महात्मा फुले यांची भाषाशैली



            भाषाविज्ञानाने साहित्य समीक्षेला आणि शैलीविज्ञानाला अधिक सैद्धांतिक आणि बनवण्यात मोठा सहभाग नोंदवला आहे. संरचनावाद, साहित्याचा भाषिक अभ्यास किंवा शैलीविज्ञान असो या सगळ्या अभ्यासपद्धतीला भाषाविज्ञानाने मूलभूत आधारसामग्री पुरवली आहे. भाषाविज्ञानाच्या अभ्यासातूनच शैलीविज्ञान ही शाखा पुढे येऊन विकसित झाली आहे. शैलीविज्ञान भाषाविज्ञानाशी संबंधित असले तरी या विज्ञानाच्या दोन शाखा विकसित झाल्या आहेत. पहिली शाखा म्हणजे भाषिक शैलीविज्ञान आणि दुसरी साहित्यिक शैलीविज्ञान होय. भाषिक शैलीविज्ञान हे भाषेचे विश्लेषण अधिक तपशीलात जाऊन करीत असल्यामुळे त्याला सूक्ष्मशास्त्राचे रूप प्राप्त झाले आहे. हे विश्लेषण ध्वनीच्या स्तरापासून सुरू होते आणि अर्थविचारापाशी थांबते. अत्यंत सूक्ष्म पातळीवर येथे साहित्याच्या भाषेचा विचार होतो. यामध्ये ध्वनींची रचना, यमक, नाद, लय, संदिग्धता, प्रतीकात्मकता, रूपक, पुनरुक्ती, अलंकार आदी घटकांचा किचार केला जातो. हा विचार कवितेचे विश्लेषण करण्यासाठी अधिक उपयोगी पडतो. परंतु कथा, नाटक, कादंबरी, गद्यलेखन आदींच्या विश्लेषणासाठी भाषिक शैलीविज्ञान अपुरे पडते. या दीर्घ साहित्यप्रकारांचा भाषिक अभ्यास करण्यासाठी साहित्यिक शैलीविज्ञान उपयोगी पडते. ही शाखा साहित्याचा स्थूल अंगाने विचार करते. म्हणजे या शाखेत परिच्छेद किंवा प्रकरण महत्त्वाचे मानले जाते. कलाकृतीच्या रूपाचाही विचार येथे केला जातो. हा विचार साधारणपणे निवड, मांडणी, पात्रविकास, संवाद, रूप, संदर्भ, वातावरण, निवेदन, निवेदकाचा कल, त्याची अभिव्यक्त होण्याची पद्धती, लेखकाचा दृष्टिकोन, आकृतिबंध, रूपकात्मकता, कथावस्तूचा गाभा अशा काही अंगाने हा विचार केला जातो. या दोन्ही शाखांची स्वतंत्र मांडणी केली जात असली, तरी साहित्याच्या शैलीची चिकित्सा दोन्ही शाखांच्या मदतीने करावी लागते. त्यामुळे महात्मा फुलेंच्या भाषाशैलीचा विचारही येथे दोन्ही अंगाने करावयाचा आहे. हा विचार मात्र स्थूल रूपांत करावयाचा आहे. कारण शोधनिबंधाची मर्यादा विचारात घेता आणि म.फुल्यांच्या लेखनाची व्यापकता लक्षात घेता त्यांच्या शैलीचा अभ्यास सूक्ष्मपणे करता येणे येथे तरी शक्य नाही.  
            ज्या पारतंत्र्याच्या काळात हळबे-गुंजीकर-रिसबूड धाटणीचे रंजनप्रधान आणि अत्यंत करमणूकप्रधान लेखन, भाषांतर प्रकाशित होत होते; केवळ मलमपट्टीच्या सुधारणा करून शिक्षण फक्त आपल्याच पदरात पाडून घेण्याची परंपरा निर्माण होत होती त्या काळात सर्वस्वी नवी आणि सगळ्या अभिरूचीला नकार देत अस्सल देशी अभिरूची निर्माण करणे आणि त्यासाठी सगळ्या देशी रूपबंधांचा वापर करणे ही अत्यंत अशक्य कोटीतली गोष्ट म.फुले करू पाहत होते. त्यासाठी त्यांनी काय काय भोगले त्याचा तपशील सर्वश्रूत आहे. तो या निबंधाचा विषय नाही; परंतु त्यांचे शैलीविषयक कार्य समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्या काळातच नव्हे तर आजही त्यांचे साहित्यिक फुले म्हणून नीट मूल्यमापन झालेले नाही. ते करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. कारण आजचा काळ हा सांस्कृतिक दबावाचा, पडझडीचा आणि तितकाच कणाहीन होण्याचा आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर अशी परिस्थिती यावी, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे. अशावेळी म. फुल्यांचे नव्याने मूल्यमापन होणे अत्यंत गरजेचे वाटते. यातून नव्या लिहिणार्‍या आणि भूमिका घेऊ पाहणार्‍या लेखकांना काही एक दिशा आणि बळ मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
            एकूणच भाषा आणि शैलीच्या अंगाने जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा मराठी समीक्षेत या विषयाचा प्रचंड दुष्काळ दिसून येतो. गद्याची शैलीशास्त्रीय समीक्षा तर सोडाच, परंतु कवितेच्या समीक्षेतही अशोक केळकर, भालचंद्र नेमाडे, रमेश धोंगडे, मिलिंद मालशे, दिलीप धोंडगे अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नावे या क्षेत्रात सापडत नाहीत. मग बाकीच्या साहित्यप्रकाराबद्दल तर न बोललेले बरे. ही नोंद यासाठी की, एक तर गद्याच्या शैलीशास्त्रीय अभ्यासाची परंपरा मराठीत नाही. त्यातही पुन्हा म.फुल्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा शैलीविचार हा अत्यंत व्यापक विषय आहे. या विषयावर गं.बा. सरदार, स.गं. मालशे, भा.ल. भोळे आणि भालचंद्र नेमाडे यांचे एकेक लेख आहेत. त्यांचा अपवाद वगळता महात्मा फुल्यांच्या शैलीवर फारसे लेखन झालेले दिसत नाही.      
