विंदा करंदीकर यांची समीक्षा
विंदा करंदीकर यांची समीक्षा : महेंद्र कदम
१९५४ ते १९९४ हा विंदांच्या समीक्षा लेखनाचा कालखंड आहे. हे समीक्षा लेखन त्यांच्या ‘परंपरा आणि नवता’(१९६७),‘उद्गार’(१९९६) आणि ‘साहित्यमूल्यांची समीक्षा’(२००४,अनुवाद:आ.ना.पेडणेकर) या ग्रंथांत व्यक्त झाले आहे. हे विचार लेख, निबंध, भाषणे, पत्रे, मुलाखती अशा विविध रुपांतून व्यक्त झाले आहेत. समीक्षेच्या प्रांतात हा कालखंड महत्त्वाचा आहे. कारण ना.सी.फडकेकृत कलावाद, बा.सी.मर्ढेकर यांचा सौंदर्यवाद आणि भालचंद्र नेमाडे यांचा वास्तववाद या तीन महत्त्वाच्या वादांनी हा कालखंड समृद्ध झाला आहे. तसेच पाश्चात्य समीक्षा विचारांचा परिचय आणि अंगीकार या काळातच अधिक चर्चिला आणि उपयोजिला गेला आहे. यातून मराठी साहित्य आणि समीक्षा समृद्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण विंदांचा समीक्षा विचार तपासणार आहोत.
विंदांची समीक्षा आपणाला तीन पातळ्यांवर समजून घ्यावी लागते. पहिली पातळी ही त्यांच्या स्वत:च्या लेखनविषयक भूमिकेची आहे; दुसर्या पातळीवर त्यांचा समीक्षा विचार, तर तिसर्या पातळीवर त्यांनी केलेली उपयोजित समीक्षा येते. या तीन पातळ्या समजून घेताना त्यांच्या जीवनविषयक आणि साहित्यविषयक घडणीविषयी ज्या नोंदी त्यांनी केल्या आहेत, त्या आकलनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या नोंदी केवळ जैविक वाढीच्या नाहीत तर त्या वाड्.मयीन वाढीशीही संबंधित आहेत. ते स्वत: इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना पाश्चात्य समीक्षेचा जसा जवळून परिचय होता, तसाच साहित्याशीही होता. त्यामुळे त्यांनी आपला बराच साहित्य विचार इंग्रजीतूनही मांडला आहे. आणि आपल्या लेखनावरील इंग्रजी साहित्य आणि समीक्षेचा प्रभावही त्यांनी मान्य केला आहे. हा प्रभाव जसा त्यांच्या कवितेवर आहे, तसाच तो समीक्षेवरही आहे. त्यांच्या समीक्षेत साहित्यनिर्मितीला कारणीभूत असणारे घटक, साहित्याची निर्मितीप्रक्रिया, तिचे मूल्यमापन आणि या सगळ्या प्रक्रियेत समाविष्ट असणारा वाचक आणि सामान्य माणूस यांचा अंतर्भाव राहिला आहे. तोही विचार आपणाला करावा लागणार आहे.
॥ एक ॥
विंदा कोकणातून शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले. तेथे त्यांचा ना.सी.फडके, माधव ज्यूलीयन यांच्याशी संबंध आला. त्यांचा काहीएक प्रभाव विंदांवर झालेला दिसतो. तसेच ते १९४२ च्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांना तुरुंगवास झालेला होता. त्यामुळे स्वातंत्र्य, गांधीवाद, मार्क्सवाद आणि इंग्रजी विषयाच्या निमित्ताने पश्चिमेकडच्या साहित्याचा दाट परिचय त्यांना झालेला होता. त्यांचा हा प्रवास धकाधकीचा असला तरी त्यांना समृद्ध करणारा होता. त्यांच्या जडणघडणीविषयी बोलताना सातारच्या भाषणात म्हणतात, “ऐन पंचविशीत माझ्या आसपास निरनिराळ्या विचारांनी भारलेल्या तरुण शिक्षकांची व कार्यकर्त्यांची वर्दळ होती. तासगावात प्रवेश केला त्यावेळी मी भागानगरच्या सत्याग्रहात तुरुंगवास भोगलेला, सावरकरी व आर्यसमाजी विचारांनी भारलेला, आणि संघाची टोपी बरोबर घेऊन आलेला एक हिंदुत्वनिष्ठ तरुण होतो; पण त्या तीन-चार वर्षांत इतक्या बौद्धिक स्थित्यंतरातून गेलो की, एक केव्हा संपले आणि दुसरे केव्हा सुरु झाले, हे मला आता सांगता येणार नाही. सुरुवातीला बाबुराव गोर्यांच्या प्रेरणेने मी गांधीवादी वाड्.मय वाचले आणि चरख्यावर सूत काढून त्याचे कपडेही वापरू लागलो. नंतर मार्क्सवादाचे मूलभूत ग्रंथ वाचून गांधीवादातून साम्यवादाकडे झुकलो”(उद्गार,१०). ही घडण एकीकडे होत असताना ते वयाच्या अठराव्या वयापासून कविता लिहू लागले होते. त्यांची कविता परंपरा आणि नवता यांच्या मिश्रणातून आकारत होती. त्यामुळे त्यांच्या कवितेने नवकवितेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी बापट-पाडगावकर यांच्यासोबत काव्यवाचनाचे कार्यक्रम केले असले, तरी त्यांची कविता मंचीय आविष्काराला बळी पडली नाही. त्यांना काव्यवाचनाच्या नैसर्गिक मर्यादा माहीत होत्या. एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे त्याचा कवितेसाठी फार उपयोग होत नाही, हे त्यांनी आपल्या समीक्षा लेखनातून स्पष्टपणे नोंदवले आहे. काव्यवाचन हा कवीच्या प्रयोगशाळेचा एक भाग आहे. कवितेचे मूळ शक्तिस्थान वेगळे असते, हे समजून न घेतल्यामुळे पाडगावकरसारखेच नव्हे तर आजच्या काळातले अनेक कवी बाद झाले आहेत. त्यासाठी विंदांनी दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, “एकट्यानेच एकांतात कविता भोगण्याची आपली शक्ती कवी किंवा रसिक या दोघांनीही जोपासली पाहिजे. शब्दांचा उच्चार न करताही त्यांना त्यांचा स्पर्श व गंध जाणवला पाहिजे; त्यांचे स्वतंत्र व संयुक्त ताण अनुभवता आले पाहिजेत; त्यांच्या काव्यांतर्गत अर्थकल्पांची अचूक चाहूल लागली पाहिजे. ही साधना त्यांना एकांतातच करावी लागते. कारण काव्यवाचनाने कविता जगली तरी एकांतावाचून काव्य जगू शकत नाही”(परंपरा आणि नवता,५५). नेमक्या या धोक्यापासून सावध रहात विंदा सतत नव्याचा आणि बदलत्या वास्तवाचा वेध घेत राहिले. त्यामुळे बदलत्या काळाबरोबर त्यांची कविता बदलत आणि प्रगल्भ बनत आली. आपण आता फार काही वेगळे सांगू शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९८० नंतर कविता लेखनही बंद करून टाकले.
१९८२ मध्ये दिलीप चित्रे यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, “प्रारंभी माझ्यावर संस्कार झाला तो माधव ज्यूलीयनांचा, हयात नसलेल्या केशवसुतांचा, आणि पाठोपाठ ब्राउनिंग या इंग्रजी कवीचा...पुढे माझ्यावर अल्पसंस्कार झाला तो मर्ढेकर-मनमोहनांचा; आणि त्याहून जास्त हॉपकिन्स व इलियट या इंग्रजी कवींचा, मार्क्स-रसेल-फ्राईड या पाश्चात्य वैज्ञानिक तत्त्वचिंतकांचा...शेवटच्या पर्वात माझ्यावर थोड्याफार प्रमाणात संस्कार होत राहिला तो मराठी संतकाव्याचा, प्राचीन वेदकाव्याचा, आणि प्राचीन भारतीय तत्त्वचिंतनाचा”(उद्गार,५५-५६). हे सगळे प्रभाव पचवून त्यांनी आपले कवितापण शाबूत ठेवले आहे. त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात मार्क्स विचार प्रभावी ठरला असला तरी त्यांच्या कवितेत तो ठळकपणे दिसत नाही. “प्रत्येक लेखकाने एखादी विशिष्ट धार्मिक, राजकीय किंवा वाड्.मयीन विचारप्रणाली मानलीच पाहिजे असे नाही. त्याच्यातील विचारवंताने पाहिजे तर मानावी, पण त्याच्यातील सृजनशील कलावंताचे त्याच्याशिवाय चालू शकते; सृजनाच्या प्रक्रियेत जाणिवेप्रमाणेच नेणीवही कार्यरत असते.” या नेणिवेचे बोट त्यांनी कधी सोडले नाही. तसेच त्यांनी प्रतिभेचे स्वैरपणही सतत जपले आहे. कारण कलेची निर्मिती तेथेच होत असते. याबाबत ते म्हणतात, “माझ्या काव्यातील विविधतेतून परस्पर असे भावनात्मक, वैचारिक व कलात्मक दृष्टिकोन प्रगट होत राहतात. त्यांत वास्तवता व काल्पनिकता, सामाजिक वस्तुस्थितीचे मार्क्सवादी व अनाकलनीय अनुभूतीचे गूढवादी वेध, उपहासात्मक उद्रेक व प्रतीकात्मक चिंतन, भाषेचे व तंत्राचे नवे प्रयोग, आणि अधूनमधून होणारा पारंपरिक छंदांचा व घाटांचा उपयोग- या सर्वांचा अंतर्भाव होतो. तिची प्रवृत्ती सुसंगत बनण्यापेक्षा समावेशक होण्याकडे अधिक आहे. मी स्वीकारलेला ‘खुला दृष्टिकोन’ ही माझ्या सृजनशील कलात्मक अनुभवाचीही निष्पत्ती असू शकेल” (उद्गार,६३-६४).
या त्यांच्या खुल्या आणि व्यापक दृष्टिकोनामुळे त्यांनी बालगीते, विरुपिका, तालचित्रे, मुक्तसुनिते असे वेगवेगळे प्रकार हाताळून आपली प्रतिभा पणाला लावली आहे. त्यांची प्रारंभीची कविता ही कलावादाकडे झुकणारी होती. ती अधिक आत्मनिष्ठ होती.‘स्व’ मध्ये रमत होती. मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र त्यांना खुणावत होते. पण लवकरच ते त्यातून बाहेर पडले. पण हे बाहेर पडणे म्हणजे सामाजिक होणे नव्हते, हे त्यांची कविता वाचताना चटकन जाणवते. जरी त्यांनी अनुभावाला व्यापकता दिलेली असली तरी, त्यातल्या काव्यावर त्यांची बारीक नजर असल्याचे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. कारण विंदा स्वत: त्या बदललेल्या भूमिकेला समाजनिष्ठ न म्हणता ‘जाणीवनिष्ठ’ असे संबोधतात, हे लक्षणीय आहे. ही जाणीवनिष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा आणि समाजनिष्ठा किंवा ज्याला विलास सारंग वस्तुनिष्ठा म्हणतात, त्या दोन्हींचा समन्वय आहे. ह्या जाणीवनिष्ठतेला त्यांच्यात असलेली स्वीकारशील वृत्ती, नव्या जाणिवांप्रती असणारा जिव्हाळा आणि त्यांचे भाषिक भान उपयोगी पडत गेले आहे. कोणत्याही एका विचाराला मर्यादा असतात, याचे त्यांना (ते मार्क्सवादी असूनही) पक्के भान असल्याने त्यांनी कायम आपल्या कवितेतून जाणीववादी भूमिका घेतली आहे. रविकिरण मंडळाचा प्रभाव मान्य करीत त्यांनी आपल्या कवितेची वाटचाल नोंदवताना परंपरा आणि नवता यांचा मेळ कसा घातला याविषयी स्पष्ट नोंदी केल्या आहेत. या नोंदी म्हणजे त्यांच्या काव्याची भूमिकाच आहे. त्यांनी हा मेळ घालताना छंद आणि मुक्तछंद यांच्यात मेळ घालून ‘स्वच्छंद’ हा नवा छंद घडवला. हा छंद घडवताना विधानार्थी भाषेला भावनिर्भर आणि प्रतीकांच्या माध्यमातून विकसनशील बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न करताना भाषिक प्रयोगाच्या, मोडतोडीच्या आणि शैलीच्या सगळ्या शक्यता आजमावून पाहिल्यामुळे त्यांची कविता दरवेळी नवे रूप धारण करीत आली आहे. ही धारणशक्ती संपल्याची जाणीव होताच त्यांनी काव्यलेखन बंद केले. त्याबाबतची भूमिका मांडताना ते म्हणतात, “१९८० साली मी माझे काव्यलेखन थांबवले. माझी सृजनशक्ती संपली असे नव्हे तर आत्मोल्लंघनाची कुवत संपली. माझी पूर्वीचीच कामगिरी निराळ्या वेषात पुन्हा सादर करण्याची आणि माझ्या लिखानाचा आकार फुगवण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. माझ्या हातून झालेल्या पूर्वीच्या उत्तम लिखानाचा व माझ्या वाचकांचा एवढा तरी मान ठेवणे हे मी माझे कर्तव्य समझतो”(उद्गार, ७०). अशी स्पष्ट आणि नेमकी भूमिका घेतल्यामुळे त्यांना कुठे थांबावे हे लक्षात आले होत
॥ दोन ॥
त्यांचा समीक्षा विचार समजून घेताना सर्वप्रथम त्यांनी स्पष्ट केलेल्या ‘परंपरा’ आणि ‘नवता’ या संकल्पनेचा विचार करावा लागतो. परंपरेचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी त्यांनी इतिहास, प्रघात व संप्रदाय यांपेक्षा परंपरा वेगळी कशी आहे ते स्पष्ट केले आहे. ती अधिक समावेशक आणि जीवनसापेक्ष असते. परंपरा म्हणजे काय ते स्पष्ट कताना करंदीकर म्हणतात, “मानवी जीवनाच्या विशिष्ट अशा एकात्म क्षेत्रातील भूतकालीन घटनांनी निर्माण केलेली मूल्यगर्भ व गतिशील चैतन्यावस्था म्हणजे परंपरा”(परंपरा आणि नवता,२). त्याचपद्धतीने नावीन्य आणि अपूर्वता यापेक्षा नवता कशी वेगळी आहे, ते त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. अपूर्वता ही एखाद्या प्राथमिक संवेदनेसारखी अव्याख्येय आणि अविश्लेषणीय असते. तिच्यात परंपरेचा विचारच संभवत नाही. तर नावीन्य स्वभावत:च अस्थायी असते. त्यामध्ये परंपरेवर खोलात जाऊन संस्कार करण्याचे सामर्थ्य नसते. नवता ही दोहोंपेक्षा वेगळी असते. “नव्या युगाची नांदी गाणारी ही नवता म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वैर प्रतिभेतून निर्माण केलेले संदर्भहीन वेगळेपण नसते...तसा काहीसा भास निर्माण झालाच तरी लवकरच ती एक सामूहिक आणि सामाजिक स्वरूपाची घटना आहे, एकापेक्षा अनेक व्यक्ती त्या पद्धतीने कार्यान्वित होत आहेत, बदलत्या ऐतिहासिक संदर्भांशी व व्यक्तिनिरपेक्ष व्यापक घटनांशी हे वेगळेपण संबंधित आहे, याचा प्रत्यय लवकरच आपणाला येऊ लागतो. हे निराळे वेगळेपण, ही नवता परंपरेच्या प्रवाहाशी प्रथम नकारात्मक पद्धतीने संबद्ध होत असते. आणि कालांतराने परंपरेला अधिक समृद्ध करून अटळपाणाने तिच्यातच मिसळून जाते”(उनि,४).
परंपरेच्या संदर्भातच नवता सिद्ध होत असली तरी विंदा म्हणतात त्या पद्धतीने नवता ही परंपरेत समाविष्ट होत नाही, ती तिची अशी स्वत:ची परंपरा निर्माण करून ठेवते, याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. कारण आपण केशवसुतांच्या कवितेला आधुनिक म्हणत असताना, तिने परंपरा निर्माण केली तरी तिचे आधुनिक हे विशेषनाम बदलत नाही. आधुनिकतेला विरोध करीत नवता आकारली आहे, हे आपणाला नाकारता येणार नाही. नवतेला नाकारत पुढे वास्तववाद आला आहे. तेव्हा विंदा म्हणतात त्याप्रमाणे नवता ही परंपरेच्या संवाद-विरोधातून आकारला येत असली तरी ती पुन्हा परंपरा होत नाही. नवता ही नवी भाषा, नवे घाट आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देत असते. या अर्थाने ती परंपरेपेक्षा वेगळी असते. आणि म्हणूनच नवता उठून दिसते. नवतेची मांडणी करताना विंदा परंपरेच्या जीर्णोद्धाराला कटाक्षाने नाकारताना नवतेचे धोकेही नोंदवतात; परंतु तिची पुन्हा परंपरा कशी तयार होते, हे मात्र नोंदवत नाहीत. त्यांची खरी समीक्षा मर्ढेकरांच्या समीक्षेच्या विचारापासूनच सुरू होतो. मर्ढेकरांच्या समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र यांचा विचार विंदांनी ‘परंपरा आणि नवता’ व ‘साहित्यमूल्यांची समीक्षा’ या दोन ग्रंथांत केला आहे.
आपल्या ‘मर्ढेकरी समीक्षेची मूलतत्त्वे’ या लेखात (‘परंपरा आणि नवता’) विंदांनी ललित साहित्याची निर्मिती, त्याचे स्वरूप आणि त्याचे मूल्यमापन या तीन घटकांची चर्चा केली आहे. लेखकाच्या व्यक्तिमनातील अनुभव घेण्याच्या साच्याची आंतरिक व्यवस्था सामान्य माणसांपेक्षा वेगळी म्हणजे केवळ घटनात्मक नसते तर, संघटनात्मक असते. ही संघटनात्मक तत्त्वे साम्य, भेद, संवाद, विरोध, समतोलपणा या सौंदर्यतत्त्वांनी प्रेरित असतात. हीच तत्त्वे लेखकाला कलेच्या सौंदर्यतत्त्वाकडे घेऊन जातात. ही सौंदर्यभावना म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीकडून येणार्या संदेशात इंद्रियसंवेदनात्मक जे असेल त्यांच्या गुणानुरोधाने व इतरांची त्यांच्या अर्थानुरोधाने फक्त परस्परसदृश किंवा परस्परविरोधी जुळवणी होय. ही सौंदर्यात्म संगती साक्षात्कारासारखी कालनिरपेक्ष असते. या सौंदर्यभावनात्मक लयीने कलाकृतीचा घाट तयार होत असतो. लयीचे हे तत्त्व संवाद, विरोध, समतोलपणा या नियमाने आकाराला येत असते. हा आविष्कार तेच कलाकृतीच्या लालित्याचे मर्म असते.
या निर्मितीशी संबंधित लयतत्त्वात लेखकाचे व्यक्तित्व दडलेले असते. यालाच मर्ढेकर ‘आत्मनिष्ठा’ असे म्हणतात. ही आत्मनिष्ठा जशी ‘लेखनपूर्व’ असते तशी ‘लेखनगर्भ’ही असते. वाड्.मयनिर्मितीमध्ये या दोन्ही निष्ठा कार्यरत असतात. लेखनगर्भ आत्मनिष्ठेत संवाद, विरोध, लय ही तत्त्वे कार्यरत असतात. या तत्त्वांतून जी साहित्यनिर्मिती होते, त्या साहित्याचे मूल्यमापन करताना आशय आणि अभिव्यक्ती यांच्यातील संबंधाचे विश्लेषण करूनही आपणाला सौंदर्यतत्त्वाचा बोध होत नाही. त्यासाठी भावानुभवांचे संघटन तपासणे हा एकच मार्ग आपल्यापुढे असतो. कारण ललित वाड्.मयाचे सौंदर्य हे भावनात्मक आशयाच्या लयबद्ध संघटनांवर अवलंबून असते. हे सौंदर्यनिष्ठ संघटन साहचर्य आणि तर्कनिष्ठ संघटनांपेक्षा वेगळे असते, ते लक्षात घेऊन कलाकृतीचे मूल्यमापन करायला हवे. असा मर्ढेकर आग्रह धरीत आहेत. त्यात काही अंशी तथ्य कसे आहे, याचे प्रतिपादन करतानाच, त्यांच्या समीक्षेने जगाला काय दिले याची नोंद करताना विंदा लिहितात, “वाड्.मयीन समीक्षेला सौंदर्यशास्त्राच्या व्यापक पायावर उभे करणे आणि सौंदर्यशास्त्रातील माध्यमाच्या विचारात सुसंगती आणून माध्यमाच्या कल्पनेपासून साधनाच्या कल्पनेची फारकत करणे हे मर्ढेकरांचे जागतिक कलामीमांसेतील महत्त्वाचे कार्य आहे”(उनि,२४). असे असले तरी मर्ढेकरांनी प्रत्यक्ष या तत्त्वांच्या आधारे साहित्यकृतींचे विश्लेषण केले नाही. तसे त्यांनी उपयोजनात्मक पद्धतीने काही काम केले असते तर या विचारांचे महत्त्व अधिक ठळक झाले असते.
परंतु तसे झाले नाही. कारण ही मांडणी तशी आदेशात्मक आहे. आणि कोणत्याही गंभीर लेखकाला ती परवडणारी नाही. कारण तो लेखक त्याला हवे तसे लिहील. त्याला हवे ते सांगण्यासाठी हवा तो कलाप्रकार त्याला पुरेसा आणि सक्षम वाटला की झाले. अशाप्रकारचा सूर हा “मर्ढेकरसारख्यांनी बौद्धिकशक्तीने विकसित केलेल्या वाड्.मयीन सौंदर्यशास्त्राच्या संकुचित, बंदिस्त व्यवस्थेचा स्वाभाविक परिणाम आहे. मी मर्ढेकरांच्या व्यवस्थेला बंदिस्त आणि संकुचित म्हणतो, याचे कारण ती व्यवस्था साहित्यसृष्टीच्या बदलत्या, बहुरंगी व व्यामिश्र स्वरुपाला सामावून घेईल अशी लवचिक बनवण्यात ते यशस्वी झाले नाहीत. तेवढ्याच अर्थपूर्ण असलेल्या सर्जनशील आणि समीक्षात्मक दृष्टिकोनाचे मूल्य आणि त्याची संबद्धता ओळखण्यास ते कमी पडले. शिवाय साहित्याच्या संदर्भात अशा सर्व सिद्धांतांना अटळ मर्यादा असतात आणि त्यात नैसर्गिक अपुरेपणा असतो, हेही त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांच्या सिद्धांतात आत्मपरीक्षणाला तसेच स्वयंपरिवर्तानाला वाव नाही”(साहित्यमूल्यांची समीक्षा,१२). मर्ढेकरांच्या सिद्धांताला विंदा अशा पद्धतीने आक्षेप घेतात. कारण त्यांचा दृष्टिकोन जीवनवादी आहे. हा विरोध त्यांनी १९९१ च्या दरम्यान केलेला असला तरी प्रारंभापासून त्यांचा दृष्टिकोन जीवनवादी आहे. १९६५ साली लिहिलेल्या ‘ललित वाड्.मयाची सांस्कृतिक फलश्रुती’ या लेखात विंदा याच अंगाने विचार करताना, साहित्याची व्याख्या करताना लिहितात, “भाषेच्या साधनाने केलेली कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रियेची बंदिश होय”(परंपरा आणि नवता,३८). आणि सांस्कृतिक फलश्रुती हेच तिचे अंतिम ध्येय आहे. ही फलश्रुती सौंदर्यकल्पनेच्या आधारे शोधणे तर्कदुष्ट आहे, कारण ललित साहित्याचे हे खास वैशिष्ट्य नव्हे. ते व्यापक वास्तवाचेच व्यवच्छेदक लक्षण आहे. सांस्कृतिक फलश्रुतीच्या या निकषावरच विंदा ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आदींचे वाड्.मयीन महत्त्व नाकारतात.
मर्ढेकर हे मराठीच्या आधुनिक सौंदर्यशास्त्राचे जनक होते हे मान्य करूनही, साहित्य ही ललित कला आहे, या विधानाला विंदा आक्षेप घेतात. खरे तर साहित्य या कलेवर जीवनदर्शनाचे अधिराज्य असते; तर संगीत, शिल्प, चित्र आदी ललितकलांवर घाटांचे अधिराज्य असते. साहित्याचा घाट हा सौंदर्यात्म असला तरी तो कार्यात्मक असतो. तो ‘जीवनवेधी’ असतो; असे नमूद करून ते लिहितात, “माझ्या साहित्यविषयक प्रत्यक्षानुभवात कल्पनाजन्य जीवनदर्शनाच्या निर्मितीला घाटापेक्षा अधिक प्राधान्य असते. महाकाव्य, शोकांतिका, सुखांतिका, कादंबरी किंवा कविता यांच्या माझ्यावरील प्रभावात ह्या जीवनदर्शनाला केंद्रवर्ती स्थान आहे. सर्जनशील साहित्यकृतीचे माझे मूल्यमापन मुख्यत: ह्या जीवनदर्शनाची मौलिकता, गहनता, आणि त्याचे व्यापक स्वरूप यांवरून केले जाते” (साहित्यमूल्यांची समीक्षा,१२). विंदा कलेचा घाट नाकारीत नसले, तरी त्यातील जीवनदर्शन महत्त्वाचे मानतात. याच अनुषंगाने त्यांनी पुढे जाऊन वास्तववादाचा विचार केला आहे. वास्तववाद हे साहित्यातील महत्त्वाचे मूल्य आहे. वास्तववादाचे वाड्.मयीन मूल्य हे वस्तुनिष्ठेच्या उत्कट इच्छेतून उद्भवते. ही मूलत: बहुरूपीय संकल्पना आहे. सौंदर्यवादाला पूरक असणारा वास्तववाद आपली ऐतिहासिक भूमिका बजावताना, वाड्.मय टिकून राहण्याविषयीचे मूल्य सतत बाळगत आला आहे. त्यामुळे या मूल्याला विंदा ‘जीवनवेधी’ शक्ती मानतात.
साहित्य ही जीवनवेधी कला असल्याने तिच्यात कोणती मूल्ये असावीत, याचाही त्यांनी विचार केला आहे. तो करताना विशुद्ध कलेचे जे निकष संगितले जातात ते कितपत प्रभावी आहेत, याची चर्चा करताना, त्यांनी शुद्ध कलेशी जोडल्या जाणार्या विशुद्धता, आत्मनिष्ठा आणि उत्स्फूर्तता या वाड्.मयीन घटकांचा विचार केला आहे. विशुद्ध काव्याचे साहित्यशास्त्र मांडणारे पो आणि पेटर यांच्या भूमिकेत भेद आहे. पो बुद्धीचा अधिकार नाकारतो आणि पेटर कल्पनात्मक बुद्धीशी जुळवून घेताना दिसतो. जॉर्ज मूर, अॅरिस्टॉटल, मिडल्टन मरी अशा अनेकांनी जरी या मूल्याचे महत्त्व अधोरेखित केले, तरी त्याची मांडणी माणसागणिक बदलत जाते. त्यामुळे ‘विशुद्धतेचा सिद्धांत समीक्षेच्या भाषेच्या संदिग्धतेत अधिकच भर घालतो आणि अराजकता वाढवतो’(उनि,४८). म्हणून तो फार अर्थपूर्ण ठरत नाही. तीच गोष्ट आत्मनिष्ठेची आणि उत्स्फूर्ततेची आहे. या दोन्ही सिद्धांतातील अनिश्चितता विंदांनी, पाश्चात्य समीक्षकांच्या विचारांचा धांडोळा घेत, अधोरेखित केली आहे. या अनेक विद्वानांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. म्हणून विंदा म्हणतात, “वाड्.मयीन संदर्भात आत्मनिष्ठा अपायकारक नसते आणि उपयुक्तही नसते.कलाकृतीच्या आकलनात आणि मूल्यमापनात अनुस्यूत असलेल्या समस्यांशी तिचा सुतराम संबंध नसतो”(उनि.६७). एकुणात विंदा कलेची शुद्धता नाकारताना दिसतात.
असे असले तरी ते साहित्याचे कलातत्त्व नाकारीत नाहीत. केवळ प्रबोधन करणारे साहित्य कितीही श्रेष्ठ असले तरी त्याला साहित्याची उंची लाभत नाही. कारण साहित्यात प्रतिभा नावाच्या ‘स्वैरिनी’चा महत्त्वाचा वाटा असतो. वस्तुत:‘प्रतिभेचा स्वभावधर्म परावर्तन नसून प्रतिसृजन असतो. सामाजिक जाणिवेच्या साहित्याला जीवनावर संस्कार करण्याची जी मर्यादित शक्ती आहे तिचे रहस्य या प्रतिसृजनात दडले आहे’(परंपरा आणि नवता,४८). प्रतिभेच्या सहाय्याने जीवनदर्शन घडवणे हे खरे साहित्याचे लक्षण असते असे ते मानतात. इतकेच नव्हेतर त्यातील निर्मितीच्या घटकांचाही ते सविस्तर विचार करतात. केवळ समाजदर्शन म्हणजे साहित्य नव्हे; याचे भान देताना; डॉ. आर. राजाराव यांच्या ‘आपण ब्राह्मण लेखक असल्यामुळे दलित लेखकांबद्दल आपण जाणताअजाणता पूर्वग्रहदूषित आहात असे आपल्याला वाटते काय?’, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, “माझ्या विचारांत आणि व्यावहारिक जीवनदृष्टीत मी ब्राह्मण नाही...दलित लेखकांनी प्रवेश केला त्यापूर्वीच मी बौद्धिकदृष्ट्या विमुक्त, प्रौढ असा पन्नासीचा माणूस झाला होतो. तेव्हा मी पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता नव्हती...दलितांवरील अमानूष अत्याचारांची सखोल जाणीव मला असल्यामुळे त्यांच्या वाड्.मयीन कर्तृत्वाचे अतिरिक्त कौतुक करण्याकडे माझी सहजप्रवृत्ती होती...पण अजूनतरी मी माझ्या वाड्.मयीन मूल्यमापनाला या सहजप्रवृत्तीची बाधा होऊ दिली नाही. सामाजिक अन्याची भरपाई उदार वाड्.मयीन मूल्यमापनाने करता कामा नये”(उद्गार,६२). विंदांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ते जरी साहित्याला जीवनवेधी म्हणत असले तरी तिचे कलापण त्यांनी नाकारले नाही. कारण कोणताही एक विचार साहित्याला एकांगी बनवत असतो. म्हणून “प्रत्येक लेखकाने एखादी विशिष्ट धार्मिक, राजकीय किंवा वाड्.मयीन विचारप्रणाली मानलीच पाहिजे असे नाही. त्याच्यातील विचारवंताने पाहिजे तर मानावी, पण त्याच्यातील सृजनशील कलावंताचे त्याच्याशिवाय चालू शकते. सृजनाच्या प्रक्रियेत जाणिवेप्रमाणेच नेणीवही कार्यरत असते. कविता एखाद्या सजीव गोष्टीसारखी वाढत जाते आणि कवीला स्वत:लासुद्धा तिचे अंतिम स्वरूप स्पष्टपणे अगोदर दिसू शकत नाही. जर एखादा कवी विचारप्रणालीनुसार आपली सृजनप्रक्रिया नियंत्रित करू लागला तर पुष्कळदा तो कलाकृती निर्माण करण्याऐवजी एखाद्या कारागिरीची वस्तू निर्माण करील...त्यामुळे कवी म्हणून मी ‘खुल्या दृष्टिकोनावर’ विश्वास ठेवतो, दुसर्या कोणत्याही पूर्वसंकल्पित विचारप्रणालीवर नाही”(उद्गार,६३-६४). या खुल्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवूनच ते सर्वच विचारप्रणालीपुढे प्रश्नचिन्ह उभे करतात.
विंदांची ही दृष्टी त्यामुळेच केवळ जीवनवादी रहात नाही. निर्मितीच्या प्रक्रियेत अंतर्भूत असणार्या कलात्मक घटकांचीही त्यांना नेमकी जाण आहे. प्रतिभा, भाषा, प्रतिमा-प्रतीके, मर्यादित अर्थाने उपयुक्त ठरणारी आत्मनिष्ठा, साहित्याच्या सौंदर्याचा घाट, कल्पनेची बंदिश याही गोष्टी निर्मितीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी आग्रहाने प्रतिपादित केले आहे. त्यांनी जीवन, प्रतिभा व भाषा यांच्या एकमेळातून जन्माला येणार्या साहित्याला आपल्या समीक्षाविचारात प्राधान्य दिलेले दिसते.
॥ तीन ॥
विंदांनी जेवढा समीक्षेच्या सिद्धांतनावर भर दिला आहे तितका भर उपयोजित समीक्षेवर दिलेला दिसत नाही. ‘उद्गार’मध्ये भाषणे आणि मुलाखती आहेत, तर ‘साहित्यमूल्यांची समीक्षा’या मूळच्या इंग्रजी ग्रंथात किंग लियर या नाटकावर एक लेख आहे. आणि ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथात काही उपयोजित लेख आहेत. त्यामध्ये हेमिंग्वे, केशवसुत, माधव ज्यूलियन आणि मर्ढेकर यांचा समावेश होतो. हेमिंग्वेचा विचार करताना विंदा लिहितात, “कलावंताला आपल्या स्थूल अनुभवातील एका विशिष्ट क्षेत्राचे आपल्या वाड्.मयीन क्षेत्रामध्ये एकात्मीकरण करावे लागत असते; तेव्हाच कलात्मक संगतीशी आणि तालबद्धतेशी सुसंगत अशा चित्राकृतीमध्ये ते प्रकट होऊ शकते. आपल्या वाड्.मयीन जीवनातील पहिल्या पर्वामध्ये हेमिंग्वेने हा कलात्मक संस्कार आपल्या सेंद्रिय वासनाविश्वावर केला आहे”(परंपरा आणि नवता,१४२). दुसर्या टप्प्यावर त्याने सामाजिक आणि राजकीय जीवनाचे चित्रण करून, तिसर्या टप्प्यावर आध्यात्मिक जीवनावर भर दिला आहे. त्यांच्या एकूण साहित्याची चिकित्सा करताना विंदांनी हेमिंग्वेच्या वाड्.मयीन व्यक्तित्वाला प्राधान्य दिले आहे. तर केशवसुत, ज्यूलियन आणि मर्ढेकर यांच्या कवितेची चिकित्सा करताना आधुनिकता, प्रयोगशीलता आणि नवता हा प्रवास कसा झाला, याचा त्यांनी शोध घेतला आहे. हा शोध जितका आशयात्मक आहे, तितकाच तो आविष्कारात्मक आहे. एका अर्थाने हा कवितेचा इतिहासच आहे. केशवसुतांच्या वाड्.मयीन कार्याचे ऐतिहासिकत्व नोंदवताना ते लिहितात, “सामाजिक किंवा वाड्.मयीन दृष्टीने संतकाव्याकडे पाहणे केशवसुतांना स्वत:च्या ताकतीवर शक्य होणे कठीण होते. पोवाडा व लावणी हे दोन्ही प्रकार मूलत: निर्भरशील वृत्तीशी जवळीक करणारे असले तरी अपकर्षावस्थेतील सांकेतिकता, शब्दजीवीपणा व प्रत्यक्ष जीवनाशी झालेली फारकत या दोषांमुळेच केशवसुतांच्या सकस निर्भरशीलतेला प्रेरक ठरण्याची शक्ती त्यांमध्ये उरलेली नव्हती. संतवाड्.मयाविषयी स्वतंत्र विचार करायला असमर्थ ठरल्यामुळे व शाहिरी वाड्.मय नव्या निर्भरशील कवितेला प्रेरक ठरण्याची आपली शक्ती गमावून बसल्यामुळे, केशवसुत मराठी कवितेच्या परंपरेच्या आधारावर पुढे जाऊ शकत नव्हते. इंग्रजी परंपरा पाठीशी घेऊनच त्यांना निर्भरशील काव्यक्रांती घडवावी लागली”(उनि,१५८). हा इतिहास केवळ रूपाचा नाही तर तो आशयाचाही आहे. त्यांच्या समग्र कवितेचे मूल्यमापन त्यांनी या दोन अक्षांवरुनच केले आहे. त्यांच्या कवितेचे प्रेमवृत्ती, समाजवृत्ती, निसर्गवृत्ती असे आशयानुसारी वर्गीकरण करणारे विंदा त्यांच्या कवितेची मर्यादा नोंदवताना म्हणतात, “केशवसुतांची प्रतिमासृष्टीही वाईट अर्थाने संकलनशील आहे. पंडिती संप्रदायातील सांकेतिक प्रतिमा आणि प्रत्यक्ष जीवनातील गोचर प्रतिमा यांचा खटकणारा सहवास त्यांच्या काव्यात दृष्टीस पडतो...केशवसुती काव्य जितक्या सहजतेने पंडिती काव्यावृतीतून बाहेर पडले; तितक्या सफलतेने पंडिती काव्यशैलीतून बाहेर पडू शकले नाही...शब्दसमरसतेचा आणि प्रतिमासमरसतेचा अभाव ही केशवसुती काव्यशैलीची फार मोठी वैगुण्ये आहेत...प्रगल्भ अभिरुचीचे समाधान करण्याची त्यांच्या एकूण काव्यसंपदेची स्थिर शक्ती फार मर्यादित राहिली”(उनि,१६२). येथे विंदा कवितेच्या रूपावर लक्ष केंद्रित करताना दिसतात.
माधव ज्यूलियनांच्या कवितेचा विचार करताना ते प्रयोगशीलता केंद्रस्थानी ठेऊन त्यांची कविता केशवसुत आणि मर्ढेकर यांच्या कवितेला जोडणारा दुवा आहे, अशी मांडणी करतात. ज्यूलियनांनी मध्यमवर्गीय भावजीवनाच्या सामाजिकतेचा उपहासपूर्ण आणि उपरोधगर्भ असा वापर मराठी कवितेत पहिल्यांदा करून मर्ढेकरांना नवी वाट निर्माण करून दिली. त्यासाठी त्यांनी बोलभाषेचा फार समर्थ वापर केला आहे. तसेच ‘सुधारक’ मधला त्यांचा जो छंद आहे, तो त्यांनी फार सक्षमपणे घडवला आहे. ही निरीक्षणे नोंदवून विंदा लिहितात, “मला वाटते, माधव ज्यूलियनांजवळ कलात्मक साहस अचाट होते, त्या कामात ते कोणालाच हार गेले नसते; पण त्यांची कलात्मक समज त्या तोलाची नव्हती. ही कलात्मक समज निर्माण होण्यासाठी कलावंताच्या वाड्.मयीन व्यक्तित्वात एका तटस्थाची उपस्थिती असावी लागते. तो तटस्थ त्यांच्या कलात्मक व्यक्तित्वात शेवटपर्यंत प्रकट होऊ शकला नाही”(उनि,१८७-८८). हे निरीक्षण कलात्मकतेला प्राधान्य देणारे आहे.
विंदांनी उपयोजित समीक्षेतही पाश्चात्य लेखक, कवींच्या विचारांचा मागोवा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या समीक्षेला जसा वाड्.मयीन सौंदर्यघाटाचा सतत संदर्भ असतो, तसाच त्याला ऐतिहासिक घाटाचा आणि परंपरेचाही संदर्भ असतो. त्यामुळे त्यांच्या या समीक्षेला एक कलामक आणि वाड्.मयीन इतिहासाचे संदर्भ आपोआप प्राप्त होतात. त्यांनी मोजकी उपयोजित समीक्षा लिहिली असली तरी ती मूल्ययुक्त आहे. मर्ढेकरांच्या कवितेचे त्यांनी केलेले हे विश्लेषण या अर्थाने महत्त्वाचे आहे. त्यांच्या कवितेला पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असे दोन्ही संदर्भ आहेत. पण त्यातला पाश्चिमात्य विचार प्रभावी आहे. मर्ढेकरांच्या कवितेची मोडणी हॉपकिन्स, इलियट आणि ऑडेन यांच्या कवितेच्या संस्कारातून आकारली आहे. मर्ढेकरांनी इंग्रजी कवींशी समकालीन होऊन लिहिल्यामुळे ही कविता नवी ठरली आहे. त्यांच्या या नवतेचे विश्लेषण विंदांनी घाटाच्या अंगाने केले आहे; जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. “ सामान्य माणसाला सकृद्दर्शनी अप्राप्य वाटणारा असा सूक्ष्म पण स्फोटक वृत्तिविशेष हे मर्ढेकरी कवितेचे वस्तुक्षेत्र (कवितेचा गाभा, तिरपा ठसा माझा) असते आणि विचारी माणसालाही कल्पनेच्या एका झेपीत पकडणे कठीण जावे एवढ्या ज्ञानविज्ञानाधिष्ठित जाणिवेच्या गतिशील कक्षा हे मर्ढेकरी कवितेचे संदर्भक्षेत्र ( गाभ्याशी संबंधित पूरक आशय/भाषा) असते. अशी कविता चिंतनात्मक अवस्थेमध्ये पुन्हापुन्हा वाचावी लागत असते...सूक्ष्मतेचा आणि विराटतेचा प्रत्यय देण्याची या कवितेची शक्तीसुद्धा घाटाच्या या विशिष्ट स्वरुपाशी निगडित आहे”(उनि,२०२-०३). या तत्त्वामुळे जशी ही कविता वेगळी ठरते, तशीच ती अनुभवांचे परस्परानुप्रवेश, भाषेची लवचिकता, परिचिताचे अपरिचितीकरण होण्यामुळे मूलभूत अनिश्चितीकरणाची साकारता, विरूद्ध वृत्तिसूचक प्रतिमा, नव्या-जुन्यांचा मेळ, भाषिक मोडतोड, प्रतिमासंघात, संदर्भसंक्रमण आदी विशेषांमुळे ही कविता नवी ठरली आहे. विंदांना मर्ढेकरांची प्रतिभाशक्ती बहुपेडी असली तरी बहुपिंडी नव्हती हे मान्य असले तरी त्यांनी आपल्या या एकपिंडीपणाला सामर्थ्यशाली कसे बनवले, याची नोंद करताना ते लिहितात, “प्रतिभेचा कस अस्सल असेल, सौंदर्यदृष्टी डोळस असेल व वाड्.मयातील इतिहास दत्त अपेक्षित स्थित्यंतराची सुस्पष्ट कल्पना असेल तर कल्पनाशक्तीचा आवाका मर्यादित असूनही मौलिक वाड्.मयीन कार्य करता येते, हे मर्ढेकरांनी सिद्ध केले आहे...विसाव्या शतकातील मानवी जीवनामधील विसंगतीने अगतिक झालेल्या व आध्यात्मिक भावस्थितीमध्ये शेवटचा आधार शोधणार्या अस्वस्थ, संवेदनाक्षम व ज्ञानविज्ञानसंस्कारित मनांची ती प्रतिनिधी आहे. सांस्कृतिक विकासाच्या विशिष्ट पातळीवरील एका मर्यादित वर्गाची ती प्रतिनिधी असली तरी ती कमी विश्वात्मक ठरत नाही. काव्यात्म विश्वात्मकता ही संख्याशास्त्रीय नसून उत्कटतासन्मुख असते. तिचा आधार समुदायाची व्याप्ती नसून प्रचितीची उत्कटता हा असतो. विशिष्ट भावस्थितीची उत्कट प्रचिती देण्यात मर्ढेकरी कविता कधीच कमी पडली नाही. एकपिंडीपणाच्या मर्यादेलाच त्यांनी आपले सामर्थ्य बनवले व विकासाच्या एका विशिष्ट पायरीवर स्थिर होऊ पाहाणार्या मराठी कवितेला विकासाची एक अटळ दिशा बर्याच प्रमाणात सुस्पष्ट करून दिली. एवढी मोठी मर्यादा असलेला इतका समर्थ कवी मराठी वाड्.मयात अजून झालेला नाही”(उनि,२३७-३८). हे मूल्यमापन म्हणजे ऐतिहासिक, आशयात्मक आणि सौंदर्यात्मक घाटाच्या वस्तुस्थितीचे उत्तम उदाहरण आहे. या विश्लेषणातून विंदांचा विचार स्पष्टपणे दिसून येतो.
किंग लियर नाटकाच्या विश्लेषणाबाबतही विंदांचा दृष्टिकोन जीवनवादी आणि जाणीवनिष्ठ आहे. त्यालाच ते जीवनवेधी असे म्हणतात. माणसाच्या आत्मिक विकासाच्या ज्या पाच अवस्था आहेत, त्यांचे दर्शन म्हणजे हे नाटक आहे. अपेक्षा, अव्हेर, एकाकीपण, जागृती आणि पुनरुज्जीवन या पाच अवस्थांमधून लियरचा आत्मिक विकास दाखवत शेक्सपिअरने कशा प्रकारे मानवी जीवनाच्या समग्र चक्राचा मूलभूत आकृतिबंध पकडला आहे, याची सप्रमाण मांडणी करून आपली भूमिका मांडताना ते म्हणतात, “राजा लियर हे नाटक सत्ता आणि सत्ताविहीन अवस्था, योग आणि कपट, निष्ठा आणि द्रोह, समृद्धी आणि दारिद्र्य, शहाणपणा आणि वेड, क्रौर्य आणि दया, स्वहितवाद आणि स्वार्थनिरपेक्षता, प्रेम आणि द्वेष, माणसातील शुद्ध जनावर आणि त्याचे संस्कारित सामाजिक वास्तव अशा अनेक प्रकारच्या मानवी वस्तवाचा वेध घेते”(साहित्यमूल्यांची समीक्षा,१३६). हे विधान म्हणजे त्यांच्या जीवनवेधी जाणिवेचे निदर्शक आहे.
एकूणच त्यांच्या समीक्षा विचारात साहित्य आणि सौंदर्य यांचा अत्यंत सुरेख समतोल साधला गेल्यामुळे त्यांचा जाणीवनिष्ठ विचार अधिक स्पष्ट झाला आहे. या जाणिवेला त्यांनी सुसंस्कृतता आणि सामान्य माणसाच्या जीवनधारणा जोडल्यामुळे त्यांच्या खुल्या दृष्टिकोनाचे वेगळेपण ठळक झाले आहे.
----------------------------------
( दि. 6-7 ऑक्टोबर 2018 दरम्यान, साहित्य अकादमी आयोजित ‘विंदा करंदीकर जन्मशताब्दी चर्चासत्र, मुंबई येथे सादर केलेला शोधनिबंध,
पूर्वप्रसिद्धी, खेळ, जानेवारी - एप्रिल २०२४)
टिप्पण्या