जागतिकीकरणानंतरचे बदलते मराठी कादंबरी लेखन
- महेंद्र कदम
॥ एक ॥
जागतिकीकरणानंतरचे मराठी कादंबरी
लेखन तपासण्यापूर्वी प्रथमत: जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याचे आजच्या समाजजीवनावर
काय परिणाम झालेले आहेत,
याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. जागतिकीकरण ही संकल्पना भारतात १९९१ नंतर गॅट
करार झाल्यानंतर सुरू झालेली प्रक्रिया आहे. यामुळे भारत हा जगासाठी आणि जग
भारताच्या व्यापारासाठी खुले झाले. या कराराने काही बंधनेही भारतावर आली. जागतिकीकरणाने
खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण
आणि खाजगीकरणाला वेगाने प्रारंभ झाला. म्हणजे काही काळ सामान्य माणसाला वाटू लागले
की, आपण आता बाजरपेठेचे मालक
झालो. कारण त्याला हवी ती वस्तू चटकन मिळू लागली. बाजारपेठ व्यापार्यांच्या ऐवजी
ग्राहकांची बनली.'कर लो दुनिया मुठ्ठी
में' ही जागतिकीकरणाची टॅग लाईन
बनवली गेली. सामान्य माणसाला बर्याच प्रमाणात ही घोषणा खरी वाटली. त्याला खरेच
दुनिया मुठीत आल्यासारखी वाटू लागली. कारण हवा तो ब्रँड त्याला सहज आणि त्याच्या
खिशाला परवडेल अशा किफायतशीर किंमतीत आणि विविध रूपांत उपलब्ध झाला. तो बाजरपेठेचा
राजा झाला. त्याचा मालक बनल्याचा फील येऊ लागला. आणि नेमका तो जाळ्यात अडकला. काय
खावे, काय नेसावे,
काय
शिक्षण घ्यावे याचे सगळे अधिकार प्राप्त झाल्याचा त्याला भास झाला. आजही तो भास
त्याला खरा वाटतो आहे. म्हणूनच तो त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू इच्छित नाही. आज
शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. विद्यार्थी हा ग्राहक बनला आहे. अनेक तज्ज्ञ
त्याच्याकडे ग्राहक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे माणूस बनण्याची प्रक्रिया या
जागतिकीकरणाने मारून टाकली आहे. पण दुर्दैवाने ते कुणाला कळायला तयार नाही. कळाले
तरी वळवायला कुणी तयार नाही.
कर लो दुनिया मुठ्ठी मेंचा प्रत्यय
देण्यासाठी एक जाहिरात पुरेशी आहे. ती आहे लाईफबॉय या साबणाची.
पूर्वीचा
हा साबण अत्यंत मोठा आणि मुठीत न मावणारा पण जरासा गावठी अशा चौकोनी आकाराचा होता.
नंतर त्यात बदल करून 'आता आपल्या मुठीत
मावेल एवढा साबण' अशी
टॅग लाईन करून तो अत्यंत आकर्षक आकारात आणि मुठीत मावेल एवढा बनवून बाजारात आणला
गेला. त्याचा खप वाढला. पण दरम्यान त्याचा आकार छोटा करून आपले नुकसान केले जातेय,
हे
ग्राहकांच्या लक्षात आले नाही. आले तोवर मूळचा ब्रँड बाजारातून नाहीसा झाला होता.
अगदी याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट घडताना दिसतेय, म्हणजे
आजचेच उदाहरण द्यायचे तर जिओने प्रारंभी जो नेटपॅक मोफत दिला त्याचे ग्राहकांना
प्रचंड आकर्षण वाटले. त्याने बाकी कंपन्या सोडून दिल्या आणि जिओ प्रेफर करायला
सुरूवात केली. दरम्यान बीएसएनएल सारख्या सरकारी कंपनीला टाळे लागले. ग्राहकांना
मोफत पॅकची इतकी सवय लावली की, त्याला
आता इंटरनेटशिवाय चैन पडेनाशी झाली. आणि मग त्यांनी तीच नेटपॅक योजना नंतर हळूहळू
बीएसएनएल, आयडिया,
एअरटेल
यापेक्षा कमी पैशात द्यायला सुरूवात केली आणि त्यांचा धंदा बसवला. आता ग्राहकाला
जिओशिवाय पर्याय राहिला नाही. गरज नसताना त्याला आता नेटपॅक विकत घ्यावा लागतो आहे.
तेच अंबानी आता हजारो पट नफा कमवून देश ताब्यात घेऊ पाहताहेत. म्हणजे जीवनावश्यक
वस्तूंचा विचार करण्याची तुमची क्रयशक्ती मारून टाकली की, तुमच्यावर त्यांचे प्रोडक्ट विकत मारायला ते तयार
झाले आहेत. आणि मार्क्स म्हणतो त्या पद्धतीने
"व्यापार्याला दहा टक्के नफा असेल तर गुंतवणूक कुठेही करणे
सहज शक्य असते. वीस टक्के नफा त्याला अति उत्साहित करतो. पन्नस टक्के नफा त्याला
हडेलहप्पी आणि उद्धट बनवतो. शंभर टक्के नफा त्याला सगळे कायदे मोडून तोडून
टाकण्याची मस्ती आणतो. आणि हा नफा निव्वळ तीनशे टक्के असेल तर तो कोणताही गुन्हा
करायला तयार होतो. अगदी तो उपकार कर्त्यालाही फाशी द्यायला कचरत नाही". (प्रसाद
कुलकर्णी, जागतिकीकरण आणि
वर्तमान आव्हाने, २३८).
एकदा का नफेखोरी प्रचंड वाढली की, त्याची
माजण्याची आणि विध्वंसक वृत्ती जोर धरू लागते याची अनेक उदाहरणे आपण भारतात पाहत
आहोत. या इंटरनेटी मायाजालातून आज तरी कुणाची सहजासहजी सुटका नाही. पण काय पाहायचे
याचा त्याला अधिकार राहिला नाही. त्याला आभासी दुनियेत सामूहिक करून प्रत्यक्ष
जगात एकटे पाडण्यात ही व्यवस्था यशस्वी झालेली आहे. त्यामुळे त्याचे हे एकटेपण
अधिकाधिक या तंत्ररूपी मायाजालात कसे गुंतून राहील, याची
चोख व्यवस्था इथला भांडवलदार करीत आहे. कारण ज्या गोष्टींची गरज नाही,
त्या
गोष्टी फुकट दिल्या जात आहेत. साधी तापाची गोळी फुकट मिळत नाही नेटपॅक मात्र फुकट
मिळतो.
भांडवलदारांच्या हातचे बाहुले
बनलेले हे जागतिकीकरण कायम शेतकरी, कामगार,
सर्वहारांच्या
विरोधात उभे असलेले दिसते. म्हणजे इथली जमीन त्यांच्या घशात घालताना त्यांना विकसक म्हणून अनेक सवलती दिल्या जातात. घरांना
अत्यंत अल्प दराने कर्ज वाटप केले जाते. पण त्याच नोकरदाराला शेती घेण्यासाठी कर्ज
मिळत नाही. घरही स्थावर मालमत्ता आहे, तसेच
शेतही स्थावरच आहे. पण शेती ही उत्पादक घटक असल्याने त्यासाठी कर्ज मिळत नाही.
परंतु अनुत्पादक घरासाठी कर्ज मिळते. तीच गोष्ट चारचाकी कारची. कार सात ते नऊ
टक्के दराने कर्जावर मिळते. त्याच नोकरदाराला शेतीसाठी लागणारा ट्रॅक्टर
घेण्यासाठी अठरा ते वीस टक्के मोजावे लागतात. चैनीच्या कोणत्याही वस्तू सहजपणे
कर्जावर मिळतात; परंतु जीवनावश्यक आणि
उत्पादक वस्तू मात्र मिळत नाहीत. यातले सगळेच चित्र अगदीच नकारात्मक नसले तरी यात
सामान्य माणसाला मात्र फारसे हाती काही लागत नाही. सरकारकडून शेतकर्यांसाठी काही योजना आणल्या जातात. पण
त्या नीट राबवल्या जात नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर जवाहर रोजगार योजनेतील विहिरीचे
देता येईल. ही मदत इतकी अल्प असते की, ज्याला
मदत मिळते, त्या मदतीत त्याची
विहीर पूर्ण होत नाही. तिला पाणी लागत नाही.आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे
स्वत:चे भांडवल नसते. त्यामुळे ही योजना त्याच्या फायद्याची ठरत नाही. त्याच्या
पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक रासायनिक खते मार्केटमध्ये आली. संकरित
बियाण्यांच्या विविध जाती आल्या. पण त्या इतक्या महाग करून ठेवल्या की,
त्यात
कारखानदारांचाच फायदा अधिक झाला आहे. भारतीय शेतकरी जेव्हा काही पिकवतो आणि
त्याच्या मालाला कधी तरी भाव मिळणार असे लक्षात आले की, बाहेरून
माल आयात करून त्याच्या मालाच्या भावाची किंमत ढासळवली जाते. जेणेकरून तो उभा
राहिला नाही पहिजे अशी व्यवस्था तयार केली जाते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
म्हणजे मदतीचा आकडा तर मोठा असणार, परंतु
त्याचा लाभधारक मात्र असमाधानी.
जी अवस्था शेतकर्यांची तीच कामगार
वर्गाची आहे. म्हणजे माणूस जगला तर पाहिजे, पण
त्याच्यातला आनंद, जोश,
उल्हास
मात्र संपला पाहिजे. सर्वहारा माणसांच्या विकासाला जागतिकीकरण हात देत नाही. यामुळे
सामान्य माणूस एकटा पडत चालला आहे.
त्याच्या या एकाकीपणाला आणि अर्धवट विकासाच्या मॉडेलला हे जागतिकीकरण जबाबदार आहे.
याचे अनेक तपशील आज पुढे येत आहेत. आज " दररोज दर तीस मिनिटाला एक शेतकरी
आत्महत्या करतो आहे. जमिनींचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अवघ्या १६%
लोकांकडे ७०% जमीन आहे. तर ७०% लोकांकडे १५% जमीन आहे. १७% वरून शेतीतली गुंतवणूक
कमी कमी होत जाऊन ती ३- ५% इतकी कमी झाली आहे. शेती उत्पादनाच्या वाढीचा दर
साडेतीन टक्क्यांवरून तो दोन टक्क्यांपर्यंत घसरला आहे. रासायनिक खतांच्या
वापरामुळे ६७% जमीन नापीक अथवा निकामी बनत चालली आहे"(अच्युत गोडबोले,
जागतिकीकरण
आणि वर्तमान आव्हाने, ४९-५०).
गावे वेगाने ओस पडत आहेत. शहरांची भरमसाठ
वाढ होताना तिथलेही बकालपण वाढत आहे. हीच गोष्ट सहकाराची आहे. अलीकडे तर भाजपा
सरकारने सहकार मोडीत काढण्याचाच चंग बांधला आहे. त्यांच्या मते या क्षेत्रात
प्रचंड भ्रष्टाचार आहे. पण म्हणून ते क्षेत्रच नष्ट करून ग्रामीण पतपुरवठा कसा उभा
करणार आहोत? पाण्याचे आणि
विजेचेही याच असमान पद्धतीने वाटप सुरू आहे. शेतीऐवजी कारखान्यांना आणि शहरांना
अधिक वीज-पाणी पुरवले जाते. त्यामुळे एक असमतोलाचे चित्र तयार झाले आहे.
पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. नुकत्याच वीस टक्के ऑक्सिजन पुरवठा करणार्या अॅमेझॉन
जंगलाला ज्या पद्धतीने आगी लावल्या गेल्या आहेत, त्या
पाहता या खाजगीकरणाचा क्रूर चेहरा समोर येऊ लागला आहे. याला अनेक देश मूक समर्थन
देत निघाले आहेत. कुणी तरी एक मोठा भांडवलदार वर्ग हे जग चालवत असल्याचा भास होतो
आहे. त्यांच्या हातचे आपण सगळे बाहुले बनून राहिलो आहोत. अर्थात हाच जागतिकीकरणाचा
अजेंडा आहे.
या आर्थिक असमतोलाबरोबरच सामाजिक,
सांस्कृतिक,
राजकीय,
धार्मिक
आणि मानसिक पटलावर मोठ्या समस्या जागतिकीकरणाने उभ्या केल्या आहेत. सामाजिक
असमतोलाशिवाय आपल्याला अस्तित्व असूच शकत नाही, याचे
पक्के भान ठेऊन जागतिकीकरण वाटचाल करीत आहे. धर्म आणि जात यांच्या अनुषंगाने
पद्धतशीर सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जात आहे. जग सपाट आहे, अशी
मांडणी करून जागतिक पातळीपासून भारतीय पातळीपर्यंत सगळीच बहुसांस्कृतिकता नष्ट
करण्याचे काम वेगाने सुरू आहे. भारतात तर त्याने अधिक वेग घेतला आहे. तुमचे
स्वतंत्र अस्तित्वच धोक्यात आणले जाऊ लागले आहे. वेगळा आवाज म्हणजे देशद्रोह ठरवला
जाऊ लागला आहे. या काळाची आणि जागतिकीकरणाची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे या
काळाने विविध संभ्रम निर्माण करायला सुरुवात केली आहे. या जाळ्यात तरूण वर्ग
वेगाने अडकत चालला आहे. त्याला दिशाहीन करून भावनिक राष्ट्रवादाचे गाजर दाखवून त्याच्यात
एकदा का वैचारिक पोकळी निर्माण झाली की, राजकीय
व्यवस्थेला हवे तसे त्याला वापरून घेता येऊ शकते. आणि या खेळीत आजचे भारतीय
राजकारण यशस्वी झाले आहे. सुडाच्या आणि अस्मितेच्या राजकारणाने वेग घेतला असल्याने
आजचे जग हे संभ्रमाचे जग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे सत्र अमेरिका,
चीन,
पाकिस्तान,
ब्राझील,
युरोप
आदी अनेक देशांत समांतरपणे चालले आहे. तेल, सोने,औषधे
आणि युद्ध याभोवती ज्या सगळ्या राजकीय लढाया सुरू आहेत त्या लढायातील
सत्तावर्चस्वाचा भाग म्हणजे जागतिकीकरण
होय. या सत्तेसाठी सगळी विकसित राष्ट्रे एक होवून विकसनशील आणि अविकसित
राष्ट्रांवर आपली सत्ता गाजवू पाहताहेत. या सत्तेला समर्थन देणारी पपेटसारखी
राजकीय व्यवस्था कशी सत्तेवर येईल हे पद्धतशीरपणे पाहिले जात आहे. याचा प्रत्यय
आपणाला अमेरिकेच्या ट्रम्प सरकारपासून सीरिया, ब्राझील,
भारत,
पाकिस्तान
आदी अनेक राष्ट्रांच्या राजकारणातून येत आहे. सत्तेसाठी ते एकमेकांवर ज्या कुरघोड्या करण्यात
व्यस्त आहेत; त्यात भारतासारखी अनेक
राष्ट्रे समाविष्ट आहेत. ही समाविष्ट राष्ट्रे भांडवलदारांच्या हातची बाहुले बनून
कार्यरत असल्यामुळे एक असमतोलाचे चित्र जगभर तयार झालेले आपणांस पहावयास मिळते.
पाच वर्षांपूर्वी दिल्लीतील आर्मी
मेडिकल कॉलेजमध्ये सैनिकांच्या मुलांच्या शंभर टक्के जागा भराव्यात अशी दिल्ली
उच्च न्यायालयाने सूचना केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती रद्दबादल करताना
जागतिकीकरणाच्या धोरणावर कठोर ताशेरे ओढले होते. १६मे,२०११
रोजी हा निकाल देताना न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आणि न्यायमूर्ती एस. एस. निडजर
यांनी म्हटले आहे की,"उदारीकरण,
खाजगीकरण आणि जागतिकीकरण या मुक्त बाजारपेठेच्या नावाखाली सरकार सर्व लोकांच्या
कल्याणासाठी काम करण्याची आपली संविधानिक जबाबदारी झटकू शकत नाही. नियमनाचा अभाव
असलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे बाजारपेठेत केवळ व्यापक अपयशच येणार नाही;
तर त्यामुळे ते घटक अधिक कार्यक्षम होऊन काम करणे अपेक्षित आहे,
तेही साध्य होणार नाही. नुकत्याच आलेल्या जागतिक आर्थिक संकटाने आपल्या डोळ्यांत चांगलेच
अंजन घातले आहे. या बाजारपेठेचे निर्णय योग्य असतात व ही पद्धती सर्व समस्यांचे
समाधान आहे, हा भ्रमाचा भोपळाही आता
फुटला आहे. उदारीकरण, खाजगीकरण व
जागतिकीकरण यावर सर्वांगाने विचार न करता विश्वास ठेवल्याचे जे जागतिक दुष्परिणाम
दिसत आहेत, त्याकडे डोळेझाक करता येणार
नाही" (प्रसाद कुलकर्णी, जागतिकीकरण
आणि वर्तमान आव्हाने, २४०).
अशोक बाबर हे जागतिकीकरणाकडे बुद्ध-मार्क्स
आणि आंबेडकरवाद या अंगाने पाहताना बुद्धाच्या देशी तत्त्वज्ञानाचा मराठी
साहित्याने नीट विचार न केल्यामुळे मराठी साहित्य जागतिकीकरणाला नेमके भिडले
नसल्याचे नोंदवतात. जागतिकीकरणाचा विचार करताना भारतीय परिप्रेक्ष्य नीट लक्षात
घेतला जात नाही. कारण भारत हा बहुसांस्कृतिक आणि बहुजातीय असा देश आहे आणि
जगतिकीकरणाची जी मांडणी आर्थिक अंगाने केली जाते ती एकांगी आहे. कारण इथे केवळ
वर्गीय मांडणी करून चालत नाही तर इथली समाजव्यवस्था आणि संस्कृतिव्यवस्था समजून
घेतल्याशिवाय आपणाला जागतिकीकरणाची नीट कल्पना येणार नाही. ती येण्यासाठी आंबेडकर
ज्या तीन भारताचा बौद्ध, ब्राह्मण
आणि हिंदू अशा तीन भागात विचार करतात, तो
नीटपणे लक्षात घेतला पाहिजे. कारण भारतीय साहित्यशास्त्र हे संस्कृत आणि पाश्चात्य
प्रमेयावर उभे आहे. त्याने बौद्ध साहित्य जी मांडणी करीत होते त्याकडे कायम
डोळेझाक केली. अर्थात त्यातही कुटील राजकारण आहे. पण तरीही आपण नीट विचार केला तर
या परंपरेची अनेक मुळे आपल्या नेणिवेत दडली आहेत ती नकळतपणे व्यक्त होतात. जसं की
खुल्या आर्थिक धोरणातून जरी काही चित्र बदलले असले तरी जातीयता नाहीशी व्हायला
तयार नाही, तशीच म.गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
लढ्याची जी अहिंसा, असहकार,
सत्याग्रह,
चले
जाव, मंदिर प्रवेश आदी आंदोलनांमागे
जसा बुद्ध विचार आहे ,तसाच शरद पाटील ज्या
मातृसत्ताक परंपरेचा उल्लेख करतात त्या भारतीय मूळ परंपरेचाही संदर्भ या नेणिवेत
दडला आहे. कारण गौतम बुद्ध ज्या परंपरेतून आला आहे, ती
परंपरा शाक्य असली तरी ती मातृसत्ताक आणि गण परंपरा आहे, तिचाही विचार आपण जागतिकीकरण समजून घेताना करत
नाही.
जागतिकीकरणाने जरी खुले आर्थिक धोरण
स्वीकारले असले आणि त्यातून भारताचा काही अंशी विकास झाला असला तरी त्याचा फायदा
कुणाला झाला, याची चर्चा नीटपणे
होत नाही. कारण मूळ भारतीय भूमीत जी विषम अशी समाजव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आहे,
तिच्या
अंगाने आपण जागतिकीकरणाचा विचार करीत नाही. आज हे जागतिकीकरण अपरिहार्य असले तरी
त्याला नकार देताना किंवा त्यात सुधारणा करताना आपणाला त्याचे भारतीय मॉडेल तयार
करावे लागेल. ते मॉडेल काही उत्तरे आपणाला देऊ शकेल. जागतिकीकरण सगळ्याला एका रांगेत
आणण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणजे
ते माणसांचे आणि संस्कृतीचे सपाटीकरण करू इच्छित आहे. या मागे भांडवलदारी आणि
वर्गवर्चस्ववादी विकसित देशांची जी राजकीय खेळी आहे, ती
समजून घ्यावी लागेल. उदाहरणच द्यायचे तर अमेरिका आणि युरोप राष्ट्रे आपापल्या
देशातील शेतकर्यांना प्रचंड सबसिडी देतात, परंतु
भारतासारख्या विकसित देशाला ती देण्यासाठी निर्बंध घालतात. हेतू हा की,
इथला
शेतकरी मोडून पडला पाहिजे,
भारतासारखी मोठी बाजरपेठ आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. भारतीय राजकारणी देखील भांडवलदारांच्या
हातात हात घालून चालताना त्यांच्याच फायद्याचे निर्णय घेतात. याचाच परिणाम म्हणजे
भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या. या कंपन्या शंभर पट नफा कमावतात आणि एक विषमतेचे
अराजक निर्माण करून राज्यकर्त्यांना निवडणुकांसाठी पैसा देऊन त्यांना निवडून
आणतात. आणि पुन्हा त्यांच्याच वरदहस्ताने शोषण चालू ठेवतात. जागतिकीकरणाची ही मोठी
समस्या आहे. आज एकीकडे शेतकरी लाखभर रूपयांसाठी आत्महत्या करतो आणि विजय मल्ल्या,
निरव
मोदीसारखा माणसं करोडो रूपये बुडवून जगभर चैन करीत फिरत राहतात.
जागतिकीकरणाने मानवाला एक नवे भान दिले
आहे. त्याच्यातला स्फुलिंग जागवला आहे. अनेक शोषणाचे काच त्यामुळे टाकून देता आले
आहेत. खुल्या आर्थिक धोरणाने सामान्य माणसांच्या खिशात काही अंशी पैसा खेळू लागला.
पहिल्या दशकात नोकर्या आणि रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात निर्माण झाल्यामुळे
मध्यमवर्गीय समाजाच्या संख्येत वाढ झाली. साधं समाजमाध्यामांचं उदाहरण घेतलं तरी लक्षात
येईल की, ज्या माणसाला व्यक्त
होण्याची कसलीच संधी नव्हती, ती
संधी या माध्यमाने केवळ उपलब्ध केली असे नाही;
तर त्याच्या अभिव्यक्तीचा मोकळा अवकाश त्याला हवा तेव्हा उपलब्ध झाला. त्यामुळे त्याच्या
आवाजाला आणि शोषणाविरूद्धच्या प्रतिकाराला धार आली. त्याला या अभिव्यक्तीतून
हळूहळू आत्मविश्वास येत गेला. अभिव्यक्तीत
अनेक गुणात्मक बदल झाले. या बदलाचाही काही एक परिणाम साहित्यावर झाला आहे. तरूण
लेखकांना प्रकाशकाच्या ज्या भानगडींना सामोरं जावं लागायचं त्यातून त्यांची काही
अंशी सुटका झाली. तांत्रिक प्रगतीमुळे गावोगावी प्रकाशन संस्था उभारल्या गेल्या.
त्याचाही फायदा लिहिणार्या मंडळीना झाला. प्रकाशकांनाही या माध्यमातून नवे लेखक
सापडू लागले. या सापडण्यातून बदलत्या काळाला पकडू शकणारी मंडळी लिहिती झाली. नाही
म्हटले तरी हा जागतिकीकरणाचा सकारात्मक परिणाम म्हटला पाहिजे.
त्याचबरोबर जागतिकीकरणाने
मध्यमवर्गीय समाजात वेगाने वाढ झाली. खेड्यातला मोठा वर्ग नोकरी आणि
उद्योगधंद्याच्या निमित्ताने शहरात स्थायिक होत गेला तसा त्याचा संपर्क शहरी
मध्यमवर्गाशी अधिक येत गेला. त्यातच त्याचा अर्थिक स्तर सुधारल्यामुळे त्याचे
मध्यमवर्गीय होणे अटळ होते. या मध्यमवर्गीय समाजात एक प्रकारची आत्मविश्वासाची
जाणीव काही काळ निर्माण झाली. त्याला सगळे जग मुठीत आल्यासारखे वाटू लागले. परंतु
त्याचा जो भ्रम होता तो नाहीसा व्हायला फार काळ लागला नाही. श्रीमंत होत गेलेला
वर्ग इतक्या झपाट्याने श्रीमंत होत गेला की, त्याच्या
जगण्याच्या सगळ्या धारणाच बदलून गेल्या. चळवळी सगळ्या थंडावल्या. खेड्यातला बहुजन
वर्ग शहरात आल्यामुळे त्याचा केंद्रबिंदू बदलत गेला. त्याला आपल्या कृषिनिष्ठ
मूल्यांचे महत्त्व पटेनासे झाले, तसतसा
तो शहरात अधिक रमत गेला. तेच दलित वर्गाचे झाले. जी दलित पँथरची चळवळ होती,
ती
कालांतराने क्षीण झाली. ग्रामीण, दलित,
ब्राह्मणेतर
चळवळींमुळे ब्राह्मणवर्ग सुटा पडत गेला. त्याला कोणत्याही चळवळीशी काही देणेघेणे
रहिले नाही. त्याने आपल्या स्वतंत्र परंपरा निर्माण करण्याच्या नादात जो एक
बहुजनीय पुरोगामी चळवळीचा महाराष्ट्राचा चेहरा होता, तो
दोन तुकड्यात विभागला गेला. त्याचा परिणाम जसा साहित्यावर झाला,
तसाच
तो समीक्षेवरही झाला आहे. त्यामुळे मराठी साहित्यातून जवळपास महानगरीय आणि
मध्यमवर्गीय ब्राह्मण वर्ग हद्दपार झाला आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात
मराठीमध्ये जशी दलित कादंबरी दिसत नाही, तशीच
महानगरीय कादंबरीही दिसत नाही. जागतिकीकरणानंतर खर्या अर्थाने मराठीत लिहिली जात
असलेली कादंबरी ग्रामीण-नागर बहुजन असा तोंडवळा असलेली कादंबरी आहे.
॥ दोन ॥
या वास्तवभूमीचा अन्वयार्थ मराठी
कादंबरीने कसा लावला आहे, हे
पाहणे रंजक ठरणारे आहे. अर्थात जागतिकीकरण जरी नव्वदनंतर आकारले असले तरी या
ठिकाणी आपण प्रामुख्याने एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी तपासणार आहोत. साधारणपणे
आजच्या काळातले परंतु नव्वदपूर्वी लिहित असलेले महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून
भालचंद्र नेमाडे, किरण
नगरकर, रंगनाथ पठारे,
श्याम
मनोहर, दीनानाथ मनोहर,
नंदा
खरे, शांता गोखले,
जी.
के. ऐनापुरे, आनंद विनायक
जातेगावकर, राजन गवस,
राजन
खान, मकरंद साठे,
मोहन
पाटील, कविता महाजन,
मेघना
पेठे यांचा उल्लेख करावा लागतो. या कादंबरीकारांनी मराठी कादंबरी समृद्ध केली आहे.
हे कादंबरीकार जागतिकीकरणाच्या अगोदरपासून कादंबरी लिहित आले आहेत. भालचंद्र
नेमाडे (हिंदू), किरण नगरकर
(प्रतिस्पर्धी), रंगनाथ पठारे
(सातपाटील कुलवृत्तांत), विलास
सारंग( रूद्र, अमर्याद आहे बुद्ध)
हे कादंबरीकार आजच्या वर्तमानाशी नाते सांगणारी कादंबरी लिहित असले तरी आपल्या
भूतकाळाच्या सांस्कृतिक इतिहासाचा नव्याने धांडोळा घेताना दिसत आहेत. त्याचा नवा
अन्वयार्थ लावण्याचा आणि पुनर्वाचन करण्याचा प्रयत्न करत आजच्या जगण्याशी त्याचा
सांधा जोडू पाहताहेत. यांचे आजही लेखन सुरू आहे. किरण नगरकर यांनी 'रावण
आणि एडी'च्या रुपाने बदलत्या मुंबईचे
चित्र नोंदवले आहे. विलास सारंगांनी 'तंदूरच्या
ठिणग्या' मधून आधुनिक
मानवाच्या जगण्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. रंगनाथ पठारे यांनी अलीकडे
'नामुष्कीचे स्वगत',
'कुंठेचा लोलक', 'त्रिधा',
'एका आरंभाचे प्रास्तविक','भर
चौकातील अरण्यरूदन','चोषक
फलोद्यान', 'सातपाटील कुलवृत्तांत'
या
कादंबर्या लिहिल्या आहेत. तर 'कबीरा
खडा बाजार में', 'फत्ते तोरणमाळ'(दीनानाथ
मनोहर), 'खूप लोक आहेत',
'उत्सुकतेने मी झोपलो',
'शंभर मी', 'खेकसत
म्हणणे,आय लव्ह यू'
(श्याम मनोहर), 'अच्युत आठवले आणि
आठवण', 'ऑपरेशन यमू',
'काळे रहस्य'
(मकरंद साठे), 'ब बळीचा'
(राजन
गवस), 'रिबोट',
'जाईच्या घरी जाई'
(जी.के ऐनापुरे), 'औरस
अनौरस', 'जमीन'
(राजन खान), अस्वस्थ वर्तमान (आनंद
विनायक जातेगावकर), 'नारी
डॉट काम', 'ईश्वर डॉट कॉम'
(विश्राम
गुप्ते) या कादंबरीकारांनी आपापल्या परीने तत्कालीन वास्तवाचा अर्थ लावण्याचा
प्रयत्न केला आहे.
रंगनाथ पठारे हे सतत स्वत:ला खोदत
आलेले कादंबरीकार आहेत. जागतिकीकरणाशी संबंधित 'नामुष्कीचे
स्वगत' ही त्यांची महत्त्वाची
कादंबरी आहे. सामान्य माणसाचे जगणे आणि त्याचे व्यक्त होणेही किती मुश्किलीचे झाले
आहे, याचा अत्यंत प्रभावी प्रत्यय
ही कादंबरी देते. त्याचबरोबर त्यांनी अलीकडे 'त्रिधा',
'कुंठेचा लोलक', 'भर
चौकातील अरण्यरूदन', 'एका
आरंभाचे प्रास्ताविक', 'चोषक
फलोद्यान' या कादंबर्या लिहिल्या आहेत. पैकी त्रिधा,
कुंठेचा
लोलक, चोषक फलोद्यान या
कादंबर्या वेगळ्या अंगाने स्त्री भावविश्वाचा शोध घेणार्या आहेत.
तिच्या
शोषणाच्या सगळ्या तर्हा नोंदवत जाणार्या या कादंबर्या नीट तपासल्या गेल्या
नाहीत. कामभावना महत्त्वाची असली तरी जोडीदार बदलला आणि आपल्या कामतृप्तीचा आनंद
घेतला, हे इतके सोपे शरीरसंबंध
नसतात. त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक,
मानसिक
काच किती विचित्र असतात; आणि
त्या काचातून मुक्तता न होण्यामुळे मानवी आयुष्याची नौका कशी भरकटत जाते याचा
प्रत्यय 'त्रिधा'मध्ये
येतो. तर स्त्रीचा वापर करणारी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था किती निर्ढावली आहे,
स्त्रीला
कसे गृहीत धरले जाते, वेश्या
व्यवसायातील अगतिकता आणि अशा स्त्रियांशी नात्याने बांधल्या गेलेल्या पुरुषांची काय अवस्था होते, यावर
'कुंठेचा लोलक'मध्ये
भाष्य येते. तर 'चोषक फलोद्यान'मध्ये
लेखकाची घडण, त्यात स्त्रीचा
असलेला सहभाग, तिच्या शोषणाच्या
परंपरेसह तिच्यातले काही तरी टिकून राहणारे सत्व यावर ही कादंबरी केंद्र करते. आणि
हे टिकून राहणे तिच्या डोळ्यातून कसे पाझरते, असा
एक नवा शोध ही कादंबरी घेते. तर 'एका
आरंभाचे प्रास्ताविक' आणि 'भर
चौकातील अरण्यरूदन' या कादंबर्या
बदलत्या राजकारणाचे, जातकारणाचे
आणि सांस्कृतिक अध:पतनाचे संदर्भ नोंदवतात. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'सातपाटील
कुलवृत्तांत'च्या निमित्तने त्यांनी
मराठा समाजाचा सातशे वर्षांचा इतिहास वास्तव आणि कल्पनेच्या पातळीवर रेखाटताना
सगळ्याच जातींना आव्हान ठरेल असे सांस्कृतिक वास्तव महाराष्ट्रासमोर आणले आहे.
मराठीतला हा महत्त्वाचा कादंबरीकार
सतत लिहित राहिला आहे. त्यांच्या आतापर्यंत चौदा कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत.
त्यातल्या अलीकडच्या जरी काही कादंबर्यांचा विचार केला तरी हा लेखक एका अर्थाने
मराठी माणसाचा सांस्कृतिक इतिहास अधोरेखित करीत आला आहे, हे
आपल्या लक्षात यईल. म्हणजे मनोहर शहाणे यांनी ज्या पद्धतीने एखाद्या शहराचे
सातत्याने कोसळत जाणे आपल्या कादंबर्यांत नोंदवून ठेवले; तेवढे
आजच्या मराठी माणसाचे जे सांस्कृतिक अध:पतन होत चालले आहे, ते
पठारे यांनी सतत आणि सातत्याने नोंदवले आहे. यांच्यावर काहींनी मराठा लेखक म्हणून
आरोप केला असला त्यात काही तथ्य असल्याचे
आढळत नाही. अर्थात तो लेखक कोणत्या जातीत जन्माला आला, यावर
काही राजकीय आडाखे बांधले जात असतील तर मात्र कठीण आहे. पण या आडाख्यालाही 'सातपाटील
कुलवृत्तांत'ने धक्का दिला आहे.
त्यांच्या लेखनाकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, पठारे
यांच्याकडे मराठा म्हणून पाहताना या जातीकडे असलेली (शेतीतून
आलेली) सर्वसमावेशक सहानुभावाची आणि सामावून घेण्याची जी वृत्ती आहे,
ती
वृत्ती त्यांच्या लेखनात सतत पाझरताना दिसते. या अंगाने त्यांच्या लेखनाकडे पाहिले
तर त्यांच्या आस्थेच्या व्यूहात सगळे लोक येतात. ब्राह्मणापासून आदिवासीपर्यंतचा
एक मोठा जात-धर्म गट त्यांच्या लेखनात गुण्यागोविंदाने नांदताना दिसतो. त्यात
कुठेही एकसुरीपणा अथवा एकारलेला दृष्टिकोन जाणवत नाही. उलट आजच्या माणसाचे जे काही
स्खलित होत जाणे आहे, ते
कसे सगळ्याच जातीधर्माच्या पातळीवर अधिक ठळक होत चालले आहे;
आणि
जागतिकीकरण नावाची व्यवस्था सगळं गिळंकृत करताना जातधर्म कसा बघत नसते,
याचे
अत्यंत काटेकोर भान त्यांची कादंबरी देते. त्यांच्या कादंबरीचे हे एक मोठे
सामर्थ्य कायम नजरेआड केले गेले आहे.
तसेच पठारे आपल्या लेखनातून सातत्याने स्त्री-पुरूष
नातेसंबंधाचा सेक्सच्या अंगाने जो शोध घेत आले आहेत, त्याकडेही
नीटपणे पाहिले गेले नाही. कुटुंब आणि बाई-पुरुष एकत्र बांधून ठेवण्यात सेक्स हा
अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, तो
विसविशीत झाला की, कुठलेच
नाते फार काळ टिकाव धरीत नाही; याचे
जळजळीत भान ही कादंबरी देते. उलट
सेक्स हे जागतिकीकरणाच्या शोषणाचे एक
महत्त्वपूर्ण हत्यार असल्याचे नवेच भान पठारे
देतात. एकदा का सेक्सच्या रुपाने स्त्री-पुरुष एकेकटे पाडले आणि त्यांना बांधून
ठेवणारी व्यवस्था संपवली की, माणसांचे
शोषण करणे सोपे जाते. नेमका हा धागा पकडून होत असलेल्या जागतिक राजकारणाला
भारतासारखी तिसर्या जगातील राष्ट्रे कशी बळी पडत जातात, याचे
उत्तम आणि दणकट भान त्यांनी मराठी साहित्याला, समाजाला
दिले आहे, हे आपण नीट समजून
घेतले पाहिजे.
आणखी एक भर त्यांच्या कादंबरीने घातली
आहे. ती म्हणजे त्यांची कादंबरी सतत प्रयोगशील राहिली आहे. परंतु ही प्रयोगशीलता
श्याम मनोहरांसारखी वरून आणि मुद्दाम लादलेली नसते. आशयाच्या
आणि निवेदनाच्या अपरिहार्य भावनेतून ती आलेली असते. पठारे यांच्या इतके निवेदनाचे प्रयोग
मराठीत कोणी केलेले नाहीत. भाषेचे एक अत्यंत रोकडे भान त्यांची कादंबरी आपल्याला
पुरवत राहते. ते दर कादंबरीत काही नवे करू पाहतात. पात्ररचना असो,
भाषा
असो, आशयाची मांडामांड असो,
बर्याच
पातळ्यांवर ते जो प्रयोग करतात तो आशयाशी एकजीव झालेला असतो. त्यामुळे त्यांची
कादंबरी कायम वाचनीयता टिकवून ठेवते. ह्याचा प्रत्यय 'सातपाटील
कुलवृत्तांत' या सातशे पानांच्या कादंबरीतही येतो.
अशाच स्वरुपाचे भान दिनानाथ मनोहर यांची कादंबरी देते. त्यांच्या अलीकडच्या
'कबीरा खडा बाजार में'
आणि 'फत्ते
तोरणमाळ' या कादंबर्या
जात-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करतात. 'कबीरा...'मध्ये
एका वेड्याच्या रुपकातून हिंदू-मुस्लीम-जैन-बौद्ध
यांच्यातील सूक्ष्म संघर्षावर बोट ठेवताना,
हा संघर्ष निरर्थक असूनही प्रत्येकजण किती बेमालूमपणे खेळत आहे,
आणि
त्यात प्रत्येक जात-धर्माचे कसे नुकसान आहे, याच्यावर
फोकस करणारी ही कादंबरी शेवटी मराठा विवाहित तरूणी आणि ब्राह्मण तरूण यांच्या
एकत्र येण्याच्या रुपाने एक नवा आदर्श समाजापुढे ठेवते. या निमित्ताने आजही एखादे
गाव कसे सरंजामी गाळात रूतून बसले आहे, याचा
प्रत्यय ही कादंबरी देते. तर 'फत्ते
तोरणमाळ'मध्ये मनोहर जागतिकीकरण
पर्यावरणालाही कसे गिळंकृत करीत निघाले आहे, त्यामुळे सातपुडा पर्वताचा आणि आदिवासी जीवनाचा
समतोल कसा ढळत चालला आहे. यावर भाष्य करतात. मूळची मार्क्सवादी जीवन धारणा प्रमाण
मानणारे मनोहर आपल्या लेखनातून भांडवलदारी
व्यवस्थेला कायम छेद देण्याचा आणि नवी जातधर्मविरहित व्यवस्था उभारणीचा प्रयत्न
करीत आले आहेत. तसेच ते सतत एक राजकीय भूमिका घेत आले आहेत. येथेच रवींद्र
रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या 'खेळघर'
या
कादंबरीचा उल्लेख करायला हरकत नाही. ही कादंबरी कसलीही जातजाणीव नसलेले कल्पित गाव
उभं करून मार्क्सवादाचा नवा प्रयोग वाचकांसमोर आणते आहे.
आपल्या मार्क्सवादी आणि डाव्या
विचारधारेशी बांधल्या गेलेल्या जी. के. ऐनापुरे यांची कादंबरीही डी-कास्ट नायकाचे
प्रतिनिधित्व करताना दिसते. त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या 'रिबोट'
आणि 'जाईच्या घरी जाई'
या कादंबर्यांमधून गिरणी कामगारांचे आणि
उपेक्षित दलित समाजाचे चित्रण येते. अर्थात
हे चित्रण रूढ दलित साहित्याच्या व्याख्येत बसणारे नाही. मुंबईतला गिरणी कामगार, रोजगार हिसकावला गेल्यानंतर,
जरी
विस्थापनाच्या मार्गावर असला तरी तो आपली जगण्यावरची निष्ठा ढळू न देता संघर्षाची
पराकाष्ठा करीत कसा टिकून राहतो, याकडे
'रिबोट'
अंगुलिनिर्देश
करते. तर काही हिंदू जातीयवादी संघटना गरिबीचा फायदा घेत ओबीसी आणि उपेक्षित
घटकातल्या तरुण-तरुणींना कशी जाळ्यात पकडू पाहते आणि जातीयता बळकट करते,
यावर
'जाईच्या घरी जाई'
ही कादंबरी फोकस करते. ऐनापुरे यांच्या लेखनाची ताकद म्हणजे त्यांची भाषा,
तिला
असलेले मुंबई आणि सांगली-कोल्हापूरच्या भाषेचे संदर्भ, मुंबईच्या
बीडीडीच्या चाळीतल्या वास्तव्याच्या निमित्ताने महानगरीय अध:स्तरीय जीवनाचा
त्यांना असलेला अनुभव आणि नंतरचा दक्षिण महाराष्ट्रातला रहिवास यामुळे त्यांचे
लेखन महानगर आणि दक्षिण महाराष्ट्राचा प्रदेश यांच्या एका उत्तम संयोगातून साकारत
असल्याने एक व्यापक भूप्रदेश तिथल्या जीवन तपशिलासह कादंबरीत येत असल्यामुळे
त्यांच्या कादंबरीत एक व्यापक समूहभाव आणि समतेचे तत्त्व सतत पाझरत राहते. म्हणूनच
ही कादंबरी प्रदेशाच्या आणि महानगराच्या सीमारेषा पुसून जागतिकीकरणाला एक समर्थ
पर्याय देण्याचा प्रयत्न करीत राहते.
रा.रं.बोराडे,
राजन
गवस, मोहन पाटील,
सदानंद
देशमुख, आनंद विंगकर,
सुरेंद्र
पाटील यांनी बदलत्या गावाचे चित्र आपल्या कादंबर्यांतून रेखाटले आहे. राजन गवस
यांची 'ब बळीचा'
ही अलीकडे प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीत भूमिपुत्रांच्याकडूनच शेतकर्यांचे
कसे शोषण होते, महात्मा जोतीबा
फुल्यांचे विचार कसे कोणीच लक्षात घेतले नाहीत याकडे लक्ष वेधले आहे. आजच्या
वर्तमानाला अत्यंत समर्थपणे सामोरी जाणारी आणि शोषणाच्या सगळ्या शक्यता अधोरेखित
करणारी करणारी ही कादंबरी जे विधान करू पाहते, ते
फार महत्त्वाचे आहे. कादंबरीचा
निवेदक म्हणतो,"अमुक
म्हणतो शेतकर्यानं आमच्यावर जात लादली. ज्याला त्याला जगवायचं. जगवणारा जात कशी
तयार करेल? ज्यांना
ज्ञानप्राप्ती झाली ते शेतकर्यांच्या मुक्तीसाठी का नाही बोलले?
येशू,
तू शेतकर्याविषयी काही म्हणालास? पैगंबरा,
तू
शेतकर्यांना काय सांगितलंस? शंकराचार्या,
तुला
शेतकरी माहीत होता? महावीरा,
शेतकरी
तुझ्या बोलण्यात कुठं? बुद्धा,
तू
तर शेतकरीच. पण तू काय दिलंस शेतकर्यांना? विठ्ठला,
तू
गोळा केलंस शेतकर्यांना. पण
का त्यांना काही नाही संगितलंस? कोणताच
धर्म शेतकर्यांना काहीच का सांगत नसेल?"(३०७).
याचा अर्थ गेल्या तीनेक हजार वर्षांपासून शेतकर्यांचा नीट विचार कोणीच केला नाही,
आज
तर जागतिकीकरणात तो पूर्ण नागवला गेला आहे. तरीही ही कृषिसंस्कृती टिकून राहील,
कारण
ही संस्कृती कोणत्याच एका धर्मावर आधारित नाही. तिचा धर्म हा महात्मा फुल्यांचा
सत्यशोधक धर्म असल्याचे विधान ही कादंबरी करते.
सदानंद देशमुखांच्या 'बारोमास'
आणि 'चारीमेरा'
या
कादंबर्यांनी बदलत्या अर्थव्यवस्थेचे आणि ढासळत्या मूल्यव्यवस्थेचे परिणाम अधोरेखित
केले आहेत. विशेषत: कृषिव्यवस्थेत अवतरलेले मध्यमवर्गीय मूल्यभान आणि मूळ समूहभान
संभाळून असलेली कृषिसंस्कृती यांच्यातील ताणतणाव हा या कादंबर्यांचा मुख्य केंद्र
राहत आला आहे. या ताणातून घरात,
नवरा-बायकोत आणि भावाभावांत निर्माण होणारे मतभेद, त्यातून
वाट्याला येत चाललेली अस्वस्थता, शेतकरी
चळवळ आणि तिच्या बदलत चाललेल्या आंदोलनाच्या दिशा, त्यातून
आलेले एकारलेपण, पैशाच्या हव्यासापायी
येऊ घातलेले वैफल्य,आत्महत्या आदी अनेक
विषयांना देशमुखांच्या कादंबर्या स्पर्श करतात. सुरेंद्र पाटलांची 'चिखलवाटा'
ही
कादंबरी गाव-शहराच्या संघर्षाची आणि नोकरीच्या निमित्ताने गाव सोडल्यानंतर घरात उभ्या राहिलेल्या तणावाची कहाणी सांगते. तर
शेतकरी आंदोलनाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली मोहन पाटलांची 'साखरफेरा'
ही कादंबरी सहकार, साखर
कारखानदारी, शेतकरी चळवळ
यांच्यातील संघर्षाला केंद्र करीत सामान्य शेतकर्यांची सगळीकडून कशी फरफट होते,
यावर
भाष्य करते. रा. रं. बोराडे यांची 'रिक्त
अतिरिक्त' ही ऊसाच्या
प्रश्नावरची कादंबरी असो अथवा आनंद विंगकर यांची 'अवकाळी
पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही
शेतकर्याच्या आत्महत्येवरची कादंबरी असो या कादंबर्या कृषिजीवनाचे मोडून पडणे
अधोरेखित करीत जातात.
श्याम मनोहर हे सतत धर्म आणि माणूस, तत्त्वज्ञान
आणि माणूस, विज्ञान आणि माणूस
यांच्यातील नातेसंबंधाचा तसेच समाज आणि सुटा माणूस, त्याचे
कुटुंब, शेजार,
त्याच्या
काम-क्रोधादी भुका यांचे काय होते, त्यातून
माणूस कसा मार्ग काढतो, त्याच्या
असण्याचे कोणकोणते संदर्भ असतात, असे
अनेक प्रश्न आस्थेच्या व्यूहात घेऊन लिहीत आले आहेत. त्यांच्या 'कळ'
या कादंबरीनंतरच्या त् 'खूप
लोक आहेत', उत्सुकतेने मी झोपलो',
'शंभर मी', 'खेकसत
म्हणणे...'या कादंबर्या प्रकाशित
झाल्या आहेत. त्यांच्या लेखनाची खासीयत म्हणजे ते वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या
ठिकाणी आणि परिस्थितीत ठेऊन पाहतात आणि त्यांच्या त्या-त्या वेळच्या जगण्याच्या
धारणा कशा बदलत जातात याचा ते शोध घेत राहतात. त्यामुळे त्यांच्या कादंबर्यांचा
वाचकवर्ग मर्यादित असला तरी;
वास्तवापासून फारकत घेऊन कल्पनेच्या स्तरावर कादंबरीचा रूपबंध पेलण्याचे काम मनोहर
करीत असल्याने त्यांच्या या चमत्कृतिपूर्ण लेखनाचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आहे.
त्यामुळे ते सतत प्रयोग करीतच लिहीत आले आहेत.
मकरंद साठे यांनी 'अच्युत
आठवले आणि आठवण', 'ऑपरेशन यमू'
आणि
'काळे रहस्य'
या कादंबर्या लिहून आजच्या गरगरणार्या आणि संभ्रमित वास्तवाला शब्दबद्ध केले
आहे. माणसाचे विखंडन आज वेगाने सुरु आहे. त्यात
कसलाही ओलावा राहिलेला नाही. एक प्रकारची भ्रमिष्टावस्था समाजाला आली आहे.
त्याच्या संवेदना मारण्याचे काम वेगाने चालू आहे. आणि हे ल्क्षात येऊनही कोणी ते
रोखू शकत नाही, याचे जे एक अस्वस्थ
पण आहे, ते फार भयावह आहे,
या
भयावह अवस्थेचे चित्रण करताना साठे भ्रमिष्टाच्या द्वारे जगण्याचा अर्थ लावण्याचा
प्रयत्न करतात. अर्थात तो लागणार नाही, हे
जरी खरे असले तरी संपूर्ण समाजच तसा झाला असल्याचे भान ही कादंबरी आपल्याला देते. अशाच
'अस्वस्थ वर्तमाना'चा
अन्वयार्थ लावताना आनंद विनायक जातेगावकर एका मोठ्या ऐतिहसिक कालपटाला कवेत घेऊन
प्रत्यक्ष इतिहास, वास्तव
आणि कल्पित यांचा संयोग घडवून आणून कादंबरीची संहिता घडवतात. इतिहासात डोकावताना
बुद्धापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारतीय इतिहासाची चिकित्सा करीत ही कादंबरी
वर्तमानाला भिडते. वर्तमान आणि भूतकाळ यांची सांगड घालताना ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादाचे किती भयावह
परिणाम झाले आहेत आणि भविष्यातही ते कसे होतील, यावर
ही कादंबरी भाष्य करते.
राजन खान यांची कादंबरी म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. त्यांनी प्रचंड लेखन
केले आहे. त्यांच्या लेखनात एक वेगळी वाचकीय धुंदी असते. त्यामध्ये त्यांची 'एक
लेखक खर्ची झाला' असो
किंवा अलीकडच्या 'सत ना गत',
औरस
अनौरस' अथवा
'जमीन'सारख्या
कादंबर्या असोत. प्रत्येक कादंबरीत ते मानवी जीवनाच्या अंधार्या जागा शोधून
त्यांना चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करतात. बलात्कारासारख्या घटनेचे राजकारण असो
(सत ना गत) किंवा लैंगिक संबंधातली तथाकथित निषिद्ध नैतिकता असो (औरस अनौरस) किंवा
जमीन वाटपातून निर्माण होणारे प्रश्न असोत(जमीन);
या सगळ्या प्रश्नांभोवती कथानक उभे करताना ते समाजिक-सांस्कृतिक,
राजकीय-धार्मिक
आदी सगळ्या शक्यता नोंदवत जातात. त्यातून माणसांचे स्खलित होत जाणे कसे
टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे, याचे
उत्तम दर्शन घडवणार्या म्हणून त्यांच्या कादंबर्यांचा निर्देश करावा लागतो.
त्याचबरोबर त्यांची कादंबरी जात-धर्माच्या पलीकडे जाण्यासाठी सतत जी धडपड करते,
त्या
धडपडीत ज्या काही प्रतिरोधाच्या शक्यता आहेत, त्या
सगळ्या शक्यतांचा शोध घेत नवे विश्व वाचकांपुढे उभं करीत जातात.
लक्ष्मीकांत देशमुख हेही या काळातले
एक महत्त्वाचे नाव. अलीकडे त्यांच्या 'इन्किलाब
विरूद्ध जिहाद', 'ऑक्टोपस',
'हरवलेले बालपण', 'यंग
इंडियाचा ग्रुप सेल्फी' या
कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत. मालमजुरीपासून उच्चभ्रू लोकांच्या जीवनापर्यंतचा
आणि प्रादेशिकपासून जागतिक संघर्षापर्यंतचा प्रवास ह्या कादंबर्यात आलेला आहे. या
कादंबर्या लोकशाहीकरणाच्या दिशेने वाटचाल करतात. लेखक स्वत: प्रशासनात अधिकारी
असल्याने प्रशासकाच्या नजरेतून शोषणाचे सगळे संदर्भ अधोरेखित करत जाणार्या या
कादंबर्या भ्रष्ट व्यवस्थेचे चित्रण करताना त्याला पर्यायही आपल्या लोकशाहीने
दिलेले आहेत, या विधानाकडे
आपल्याला घेऊन जातात. प्रशासन ही विकासाची भूमी कशी आहे, यावर
या कादंबर्या भाष्य करतात. कविता महाजन यांनी आपल्या 'ब्र'
आणि
'भिन्न'
मधून
आदिवासी स्त्रीबरोबर, एड्सग्रस्त
स्त्रियांचे, त्यांच्या मुलांचे
आणि त्या निमित्ताने आधुनिक स्त्रीच्या स्वतंत्र स्पेसचे, ती
कितीही आधुनिक झाली तरी तिच्याव्र होणार्या शारीरिक अन्यायाचे आणि लैंगिक शोषणाचे
संदर्भ या कादंबर्यात आलेले आहेत. तसेच
विकासाच्या आणि मदतीच्या नावाने परदेशातून मदत मिळवून भ्रष्टाचार करणार्या
एनजीओंच्या राजकारणावरही कविता महाजन यांनी फोकस केला आहे. कार्यकर्तीच्या नजरेतून
आलेले हे जग असल्यामुळे महाजनांच्या या कादंबर्यांना काही मर्यादा पडल्या आहेत.
विश्राम गुप्ते यांनी आपल्या
'नारी डॉट कॉम' आणि
'ईश्वर डॉट कॉम'
या
कादंबर्यांमधून अनुक्रमे स्त्रीतत्त्वाची आणि तिच्या स्वातंत्र्याची;
तर
ईश्वर ही गोष्ट अस्तित्वात नसतानाही त्याची किती भीती आपल्याला दाखवली जात आहे,
त्यामागचे
धर्मकारण काय आहे याची चिकित्सा केली आहे. मिलिंद
बोकील यांच्या 'शाळा'त
तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्या शाळकरी मुलांचे बालसुलभ भावविश्व आणि नव्यानेच
आकाराला येऊ लागलेले लैंगिक विश्व आले आहे. तर 'एकम'मध्ये
महानगरीय मानवाचे एकटेपण अधोरेखित झाले आहे. तर 'सरोवर'
मध्ये
ते प्रौढ स्त्री-पुरुषांच्या अशारीर प्रेमाची कथा सांगते.
मेघना पेठे यांची 'नातिचरामि'
ही
कादंबरी स्त्री-पुरुष नात्यांचा उलटा विचार करायला लावते. म्हणजे स्त्रीच्या
शोषणाला ती नकार देते. परंतु त्याचवेळी ती त्यांच्यातल्या मोकळ्या संबंधांना
स्वीकृतीच्या टप्प्यावर आणून उभी करते. या नातेसंबंधात मुख्य भाग असतो तो लैंगिक
संबंधांचा. पण कायम नैतिकतेच्या चष्म्यातून त्याकडे पाहिले जात असल्यामुळे स्त्री कायम
शोषणाची बळी ठरली आहे. त्यामुळे तो तथाकथित चष्मा काढून टाकल्यावर नात्यात जर
मोकळेपणा आला तरच हे नाते नीट राहील, अन्यथा
केवळ लग्नात 'नातिचरामि'
अशी
शपथ घेऊन नात्यांचा उत्सव साजरा करण्याला अर्थ नसतो, अशा
स्वरूपाच्या धारणेतून मेघना पेठे भारतीय स्त्रीवादाच्या परिप्रेक्ष्यातून स्त्रीच्या
भावविश्वाचा शोध घेतात.
आजची मराठी कादंबरी समृद्ध करण्यात
या कादंबरीकारांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या कादंबरीकारांनी जागतिकीकरणपूर्व जगाचा
अनुभव घेतला असल्यामुळे, त्यांनी
आपल्या पूर्वअनुभूतीच्या संचिताच्या प्रकाशात आजच्या काळाचा अन्वयार्थ लावण्याचा
प्रयत्न केला आहे. त्यामुळे
आधीचे जग आणि जागतिकीकरणोत्तर जग यांच्यातील संघर्षावर ही कादंबरी बोट ठेवताना दिसते.
मात्र नव्वदच्या आसपास जन्मलेले लेखक आजच्या वास्तवाकडे कसे पाहतात,
हेही
पहावे लागेल.
॥ तीन ॥
खुल्या अर्थव्यवस्थेने जरी काही बर्या
गोष्टी आपल्या पदरात पडल्या असल्या,
तरी त्याचा फायदा सामान्य माणसाला न होता मोठ्मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांना आणि
भांडवलदारांना झाला आहे, होत
आहे. तसाच त्याचा काही फायदा नोकरदार वर्गालाही झाला आहे. म्हणजे रूढ अर्थाने
ज्याला आपण मध्यमवर्ग म्हणतो अशा वर्गाला झाला आहे. १९९६च्या चौथ्या आणि २००६च्या
पाचव्या आयोगात पगारात घसघशीत वाढ झाली. मूळ पगारात चौपट वाढ झाली आहे,
जी नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. आणि त्याच दरम्यान चैनीच्या वस्तू
सहजपणे अत्यल्प व्याजदरात उपलब्ध झाल्या. बिगरशेती प्लॉट, घरबांधणी,
चारचाकी
खरेदी(कारसाठी, ट्रक-ट्रॅक्टरसाठी
नव्हे), चैनीच्या वस्तूसाठी
अत्यल्प व्याजदरात कर्जाची सोय उपलब्ध झाली. खाजगी बँकानी निमशहरात आपले पाय
पसरायला सुरुवात केली. पगार तारण ठेऊन कितीही कर्ज दिले जाऊ लागले. कर्ज हे पाप
आहे म्हणणार्या शेतकर्याच्या पोरानेच ही कर्जे घ्यायला सुरुवात करून आपला
जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. मात्र यामागचे मल्टिनॅशनल कंपन्यांचे धोरण
लक्षात आले नाही. पगारवाढ झाली, परंतु
मागील दाराने तुमच्या खिशातून पैसा काढून घेणार्या भासमय जगाचे भान आपल्याला येऊ
दिले नाही. आपण या भ्रामक जगालाच विकासाचे आणि प्रगतीचे जग म्हणू लागलो.
या सगळ्यात एक गोष्ट अनेकांच्या
लक्षात आली नाही, ती
म्हणजे कायम जो कमी व्याजदराचा पतपुरवठा अनुत्पादक गोष्टींसाठी आणि मोठमोठ्या
उद्योजकांनाच झाला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदाराला बरोबर कर्जाच्या विळख्यात
बंद करून शेतकरी, अल्पभूधारक,
मजूर,
उपेक्षित
अशा लोकांच्या शोषणाचे मार्ग या व्यवस्थेने तयार करून ठेवले. आणखी एक महत्त्वाची
गोष्ट झाली, ती म्हणजे बहुतांशी बहुजन
वर्गातून आलेला नवमध्यमवर्ग मूळच्या शहरी मध्यमवर्गाकडे अधिक आकर्षित झाला. तोवर हा
मूळचा मध्यमवर्ग आपले तोंड फिरवून वरच्या उच्चभ्रू वर्गाकडे पाहू लागला होता.
त्यामुळे या नव्या मध्यमवर्गीय जगाची अवस्था गोंधळल्यासारखी झाली. त्याचा जगण्याचा
स्तर उंचावला तरी एक पाय कायम गावात अडकून पडला. त्यामुळे एक प्रकारचे उपरेपण तो
सतत सहन करीत राह्यला. यातून आपोआपच त्याच्यात कोरडेपणा, एकाकीपणा
आणि कोडगेपणा आला. जागतिकीकरणाला जे हवे होते ते वेगाने आकाराला आले. अवघ्या दशकात
सगळा मूल्यव्यवहार झपाट्याने बदलून गेला. या
सगळ्याचा त्याला अंदाज येऊ लागला होता, पण
त्याची त्यातून सुटका होत नव्हती. त्याला
विचार करायला संधीच मिळत नव्हती किंवा जागतिकीकरणाने त्याला भ्रामक विकासाची आयतीच
संधी उपलब्ध करून दिल्यामुळे तो त्यात गरगरत निघाला होता. हीच अवस्था मूळच्या
मध्यमवर्गाची झाली होती.
अशा सगळ्या कोंडीत संवेदनशील माणसापुढे
लिहिणं हाच सुटकेचा एकमेव मार्ग त्याला उपलब्ध होता. नेमकं यावेळी या
नवमध्यमवर्गाला लिहिण्याचं आणि प्रकाशनाचं एक स्वतंत्र विचारपीठ मिळालं. प्रकाशन
संस्था वाढल्या. वाचकवर्गात वाढ झाल्यामुळे नाही म्हटले तरी पुस्तकांचा खप वाढला.
या सगळ्याचा एक बराच म्हणता येईल असा परिणाम मराठी कादंबरीवर झालेला दिसतो. परंतु या
मोठ्या संधीच्या अवकाशात महानगरीय कादंबरी मात्र फारशी लिहिली गेलेली दिसत नाही. कदाचित
त्यांची ती गरज कमी झाली असेल किंवा वेगाने त्यांच्यावर आदळत असलेल्या गोष्टींचा
आणि नवमूल्यांचा नीट अन्वयार्थ त्यांना लावता आला नसावा. त्यामुळे
१९८०नंतर महानगरीय कादंबरीचा केंद्र बदलून गावाकडे सरकला होता तो या काळात अधिक
भक्कम झाला. त्यामुळे २००० नंतरची मराठी कादंबरी ही खेड्यातून आलेल्या लेखकांनीच
लिहिलेली आहे, हे आपल्याला नाकारता
येत नाही. आणि म्हणून या काळातल्या कादंबरीचा तोंडवळा हा बहुजनीय वास्तवाचा आणि बहुस्वरीय
राहिला आहे.
प्रवीण
बांदेकर, कृष्णात खोत,
किरण
गुरव, सरदार जाधव,
दिनकर
दाभाडे, अशोक कौतिक कोळी,
नामदेव
माळी, सुरेंद्र पाटील,
रमेश
इंगळे-उत्रादकर, सीताराम सावंत,
धम्मपाल
रत्नाकर, बालाजी मदन इंगळे,
रवींद्र
पांढरे, रफीक सूरज,
जयसिंग
पाटील, श्रीकांत देशमुख,
प्रदीप
धोंडिबा पाटील, नितीन भरत वाघ,
मनोज
बोरगावकर, अवधूत डोंगरे,
शिल्पा
कांबळे, सुशील धसकटे,
राकेश
वानखेडे, प्रसाद कुमठेकर,
प्रणव
सखदेव, श्रीरंजन आवटे,
नवनाथ
गोरे हे आजच्या काळाचे कादंबरीकार आहेत. ही यादी तसे आशादायक चित्र निर्माण करणारी
आहे. कारण एकूणच मराठीचे वाड्.मयीन पर्यावरण पाहिले तर अभिव्यक्तीचा संकोच होत चाललेला
असताना, कथेऐवजी कादंबरी हा
दीर्घ गद्यप्रकार हाताळणार्या लेखकांची संख्या वाढते आहे. खरं तर समाज माध्यमांचा
वाढता प्रभाव आणि परिणाम लक्षात घेता अनेकजण कवितेच्या नादी लागले आहेत. अर्थात हा
नाद वाईट नाही. परंतु लगेच त्यांना
अभिव्यक्तीची संधी मिळत असल्याने कवितेचे गांभीर्य कमी होत चालले आहे. कथेत फारसे
काही होताना दिसत नाही, अशा
एका निसरडेपणाच्या टप्प्यावर कादंबरीकारांची आणि कादंबर्यांची संख्या वाढते आहे.
अर्थात
ही केवळ संख्यात्मक वाढ नाही तर ती गुणात्मक देखील आहे. हे सगळे वर उल्लेखिलेले बहुतांश
लेखक काही अपवाद वगळता साधारण चाळिशीच्या आसपासचे आणि त्याच्या आतले आहेत. त्यांनी
जागतिकीकरण भल्याबुर्या अर्थाने पचवले आहे. तेव्हा ही सगळी मंडळी या भोवतालाकडे
कसे पाहते, हा प्रश्न आहे. कारण जागातिकीकरणाने आता खर्या अर्थाने पक्के
पाय रोवले आहेत. त्याचे भले-बुरे परिणाम आता लोकांसमोर आणि जगासमोर आले आहेत. या
सगळ्याचा अर्थ या कादंबरीने काय लावला आहे, हे
पाहणे वेधक ठरणार आहे.
प्रवीण बांदेकरच्या 'चाळेगत',
'उजव्या सोंडेच्या बाहुल्या', 'इंडियन
अॅनिमल फार्म' या कादंबर्या कोकणी
जीवनातील राजकीय आणि सांस्कृतिक हस्तक्षेपाच्या वाढत्या आक्रमणाबद्दल थेटपणे बोलत
राहतात. त्याच्या या कादंबर्या जरी रूपकात्मकता धारण करीत असल्या तरी त्या ज्या
पद्धतीने आजच्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल भाष्य करीत येणार्या भयावह काळाचे सूचन
करतात ते फार महत्त्वाचे आहे. कोकणातला सामान्य माणूस आपल्या हजारो वर्षांच्या
सांस्कृतिक संचितावर समृद्ध जीवन जगत असताना विकास, ग्लोबल
नीती यांच्या नावाखाली जो नंगा नाच घातला जात आहे, तो
किती विध्वंसक आणि क्रूर आहे, याचे
चित्रण या कादंबर्या करतात. हे चित्रण चढत्या क्रमाने करताना,
आपला
प्रयोगाचा धर्म न विसरताही या कादंबर्या अधिकाधिक वाचनीय होत जातात. विशेषत:
त्यांची 'इंडियन अॅनिमल फार्म ही
कादंबरी या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. ही कादंबरी जरी रुपकात्मक असली तरी आजच्या
वर्तमानाच्या भयावहतेची आणि भविष्यातल्या धोक्यांची नांदी नोंदवत जाते. प्रवीण
बांदेकर प्रत्येक कादंबरीत वेगळा प्रयोग करीत आले आहेत. चाळेगत,
उजव्या
सोंडेच्या बाहुल्यात पारंपरिक कथनाचे आणि अभिव्यक्तीचे, लोककलांचे
सगळे प्रकार हाताळत आपले म्हणणे अधिक परिणामकारक करतो. तर इंडियन.. मध्ये अख्खी
कादंबरीच रुपकात्मक अंगाने साकारली तरी तिची गुणवत्ता उणावत नाही.
कृष्णात खोतने 'गावठाण',
'रौंदाळा', 'झडझिंबड',
'धूळमाती', 'रिंगाण'
या कादंबर्यांमधून बदलत्या ग्रामजीवनाचा वेध घेतला आहे. २०००पासून लिहित असलेल्या
कृष्णात खोतने केवळ बदलत्या गावाचेच नव्हे तर; गावांबरोबर बदलता निसर्ग,
पर्यावरण,
माणूस
आणि त्याच्या वर्तनात होत चाललेला बदल, खेड्यावर
लादले जात असलेले शहरीकरण, त्यातून
आकारलेले नवे अर्थकारण, राजकारण,
सत्ताकारण,
दुष्काळ,
पूर,
प्राणीविश्व
यांच्यासकट आकारला आलेली ही संस्कृती कशी कळाहीन बनत चालली आहे,
याचा
प्रत्यय या कादंबर्या देतात. त्याच्या प्रत्येक कादंबरीचा नायक वेगळा आहे.
तो
कधी गावाला नायकत्व बहाल करतो. कधी पाऊस संपूर्ण कादंबरीभर कोसळत राहून नायकत्व
सांभाळतो. तर कधी प्राणिविश्व त्याच्या कादंबरीचे नायक बनतात. याचे कारण गाव हा
केवळ माणसांनी आकारला येत नाही तर तो प्राणी, पर्यावरण,
पाऊस,
दुष्काळ,
शेती
या सगळ्यांनी आकाराला येतो, याचे
एक सततचे जागते भान त्याची कादंबरी ठेवते. ही कादंबरी जरी गावव्यवस्थेचे चित्रण
करीत असली तरी तिच्यामागचा कृष्णात खोतच्या आस्थेचा व्यूह आणि आकलनाचा अवकाश मोठा
आहे. त्यामुळे या चित्रणाच्या कक्षा विस्तारत जातात आणि एकूणच प्राणी,
निसर्ग,
पर्यावरणासह
संपूर्ण मानवीसमूह कसा डेडएंडला निघाला आहे, याचे
सूचन करताना दिसतात.
नामदेव माळी यांनी 'छावणी'
आणि
'खरडछाटणी'
या
दोन कादंबर्यांमधून शेती आणि त्याला लगडून येणार्या शेतकर्यासह प्राणिविश्वाच्या
उद्ध्वस्ततेचे चित्रण केले आहे. 'छावणी'मध्ये
दुष्काळामुळे ज्या जनावरांच्या छावण्या निर्माण होतात, त्या
छावण्यांमध्ये शेतकर्यांबरोबर बैल-गाय तत्सम शेतीच्या अर्थकारणाशी जोडल्या
गेलेल्या जनावरांचे हाल कसे होतात, याविषयीचे
चित्रण आहे. तर 'खरडछाटणी'मध्ये
द्राक्षबागेच्या रुपकाधारे शेतकर्याचे होणारे शोषण केंद्रस्थानी आहे. या
शोषणामुळे सगळी कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधाची व्यवस्था कशी कोलमडून पडते,
याचे
अत्यंत विदारक चित्र ही कादंबरी रेखाटते. संघर्षातही उभा राहण्याचा प्रयत्न करून
काहीच हाती येत नाही, हे
पाहून या कादंबरीतला गोपूतात्या आत्महत्या करतो. हे आत्महत्येचे प्रकरण केवळ
गोपूतात्यापुरते राहात नाही, समग्र
शेतीच्या अभावाचे आणि त्यातून येणार्या कंगालपणाचे दर्शन येथे घडते.
जागतिकीकरणाने जी नवी शोषणाची परंपरा निर्माण केली आहे, तिचा
परिणाम म्हणजे शेतकर्यांच्या आत्महत्या आहेत. या आत्महत्यांची नेमकी राजकीय आणि
सांस्कृतिक चिकित्सा केली जात नाही. शेती आणि तिचे अर्थशास्त्र याचा विचार केला जात नाही. त्याच्या
मालाला भाव मिळत नाही. खतांच्या वाढत्या किंमती आणि बेभरवशाचा निसर्ग यामुळे संपूर्ण
कृषिव्यवस्थाच कशी नाहीशी होत चालली आहे,
याविषयी
ही कादंबरी भाष्य करते आहे.
प्रदीप धोंडिबा पाटील यांची 'गावकळा'
ही
कादंबरी ग्रामस्वच्छता अभियानाच्या निमित्ताने गावपातळीवरील राजकारणाचा धांडोळा
घेते. गावाच्या विकासाऐवजी आपल्या अस्तित्वासाठी घाणेरडे राजकारणच कायम
पृष्ठभूमीवर येत राहते, याचे
परिणामकारक चित्र ही कादंबरी उभे करते. दिनकर दाभाडे यांची 'व्हाया
सावरगाव खुर्द' ही कादंबरी अशीच
बदलत्या गावाचे चित्र रेखाटते. तर एका वेगळ्या अंगाने जाणारी पण नदीचे आणि
तिच्याबरोबर चालत आलेल्या संस्कृतीचे कोसळणे काय असते, याचा
प्रत्यय मनोज बोरगावकर यांची 'नदीष्ट'
ही
कादंबरी देते.
सरदार जाधवांनी 'कोयता'मध्ये
आणि 'येसन'मध्ये
ज्ञानेश्वर जाधवर यांनी ऊसतोड कामगारांचे जीवन चितारले आहे. त्यांच्या लेखनात
अभावग्रस्त लोकांचे जगणे जसे आहे, तसेच
शोषणाचे संदर्भही आहेत. या कादंबर्या जरी चरित्रात्मक तपशिलाकडे जात असल्या तरी एकीकडे ऊस
उत्पादकाचा उंचावत चाललेला आर्थिक स्तर आणि दुसरीकडे कधीकाळी शेतीचा मालक असलेला
बहुजन शेतकरी किंवा गावगाड्याला लगडून येणारा सगळ्याच जाती धर्माचा माणूस आणि
त्याचा खालावत चाललेला आर्थिक, सामाजिक
स्तर यांच्यातील द्वंद्व या कादंबर्या देखाटतात. तर अशोक कोळी यांच्या 'पाडा',
'कुंधा' या
कादंबर्या शेतकर्याच्या अवस्थेचे आणि त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध
घेताना दिसतात. इथली मार्केट इकॉनॉमी सगळीकडून शेतकर्याचा घात करायला टपली आहे,
यावर
या कादंबर्या भाष्य करतात. नवनाथ गोरेची 'फेसाटी'
चरित्रात्मक
तपशिलांशी संबंधित असली तरी तिच्यातून शेतकर्याच्या अभावग्रस्ततेचे चित्रण आलेले
पहावयास मिळते.
शिक्षणव्यवस्था आणि आजचे वास्तव
याविषयी रमेश इंगळे उत्रादकर, सीताराम
सावंत, बालाजी मदन इंगळे,
प्रसाद
कुमठेकर, सुशील धसकटे,
जयसिंग
पाटील, रफीक सूरज यांनी
कादंबरी लेखन केले आहे. रमेश इंगळे उत्रादकर यांनी 'निशाणी
डावा अंगठा' आणि 'सर्व
प्रश्न अनिवार्य' या कादंबर्यांच्या
माध्यमातून प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे
वाभाडे काढले आहे. प्रशासनाने आणि शासनाने प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था कशी
खिळखिळी केली आहे, यावर
या कादंबर्या प्रकाश टाकतात. शिक्षण ही प्रगतीची पहिली खिडकी आहे,
तीच खिडकी बंद करून आपणच आपले मारेकरी होत चाललो आहोत. शिक्षणाच्या
खुल्या धोरणाने, शासनाच्या कामचलावू प्रवृत्तीने सगळी व्यवस्था
कशी नासत चालली आहे, यावर
या कादंबर्या भेदक भाष्य करतात. सीताराम सावंत यांच्या 'देशोधडी'
व
'भुई भुई ठाव दे'
या
कादंबर्या अनुक्रमे उच्चशिक्षित बेकार तरूणांच्या अस्वस्थतेचे आणि शहराला लागून
असणार्या शेतीचे जेव्हा प्लॉटिंग केले जाते, तेव्हा
मूळचा शेतकरी कसा विस्थापित होतो याचे चित्रण करतात. शेती आणि शिक्षण या सामान्य
माणसांच्या आयुष्याला आकार आणि दिशा देणार्या महत्त्वाच्या घटक आहेत. परंतु याच
दोन घटकांचे आणि त्यानुषंगाने येणार्या सांस्कृतिक घटितांचे सातत्याने शोषण कसे
होत जाते, हा सीताराम सावंत
यांच्या लेखनाच्या आस्थेचा केंद्रबिंदू राहिला आहे. बालाजी मदन इंगळे 'झिम
पोरी झिम'मधून शिक्षणाचे महत्त्व
अधोरेखित करताना,मुलींच्या शिक्षणात
आजही किती अडथळे आहेत यावर भाष्य करतो. या निमित्ताने गावपातळीवरील जातकारण किती
भयानक आहे, याचाही तो लेखाजोखा
मांडतो. किरण गुरवची 'जुगाड'
ही
कादंबरी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगारीची व्यथा मांडते.
त्याचबरोबर आजच्या तरुणाला ही व्यवस्था कशी सर्व बाजूने यंत्रवत बनवत चालली आहे,
याचा
ती एक अनोखा अनुभव देते.
सुशील धसकटे 'जोहार'च्या
माध्यमातून उच्चशिक्षित ग्रामीण तरुणाची जगण्यावर असलेली निष्ठा,
त्याची
देशी जाणीव महानगरीय व्यवस्थेत कशी चिरडली जाते आणि त्या चिरडण्याला
शिक्षणव्यवस्था कशी जबाबदार आहे, याकडे
आपले लक्ष वेधते. प्रसाद कुमठेकर आपल्या तिरकस आणि उपहासात्मक शैलीतून
शिक्षणव्यवस्थेतून शिक्षणाचा आत्माच कसा हरवून गेला आहे याची प्रभावी नोंद आपल्या
'बगळा' या
कादंबरीतून करतो. तर 'बारकुल्या बारकुल्या
स्टोर्या' तून त्याने विविध
पात्रांच्या निवेदनातून गावाचे गावपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जयसिंग पाटीलची '
नामशेष
होणारा माणूस' ही कादंबरी
प्राध्यापकाच्या भावविश्वाची, त्याच्या
गावातून येण्याच्या व शहरात स्थायिक होऊ पाहण्याच्या मूल्यसंघर्षाची नोंद घेते. या
निमित्ताने त्याने उसवत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेचे आणि शिक्षणव्यवस्थेचे
अंतर्बाह्य जग नोंदवले आहे. तर रफीक सूरजने 'रहबर'च्या
निमित्ताने शिक्षणात आणि नगरात आजही कसा धर्मवाद पोसला जातो,
यावर
भाष्य केले आहे. या सगळ्यात प्राध्यापक म्हणून काम करताना माणसाला आजही जात-धर्म
कसे अडचणीत आणू पाहते, यावर
त्याने बोट ठेवले आहे. रवींद्र पांढरे याची 'पोटमारा'ही
याच अनुषंगाने शिक्षण आणि ग्रामीण व्यवस्था यांचा सांधा जोडताना काय-काय होते,
मूल्यांशी
कशी झटापट करावी लागते, याचा
प्रत्यय देते.
धम्मपाल रत्नाकर,
नितीन
भरत वाघ, श्रीरंजन आवटे,
प्रणव
सखदेव, अवधूत डोंगरे,
शिल्पा
कांबळे, राकेश वानखेडे यांनी
नागर आणि महानगरीय पार्श्वभूमीवर आकाराला येत असलेल्या आजच्या उच्चशिक्षित
तरुणाच्या जाणिवांचे, त्यांच्या
जीवनशैलीचे, अभावाचे,
विचारधारेतील
चैतन्याचे, त्यांच्यातील मुक्त
लैंगिक संबंधांचे चित्रण केले आहे. नितीन भरत वाघ 'व्हर्जिन'
मधून
आर्थिक अपरिहार्यतेच्या गरजेतून आपली व्हर्जिनिटी विक्रीस काढलेल्या तरुणीच्या जाहिरातीच्या निमित्ताने आजच्या
जगातील वासनांध प्रवृत्तीवर बोट ठेवतो. जी गोष्ट कधीच व्हर्जिन मानली जात नव्हती
ती मधल्या काळात अचानक आकाराला आली आणि योनिशूचितेला अवास्तव महत्त्व प्राप्त
झाले. या मागे सामाजिक-सांकृतिक आणि आर्थिक व पवित्रतेचे संदर्भ कसे छुपेपणाने दडले
आहेत, याच्या तपशिलात ही
कादंबरी जाते आणि पुरुषांचा वासनांध चेहरा उघडा पाडते. तर 'विसकट'मधून
धम्मपाल रत्नाकर यांनी वेश्या व्यवसायातील बारकावे आणि त्यांच्यातील टिकून
असलेल्या माणूसपणावर भर देताना,प्रामाणिकपणे
शिक्षण घेणार्या तरूणाला त्या कशी भरघोस मदत करून आपली नैतिकता सिद्ध करतात,
यावर
प्रकाश टाकला आहे. श्रीरंजन आवटेने आपल्या 'सिंगल
मिंगल'मधून आणि प्रणव सखदेवने 'काळे
करडे स्ट्रोक्स' मधून व्हर्जिनिटीच्या
बुरसट कल्पना आजच्या पिढीने धुडकावून लावल्या आहेत, ही
पिढी आपला शरीरोत्सव मुक्तपणे अनुभवू शकते, अर्थात
हा मुक्त लैंगिक संबंध याचा अर्थ स्वैराचार असा होत नाही. कारण
सेक्सच्या बाबत ही पिढी जरी बुरसटलेल्या वृत्तीची नसली आणि शरीरसंबंधाच्या
चैतन्याच्या सोहळ्याबाबत सजग असली तरी त्यांना मन-मेंदूची केमिस्ट्री महत्त्वाची वाटते.
ती जुळली तरच सेक्स आनंदी होतो. पर्यायाने
जगणे आनंदी होते, तिथे
विसंवाद झाला तर काळोखाची वाट चालावी लागते. केवळ शरीरसुख म्हणजे मुक्तपणा नव्हे
त्याच्याही पलीकडे एक मोठे जीवन आणि काही एक तत्त्वविचार आहे,याचे
दिशादर्शन घडवण्याचा प्रयत्न या कादंबर्या करतात. परंतु त्यांना जगणं आणि विचार
यांची सांगड घालता आली नाही.
अवधूत डोंगरेच्या 'स्वत:ला
फालतू समजण्याची गोष्ट' मध्ये
महानगरीय मानवाच्या व्यस्त जीवनाचे चित्रण आले आहे. पत्रकारिता,
राजकारण,
तरुणांचे
आभासमय जग आणि आजच्या वर्तमानाचा अनाकलनीय गरगरत राहणारा भोवरा समग्र जीवनाला कसा
फालतू बनवत चालला आहे, याविषयी
ही कादंबरी बोलते. तर 'एका
लेखकाचे तीन संदर्भ' ही
कादंबरी लिहिण्याच्या निर्मितिप्रक्रियेवर बोट ठेवते. गडचिरोलीच्या परिसराच्या चित्रणाच्या
निमित्ताने दु:ख, हिंसा,
हत्या,
दारिद्र्य
यांना केंद्र करणारी 'पान,पाणी
नि प्रवाह' ही कादंबरी आदिवासी
भाग, नक्षलवादी जीवन,
शासनव्यवस्था
आणि विकास यावर भाष्य करते. गावापर्यंत रस्ता तयार झाल्याचा आनंद होण्याऐवजी पोलीस
लवकर गावात पोचतील अशी भीती नक्षलवादी लोकांना वाटते. विकासाचे हे एक वेगळेच रूप
आपल्या समोर येते. जागतिकीकरण्याच्या रेट्यात सामान्य माणूस कसा नागवला जात आहे,
याचे
भान अनेकांना येऊनही कुणी काहीच करीत नाही, याची
तीव्र चीड ही कादंबरी व्यक्त करताना; इथल्या
व्यवस्थेचे बुरखे ओरबाडून काढते. त्याची 'भिंतीवरचा
चष्मा' ही कादंबरी ईशान्य
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची कहाणी सांगते.
रूढ अर्थाने अवधूतच्या कादंबर्यांना
कथानक नसते. एक वेगळी लय आणि वेग त्याच्या निवेदनात असतो. गोष्ट सांगण्यासाठीचा
निवांत अवकाश आणि सुसेगाद जगणंच उपलब्ध नसेल तर आपण गोष्ट त्याची गोष्ट तर कशी
करणार, असा प्रश्न त्याला
पडला असल्याने त्याच्या निवेदनात जशी गती असते, तशी
एक प्रकारची विसंगतता आणि अतार्किकता असते. ती सतत कादंबर्यांभर वाहत राहते.
तुकड्या-तुकड्यांनी जोडलेले हे जग म्हणजे एका अर्थाने मानवी विखंडनाची जी
प्रक्रिया आहे, ती किती अस्तित्वहीन
बनत चालली आहे, याचा हा आलेख आहे.
उपरोधी आणि तिरकस शैलीत उत्तर आधुनिक म्हणवल्या जाणार्या जगण्याचा समाचार घेणार्या
या कादंबर्या आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात.
राकेश वानखेडे आणि शिल्पा कांबळे
यांनी वेगळ्या प्रकारची कादंबरी लिहिली आहे. म्हणजे यांच्या कादंबरीत नागर जीवन येते,
पण
त्याला जात-धर्माच्या शोषणाचे संदर्भ अधिक आहेत. एका अर्थाने दलित कादंबरीच्या
कक्षा विस्तारन्याचे काम या कादंबर्यांनी केले आहे. राकेश वानखेडे याची 'पुरोगामी'
ही
कादंबरी दलित साहित्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करते. माओवाद,
मार्क्सवाद,
आंबेडकरवाद
या सगळ्या वादांचा लेखाजोखा मांडताना दलित जीवनाचे तपशीलही ही कादंबरी नेमकेपणाने
नोंदवत जाते. कोणताही एक सुटा विचार इथल्या सामान्य माणसाचे शोषण थांबवू शकणार
नाही, त्यासाठी मार्क्सवाद आणि
आंबेडकरवाद यांची सांगड घालायला हवी, अशी
मांडणी ही कादंबरी करते. तर शिल्पा कांबळे यांची 'निळ्या
डोळ्यांची मुलगी' ही
कादंबरी महानगरीय दलित जीवनाचे चित्र रेखाटते. ही कादंबरीही आंबेडकरवादाला
मार्क्सशी जोडून घेऊ पाहते. अत्यंत अनोख्या प्रयोगशैलीत साकार झालेली ही कादंबरी
सगळे संकेत झुगारून देत, भाषिक
साचेबंदपणा नाकारत नव्या काळाची भाषा बोलते. जातीय आणि धार्मिक संघर्ष कितीही
विकोपाला गेला तरी लढा थांबवून चालणार नाही,
याचे भान देणारी ही कादंबरी यासाठी महत्त्वाची आहे की, एका
तरूण महिलेने हे जे चित्र रेखाटले ते अत्यंत प्रभावी आणि स्त्रीवादी जाणिवेचे
असल्याने मराठी कादंबरीत ते अनोखे आहे. महाराज, महंत,
बुवा,
भंते
हे सगळेच कसे वासनांध आहेत, त्यांच्यातलं
पौरुषत्व आणि तथाकथित धर्मतत्त्व अद्यापही स्त्रीला माणूस मानायला तयार नाही. धर्माच्या
नावाने भोंगळ अध्यात्म आणि त्याखाली लपलेली वासनामय वृत्ती यामुळे या कादंबरीच्या
नायिकेचा सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडून जातो. परंतु तरीही तिला बुद्ध,
मार्क्स
आणि डॉ. आंबेडकर खुणावत राहतात. म्हणून ती पुरोगामी चळवळीत सक्रीय होते. जरी इथली
शासकीय व्यवस्था या सगळ्या चळवळी मोडून काढण्यासाठी टपलेली असली तरी,
त्या
व्यवस्थेला विरोध करीत राहण्यातच आपले यश आहे, असा
आशावाद ही कादंबरी निर्माण करते. अंजली जोशी यांची 'विरंगी
मी विमुक्त मी' ही कादंबरी
चरित्रात्मक परंतु एका स्त्रीच्या लैंगिक वाढीबरोबर मानसिक वाढीची कहाणी सांगते.
तर उज्ज्वला शिंदे यांनी 'बाईचं
घर मेणाचं' मध्ये शिक्षणव्यवस्थेत
प्रवेश करू लागलेल्या खेड्यातल्या पहिल्या पिढीतल्या मुलींचे बालसुलभ भावविश्व
रेखाटले आहे.
रामचंद्र नलावडे यांची 'कुरण'
प्रशासनातील
भ्रष्ट व्यवस्थेवर प्रहार करते. ही व्यवस्था अगदी सामान्य माणसालाही कशी वेठीस
धरते, याचा लेखाजोखा मांडते.
तर अरूण चव्हाण यांची 'तिमीरभेद'
ही
कादंबरी ऐतिहासिक आणि काल्पनिक यांच्या लेखनाचा उत्तम नमुना म्हणून पुढे येते.
राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या चरित्रात्मक तपशीलाकडे
निर्देश करणारी ही कादंबरी लोकशाही प्रधान
राजवटीच्या अंताचीही कहाणी सांगते. तर नंदा खरे यांची 'उद्या'
भविष्यातले जग आणि भारत कसा असेल,
यावर
भर देताना हिंसा, नराचे
अधिकत्व आपल्याला नाशाच्या दिशेने कसे घेऊन निघाले आहे, याची
सप्रमाण चिकित्सा करते. त्यासाठी
विज्ञानातल्या अनेक प्रयोगांचा, प्राणिविश्वाचा
दाखला देत, मानवाची उद्याची वाटचाल कशी
विनाशाच्या दिशेने निघाली आहे, याचे
दिग्दर्शन ही कादंबरी करते.
आजच्या मराठी कादंबरीचा हा प्रवास
आहे. हा प्रवास गुणात्मक आणि संख्यात्मक असा दुहेरी आहे. साधारणपणे कृषिव्यवस्था
आणि तिला लगटून येणारी तिथली बदलती मूल्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था,
महानगरीय
मूल्यव्यवस्था आणि तेथील जीवनातील लैंगिक धारणा अशा प्रकारचे विषय या कादंबरीने
हाताळलेले आहेत. हे विषय हाताळताना त्यांनी अभिव्यक्तीच्या नव्या शक्यताही शोधल्या
आहेत. त्यामुळे मराठी कादंबरीने आपले मराठी साहित्याच्या मध्यवर्ती क्षेत्रात आपले
प्रथम स्थान अबाधित राखले आहे.
॥
चार ॥
ही सगळी मांडामांड म्हणजे आजच्या
कादंबरीच्या इतिहासाचे विहंगम दर्शन आहे. अर्थात हा केवळ आढावा नाही,
त्यामागे जागतिकीकरण या व्यवस्थेचा मूल्यविचार आहे. जागतिकीकरण,
उदारीकरण,
खाजगीकरण
ह्या आजच्या काळाच्या परवलीच्या संज्ञा-संकल्पना बनून राहिल्या आहेत.
त्यांचा
मानवी जीवनावर जो आत्यंतिक परिणाम झालेला आहे आणि त्यातून एकूण मानवी अस्तित्वच
धोक्यात आले आहे. या सतत बदलत जाणार्या आणि कसलाच अंदाज येऊ न देणार्या या काळाने
समग्र मानवजातच वेठीस धरली आहे. या काळाचा वेग इतका प्रचंड आहे की,
तो
मानवाच्या आवाक्यात यायला तयार नाही. अशा या काळाला लेखक कसा पकडतो आहे,
त्याचा
तो अन्वयार्थ कसा लावतो आहे, याचा
विचार येथे केला आहे.
एकूणच आजच्या मराठी कादंबरीने या वास्तवाला
भिडण्याचा प्रयत्न केला आहे. ती आशयाबरोबर रचनेचेही प्रयोग करीत आली आहे. विशेषत:
भाषिक अंगाने या कादंबरीने बोलींचा अत्यंत सन्मानाने स्वीकार करून तिचे वेगळेपण
अधोरेखित केले आहे. तसेच
आजच्या महानगरीय भाषेतील इंग्रजी, हिंदीचा
वाढता वापरही या कादंबरीने अधोरेखित केला आहे. या कादंबरीला विचारांचेही वावडे
नाही. ती काही एक विचार घेऊन पुढे येताना दिसते आहे. पारंपरिक रचनाबंध झुगारून नवे
बंध निर्माण करण्याचाही प्रयत्न करीत आहे. आशय-विषयाच्या वेगळ्या वाटा चोखाळणारी
आजची मराठी कादंबरी जुन्या-नव्या लेखकांनी समृद्ध केली आहे. गावपातळीपासून
महानगरापर्यंत आणि छोट्या समूहापासून उच्चभ्रू वर्गापर्यंत सगळ्या जाती-धर्माच्या
मूल्यविचाराला तिने आपल्या कवेत घेतले आहे. ही कादंबरी कायम शोषितांच्या बाजूने
उभी राहत आली आहे. तिने जमेल तेवढा शासनकर्त्या जमातीचा आणि शोषकांचा खरपूस समाचार
घेण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच दुसरा अर्थ या कादंबरीने व्यवस्थेमध्ये सतत सांस्कृतिक
हस्तक्षेपाचे राजकारण केले आहे. या कादंबरीने मराठी साहित्याच्या कक्षा
विस्तारण्याचेही काम केले आहे.
ही सगळी वाटचाल समाधाकारक वाटत असली ज्या
वेगाने काळाचे आक्रमण होत आहे तो वेग या कादंबरीला पकडता आलेला नाही. कारण ज्या
पद्धतीचा हस्तक्षेप आजच्या राजकारणाने आणि संस्कृतिकारणाने सुरु केला आहे,
त्याला
उत्तर देण्यात किंवा त्या समस्येला भिडण्यात ही कादंबरी कमी पडते आहे. म्हणजे
गावस्तर घेतला तरी त्याचे चित्रण करणारा लेखक कायम तिथून बाहेर पळण्याची वाट शोधत
आला आहे. जो तिथून बाहेर पडण्याच्या शक्यता शोधतो आहे, तो
लेखक आपल्या जगण्याच्या आस्थेचा पट- त्याने
कितीही ठरवले तरी-व्यापक करून,
आतून स्वत:ला भिजवून घेऊन ते गरगरणारे वास्तव तो कागदावर उतरवू शकणार नाही. कारण
आजचे गाव इतके वेगाने बदलत आहे की, त्याचा
वेग गावात राहणार्याला कळत नाही. आणि कळला तरी तो लेखक नाही. आणि जो लिहिणारा आहे
तो गावाशी आजही बांधला गेला असला तरी तसा तो त्रयस्थ बनलेला आहे. गाव आतून ज्या
पद्धतीने उसवत चालले आहे, ती
उसवण आणखी मराठी कादंबरीत यायची आहे. तिथल्या जातकारण आणि अर्थकारणाने गावाला जे
हिडीसपण आणी बकालपण दिले आहे आणि त्यातून तिथला तरूण जो दिशाहीन झाला आहे,
यावर
ही कादंबरी बोलत नाही. पुन्हा नव्याने जी सरंजामीची आणि धर्माची नवी वारूळे तयार
होत आहेत, त्यांची चिकित्सा
झालेली दिसत नाही. वेगाने सडत चाललेल्या त्या
राजकरणावर ही कादंबरी भाष्य करीत नाही. त्यामुळे जरी आजच्या कादंबरीचा चेहरा
बहुजनीय बनला असला तरी तिने आणखी वास्तववादाच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. अनुभवाचे
कल्पनांतर करून त्याला एका घाटात बसवायचे असते, याचे
फार कमी लेखकांना भान आहे. कादंबरीचा घाट आतून समजून घेऊन लिहिणारे लेखक अत्यल्प
असल्याने ही कादंबरी जरी अधिक प्रमाणात लिहिली गेली असली तरी तिने मागील
कादंबरीच्या वाटा पुसून,
आपली नवी वाट निर्माण केली आहे,
असे दिसत नाही.
जी गोष्ट गावाची तीच महानगराची.
एक
तर महानगरीय म्हणावी अशी कादंबरी अलीकडे फारशी लिहिली गेलेली दिसत नाही. जी लिहिली
गेली ती भाऊ पाध्येंच्या पुढे गेली आहे, असे
म्हणणे कठीण आहे. वासूनाका ते धोपेश्वरकर असा व्यापक पट कवेत घेऊन महानगराचे स्खलन
अधोरेखित करणारे पाध्ये ज्या पद्धतीने जीवनाला भिडतात, तसे
कोणी येथे भिडताना दिसत नाही. काही जण अगोदर डोक्यात प्रयोगाचे प्रारूप तयार करून
मग कादंबरी लिहीत असावेत असे वाटावे इतके त्यांचे प्रयोग अंगावर येतात. बरं ते
अंगावर आले तरी त्यांच्या या प्रयोगातून काही एक भरीव विधान सापडते आहे,
असेही
होत नाही. तर आजची तरुण लेखक मंडळी महानगर आतून बाहेरून नीट समजून घेऊन,
अभ्यास
करून काही एक मांडणी करीत आहेत,
असे वाटत नाही. त्यामुळे या कादंबरीला तसा स्वतंत्र चेहराच प्राप्त झालेला नाही.
एकूण आजच्या मराठी कादंबरीचा विचार
केला तर, अपवाद वगळता आजच्या
राजकीय आणि सांस्कृतिक अराजकावर नेमकेपणाने कादंबरी लिहिली जात आहे,
असे
दिसत नाही. जी एक सांस्कृतिक अरेरावी सगळीकडे पसरत चालली आहे,
तिच्या
विरोधात मराठी कादंबरी काही करत नाही. जी काही वैचारिक पक्वता या कादंबरीने व्यक्त
केली आहे, तीही बोटावर मोजण्याइतक्याच
कादंबर्यात आली आहे. खुल्या अर्थकारणामुळे गाव ते महानगर अशा टप्प्यावर काय-काय
घडामोडी घडल्या आणि त्याचे आर्थिक काय परिणाम झाले, त्या
आर्थिक परिणामातून इथल्या सांस्कृतिक व्यवस्थेची कशी वाट लागली,
याचे
चिंतन या कादंबरीत आलेले नाही. त्याच बरोबर महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग आजही
ज्याला साधे नागरिकत्व मिळालेले नाही, ज्याची
आयडेंटिटीच नकाशावर नाही असा मोठाच वर्ग,
आदिवासी-दलित-उपेक्षित
वर्ग या कादंबरीच्या व्यवहारापासून कोसो
मैल दूर आहे. उलट आधीच्या दलित चळवळीच्या काळात उपेक्षित समाजाचे जे एक प्रतिनिधित्व
आले होते, तेही आजच्या कादंबरीत
दिसत नाही. म्हणजे जागतिकीकरणाने माणसांचे जे सपाटीकरण केले आहे,
त्या
सपाटीकरणात सामान्य सर्वहारा माणसाचा जो चेहरा हरवला आहे, तो
हरवलेला चेहरा कुठेच दिसत नाही. त्यामुळे या व्यवस्थेत संपूर्ण ताकदीने हस्तक्षेप
करण्याची अथवा होणाची जी गरज आहे, ती
आजतरी पूर्ण होताना दिसत नाही.
आशयाबरोबर अभिक्यक्तीच्या नव्या वाटा
या कादंबरीने चोखाळल्या असल्या तरी, आधीच्या कादंबरीच्या ती फार पुढे गेली आहे असे
दिसत नाही. मराठी साहित्य व्यवहाराच्या केंद्रस्थानी असूनही या कादंबरीला आपला
स्वतंत्र असा जागतिकीकरणोत्तर चेहरा निर्माण करता आला नाही. नेमाडे-पठारे-मनोहर-गवस-
साठे- बांदेकर- खरे अशी एक नवी परंपरा तयार झालेली दिसते. परंतु
साठोत्तरी कादंबरीने जशी नवकादंबरीची ठळक परंपरा निर्माण केली होती,
तशी
आजच्या कादंबरीने केलेली दिसत नाही. वास्तवाचा सरधोपट मार्ग स्वीकारून लिहिणार्या
लेखकांची मोठीच फौज तयार झाली. पण त्यांनी कादंबरीच्या घाटाचा अभ्यास केला
नसल्याने रूपाच्या बाबतीत मराठी कादंबरीत फारसे काही नवे झालेले आढळत नाही.
यामागे समीक्षकांचा अभाव हेही एक कारण
असावे. कारण मराठी समीक्षेचा विचार केला तर रा.ग. जाधव, गंगाधर
पाटील, म.सु.पाटील,
हरिश्चंद्र
थोरात अशी निखळ समीक्षक असणारी ही मागच्या पिढीतील मंडळी सोडली तर आज असा कोणीही समीक्षक दिसत
नाही. उलट अलीकडे ललित लिहिणाराच वर्तमानपत्री समीक्षा लिहिताना दिसत आहे.
त्यामुळे वाड्.मयीन पर्यावरणात जो एक वैचारिक दबदबा असावा लागतो,
तो
दिसत नाही. वाड्.मयीन संकल्पनांचा परिचय होणेही दुरापास्त बनले असताना,
आपण उत्तर आधुनिकतेच्या गप्पा करू लागलो आहोत. मुळात खरंच आपल्याकडे आधुनिकता आली
होती का ? होती तर ती कोणत्या
स्वरूपाची होती ? याचाही नीट विचार
झालेला नाही. असे असताना आपण उत्तर आधुनिक वगैरे गप्पा मारीत असतो. त्यामुळे जो एक
वैचारिक भोंगळपणा आजच्या समीक्षेत जाणवतो आहे, तोच
संकल्पनात्मक भोंगळपणा कादंबरीच्या बाबतही दिसतो. त्यामुळे अभ्यास करून कादंबरी
लिहायची असते, हे अनेकजणांना मान्य
होत नाही. साहजिकच संकल्पनात्मक पातळीवर मराठी कादंबरी फार पुढे सरकताना दिसत
नाही.
एकूणच मराठी समाजात साहित्याविषयी जी टोकाची
अनास्था निर्माण होऊ लागली आहे, तिचाही
काही परिणाम मराठी कादंबरीबर झालेला असावा. असे असले तरी काही एका असमाधानासह आणि मर्यादांसह
मराठी कादंबरीने विकासाच्या शक्यता सूचित केल्या आहेत, हे
नाकारता येणार नाही. तेव्हा या मर्यादा ओलांडून मराठी कादंबरी पुढे जाईल आणि नवी
परंपरा निर्माण करेल याची खात्री नक्कीच आहे.
-----------------------------------------------------
भूमी, शाहूनगर,
कुर्डूवाडी
रोड,
टेंभुर्णी, ता.
माढा, जि. सोलापूर.
४१३ २११.
टिप्पण्या