            म. फुले यांनी साधारणपणे १८५५ पासून लेखनाला सुरुवात केलेली दिसते. नाटक, काव्य, कादंबरीसदृश्य लेखन. वैचारिक लेखन, निबंध, पत्रलेखन अशा विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. निवड आणि मांडणी ही शैलीची दोन महत्त्वाची तत्त्वे असतात. या अंगाने आपण विचार करायला लागलो तर म. फुल्यांच्या आशय, रूप आणि भाषा या घटकांच्या निवडीमागची भूमिका आपल्या लक्षात येते. त्यांनी जो आशय लेखनासाठी निवडला आहे तो पूर्णत: नवा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा आशय सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा आणि त्यांच्या शोषणाच्या नकाराचा आहे. त्यासाठी ते साहित्याचे जे रूप घडवतात ते पुन्हा नवीन आहे. म्हणजे ते एकाचवेळी लोकनाट्याला आधुनिक नाटकाच्या रुपांत सादर करतात. अभंगाची मोडतोड करीत अखंडाची रचना करतात. वैचारिक आणि पाश्चात्य कथनपरंपरेच्या मिश्रणातून कादंबरी घडवण्याचा प्रयत्न करतात. भाषेच्या बाबतीत तर ते अधिकच जागृत दिसतात. कारण त्यांच्या लेखनाची भाषा ही अस्सल मराठी आहे. जो प्रयत्न छ. शिवरायांनी केला होता तो प्रयत्न म. फुल्यांनी साहित्याच्या भाषेत पहिल्यांदा केला आहे. आधुनिक मराठी गद्यात हे पहिल्यांदा घडले आहे. कारण त्यांनी तत्कालीन परंपरा नाकरीत जी बोली साहित्यात वापरली आहे, ती क्रांतिकारक घटना आहे. प्राचीन परंपरेत हे काम जरी ज्ञानदेव, तुकाराम, चक्रधर आदी संतांनी केले असले तरी त्यांच्या पुढे जाऊन तत्कालीन ब्राह्मणी परंपरेला छेद देत बोलीला जो सन्मान त्यांनी मिळवून दिला आहे, तो लक्षणीय आहे.
            त्यांच्या लेखनाचा मुख्य हेतू शोषणाला नकार देण्याचा असला व काही वेळा आशयाच्या मांडणीत पुनरूक्ती दिसत असली तरी त्यांच्या रचनाप्रकारांत इतकी विविधता आहे की, केवळ शैलीच्या अंगाने विचार करायचे म्हटले तरी एका स्वतंत्र ग्रंथाची निर्मिती होईल. त्यांच्या लेखन निवडीमागचा हेतू केवळ रंजन अथवा प्रबोधन नसून विद्रोह, परिवर्तन व सांस्कृतिक हस्तक्षेपाचे हत्यार हा राहिला आहे. म.फुले लिहितात तो कालखंड पारतंत्र्याचा आहे. या काळातही त्यांची विचार करण्याची आणि व्यक्त होण्याची धारणा लक्षणीय वेगळी आहे. ते प्राचीन भारतीय इतिहासाचे पुनर्वाचन करून नवा इतिहास वाचकांपुढे ठेवतात. इंग्रजांच्या सत्तेचा फायदा घेत सामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू पाहतात. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठीच कामगिरी करतात. साहित्याच्या परंपरा मोडीत काढून आपले स्वत:चे नवे रूपबंध घडवतात. परिवर्तनासाठी कृतिशील आणि भाषिक विद्रोहाची भूमिकाही ते घेतात.
            रचनांच्या शीर्शकातून त्यांच्या भाषिक विद्रोहाच्या भूमिकेचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. त्यांनी 'तृतीय रत्ना'च्या दृष्टीतून छ. शिवरायांना कुळवाड्यांचा राजा म्हणून सादर केले. हंटर कमिशनच्या पुढे साक्ष देऊन त्यांनी 'शेतकर्‍याचा असूड' उगारला. त्यांनी 'ब्राह्मणांच्या कसबा'पुढे शूद्रांना 'गुलामगिरी'चे जिणे जगावे लागते, हे लक्षात आणून देऊन नाकारण्याचा 'इशारा'ही दिला. केवळ इशारा देऊन ते थांबले नाहीत; तर त्यासाठी 'सार्वजनिक सत्य धर्मा'ची स्थापना करून नवी पर्यायी व्यवस्था निर्माण केली. केवळ पद्यामध्ये त्यांनी अभंग, ओवी, पाळणा, अखंड, आरती, पोवाडा, मंगलाष्टक, आर्यादी विविध वृत्ते, मंगलाचरण, मंत्र असे अनेक रचनाप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. त्यातही पुन्हा संवादीलय, विरोधीलय, ध्रुवात्मक मांडणी, नाद, स्वर असे अनेक घटक अंतर्भूत झालेले आहेत. हे हाताळताना त्यांनी मूळ रचनाप्रकारात लवचिकपणा आणला आहे. कधी त्यात मोडतोड केली आहे. तर कधी मूळ रचनाप्रकाराचे विषय आणि उद्देश नाकारून त्यात नवीन आशय आणि उद्देश भरला आहे. म. फुल्यांच्या पद्यरचनेचा विचार सूक्ष्मपणे करता येतो. त्यांच्या अखंडादि रचनेत लयीच्या तत्त्वाला संवादाची बैठक लाभली आहे. त्यामुळे त्यांनी अभंगाची बंदिश नाकारून मुक्त अशी अखंडाची रचना केली आहे. त्यांच्या या रचनेत नाद, यमक, अनुप्रास, अलंकार, रूपक, छंद, वृत्त आदींचा समावेश आहे. पण त्या सगळ्याला लोकलयीच्या सादरीकरणाचा संदर्भ आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्यांच्या रचनेत साधेपणा आढळत असला तरी त्यामागे लोकलयीतला मोकळेपणा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी काही उदाहरणे पाहता येतील. (इथून पुढे घेतलेली सर्व उदाहरणे आणि पृष्ठ क्रमांक हे य. दि. फडके यांनी संपादित केलेल्या' महात्मा फुले समग्र वाड्.मय' या ग्रंथाच्या सुधारित पाचव्या आवृत्तीतून (१९९१) घेतलेली आहेत.)  
                        'अंत्यजांनो, तुम्ही उपकार स्मरा । पोटी गच्च धरा । इंग्लिशास ।।
                        आर्यहितासाठी न्याशनल सभा । शूद्रादीका शोभा । कशी राहे ॥
                        गोर्‍या लोकां घ्यावें सभेमध्ये जावें । हाणून पाडावें । ब्रह्मकुट ॥
                        मर्दुमकीनें रक्षा सद्विवेकास । सौख्य मानवास । जोती म्हणे ॥' (५५१-५२).  किंवा
                        'अंगवस्त्रे ज्यास धुण्याचा कंटाळा । चोळी वेळोवेळा । दोन्ही कांखा ॥
                        दांट विचकूनी जांघांस चोळी । काढीताच मळी । गार वाटे ॥
                        वस्त्रांतील उवा चिमटीने धरी । चोळोनिया मारी । मुकाठ्याने ॥
                        अंगवस्त्रें स्वच्छ ठेंऊ विसरतो । निंदे पात्र होतो । जोती म्हणे ॥' (५५४).
या ठिकाणी छोट्या (८-८ अक्षरे) आणि मोठ्या (६-६-६-४ अक्षरे. या अभंगात १२ अक्षरानंतर उभा दंड असतो आणि शेवटी १० अक्षरानंतर दंड असतो. तर शेवटच्या चरणाअगोदर निर्मिकाचे नाव असते.) अभंगाची मोडतोड केलेली दिसते. फुले मात्र तिसर्‍या चरणानंतर उभा दंड देतात. आणि शेवटच्या चरणात निर्मिक म्हणून स्वत:चे नाव घालतात.  कारण त्यांचा हेतू केवळ काव्य करणे हा नाही किंवा केवळ उपदेश देणे हा नाही; तर शूद्र माणसाचे जीवन बदलले पाहिजे, त्याच्या जगण्याचा स्तर उंचावला पाहिजे ही धारणा असल्याने त्यांच्या रचनेत सहजता, संवाद, लोकलय, मोकळेपणा आणि बोलीचा वापर दिसून येतो. हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग आहेत. यात यमक आहे, पण त्याचा सोस नाही. अलंकार आहेत पण ते जीवनाशी लगडून आलेले आहेत. नाद आहे पण तो अनेकदा जाणीवपूर्वक तोडला आहे. लय आहे, पण ती बोलीशी संवादी आहे. या रचनांबरोबर त्यांनी पाळणा, ओवी, मंगलाचरण, आरती आदी अनेक छंद हाताळले आहेत. हे छंद हाताळताना त्यांनी त्यातही लवचिकपणा आणून एकप्रकारे तत्कालीन साचेबंदपणाला नकार दिला आहे. हा नकार फक्त रचनेच्या साचेबंदपणाला नव्हता तर तो आशयाला आणि मुळ रचनेच्या हेतूलाच नकार होता. त्यामुळे त्यांच्या पद्याला एक वेगळेपणा आलेलादिअस्तो. कारण या सगळ्या पारंपरिक लोककला प्रकारात देव, धर्म, विधी, परंपरा, श्रद्धा आदी विशेष आढळतात; नव्हे तर तेवढ्यासाठीच या रचानाप्रकारांची निर्मिती झालेली दिसते. पण फुले मात्र या मूळ भूमिकेलाच सुरुंग लावून, त्यांना नाकारून,  विवेकाचा आवाज बुलंद करू पाहतात. विवेकाच्या आणि तर्काच्या कसोटीवर सगळी मूल्ये घासूनपुसून मगच त्याची मांडणी करतात. त्यामुळे त्यांच्या लेखणीला तीव्र धारदारपणा येतो. रचना जरी पद्यात आणि गेय असली त्यातली तीव्रता आणि उपदेशातली सहजलयात्मकता या विरोधात्म नात्यातल्या लयीमुळे त्यांच्या पद्याला उठावदारपणा प्राप्त होतो.       
            म.फुलेंच्या शैलीचा अत्यंत महत्त्वाचा आणि चटकन नजरेत येणारा विशेष म्हणजे संवादीशैली. हा संवाद पुन्हा ते कोणाशी करतात, तेही महत्त्वाचे आहे. कारण ते कायम शूद्र लोकांशी, शेतकर्‍यांशी, बायकांशी, मायबाप सरकारशी बोलताना दिसतात. प्रसंगी भट सावकार अशा मंडळींशी सवाल जबाब करतात. सामान्य शूद्रांशी बोलताना त्यांच्या शैलीत आपुलकी, समजून सांगण्याची भावना, त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारी तर्काची भाषा, त्यांच्याच बोलीत बोलून आपलसं करून घेण्याची सहजलय हे संवादीशैलीचे विशेष आहेत. तर ते जेव्हा मायबाप सरकारशी किंवा शोषक असणार्‍या ब्राह्मण वर्गाशी बोलायला लागतात तेव्हा त्यांची भाषा तात्त्विक, वैचारिक, पांडित्याचे दर्शन घडवणारी, उपहास आणि विडंबनाने भरलेली, विद्रोही रूप धारण केलेली असते. अशावेळी त्यांच्या रचनेत आणि वाक्यातही दीर्घत्व यायला लागते. इंग्रजी धाटणीची वाक्यरचना आणि संस्कृतप्रचुरता यायला लागते. या निवडीमागची त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे, फुले हे खर्‍या अर्थाने विवेकनिष्ठ आधुनिकवादी विचारवंत आणि साहित्यिक ठरतात. यासाठी काही उदाहरणे पाहता येतील.
उदा., बरें, त्यावेळेस प्रजेची तरी खाऊन पिऊन सरकारी कर देण्याजोगी स्थिति होती काय? मुळीच बोलावयास नको. तिची जी काय दशा होती ती सांगता पुअरवत नाही... आता स्त्रियांचे पोशाखाविषयी विचाराल, तर तो सांगण्यास आम्हास दु:ख वाटते. त्या बिचार्‍या त्यावर काय समजून आपले दिवस काढीत अ‍सतील ते असोत, परंतु यांच्याकडून त्यांना तीळमात्र सुख मिळत नसे ( इशारा, ३९०-९१).
या संवादी शैलीत फक्त कुणाशी तर बोलण्याचा भाव नाही, तर मुळात ही शैली पारंपरिक लोकप्रयोगातील कथनशैली आहे. लग्न, यात्रा अशावेळी ज्या लोककला सादर होत असत, त्यात अशाप्रकारच्या शैलीचा वापर केला जात असे. विशेषत: लग्न आणि यात्रेच्या वेळी अशा कला गावातील मंडळी सादर करीत असायची. यामधून केवळ रंजन होत   नव्हते तर तमाशातील कलाप्रकारासारखे सवाल जबाब ही चालायचे. त्याचेच विकसित रूप फुले वापरताना दिसतात. सवाल जबाबात जी एक तर्कनिष्ठ विचार करण्याची वृत्ती तयार व्हायची, त्या पद्धतीची लेखनशैली येथे आलेली आहे. तर्काची आणि तत्त्वज्ञानाची जोड देऊन आकारलेली ही शैली म्हणूनच परिणामकारक ठरली आहे. या संवादीशैली संदर्भात भालचंद्र नेमाडे लिहितात, 'त्यांच्या बहुतेक ग्रंथावर मिशनरी संवाद पद्धतीचा आणि मिशनरी हिंदुत्वविरोधी विचारसरणीचा प्रभाव आहे. त्यातील कित्येक प्रश्नोत्तरे प्रत्यक्ष मिशनरी प्रचारवाड्.मयातही त्यांच्याआधी वापरलेली दिसतात. प्रश्नचिन्हानंतरचे 'जसे', 'कारण', 'म्हणून' असे जुळणी करणारे शब्द थेट मिशनरी मराठी शैलीतून फुल्यांनी घेतलेले दिसतात. अपेक्षित नसलेली परंतु उत्तरासाठीच केवळ अगोदर आलेली प्रश्नार्थक विधाने ही जॉन बनियनची खास शैलीही फुल्यांमध्ये दिसते.' (महात्मा फुले गौरव ग्रंथ : संपा. पी.बी. साळुंखे, एम. जी. माळी, ग.प्र. प्रधान आदी, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, मुंबई, १९८२, पृ. ७०२). अशाप्रकारची रचना ही त्यांची खासीयत आहे.     
१. आमच्या जहामर्द इंग्रज सरकारच्या कारस्थानाने एकंदर सर्व हिंदुस्थानांत हमेशा लढायांचे धुमाळ्यांत वध होण्याचे बंद पडल्यामुळे चहूंकडे शांतता झाली खरी, परंतु या देशांत स्वार्‍या, शिकारी बंद पडल्यामुळे एकंदर सर्व लोकांचे शौर्य व जहामर्दी लयास जाऊन राजेरजवाडे 'भागू बाया'सारखे दिवसा सोवळे नेसून देवपूजा करण्याचे नादांत गुन होवून रात्री निरर्थक उत्पत्ति वाढवण्याचे छंदात लंपट झाल्यामुळे, येथिल चघळ खानेसुमारी मात्र वाढली. यामध्ये सर्व शेतकर्‍यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले की, कित्येकांस आठ आठ दहा दहा पाभरीचे पेर्‍यावर गुजारा करावा लागतो, असा प्रसंग गुजरला आहे. व अशा आठ आठ दहा दहा पाभरीचे पेर्‍याकरिंता त्यांना एकदोन बैल बाळगण्याची ऐपत नसल्यामुळे ते आपली शेते शेजार्‍यापाजार्‍यांस अर्धेलीने अथवा खंडाने देऊन, आपली मुलेमाणसे बरोबर घेऊन कोंठेतरी परगावी मोलमजुरी करून पोट भरण्यास जातात (शेतकर्‍याचा असूड, २६८).
२. सदरी लिहिलेल्या प्रतिवर्षी येणार्‍या सणांशिवाय मधूनमधून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण व ग्रहांचे उलटापालटीचे संबंधाने शेतकर्‍यापासून भटब्राह्मण नानाप्रकारची दाने घेऊन एकंदर सर्व पर्वण्या पाळीपाळीने बगलेत मारून व्यतिपात भाऊबळाने शेतकृयांचे आळोआळीने भीक मागत फिरतात. शिवाय शेतकृयाचे मनावर हिंदुधर्माचे मजबूत वजन बसून त्यांनी नि:संग होवून आपले नादी लागावे म्हणून, सधन शेतकर्‍याचे घरोघर रात्री भटब्राह्मण कधीं कधीं पांडवप्रताप वगैरे भाकड पुराणांची पारायणे करून त्यांजपासून पागोट्याधोत्रासह द्रव्यावर घाला घालून, कित्येक निमकहरामी भटब्राह्मण आपल्या शेतकरी यजमानाच्या सुनाबाळांस नादी लावून त्यांस कुकूचकू करावयास शिकवितात (शेतकर्‍याचा असूड, २६४-६५).
            अशा प्रकारच्या रचना पद्यातही आढळून येतात.
                        'स्नानसंध्या नित्य टिळाटोपीवर ॥ घेती मांडीवर जारीणीस ।।      
                        नेसुनी सोवळे विटाळसा झाला ॥ शिवेना शूद्राला शुद्ध कैसा ॥
                        श्रवण वेदाचे शूद्रा बंद केले ॥ मुळी शिकविले इंग्लिशांना ॥
                        भूदेव होवूनी पाया पडविती ॥ पायथी पडती रांडाच्याहो ॥' (ब्राह्मणाचे कसब, १०७).   
या उदाहरणांमधून वर उल्लेख केलेले शैलीविशेष दिसून येतात. ब्राह्मण वर्गाशी बोलताना किंवा त्यांच्याविषयी लिहिताना त्यांची भाषा पल्लेदार तर बनतेच; परंतु ती बोचरी, उपहासात्मक आणि उपरोधी बनते. तसेच  विरोधी चित्रे (ब्राह्मणाचे कसब) जवळ-जवळ उभे करून ध्रुवात्मक मांडणी केल्यामुळे त्यातल्या शोषणाची आणि दुटप्पीपणाची प्रभावी चित्रमालिका साकार होत जाण्याने अनुभवाला एक वेगळीच उंची लाभते. शोषणाची तीव्रता लक्षात यायला मदत होते. हीच शैली शेतकर्‍याची दैन्यावस्था नोंदवताना मात्र खूप हळवी आणि समंजस, वास्तवाला भिडणारी, संवादी आणि समजून सांगणारी बनत जाते. अशावेळी त्यांच्या विचारातील आणि मांडणीतील तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा समन्वय लक्षात घेण्यासारखा असतो. त्यांच्या भाषेत प्रमाण मराठी आणि बोलीतील शब्दांच्या वापरामुळे जशी एक सहजलय दिसून येते; तशीच संस्कृत, अरबी-फारसी भाषेतील शब्दांच्या आणि वाक्यरचनेच्या वापरामुळे एक प्रकारचा भारदस्तपणाही आलेला दिसतो. त्यांच्या शैलीचा हा विशेष सर्वत्र दिसतो. त्यमुळे त्यांची शैली ही फुलेशैली म्हणून ओळखली जावी इतकी स्वतंत्र, प्रभावी आणि नवी आहे.
            म. फुले यांच्या भाषिक शैलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आधी निष्कर्ष किंवा विधान किंवा थेट विषयप्रवेश करून ते आपल्या लेखनाला सुरूवात करतात. मूळ मराठी भाषेचा आणि माणसाच्या स्वभावाच्या नेमकी उलट मांडणी ते करीत जातात. म्हणजे मराठी माणूस आधी नमनाला घडाभर तेल घालवतो आणि बुडाभर तेलात सार्‍या विषयाचे सार सांगून रिकामा होता. फुले नेमके उलट करतात. आधी ते प्रमेय रचतात किंवा मांडतात आणि मग त्याच्या पुष्ट्यर्थ उतरंडीसारखी मांडणी करून आपला मुद्दा स्पष्ट करतात. मराठी ग्रंथकार सभेच्या पत्रात ते प्रारंभीच लिहितात, 'वि.वि. आपले ता. १३ माहे मजकूरचे कृपासोबतचे विनंतिपत्र पावले. त्यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोड्या दादा, ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याने खुषीने व उघडपणे देववत नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ बसत नाही.'(३४४).
या विधानाने पत्राला प्रारंभ करून त्याच्या पुष्ट्यर्थ पुढे त्यांनी आपली मांडणी केली आहे. प्रारंभी ते कोणतीही प्रत्तावना करीत नाहीत. थेट विषयाला हात घालून अगदी विषयाची दिशा काय आहे, हे सूचित करतात. 
उदा. धोंडीबा:- युरोपखंडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होवून दास करण्यची बंदी केली, याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला, कारण मनुसंहितेत लिहिले आहे की, ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून ब्राह्मणांस उत्पन्न केले; आणि त्या ब्राह्मणांची फक्त सेवाचाकरी करण्याकरिता त्यानें आपल्या पायांपासून शूद्रांस उत्पन्न केले.
जोतीराव:‌- इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली, याजवरून त्यांनी ब्रह्म्याच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नानाप्रकारचे लोंक आहेत, त्यांस ब्रह्म्याने कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याजविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे?(गुलामगिरी, १४१).  
आधी निष्कर्ष किंवा विधान किंवा थेट विषयप्रवेश करून ते आपल्या लेखनाला सुरुवात करून त्याच्या समर्थनार्थ,  पुराव्यादाखल उदाहरणांसह इमारत उभी करीत जातात. आणि शेवटी पाया पक्का करतात. आधी कळस आणि मग पाया या पद्धतीने ते आपली मांडणी करतात. त्यांच्या शैलीचे हे वैशिष्ट्य नेमके मराठीच्या छेद देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत वास्तवाचे तपशील भरपूर असले तरी ते रटाळ होत नाहीत आणि उगीच पुस्तकांची पृष्ठसंख्या वाढत नाही. त्याचबरोबर त्यांना काय म्हणायचे ते आधीच स्पष्ट होते. त्यामुळे वाचकांच्या संकल्पना किंवा विचार करण्याच्या दिशा निश्चित आणि नीट होतात. नाहीतर अनेकदा मजकूर उत्तम असूनही त्याची मांडणी उलटी झाल्यामुळे वाचकांना शेवटपर्यंत विचाराचे आकलन नीट होत नाही. त्यामुळे वाचक आपले वाचन अर्ध्यावर सोडण्याची शक्यता असते. अशी धोक्याची शक्यता फुले कधीच स्वीकारत नाहीत.
            त्यांच्या या शैलीविशेषाकडे कोणा अभ्यासकाचे-साहित्यिकाचे लक्ष गेलेले दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यातही पुन्हा 'गुलामगिरी' नाटक नसूनही ते लेखन संवादातून आकारल्यामुळे त्यामध्ये एक वाचनीय रंजकता येते. त्यातही पुन्हा पारंपरिक लोकनाट्य आणि लोकशैलीचा परिणाम पचवून त्यांनी हे रूप घडवल्यामुळे त्याची परिणामकारकता वाढते. येथे केवळ दोघांचे संवाद नाहीत. त्यामध्ये अज्ञानी, भाबडा वाचक आणि शंकेखोर, आपलेच म्हणणे खरे ठरवणारा शोषक दडला आहे. तर त्याच्या प्रश्नांना उत्तरे देणारा धोंडीबा हा लेखकाच्या विधानाला बळकटी देणारा असल्याने हे संवादरूपी लेखन वाड्.मयीन गुणवत्तेकडे गेले आहे. हे शैलीतत्त्व त्यांनी आपल्या पद्यरचनेतही योजलेले दिसते. छ. शिवरायंच्या पोवाड्याची सुरुवात त्यांनी,          
                        'कुळवाडी-भूषण पवाडा गातो शिवाजी भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥
                        लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा । काळ तो असे यवनांचा ॥'
अशी करून गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय या प्रतिमेला छेद दिला आहे. या प्रतिमाभंजनात आणि नव्या प्रतिमा निर्माण करण्यात फुले माहीर आहेत. त्यांनी याच अंगाने सगळ्या पुराकथांचे विश्लेषण केले आहे. 'ब्राह्मणाचे कसब' मध्येही अशाच सुरूवाती केलेल्या आढळून येतात. घरभरणीच्या लुटण्याच्या अभंगाला सुरुवात करताना ते लिहितात,
                        'जळो जळो तुमचे जिणे । उद्योग्या आधीं ताजे खाणे ॥
                        हे बा कृत्य लाजिरवाणे । समजोत कपटी शहाणे ॥'  
तर पोथी वाचण्याच्या बहाण्याच्या पवाड्याची सुरूवात करताना ते लिहितात,  
                        'बामनी कावा । समजून घ्यावा ।
                        आहेत अकलेचे खबरदार । शहाणे ठक आरपार ॥' (९७-९८) अशी करतात.
शूद्रातिशूद्रास उपदेश करताना ते आपल्या अखंड रचनेच्या प्रारंभी ते म्हणतात,
                        'आर्यांच्या इराणी नाही भेदाभेद । घ्यावा हाच शोध । वेदामध्ये ।
                        गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धनी । इराणी मागूनी । आले इथे ॥' (५७८).
कुळंबिणीच्या अखंडात ते प्रारंभीच लिहितात,
                        'कोंबडा आरव होता प्रात:काळी । बसे जातेपाळी । शूद्रजाया ।
                        गाण्याचा धिंगाणा  भ्रतार उठतो । बईलास नेतो चरावया ।
                        अर्णोदय होता करी शेणकूर । वाही पाट्यावर । केरासह ।
                        धूर्त आर्य तिला म्हणे कुळंबीण । गुणाचे कमी न । जोती म्हणे ।। ( ५८४).
ही उदाहरणे नोंदवण्याचे कारण असे की, केवळ गद्यातच नव्हे तर फुले हा प्रयोग पद्यातही करताना दिसतात. यामगील त्यांची भूमिका म्हणजे निवेदकाचा हेतू किंवा लेखकाच्या हेतूकथनाचे हेतूपूर्व प्रयोजन हेतूगर्भ लेखनात आणि हेतूपश्चात अभिरूचीतही दिसून येते. असा प्रयोग मराठीत दुर्मीळ आहे. याची मुबलक उदाहरणे फुल्यांच्या लेखनात सापडतात. म्हणून भा.ल. भोळे लिहितात, 'फुले केवळ आद्य शिवशाहीर, आद्य स्वतंत्र व सामाजिक नाटककार, आद्य उपहासलेखकच नव्हेत तर ते बहुजन भाषेचे आद्य शैलीकारही आहेत. त्यांची ही परंपरा पुढे टिकून न राहिल्यामुळेच आजच्या मराठी भाषेलाच अवकळा, भोंगळपणा आला आहे; ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास ही गरज पटू शकेल.
(महात्मा फुले गौरव ग्रंथ, उनि, पृ. ६८५).    
            शिव्या आणि तत्सदृश्य शैली हाही त्यांच्या लेखनाचा खास विशेष आहे. ते केवळ भाषेकडे किंवा त्यातल्या शिवीकडे विद्रोहाचे रूप म्हणून पाहत नाहीत, तर एक भूमिका म्हणून पाहत आले आहेत. म्हणजे त्यांनी गणपतीच्या आरतीचे जे विडंबन केले आहे ते केवळ गणपती नाकारण्यासाठी नाही, तर संस्कृतची छुपी सांस्कृतिक दहशत काय आहे, हे त्यांनी आरतीचा सरळ सरळ मराठी भावानुवाद करून सिद्ध केले आहे. केवळ एवढ्यावरच ते थांबत नाहीत तर भाषेच्या मोकळेपणाच्या अभिव्यक्तीच्या दिशाही ते सूचित करताना कवी तुकोबाशी नाते सांगतात. फरक इतकाच तुकोबा श्रद्धाशील आहेत. तर फुले अश्रद्धेय वाटतात. पण ते तसे नाहीत; हे त्यांच्या निर्मिकाच्या कल्पनेवरून सिद्ध होते. देव आणि धर्माला जोडून येणार्‍या पुराणकथा, देव, परंपरा, श्रद्धा आदी सगळ्या गोष्टींना नकार दिला तरच शोषणमुक्ती मिळेल अशी त्यांची धारणा असल्यामुळे त्यांच्या भाषेला अधिकच बोचरे आणि उपहासाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुराणकथांचे त्यांनी केलेले वाचन या अर्थाने महत्त्वाचे आहे. त्यांनी 'गुलामगिरी'तील अवतारांचे केलेले विश्लेषण मुळातून वाचण्यासारखे आहे.
१. ब्रह्मास जर खरोखर चार तोंडे होती, त्याचप्रमाणे त्यास आठ स्तने, चार बेंब्या, चार मूत्रद्वारे, चार मलद्वारे असली पाहिजेत: पण त्याजविषयी खात्री होण्याजोगा लेख कोठेच आढळत नाही. (१४३).  
२. पद्मा डुकरिणीने वरहास त्याचे लहानपणी आपल्या स्तनाचे दूध पाजिले असेल यात काही संशय नाही: परंतु पुढे काहीसा मोठा झाल्यावर आपल्या ब्रह्मापतीसहित वराहास बरोबर घेऊन गावांतील खिंडारातील अतिसुकुमार फूलझाडांचा चारा चरण्याची त्यास सवय लागून मोकळी झाली असेल किंवा कसे, हे वराह आदिनारायणच जाणे (१४७).
३.                     'तीर्थयात्री आर्य अंगवस्त्रे नेती । फुगड्या खेळती । पंढरीस ।।
                        शूद्र घरी पूजा खेळ मांडी भट । देवा करी न++ । हितासाठी ।।                
                        बळीस्थानी किती आर्यभट लंड । देवाजीचे भंड ज्यांनी केले ।।'  (अखंडादि काव्यरचना, ५७४)
त्यांच्या या रचनेतून केवळ भाषिक प्रगल्भताच नव्हे तर भाषेचे वजन, शब्दांच्या वापरातील सूक्ष्मता, अर्थामागचे राजकारण, अर्थाची वलये, बोलीचे महत्त्व, सामान्य माणसांच्या भाषेतून व्यक्त होताना जाणवणारा जिव्हाळा असे अनेक विशेष प्रत्ययास येतात. या संदर्भात स.गं.मालशे लिहितात, 'त्यांची शैली उघडीवाघडी वाटली तरी ती खास त्यांचीच आहे. तिला नागरतेची, प्रौढतेची वा औपचारिकपणाची पडदपोसी ठाऊक नाही. ती रांगडी, चढाईखोर, आणि विलक्षण बोलघेवडी आहे. शूद्रातिशूद्राच्या हीनदीन स्थितीकडे पाहून ती कळवळते आणि त्या स्थितीला कारणीभूत असणार्‍या ब्राह्मणी वर्चस्वावर जहरी आगपाखड करते. शूद्रातिशूद्रांच्या आत्मविस्मृत वृत्तीमुळे वैतागते. मनुशंकराचार्यांनी जातिभेद आणि कर्मकांडे वाढविली म्हणून त्यांच्यावर कडाडून हल्ले चढवते. बोलक्या सुधारकांचे उपहास-उपरोधाने वाभाडे काढते, त्यांच्या नादी लागलेल्या लब्धप्रतिष्ठित शूद्र पुढार्‍यांना खावडावाने टोमणे मारते, इंग्रजी राज्यामुळे शतकानुशतकाच्या अन्यायाला वाचा फुटण्याची संधी प्राप्त झाली म्हणून ती त्या राज्याला वरदान मानते आणि त्या उत्पाती बंडे आरंभणार्‍यांना शिव्याशाप देते...जातिभेद आणि विषमतेचा विचार डोळ्यांपुढे आला की, ती हिरवी-पिवळी होते. हिंदुधर्मातील कर्मकांडावर ती थट्टेखोर भाष्य करते आणि जातिभेदासारख्या दुष्ट रूढींच्या छाताडावर थयाथया नाचावे, असे तिला वाटते. मात्र या भाषाशैलीत ओतप्रोत भरून राहिलेला हा संतापाचा कढ बावनकशी असतो, 'अंतरीचे धावे । स्वभावे बाहेरी' या कोटीतला असतो (महात्मा फुले गौरव ग्रंथ, उनि. पृ.६६८).
            म.फुले बर्‍याचदा ग्रांथिक वाक्यरचनेची मोडतोड करताना बोलीचा वापर करतात. बोलीतल्या अंगभूत संवादीलयीचा वापर करून निवेदनाला एक गती प्राप्त करून देतात. त्यामुळे आपण जसे बोलतो तशीच त्यांची शैली आकारत जाते. अशावेळी तिला व्याकरणाच्या नियमांचे पालन करावे वाटत नाही. उलट अधिकाधिक स्वाभाविकतेकडे ती झुकते. एखाद्या अजाण व्यक्तीला समजावून सांगताना भाषेत जी एक अनौपचारिकता आणि तळमळ असते, तीही त्यांच्या शैलीत दिसून येते. मात्र ऐकूनही तो अजाण माणूस बदलत नाही म्हटल्यावर येणारा वैतागही ती व्यक्त करते. तर शेटजी-भटजीवर तुटून पडताना ती वेगवान आणि लक्षवेधी बनते. बोलण्याच्या ओघात येणारे सगळे गुण त्यांच्या शैलीने आत्मसात करून त्याचे प्रकटीकरण केले आहे. त्याचबरोबर चिडून आणि आत्यंतिक जिव्हाळ्याने जेव्हा माणूस बोलायला लागतो, तेव्हा त्याच्या बोलण्यात एक प्रकारचे दीर्घत्व येत जाते विरामांचे भान त्याला राहत नाही, विचार आणि भावना फक्त महत्त्वाच्या वाटू लागतात. हे सगळे दीर्घत्वाचे विशेषही त्यांच्या लेखनात दिसून येतात. अर्थात या दीर्घत्वावर इंग्रजीचाही काहीएक संस्कार असल्याचे लक्षात येते. तत्कालीन गद्यात हा प्रयोग संपूर्ण नवा होता. या वेगळ्या प्रकारच्या शैलीमुळेच त्यांना आधी व्याकरण शिकून घ्या, असे सल्ले तथाकथित विद्वानांनी दिले होते. यावरून त्यांचे भाषिक द्रष्टेपण आणि वेगळेपण लक्षात येते.
१. त्यातून शेतकरी अक्षरशून्य असून त्यास सारासार विचार करण्याची बिल्कुल ताकद नसल्यामुळे तो धूर्त भाटांच्या उपदेशावरून हरीविजय वगैरे निरर्थक ग्रंथातील भाकडकथेवर विश्वास ठेऊन पंढरपूर वगैरे यात्रा, कृष्ण व रामजन्म व सत्यनारायण करून अखेरींस रमूजीकरता शिमग्यांत रात्रंदिवस +++ मारता मारता नाच्यापोराचे तमाशे ऐकण्यामध्ये आपला वेळ थोडा का निरर्थक घालवतो? त्यास मूळापासून विद्या शिकण्याची गोडी नाही व तो निव्वळ अज्ञानी असल्याने त्यास विद्येपासून काय काय फायदे होतात, हे त्या शेतकर्‍याच्या प्रत्ययास आणून देण्याऐवजी शेतकर्‍यांनी नेहमी गुलामासारखे त्याच्या तावडीत रहावे या इराद्याने शेतकर्‍यास विद्या देण्याची कडेकोट बंदी केली होती (शेतकर्‍याचा असूड, 303).
२. परंतु सतशील पंडिता रमाबाईच्या माथ्यावर पाद्री आचार्याने थोडेसे स्वच्छ पाणी शिंपडल्याबरोबर 'पंडिता र्माबाई बाटली' पंडिता रमाबाई बाटली' म्हणून भटब्राह्मणांस हाकाटी करू लागणार्‍या शुद्रांची थोरवी ती काय? अहो, कित्येक भटब्राह्मण बाटलीतील ऐन माल गट्ट करून शेवटी इंग्लडाकडे दीन वदने करून ,'रमाबाई बाटली' रमाबाई  बाटली' म्हणून रात्रंदिवस बाटल्याचा निजध्यास करितात; हेच का वाचाळ आर्य भटब्राह्मणांचे वैभवसौभाग्य? असो, यापुढे तुमची मर्जी असल्यास दुसरे काही महत्त्वाचे प्रश्न करा की, ज्यापासून आपल्या शूद्र बांधवांचे डोळे उघडतील   (सत्सार, अंक १, ३५८).
ही शैली अनघड वाटत असली आणि तिला व्याकरणिक चौकटीतून नाकरण्याचा प्रयत्न केला असला तरी मूळात ही एक स्वतंत्र अशी घडवलेली शैली आहे. या शैलीमुळे खरे तर त्यांच्या लेखनाला वाड्.मयीन महत्ता प्राप्त झाली आहे. परंतु तत्कालीन संस्कृतप्रचुर आणि इंग्रजी धाटणीच्या व्याकरणिक बडग्यामुळे या शैलीकडे कोणाचे लक्ष गेले नाही. ज्यांचे गेले त्यांनी तिला साफ नकार दिला. कारण ती सर्वहारा लोकांची शैली होती. या संदर्भात भालचंद्र नेमाडे लिहितात, 'फुल्यांनी मराठी गद्यात पहिल्यांदाच श्रमिकांची आणि शूद्रांची भाषा उमटवली. हे त्यांचे भाषिक कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. खेड्यापाड्यातील लोकांचे साधे वाक्प्रचार, संस्कृत-फारसी-गुजराती-मराठी म्हणी, नव्या रूढ हऊ घातलेल्या इंग्रजी वाक्यरचनेतही गावठी मराठीचे लयखंड आणणारी पदरचना, मुतविले-हटिवले-राजहौसी-चवरंग असे उच्चारानुसारी लेखन, वेगवेगळ्या जातवाल्यांच्या बोली, ब्रह्मदेवाला 'बेटीचोद' आडनाव ठेवणे, बळीसमोर प्रकटलेल्या आदिनारायणाला 'बंब्या' म्हणत राहणे, साहित्य संमेलनात जमणार्‍या ब्राह्मण लेखकांना 'उंटावरून शेळ्या वळणारे' म्हणणे, स्त्रीच्या पोटी जन्मून तिलाच छळणार्‍या आर्यब्राह्मणी पुरुषजातीला 'कुर्‍हाडीचा दांडा' म्हणणे- ह्या काही प्रयोगांवरून फुले हे पिंडाने भाषेच्या विलासात रमणारे व्यक्तिमत्त्व वाटते' (महात्मा फुले गौरवग्रंथ, उनि, पृ. ७०१).  
            म. फुले यांची शैली लोकसंवादी असल्याने आणि तिची लोकपरंपरा मराठीत असल्याने त्यांनी गद्यलेखनात नाट्यशैलीबरोबर नाटकाचा बंधही अधिक प्रमाणात वापरला आहे. या प्रकारच्या शैलीला साहित्यिक रूप देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. नाट्यशैलीला लगडून येणारे जिव्हाळा, उपहास, उपरोध, टिंगल, नाट्य, भारदस्तता, अलंकारिकता, सहजता, वक्रोक्ती, विडंबन, संबोधने, कृतिशीलता, परिचयात्मकता असे अनेक विशेष येथे दिसतात. त्याचे काही नमुने पुढीलप्रमाणे :
१. हल्ली शेतकर्‍यांची निहारी(उच्चाराबर हुकूम लेखन (कंस माझे), शिळ्या तुकड्यांवर लाल चटणीचा गोळा, दुपारी ताज्या भाकरीबरोबर आमटी अथवा सांडग्याचे खळगूट(बोली); रात्री निव्वळ वरणाचे पाण्यांत जोंधळ्याच्या अथवा मक्याच्या कण्या, मध्ये कधी गाजरे अथवा रताळे पिकल्यास त्यांच्या बरूबर(बोली) गुजारा करावा लागतो, तरी त्यांस नेहमी वेळच्या वेळी भाकरी मिळावयाच्या नाहीत( शेतकर्‍याचा असूड, ३०४-५). :- (जिव्हाळा आणी सहजता).
२. आता मी गारशा थंडहवाशीर रमणीय सिमला पर्वतावर जाऊन काही विश्रांती घेऊन परम दयाळू गव्हरनर साहेबांसमक्ष (उच्चारानुसारी लेखन) आपल्या पलीकडील सरकारच्या नावाने हाका मारून त्यांस शूद्र शेतकर्‍याची सुधारणा करण्याविषयी सूचवितो( शेतकर्‍याचा असूड, ३१९). :- ( उपरोध आणि नाट्य).
३. आता यावरून तूच विचार करून पहा की, जेव्हा बंब्याने (वामनावतार) आपल्या दोन पावलांत एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटविले, तेव्हा त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखाली कित्येंक गावें चेंगरून लयास गेली असतील, नाही बरे? दुसरे असे की, त्या बंब्याने जेव्हा आपले दुसरे पाऊल आकाशात ठेवितेवेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक तार्‍यांचा एकमेकांवर आदळून चुराडा झाला असेल की नाही बरें ! तिसरे असें की, त्या बंब्याने आपल्या दुसर्‍या जर सर्व आकाश आटविले तर त्याचे कंबरेपासून वरचे धड कोठें राहिले असावे? कारण मनुष्याचें दुसरे पाऊल फार तर त्याच्या बेंबटापर्यंत उंच आकाशात पोहचू शकते (गुलामगिरी, १५५). :-(उपहास, टिंगल, विडंबन, वक्रोक्ती).           म. फुल्यांच्या शैलीतला हा आपलेपणा, दंभस्फोट, संबोधण्याची आणि समजावून सांगण्याची वृत्ती, मिश्र भाषिक शब्दांची वाक्यरचना, वाक्यांचे दीर्घत्व, लेखनातील तळमळ आदी विशेष त्यांचे वेगळेपण दर्शवितात. इतकेच नव्हेतर ते कृतिशील विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक असल्यामुळे त्यांच्या लेखनाला धार येते. एकूणच काळातला भालचंद्र नेमाडे म्हणतात तसा, विवेकनिष्ठ विचारशैली निर्माण करणारा हा एकमेव लेखक आहे. केवळ शैलीत त्यांचे वेगळेपण आहे असे नव्हे तर त्यांचा इंग्रजी भाषेचा आणि रूपबंधाचा चांगला अभ्यास होता. ते आपल्या लेखनात पाश्चात्य कादंबरी, कविता या रूपांचा, पाश्चात्य विचारवंतांचा, त्यांच्या लेखनशैलीचा उल्लेख करतात; यावरून त्यांना या सगळ्यांचा परिचय असूनही आणि त्याच्या अनुकरणाची एक मोठीच लाट त्या काळी असूनही फुले त्या वाटेने जात नाहीत. ते आपली शैली आणि साहित्याचे रूप जाणीवपूर्वक घडवत आहेत, हे लक्षात आल्यावाचून रहात नाही. कारण त्यांनी अभंग आणि कविता नाकारून अखंड रचना निर्माण केली. कादंबरी लिहिण्याऐवजी त्यांनी कादंबरीसदृश्य वैचारिक लेखन केले. यामागची भूमिका आपण नीट समजावून घेतली पाहिजे. फुल्यांच्या पुढे जी कादंबरी होती, ती काल्पनिक, रंजक आणि उथळ स्वरूपाची होती. त्यामुळे त्यांना कादंबरीचा हा रूपबंध मान्य नसावा. त्यांना जे रूप घडवायचे आहे, ते केवळ काल्पनिक नको आहे, तर वास्तव आणि खोट्या कल्पना नाकारून त्या कल्पनांची चिकित्सा करणारे हवे आहे. म्हणजे एका अर्थाने ते वास्तवाचे आणि इतिहासाचे उफराटे वाचन आहे. आणि असे वाचन तत्कालीन कादंबरी करीत नव्हती. परंतु त्यांच्या गद्यलेखनाचा विचार केला तर त्यांनी त्यात निर्माण केलेली पात्रे, वातावरणनिर्मिती, भाषा, घटनाप्रसंग, कथनाच्या वेगवेगळ्या तर्‍हा, निवेदित भाषेतली जाणीवपूर्वकता, वास्तव आणि कल्पिताचा घातलेला मेळ आदी सगळे घटक कथा आणि कादंबरीचे नवे रूप घडवीत होते. पण त्याकडे तत्कालीन लेखक-वाचक-समीक्षकाने 'साहित्य' म्हणून न पाहिल्याने फुल्यांनी निर्माण केलेल्या रूपबंधांची फारशी चर्चा झाली नाही. आणि आजही या अंगाने कोणी त्यांच्या लेखनाचा फारसा विचार करायला तयार नाही. त्यांच्या रूपबंधाच्या घडणीमागे निश्चित असे तत्त्व आहे; आणि ते केवळ देशी अशा प्रकारचे आहे. त्यांनी घडवलेली ही साहित्यरूपे आणि भाषाशैली स्वतंत्र, वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा सर्वांगीण विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.

 --------------------------------
                                                                                        

                   

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट