‘सैराट’ची भाषा
नागराज मंजुळे आज दिग्दर्शक म्हणून
देशभर सुपरिचित आहे. परंतु नागराज मूळचा कवी आहे.‘उन्हाच्या
कटाविरुद्ध’
हा
त्याचा कवितासंग्रह दुसर्या आवृत्तीसह रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या
कवितासंग्रहातच त्याच्या भाषेचे वेगळेपण लक्षात आले होते. तोच धागा पुढे ‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’मध्ये दिसतो.
मराठी सिनेमाला दिलेली भाषा ही नागराजची सर्वात मोठी देन आहे. सिनेमाच्या बाकीच्या
घटकांची चर्चा आणि त्यासोबत आलेले यश याबद्दल खूप चर्चा झाली आहे. म्हणून येथे
फक्त आपण भाषेच्या अंगाने विचार करणार आहोत.
‘सैराट’ सर्वप्रथम
आपलं लक्ष वेधून तो क्रिकेट मॅचच्या धावत्या समालोचनाने आणि मैदानातील मुलांच्या
भाषेने. कारण
मैदानात चाललेल्या गोंधळाऐवजी प्रेक्षक पटकन भाषेकडे खेचला जातो. भाषेकडे खेचले
जाण्याचे हे प्रकरण मराठी सिनेमात तरी कधी घडलेले मी पाहिले नाही. मुळात मराठी
सिनेमात भाषेचा इतका प्रभावी आणि नेमका वापर मझ्या तरी पाहण्यात नाही. जो झाला तो
अत्यंत विकृत आणि ग्रामीण बोली या नावाखाली अडाणी पद्धतीने झाला आहे. निळू फुले, दादा कोंडके, अशोक सराफ या
मंडळींचा खरंतर ग्रामीण भागाशी संबंध होता. परंतु भाषेचे भान मात्र त्यांनी
सिनेमात दाखवलेले दिसत नाही. पुढील टप्प्यात हे भान मकरंद अनासपुरे याने व्यक्त
केलेले दिसत असले, तरीही सिनेमाच्या भाषेचे समग्र भान पहिल्यांदा‘सैराट’मध्ये व्यक्त
झालेले दिसते. भाषा आणि बोली या परस्परपूरकच असतात असे नव्हेतर, बोली
प्रमाणभाषेला जिवंतपणा द्यायचा प्रयत्न करीत असतात. बोलीमुळेच भाषा जिवंत राहण्यास
आणि समृद्ध होण्यास मदत होत असते. पूर्वी हागंदारी हा शब्द अश्लील आणि ग्राम्य
समजला जायचा,
परंतु
तो आज स्वच्छता अभियानात केंद्रस्थानी आहे. हे फक्त एक उदाहरण झाले. एवढेच कशाला
सैराट आणि झिंगाट हे बोलीतले शब्द आता सगळीकडे वापरले जात आहेत.
तर मुद्दा असा की,‘सैराट’आपले लक्ष
भाषेकडे का वेधतो? मुळात हा चित्रपट घडतो तो सोलापूर जिल्ह्यातील
करमाळा तालुक्यात. सोलापूर तसा नगर आणि पुण्याला लागून असलेला जिल्हा आहे. नगर आणि
सोलापूर या दोन्ही जिल्ह्याच्या बोली वेगवेगळ्या आहेत. परंतु अभ्यासकांनी या
बोलींकडे फारसे गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही. तसेच या बोली साहित्यातही फारशा
आलेल्या नाहीत. सिनेमा तर कोसोमैल दूर होता. बोली म्हणजे प्रमाणभाषेतील शब्दांचे
विकृत रूप असा काहीतरी चुकीचा समज होता आणि आजही आहे. त्यामुळे एकूण ग्रामीण
भाषेकडे आणि माणसाकडे शहरी माणसांचा पाहण्याचा दृष्टिकोनच कायम दूषित राहिलेला आहे.
तो पुसण्याचे काम पहिल्यांदा नागराजने केले आहे. हे मोठेच ऐतिहासिक काम त्याच्या
सिनेमाने केले आहे. आणखी एक ऐतिहासिक काम त्याने केले आहे, ते म्हणजे
त्याने पहिल्यांदा सोलापूरच्या बोलीला जगाच्या नकाशावर आणून ठेवले आहे. त्याने
तिसरे एक ऐतिहासिक काम केले आहे: बोलीभाषा वापरताना जो एक न्यूनगंड असतो, तो पुसून
बोलीला सन्मान मिळनून दिला आहे. परश्या, सल्या आणि लंगड्या
असोत किंवा आर्ची असो, ही जी बोली बोलतात ती अत्यंत आत्मविश्वासाने
अणि ठामपणे बोलतात. यांच्या नावापासूनच हे सगळे सुरु होताना दिसते. हे नोंदवण्याचे
कारण असे की,
भाषेच्या
वापराचे जे प्रतिष्ठेचे निकष आजही सांगितले जातात, ते गावाकडील
मुला-मुलींना नीटपणे उभं राहू देत नाहीत. या भाषिक न्यूनत्वामुळे बरीच गुणवान मुले
स्पर्धेत उतरण्यापूर्वीच बाद होतात. नागराजने या समजुतीला जोरदार धक्का दिला आहे.
आपली बोली हेच आपल्या गुणवत्तेचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असा नवा
विश्वास त्याने तरुणपिढीला दिला आहे. नागराजने एकाच वेळी अशा बर्याच ऐतिहासिक बुरुजांना
सुरुंग लावून नवे परिवर्तनाचे बुरूज तयार केले आहेत.
‘सैराट’ची बोली ही
खरं तर सोलापूर जिल्ह्याची बोली म्हणून विचार घ्यायला हवी, कारण
नागराजने अत्यंत समर्थपणे बोलीचे उपयोजन केले आहे. हा सिनेमा ज्या परिसरात घडतो तो
परिसर एका बाजूने नगर जिल्ह्याला आणि दुसर्या बाजूने पुणे जिल्ह्याला जवळ आहे.
असे असूनही या परिसराच्या भाषेवर पुण्याच्या प्रमाणबोलीचा फारसा प्रभाव जाणवत
नाही. नगर जिल्ह्याच्या बोलीचे आणि तेथील लकबीचे काही संदर्भ आढळून येतात. परंतु
याला प्रभाव म्हणण्याऐवजी परस्परसंबंध असे संबोधायला हरकत नाही. या सोलापुरी
बोलीने आपले वेगळेपण जोपासले आहे, ते या सिनेमात प्रभावीपणे उतरले आहे.
‘सैराट’मध्ये आलेली
बोलीभाषा ही सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करते. जरी ग्रामीण
भागात साक्षरता वाढली असली तरी आजही अनेकजण अत्यंत दिमाखात आणि आत्मविश्वासने
बोलीभाषेचा वापर करतात. म्हणून तर आर्ची, परश्या, सल्या
आपल्याच भाषेत व्यक्त होतात. वस्तुत: नागराज या कॉलेजकुमारांना प्रमाणबोली देऊ शकत
होता,
अणि
ते खटकलेही नसते. परंतु तो तसे न करता त्यांना त्यांच्याच भाषेत व्यक्त व्हायला लावतो.
त्यामुळे भाषिक अभिव्यक्तीच्या दडपणातून ही मुलं मोकळी होतात आणि नागराजला हवा तो
अस्सल अभिनय ही मुलं करताना दिसतात. या बोलीभाषेमुळे सिनेमाला मातीचा आणि प्रदेशाचा
पक्का संदर्भ लाभला आहे. त्याचबरोबर त्या मुलांच्या वागण्यात आणि अभिनयात जो एक
सहजपणा आला आहे तो केवळ त्यांना नागराजने दिलेले भाषेचे मोकळेपण हे महत्त्वाचे
कारण आहे. हा सहजपणा हेच या सिनेमाच्या यशाचे खरे कारण आहे. एकूण मराठी सिनेमाची
भाषाच या निमित्ताने बदलून टाकण्याचे काम ‘सैराट’ने केले आहे.
हे नोंदवण्याचे कारण असे की, आजपर्यंत मराठी सिनेमाने भाषेबाबत
चुकीचा दृष्टिकोन समाजात पसरवला होता. प्रमाणबोलीतले काही शब्द थोड्याशा विकृतपणे
उच्चारले की झाली बोली अशी धारणा होती.ही धारणा पुन्हा बोलीकडे न्यूनत्वाच्या
दृष्टीने पाहणारी होती.सैराटने हे सारे प्रस्थापित समज मोडून काढले आहेत.
या बोलीचे पहिले लक्षण म्हणजे, एकारांत शब्द
अकारांत पद्धतीने उच्चारले जातात. शक्य तेवढे शब्दाच्या अंती येणारी मात्रा खावून
टाकण्याकडे अधिक कल असलेला दिसतो. केलं, खाल्लं, बसलं, उठलं. गेलं, लागलं, आलं, कळलं, हाणलं अशी
अकारांत रूपे वापरली जातात. या पद्धतीच्या वापरामुळे लिंगव्यवस्थेच्या वापरातील
काटेकोरपणा नाहीसा होतो.
उदा. लंगडं कामातनं गेलं बग. त्याला असं धुतलं की बास! या
वाक्यांमध्ये लंगडा आणि धुतला अशी पुल्लिंगी रूपे असायला हवीत, परंतु येथे
ती नपुंसकलिंगी म्हणून येतात. बारकाईने सिनेमातले संवाद ऐकले तर आपणांस अशा रचना
सरसकट आढळतात. यामुळे या प्रकारची वाक्ये ऐकताना आपणाला एक वेगळाच अनुभव येतो.
या बोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे
शिव्यांचा केला जाणारा वापर. अत्यंत खुलेपणाने आणि सहजपणे शिव्या दिल्या जातात. या
बोलीत जेवढ्या शिव्या दिल्या जातात तितक्या दुसर्या कुठल्या बोलीत दिल्या जात
असतील असे वाटत नाही. अनौपचारिक संवादात आणि रागात पण शिव्या दिल्या जातात.आणि
गंमत अशी की,
यातल्या
बहुतेक शिव्या आईवरच्या आहेत. तरीही कुणाला याचे वाईट वाटत नाही. वस्तुत:
शिव्यांच्या वापराकडे आपण सांस्कृतिक राजकारणाचा भाग म्हणून पाहिले पाहिजे.माणूस
जसजसा आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या विकसित होत जातो; तसा तो
मध्यमवर्गीय होत जातो. हा मध्यमवर्गीय माणूस मग आपोआप आपल्या मुळांपासून तुटत
जातो. या तुटण्यात भाषा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. प्रमाणभाषा हेच आपल्या
अभिव्यक्तीचे प्रमुख साधन आहे अशी मध्यमवर्गीय माणसांची धारणा पक्की होत जाते. त्यामुळे बोली आणि शिवी त्या
वर्गातून हद्दपार होत जाते. परंतु आर्थिक
अभावग्रस्तता आणि जातव्यवस्थेतील खालचा दर्जा जेथे दिसून येतो, तेथे शिवी
अपरिहार्य असते;
कारण
व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे एकमेव हत्यार म्हणजे शिवी असते. सांस्कृतिक आणि
सामाजिक कोंडलेपण नोंदवण्यासाठी सर्रासपणे शिवी वापरली जाते. तसेच मनातील कोंडमारा, राग व्यक्त
करण्यासाठी त्या वर्गाकडे दुसरा पर्याय नसतो. इतकेच नव्हेतर शिवी जर नसती तर किती
खून आणि मारामार्या झाल्या असत्या सांगता येत नाही. माणसाच्या रागाची पहिली
उत्स्फुर्त प्रतिक्रिया असते ती शिवी. त्यातूनही राग आवरणे शक्य झाले नाही तर मग
मारामार्या सुरु होतात. त्याचबरोबर शिवीत कायम स्त्रीचा वापर केलेला असतो. यामागे
पुरुषसत्ताकता जशी असते; तशीच एखाद्या समाजाला गुलामीत
ठेवण्यासाठी स्त्रीचाच वापर केला जातो. त्यामुळे शिवीकडे असे व्यापक राजकारणाचा
भाग म्हणून पहावे लागते. आयघाल्या, झवाड्या, हांडग्या, चढायला लागला, बुळ्या, कडुभाड्या, लवड्या अशा
अनेक शिव्या सैराट मध्ये येतात. विशेषत: पळून गेल्यानंतर संशयाने जेव्हा परश्या
पछाडतो तेव्हा हॉटेलमध्ये आर्ची शिवी देते तेव्हा आपणास धक्का बसतो. पण त्यावेळी
आर्चीकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. तिच्या या कृतीतून तथाकथित योनीसूचितेला आणि पुरुषसत्तेलाही
ती हादरे देते. त्यासाठी ती शिवीकडे विद्रोहाचे हत्यार म्हणून पाहते. तर प्रिन्स
पर्श्यासकट त्याच्या घरच्यांना जेव्हा शिव्या देतो तेव्हाही तो राग व्यक्त
करण्याचे हत्यार म्हणून पाहतो. अनेकदा सिनेमात सहजपणे शिव्या येतात, त्यामागे
बोलीचा तो विशेष म्हणून पहावे लागते. केवळ अश्लील भाग म्हणून शिवीकडे पाहून चालत
नाही,
याची
तीव्र जाणीव हा सिनेमा करून देतो. या
शिवीच्या वापराचे मानसशास्त्र नागराजने येथे प्रभावीपणे वापरले आहे. सांस्कृतिक
कृती,
विद्रोह, सामाजिक कुचंबणा, दडपण आणि राग
व्यक्त करण्याचे प्रमुख माध्यम आणि साधन म्हणून नागराज शिवीकडे पाहताना दिसतो.
या बोलीमध्ये बर्याचदा क्रियावाचक
शब्द विशेषण म्हणून उपयोजिले जातात. पटांगण झालं, धुरळा उडवला, व्हकाव्हका
बगत्याती,
करपून
गेलं ती,
उबा
फाडील तुला,
थेsssट रानात
चाल्ली,
अशा
काही रचनांमधून पटांगण, धुरळा, व्हकाव्हका, करपून असे क्रियावाचक
शब्द विशेषणासारखे येतात. अशा रचनांमुळे
नाम- सर्वनामाऐवजी विशेषणे केंद्रस्थानी येतात, त्यामुळे
अर्थाधिक्य प्राप्त होऊन नवाच अर्थ वाक्यांना प्राप्त होतो. येथेच आणखी एक मुद्दा
स्पष्ट करणे आवश्यक आहे तो म्हणजे, बहुतेक वेळा विशेषणे ही नामांची महती वाढवण्यासाठी
येत असतात. येथे मात्र तसे होत नाही. रताळ्या, लंगड्या, हालगाट, चेन्नई
एक्स्प्रेस (सर मागं), बुळग्या, हांडग्या, लवड्या या
विशेषणांतून नामांची उंची वाढण्याऐवजी त्यांचा स्तर घसरवला जातो, उपहासात्मकता
केंद्रस्थानी आणली जाते. आणि ते जाणीवपूर्वक केले जाते. हा एक अत्यंत महत्त्वाचा
विशेष येथे दिसून येतो.
कोणत्याही भाषेचा किंवा बोलीचा
सुलभीकरण आणि सामान्यीकरण हा धर्म असतो.सैराटमध्ये हे ठळकपणे दिसून
येते.लाता(लाथा),जिकला(जिंकला),उबा
फाडील(उभा),चिटी(चिठ्ठी),चाल्ली(चालले
आहे),
बग्तोय(बघतोय), आम्चाच(आमचाच),नस्तु(नसतो), इरोदकास्नी
सांगा मनाव(विरोधकांना सांगा म्हणावं), आट्वण(आठवण) , इर्भळ
(दिवसभर),
बग्त्याती(बघतात)
असे अनेक भाषिक नमुने येथे दिसून येतात.केवळ एवढेच नव्हेतर शब्दांच्या
सुलभीकरणासोबत आपली प्रादेशिकता जपताना अस्सल म्हणता येतील असे देशी शब्द सैराटमध्ये
भरपूर प्रमाणात आले आहेत. मुकला, व्हकाव्हका, धुरळा, इर्भळ, कडू, वड पाचची, सैराट, झिंगाट, नाद खुळा, आयला, लका, आता गं बया
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
आयला, बग्ग्ड्या, आयघाल्या, आता गं बया, लका/लकाव, येड्झवं, आयेव लका, तुज्या आयचं
तुज्या,आगं बयाव असे
हे भाषिक प्रयोग बोलीत सातत्याने वापरले जातात. त्यामुळे सोलापुरी बोलीचे हे खास
वैशिष्ट्य म्हणून नोंद करायला हवी. याही वैशिष्ट्याचा प्रभावी वापर या
सिनेमात झालेला दिसतो. त्यामुळे सैराटची बोली अधिकच परिणामकारक ठरली आहे.आणि
कलावंत सगळे पुन्हा याच परिसरातील असल्याने त्याचे सादरीकरणही उत्तम झाले
आहे.नागराजला जी सिनेमाची भाषा कळली आहे त्यात हा स्थानिक कलावंतांचा मुद्दा
महत्त्वाचा आहे.
बर्यापैकी कलावंत स्थानिक असल्यामुळे
बोलीचा वापर जसा प्रभावी झाला आहे तसाच सादरीकरणाचाही प्रभाव महत्त्वाचा आहे.
सोलापुरी माणूस बोलताना नेहमीच वरच्या पट्टीत बोलतो. इथले हवामान कोरडे आणि परिसर
दुष्काळी असल्यामुळे उच्चार(वरच्या पट्टीत) करताना वागेंद्रियांना कसलाही त्रास
होत नाही. तसेच दुष्काळामुळे दाखवण्यासारखं दुसरं काहीच नसल्यामुळे (कदाचित
बोलण्यातून तरी) भाषेच्या सादरीकरणात एकप्रकारचा आवेश आणि थोडासा उर्मटपणाकडे झुकणारा बाज आढळून येतो.बोलीमध्ये जो गोडवा
असतो तो मात्र येथे दिसत नाही.एक प्रकारचा रफनेस या बोलीला आहे. तो तसाच
सैराटमध्ये आलेला आहे. याचा उत्तम नमुना पर्शाच्या कुटुंबियांना दम देताना दिसून
येतो. तसेच आर्चीच्या ये निग बाहीर, मराटीत सांगितलेलं कळत नाय, का
इंग्लिशमदी सांगू, मंग्या सोड त्याला, हात तर लावून
बग त्याला मग तुला सांगते, या सगळ्या तिच्या सगळ्या
संवादातून केवळ बंडखोरी दिसत नाही, तर बोलीतला
रफनेस त्यातून व्यक्त होताना दिसतो.
सैराटमध्ये म्हणी आणि वाक्प्रचारांचा
अस्सल वापर असल्यामुळे बोलीला अधिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. आयच्या गावात आणि
बाराच्या भावात,
बड्या
बड्या बाता आणि ढुंगाण खातंय लाता, हुकला तर मुकला ठोकला तर जिकला, झालं पटांगण, उबा फाडील, सटकला लका
आता तू,
गावावर
उडाय लागला,
कुत्री
मारीत फिरणं,
बगतोस
काय रागानं षटकार मारलाय वाघानं, याड लागलं, शिकून सवरून
लोकाची धन,
जबर
किक बसली,
हितंच
गाडत्याल,
चांगलं
सांगाव तर आमचाच टांगा पलटी करतोय, अशा कितीतरी नव्या म्हणी आणि
वाक्प्रचारामुळे संवादाची उंची वाढली आहे.त्यामुळे सिनेमाचं जग तितकंच कलात्मक आणि
वास्तव बनलं आहे. त्याचबरोबर बुलेटला सॉंग
म्हणणं,
डोळं
वासून काय बग्तोय असं म्हणणं, पप्पी दे म्हणणं, अशा अनेक
रचनांमुळे आशयाला गुणवत्ता प्राप्त होते.
एकूणच‘सैराट’च्या
बोलीभाषेने केवळ सिनेमाची उंची वाढवली नाही, तर सांस्कृतिक
राजकारणात महत्त्वाचा हस्तक्षेप नोंदवला आहे. वंचितांच्या जगाला न्याय देताना
त्यांच्याच भाषेत बोलून नवा न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. बोलीभाषेचा
हा वापर तरुणांच्या भावविश्वाला नेमकेपणाने व्यक्त करतो.त्यांचे दबलेपण, हळुवारपणा, संवेदंशीलता, विद्रोह, नकार, शोषण, मुक्तता या
सगळ्या मूलभूत घटकांना कवेत घेऊन नागराजने काव्यात्म न्यायाची अत्यंत सुंदर अशी
शोकात्म मांडणी केली आहे. या मांडणीमागे समतेचे, न्यायाचे
मूलभूत तत्त्वज्ञान सिनेमामागे आणि बोलीभाषेमागे उभे आहे. म्हणून तर ‘सैराट’ने समतेच्या
जोरावर जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
---------------------------------------
टिप्पण्या