समीक्षेतील संशोधनाच्या दिशा

 समीक्षेतील संशोधनाच्या दिशा : महेंद्र कदम

 समीक्षाविचार हा साहित्याचे विश्लेषण करत असल्याने तो परजीवी असला तरी साहित्याला एक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतो, त्या अर्थाने समीक्षा ही साहित्याला पुढे घेवून जाणारी वाड्.मयीन चर्चा असते. इतकेच नव्हे तर अनेकदा लेखकाला न सूचलेल्या काही नव्या प्रमेयांची मांडणी समीक्षा करत असते. त्यामुळे साहित्याचा विचार करताना समीक्षेला बाजूला करता येत नाही. मराठी साहित्याच्या बाबतीथी हे खरे आहे. जेव्हा आपण मराठी समीक्षा असे म्हणतो, तेव्हा ती साधारणपणे आधुनिक साहित्याच्या प्रारंभापासून झालेली दिसते. त्यापूर्वीच्या विश्लेषणाला टीका असे म्हणत असत. मध्ययुगीन काळात वेदवाड्.मय, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारतादी ग्रंथांवर टीकात्मक भाष्य करताना स्वतंत्र ग्रंथ रचलेले दिसतात. ज्ञानेश्वरी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. परंतु रूढ अर्थाने ज्याला समीक्षा म्हटले जाते, ती आधुनिक काळाची देण आहे.

१८१८ ला इंग्रजांच्या एकछत्री अंमलापासून आपण पारतंत्र्यात गेल्यानंतरच मराठी आधुनिक साहित्याची पायाभरणी झालेली आहे. मराठीतले आधुनिक पद्य आणि गद्य लेखन इंग्रजी साहित्याच्या संपर्काने बहरत आलेले आहे. प्रारंभीचा हा कालखंड जरी भाषांतराचा असला तरी त्यातून काही भारतीय अथवा मराठी मूल्यांशी आधुनिक जीवनसरणीचा संबध जोडून त्यातील बर्‍या वाईटाची चर्चा साहित्याच्या आणि निबंध लेखनाच्या माध्यमातून होत आलेली आहे. त्याच अनुषंगाने समीक्षाही लिहिली गेलेली आहे. ही समीक्षा परिचयात्मक आणि आदेशात्मक स्वरूपाची राहिलेली आहे. अगदी बाबा पदमनजी, चिपळूणकर, लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखनात परिचयाचा आणि समाजाला दिशा देऊ पाहणार्‍या आदर्श मूल्यांचा पाठपुरावा असलेला दिसून येतो. ही मांडणी त्या काळात महत्त्वाची होती. परकीय आक्रमकांनी व्यापलेल्या आपल्या भूमीत एतद्देशीय आणि परकीय मूल्यसंघर्ष होणे अत्यंत स्वाभाविक होते. तसा तो झालेला आहे. त्यातून जी घुसळण होत आली, त्याचे दर्शन तत्कालीन साहित्यात आणि समीक्षेत पडलेले दिसते.

 साहित्य हे त्या- त्या काळाचे अपत्य असते, हे म्हणणे खरे असले तरी मराठी साहित्याच्या संदर्भात हे अर्ध सत्य आहे. मराठी समाज त्या काळात ज्या अवस्थेमधून जात होता, त्या अवस्थेचे अत्यंत अपवादात्मक चित्र साहित्यात उमटलेले दिसते. साहित्यात जर तत्कालीन अवस्थेचे चित्र येत नव्हते तर ते समीक्षेत कसे येणार होते? त्यामुळे मराठी समीक्षा प्रारंभापासून परोपजीवी राहिली आहे. या वास्तवाला आणखी एक दुसरी बाजू आहे की, तत्कालीन वास्तवाला भिडून परिवर्तनाची बाजू लावून धरणारा अथवा शोषणाला नकार देणारा वर्ग साहित्याच्या प्रांतात नव्हता. तो थेट मैदानात उतरून लढाई लढत होता. त्यामुळे मराठी ‘कादंबरीचे पहिले शतक’ या ग्रंथात कुसुमावती देशपांडे जे म्हणतात ते खरे आहे. त्या म्हणण्याचा सारांश असा आहे की, ‘इंग्रजांच्या आगमनाने उपलब्ध झालेल्या छापखान्यामुळे मराठी लेखकाला साहित्य छापण्याची सोय झाली; परंतु त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आणि निर्भय विचार करण्याची कोंडी झाल्यामुळे मराठी साहित्यात नवी पहाट जन्माला आलेली दिसत नाही.’ त्यामुळे म. मो. कुंटे यांचे ‘राजा शिवाजी’ हे महाकाव्य दक्षिणा प्राईज कमिटीसाठी लिहिले गेले होते, हे कसे नाकारणार आहोत आपण? याचा अर्थ पारतंत्र्याचा मोठाच प्रभाव मराठी साहित्यावर पडलेला असल्याने मराठी साहित्यात स्वतंत्र प्रज्ञेची फारशी निर्मिती झालेली दिसत नाही. त्यामुळे समीक्षेतही स्वतंत्र प्रवाह निर्माण झालेला दिसत नाही.

 याला एक सन्माननीय अपवाद म्हणजे महात्मा जोतीबा फुले हे होत. त्यांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही तर त्यांच्या साहित्याची आणि त्या काळाची चिकित्सा कशी करायची याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला होता. त्यांचे साहित्य हे कायम शोषितांच्या बाजूने उभे राहून शोषणाला नकार देत आलेले आहे. त्यांनीच मराठी नाटक, कादंबरी आणि आधुनिक कवितेची खरी सुरुवात केलेली दिसते. फुले केवळ त्यावर थांबले नाहीत, तर साहित्यातील चित्रणाची समीक्षा कशी करावी याचे नवे मापदंड त्यांनी निर्माण केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही त्यांच्या समीक्षेची त्रिसूत्री होती. या त्रिसूत्रीला केंद्र करून त्यांनी समाजाची तर चिकित्सा केलीच परंतु ज्या प्राचीन रामायण- महाभारत, पुराणे, उपनिषदे यांच्यावर मराठी साहित्याची उभारणी होत आली होती त्या साहित्याची नव्याने चिकित्सा करून मराठी समीक्षेला एक नवा मूल्यविचार दिला. त्यामुळे त्यांची समीक्षा केवळ परिचयात्मक अथवा उपदेशपर मूल्यात्मक अशी नव्हती तर ती एक समाजशास्त्रीय आणि संस्कृती चिकित्सेची मूलभूत अशी पायाभरणी होती. त्यांच्या विचारसरणीतून आकाराला आलेल्या सत्यशोधकीय विचारांतून केशवराव जेधे, भास्करराव जवळकर, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील अशी एक मोठी परंपरा प्रारंभीच्या काळात निर्माण झालेली दिसते. परंतु ही परंपरा प्रस्थापित चौकटीला धक्के देणारी ठरल्याने तिचा मध्यवर्ती समीक्षेच्या विचारव्यूहात समावेश झाला नाही. उलट तिची हेटाळणी केली. काही समीक्षकांनी तिला अनुल्लेखाने मारले. त्याचा तोटा असा झाला की, मराठी समीक्षेची पायाभरणी चुकीच्या प्रमेयावर आकारली. अगदी अलीकडे अरुण शिंदे, सुधाकर शेलार यासारख्या अभ्यासकांनी सत्यशोधकीय समीक्षेचा विचार केलेला दिसतो. हे अपवादात्मक चित्र आहे.

साहजिकच वारकरी संप्रदायाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चिकित्सा करत महत्त्वाची मांडणी करणारा ‘राईज ऑफ द मराठा पॉवर’ सारखा न्यायमूर्ती रानडे यांचा ग्रंथ दुर्लक्षिला गेला. तसेच द. ग. गोडसे यांनी केलेली चिकित्साही बाजूला सारली गेली. गो. म. कुलकर्णी सारखे समीक्षक रानडे, गोडसे यांच्या समीक्षेला एकांगी समीक्षा (भाषा व साहित्य: संशोधन, ३९७- ४००) असे संबोधून तिला नकार देतात. तसेच वि. भि. कोलते यांच्या महानुभाव साहित्याच्या संशोधनाचा आणि गं. बा. सरदार यांच्या संत साहित्याच्या सामाजिक फलश्रुतीचाही विचार झाला नाही. त्यामुळे समीक्षेचे देशीकरण अथवा मराठीकरण झाले नाही. मराठी समीक्षेचा पाया घालणार्‍या म. फुलेंना आणि त्यांच्या परंपरेला बाजूला ठेवल्याने मराठी समीक्षेची वाटचाल चुकीच्या दिशेने झालेली दिसते. त्याचबरोबर रूढ अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साहित्याची चिकित्सा केलेली नसली तरी त्यांच्या सामाजशास्त्रीय मांडणीचा विचारही समीक्षेच्या केंद्रस्थानी आलेला दिसत नाही.

साधारणपणे दुसर्‍या महायुद्धानंतर मराठीमध्ये नवसाहित्याची लाट आलेली दिसते. या लाटेतून निर्माण झालेल्या साहित्याची चिकित्सा करताना एकीकडे रूपवादी समीक्षा लिहिली जावू लागली; तर दुसरीकडे ना. सी. फडके आपल्या ‘प्रतिभासाधन’ मधून कलावादी रूपबंधाची निकषव्यवस्था सांगून त्या पद्धतीची साहित्यानिर्मिती करत होते. त्यामुळे साठच्या दशकात रूपवादी समीक्षेचा दबदबा राहिलेला दिसून येतो. अस्तित्ववाद, संज्ञाप्रवाह, परात्मता, आत्मनिष्ठा, व्यस्तता, कलास्वाद, सौंदर्यवाद आदी मूल्यांची चर्चा समीक्षेत होत राहिली. परंतु त्यालाही म्हणावी तशी सैद्धांतिकता लाभली नाही. या संदर्भात रा. भा. पाटणकर लिहितात, “एकोणिसाव्या शतकानंतरच्या मराठी साहित्यावर निश्चितपणे दाखवता येतील असे परिणाम इंग्रजी साहित्याने व साहित्य- विचाराने घडवले याविषयी मतभेद होतील असे वाटत नाही. इंग्रजीमधून आपण नवे वाङ्मयप्रकार घेतले, काही जुन्या वाङ्मयप्रकारांकडे इंग्रजी दृष्टीने बघायला शिकलो. साहजिकच इंग्रजी समीक्षेतील संकल्पनाव्यूह आपल्याकडे सहजपणे प्रस्थापित झाला. जर आपला सर्व समीक्षाव्यवहार या पाश्चात्य संकल्पनाव्यूहात चालत असेल तर त्याची व्यवस्थित माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या दोन शतकांत पाश्चात्य विचारात व साहित्यकृतींच्या स्वरूपात जसजसे बदल झाले तसतसे ते आपल्याकडेही झाले. त्यांच्याकडे बोधवाद व मनोरंजनवाद मागे पडले आणि त्यांची जागा आत्माविष्कारवाद आणि पुढे स्वायत्ततावाद यांनी घेतली. विशिष्ट कालावधीनंतर आपल्याकडेही हे वाद आले. पण त्यांची सैद्धांतिक पातळीवरची स्पष्ट जाणीव मात्र मराठी समीक्षकांत व शिक्षकांत अजून आलेली नाही” (साहित्य:अध्यापन आणि प्रकार, ५७). पाटणकरांचे हे निरीक्षण १९८७ सालातले आहे. त्यांच्या या निरीक्षणाचा अन्वय लावताना ते मराठी साहित्याला आणि समीक्षेला कांटवादी न होण्याला दोष देतात आणि तो खरा आहे. ते मराठी समीक्षेने संस्कृत साहित्यशास्त्रात आपली मूल्ये शोधली ती कशी चुकीची आहेत, हेही पाटणकर मान्य करतात. आपल्याकडे मर्ढेकर म्हणतात तसे मराठी समीक्षा पुरेशी परपुष्टही झालेली नाही, ती कायम वरवर वावरत आली आहे. पाटणकर म्हणतात तसे आपण पाश्चात्य विचारही नीट समजून घेतले नाहीत. तसेच साहित्याला अत्यंत पूरक अशी मांडणी करणार्‍या म. फुले, डॉ. आंबेडकर, केतकर, राजवाडे, राजारामशास्त्री भागवत, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, दि. के. बेडेकर, रा. चिं, ढेरे, दुर्गा भागवत, तारा भवाळकर, डी. डी. कोसंबी, शरद पाटील, आ. ह. साळुंखे, ‘पोत’कार द. ग. गोडसे, वसंत पळशीकर, सदानंद मोरे, सुधाकर देशमुख, स. रा. गाडगीळ, नरहर कुरुंदकर अशा अनेक विचारवंतांना समीक्षेच्या कक्षेबाहेर ठेवल्याने मराठी समीक्षाविचाराला पाया लाभला नाही.

मराठी साहित्यात नवतेचे पर्व येवू घातले होते, त्याची समीक्षेने म्हणावी तशी दखल घेतली नाही. यामध्ये कादंबरीकार केतकर, विभावरी शिरूरकर, उपेक्षितांचे अंतरंगवाले श्री. म. माटे. उत्तरार्धातले र. वा. दिघे, शरदचंद्र मुक्तिबोध, प्रारंभीचे उद्धव शेळके यांच्या साहित्याचे आकलन मराठी समीक्षेला झाले नाही. वि. का. राजवाडे यांच्या कादंबरीवरील निबंधाचा अथवा का. बा. मराठे यांच्या ‘नावल आणि नाटका’चा विचार बाजूलाच राहिलेला दिसतो. कथेच्या संदर्भातही तेच झालेले आहे. मराठी नवकथा म्हणून जी मांडणी झाली त्यात माडगूळकरांना नीट स्थान दिले गेले नाही. नाटकाच्या समीक्षेबाबत तर केवळ वाड्.मयीन इतिहासांच्या पुस्तकातच स्थान मिळालेले आहे. त्यातही पुन्हा म. फुल्यांच्या ‘तृतीयरत्न’ चा साधा उल्लेखही आढळत नाही. गो. म. कुलकर्णी लिहितात, “नवसाहित्य हे नवचित्रकार, किंवा नवसंगीत यांच्याशीही संलग्न आहे. नवसाहित्यातील अस्तित्ववादी विचार, आत्यंतिक आत्मनिष्ठेवर दिला जाणारा भर, विविध वाड्.मय प्रकारांची त्याने चालवलेली मोडतोड, मुक्तछंदाचा फैलाव, दुर्बोधतेचे किंवा अश्लीलतेचे नव्याने उद्भूत झालेले प्रश्न, कथानकाची संज्ञाप्रवाहात्मक मांडणी, सहिलीची संमीश्र आणि बदलती रूपे, चिकित्सक, चोखंदळ, मर्मज्ञ सशोधकांची, समीक्षकांची वाट पहात आहेत” (भाषा व साहित्य: संशोधन. ४०८). कुलकर्णी यांचे हे मतही १९८१ च्या आसपासचे आहे. या सगळ्याचा अर्थ असा आहे की, मराठी समीक्षेला नेमकी दिशा सापडलेली नव्हती. नंतरच्या काळात सौंदर्यशास्त्राची उभारणी होत असताना कांट- हेगेल यांच्या विचारांचा अभ्यास करून लौकिक-अलौकिकवादी समीक्षेच्या मांडणीचा विचार झाला. हा विचार महत्त्वाचा असला तरी त्यातील लौकिकतावादी मांडणीची परंपरा शोधून तिचे विश्लेषण न झाल्याने हे शास्त्र अडगळीत जावून पडले. बा. सी. मर्ढेकर, रा. भा. पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांनी जरी सौंदर्यशास्त्राची मांडणी केलेली असली तरी तिला काही भवितव्य निर्माण झाले नाही. ही मांडणी समीक्षेची समीक्षा करणारी असूनही ती दुर्लक्षित राहिली.

सत्तरच्या दशकात मात्र या समीक्षेला वैतागून गेलेल्या काही लेखकांनी बंड केले. त्यातील अशोक शहाणे यांचा ‘मराठी साहित्यावरील क्ष किरण’ हा लेख महत्त्वाचा ठरला. भालचंद्र नेमाडे यांचाही समीक्षा विचार याच विद्रोहातून आकाराला आलेला आहे. लेखकाचा लेखकराव, मराठी कादंबरीवरील लेख, नवी नैतिकता आणि देशीवाद या संकल्पनाविषयक जी मांडणी नेमाड्यांनी केली त्यातून मराठी समीक्षेत एक नवचैतन्य निर्माण झाले. मराठी समीक्षा अधिक सैद्धांतिक आणि मूलग्राही बनत आली. नेमाड्यांच्या समीक्षेने मराठी समीक्षा टवटवीत झाली. वाद, चर्चा घडू लागल्या. त्यातील देशीवादावरील चर्चा फार महत्त्वाची ठरली आहे. ही चर्चा जशी अनुकूल, देशीवादाचा विस्तार करणारी आहे तशीच ती प्रतिक्रियावादी अथवा देशीवादाला नाकारणारी आहे. यात अशोक बाबर, वासुदेव सावंत, रंगनाथ पठारे, विलास सारंग, हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, रावसाहेब कसबे, मोतीराम कटारे, जी. के. ऐनापुरे अशा अनेक लेखक, समीक्षकांचा समावेश आहे. ही चर्चा अनेकदा साहित्यबाह्य वळण घेत फारच क्रिया- प्रतिक्रियावादी झालेलीही दिसते. असे असले तरी समीक्षेला एक दिशा प्राप्त झालेली दिसते.

भालचंद्र नेमाडे यांच्या समीक्षेचा विचार करतानाच आणि त्यांच्या देशीवादातील उणिवांवर बोट ठेवताना विलास सारंग आणि हरिश्चंद्र थोरात यांनी महत्त्वाची समीक्षा लिहिली आहे. यांच्या समीक्षेने मराठी साहित्याचे खुजेपण जसे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तसाच साहित्याचे वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला आहे. साठनंतरच्या मराठी साहित्याची चिकित्सा करण्यासाठी हे तीन समीक्षक जसे महत्त्वाचे ठरतात तसेच कथनमीमांसेची पहिली आणि महत्त्वाची मांडणी करणारे गंगाधर पाटील हेही महत्त्वाचे समीक्षक ठरतात. गंगाधर पाटलांनी पहिल्यांदा कोसला आणि नवसाहित्याचे विश्लेषण करताना पाश्चात्य संकल्पनाव्यूहांचा अत्यंत पद्धतशीर परिचय करून देवून तो मराठी साहित्याला उपयोजित करून जे विश्लेषण केले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मांडणीचा विस्तार करत तृष्णाबंध या संकल्पनेचा विचार करणारे म. सु. पाटील हे यांनी ज्ञानेश्वरीचा मांडलेला तृष्णाबंध समीक्षेला वेगळी दिशा देणारा आहे.

मराठी साहित्यात जसा दलित, ग्रामीण, स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह निर्माण झाला तशी समीक्षेची मांडणीही नव्याने होवू लागली. ग्रामीण साहित्याच्या समीक्षेची मांडणी आनंद यादव, भास्कर चंदनशिव, मोहन पाटील, वासुदेव मुलाटे, नागनाथ कोत्तापल्ले यांनी करून समीक्षेला एक सैद्धांतिक चौकट देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना मराठी समीक्षेच्या केंद्रस्थानी तुकाराम आणि म. फुले यांना आणता आले नाही. दलित साहित्याची समीक्षा रा. ग. जाधव. भालचंद्र फडके, बाबुराव बागुल, गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, शरणकुमार लिंबाळे, मोतीराम कटारे यांनी करून दलित साहित्याचे स्वतंत्र साहित्यशास्त्र मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो. स्त्रीवादी समीक्षेची मांडणी म्हणावी त्या पद्धतीने झालेली नाही. विद्युत भागवत, शर्मिला रेगे, अश्विनी धोंगडे, प्रभा गणोरकर, शोभा नाईक अशा काही अभ्यासकांनी ही मांडणी केलेली आहे. नाटकाची समीक्षा गो. पु. देशपांडे, वि.भा. देशपांडे, महेश एलकुंचवार, मकरंद साठे या मूळच्या नाटककारांनीच केलेली दिसते. शरद पाटलांनी नाट्यगृहाच्या निमित्ताने भरताच्या नाट्यशास्त्राची केलेली चिकित्सा महत्त्वाची आहे, परंतु ती अद्याप कोणी ध्यानात घेतलेली दिसत नाही.

मराठी समीक्षा जरी काळानुरूप बदलत आणि विकसित होत आली असली तरी तिने स्वत:ची अशी सक्षम सैद्धांतिक मूल्यचौकट निर्माण केलेली दिसत नाही. मराठी समीक्षेने कायम पश्चिमेकडे डोळे लावून आपल्या साहित्याची चिकित्सा केली. ती करायला हरकत नव्हती. परंतु पाश्चात्य सिद्धांताचे भारतीयीकरण करण्यात तिला अपयश आलेले आहे. मराठी समीक्षा कोणी लिहिली आहे? असा जरा प्रश्न विचारला तर त्यातील बहुतेक समीक्षक मूळचे साहित्यिक आहेत. ज्या अभ्यासक विचारवंतांनी मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अधिक तपशिलात मांडणी करत एक भक्कम सांस्कृतिक वैचारिक बैठक मराठी समीक्षेला देण्याचा प्रयत्न केला त्यांचा विचार समीक्षेने केलेला दिसत नाही.

दुर्गा भागवत आणि पंजाबराव देशमुख यांनी जो धर्म आणि साहित्याचा विचार केलेला आहे, तो मराठी समीक्षेला नवा विचार देणारा आहे. नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृतीचे केलेले वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्म आणि जात चिकित्सा केवळ दलित अभ्यासकांनीच लक्षात घेतली. तीही नीट आकलन करून समग्र साहित्याला लावलेली नाही. दलित साहित्याचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र मध्यवर्ती मराठी साहित्याला लावून त्याचे उपरेपण त्यांनी उघड केले नाही. राजारामशास्त्री भागवत यांनी मराठी भाषा आणि मध्ययुगीन साहित्याची केलेली मांडणी आपण अद्याप समजून घेतलेली नाही. डी. डी. कोसंबी यांचा ‘पुराणकथा आणि वास्तवता’ हा ग्रंथ मराठी समीक्षेला वेगळा विचार देणारा आहे. स. रा. गाडगीळ यांनी लोकायत तत्वज्ञानाच्या अनुषंगाने केलेला विचार आजही महत्त्वपूर्ण आहे. तो मराठी साहित्याच्या संस्कृती चिकित्सेला आणि पर्यायाने मराठी समीक्षेला एक वेगळा आयाम प्राप्त करून देणारा आहे. रा. चिं. ढेरे आणि तारा भवाळकर यांनी जो लोकसंस्कृतीचा अभ्यास केला आहे तो अभिजनांच्या आणि बहुजनांच्या संस्कृतीची वेगळी ओळख निर्माण करून देणारा आहे. एखाद्या साहित्यकृतीत दडलेली लोकतत्त्वे आणि लोकसंस्कृती शोधण्यासाठी हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. मिथ्सच्या अनुषंगाने स. अ. डांगे यांनी केलेली चिकित्सा पौराणिक नाटकांच्या विश्लेषणाला वेगळी दिशा देणारी ठरेल.

शरद पाटील यांनी अलीकडे अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र मांडून रामायण महाभारतापासून बाबुराव बागूल यांच्या ‘सूड’ ते भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’पर्यंतची विश्लेषणाची नवी स्त्री- सत्ता वादी आणि समतावादी मांडणी केलेली आहे. त्यांनीच मार्क्स, फुले आंबेडकर यांना एकत्र आणून नवे साहित्यशास्त्र रचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा समतावादी विचार आजही दुर्लक्षित आहे. शरद पाटील आणि आ. ह. साळुंखे यांनी केलेला स्त्रीसत्तावादी विचार, तसेच वि. का. राजवाडे यांचा ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ मराठीतील स्त्रीवादी समीक्षेसह एकूणच समीक्षेला वेगळा आयाम प्राप्त करून देणारा आहे. त्यांच्या या मांडणीत अनेक नव्या शक्यता दडल्या आहेत. स. रा. गाडगीळ आणि सुधाकर देशमुख यांनी मध्ययुगीन धर्म संकल्पनांचा आणि त्यांचा समाजावर व साहित्यावर पडलेल्या विचारांचा जो मागोवा घेतला आहे तो मराठी समीक्षेला अद्यापपर्यंत ज्ञातही नाही, हे मराठी साहित्याचे आणि समीक्षेचे नुकसान करणारी गोष्ट आहे. स. आ. जोगळेकरांनी ‘गाथासप्तशती’चे संपादन करताना जी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे ती मराठीच्या भाषाविषयक अभ्यासाला आणि संस्कृती विचाराला वेगळी चालना देणारी आहे. श्री. व्यं. केतकरांनी प्राचीन महाराष्ट्राचा घेतलेला शोध नव्याने समजून घेवून समीक्षेची मांडणी व्हायला हवी. सदानंद मोरे यांनी संत तुकारामांना केद्रस्थानी ठेवून केलेली मराठी साहित्याची संस्कृती चिकित्सा महत्त्वपूर्ण आहे. अशा अनेक अभ्यासकांकडे मराठी समीक्षेने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने मराठीत समाजशास्त्रीय अथवा संस्कृतिशास्त्रीय समीक्षा पद्धती विकसित झाली नाही.

मराठीत वेगवेगळ्या विचारांना केंद्र करूनही समीक्षा लिहिली गेली आहे. मानसशास्त्रीय, चरित्रात्मक, आदिबंधात्मक, कथनमीमांसा अशा अंगाने ही समीक्षा झालेली असली तरी तिला केवळ पृष्ठस्तरीय स्वरूप लाभलेले आहे. फ्रॉईड अथवा युंगचा केवळ उल्लेख करून मानसशास्त्रीय समीक्षा नीट होत नाही. तिची उपयोजनात्मक परिपूर्ण चिकित्सा पद्धती काय असावी, असा प्रयत्न मराठीत झालेला दिसत नाही. जया दडकर यांचे ‘खानोलकरांच्या शोधात’ हे चरित्रात्मक समीक्षेचे आकलान सोडले मराठीत चरित्रात्मक समीक्षा नाही. हिंदीत जी लोकशाहीच्या अंगाने आणि रूपवादी विचारांचा मागोवा घेताना प्राच्य काव्यशास्त्राची जी विस्तृत चर्चा झालेली आहे तशी चर्चा मराठी समीक्षेत झालेली नाही. कथनमीमांसेच्या अंगाने काही विश्लेषण झालेले आहे, परंतु त्या कथनपरंपरा आणि मराठीतील प्राचीन कथन यांची सांधेजोड करून काही विश्लेषण झालेले दिसत नाही. अशा या आशयाच्या अंगाने विकसित करता येण्यासारख्या अनेक शक्यतांची मराठी समीक्षा वाट पाहात आहे.

रूपबंधाच्या अंगानेही आपल्याकडे फारसा समीक्षाविचार झालेला नाही. साहित्य ही कला आहे, तिच्या घडणीचे एक शास्त्र असते. तिची एक परंपरा असते, तिचा एक इतिहास असतो. काळाच्या बदलाबरोबर तिच्यात काही बदल होत असतात, असा व्यापक विचार करून साहित्यप्रकारनिष्ठ समीक्षाही मराठीत नाही. कथा, कविता, कादंबरी, नाटक यांच्या रूपबंधाची सविस्तर चर्चा आणि चिकित्सा करणारी किती सामुग्री मराठीत आहे, असा प्रश्न विचारला तर भालचंद्र नेमाडे, हरिश्चंद्र थोरात, गंगाधर पाटील, विलास सारंग, सुधीर रसाळ, वसंत पाटणकर, रोहिणी तुकदेव, गो. मा. पवार (विनोदाचे तत्त्वज्ञान) अशी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नावे सापडतात. एखादा वाड्.मयप्रकार कसा उदयास आला आणि त्याच्या रूपबंधाचा विकास कसकसा होत आला याची सप्रमाण मांडणी होण्याची गरज आहे. म्हणजे मग आधुनिक मराठी कवितेचा आणि नाटकाचा पाया महात्मा फुले यांनी घातला आहे की नाही, याचे उत्तर आपल्याला सापडेल. तसेच तसेच एखादा साहित्यप्रकार रूपाच्या अंगाने कसा विकसित होतो, याचाही शोध लागेल.

समीक्षेत अनेकदा रूपबंधाच्या घटकांचा अभ्यास कायम अनुषंगिक स्वरूपात होत आलेला आहे. त्यामुळे तर मराठीत भाषा अथवा शैलीशास्त्रीय समीक्षा आढळत नाही. अशोक केळकर, रमेश धोंगडे, दिलीप धोंडगे अशी केवळ चार पाच नावे या प्रांतात सापडतात. तीही पुन्हा कवितेच्या शैलीचा अधिक अभ्यास करताना दिसतात. त्यामुळे भाषा, निवेदन, पात्र, वातावरण या अनुषंगाने मराठी समीक्षेत संशोधन करायला खूप वाव आहे. मराठी कथेचा अथवा कादंबरीचा बदलता निवेदक असा विषय घेतला तरी कितीतरी नव्या गोष्टी समोर येतील. मराठी कादंबरीतील नायकाचे वय, मराठी नाटकातील बदलते नेपथ्य, मराठी कवितेतील पर्यावरण आणि त्याच्यावर कवीने केलेले आरोपण अशा किती तरी शक्यता आजमावून पाहून मराठीची समीक्षा समृद्ध करता येईल. तसेच मराठी समीक्षेच्या वाटचालीचे टप्पे करून तिच्या वाटचालीचा इतिहास लिहिताना त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेवून एक बृहत प्रकल्प करता येण्यासारखा आहे. अर्थात हे कुणा एकट्या- दुकट्याचे काम नाही. ही मोठी सामूहिक जबाबदारी आहे. पण म्हणून ती अशक्य आहे अशातला भाग नाही. कोणतीही एखादी संस्था काही निवडक अभ्यासकांना सोबत घेवून हा प्रकल्प पूर्ण करू शकते.

------------------

संदर्भ :

भागवत, श्री.पु., रसाळ सुधीर (संपा.) : साहित्य: अध्यापन आणि प्रकार, मौज, मुंबई, १९८७.

जोशी, वसंत (संपा.) : भाषा व साहित्य: संशोधन, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, १९८१.

भोळे, भा. ल. ( संपा.) : संशोधनाची क्षितिजे, साकेत औरंगाबाद, द्वितीयावृती. २००७.

-----------------

महेंद्र कदम

भूमी, शाहूनगर, कुर्डूवाडी रोड, टेंभुर्णी

ता. माढा, जि. सोलापूर ४१३ २११.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट