असो आता चाड : संदीप जगदाळे



                                                                                                                                             -महेंद्र कदम       
            लोकवाड्.मय प्रकाशन गृहाने नुकताच प्रशित केलेला हा कवितासंग्रह. संदीप हा आजच्या पिढीचा कवी. त्याचा हा पहिलाच संग्रह असला तरी, विविध नियकालिकातून प्रकाशित झालेल्या कवितांच्या रूपाने तो  मराठी पर्यावरणाला माहीत असलेला कवी आहे. त्याच्या कवितेने तिची जागा अगोदरच निर्माण केली आहे. त्यामुळे ह्या जागेच्या अवकाशाचा विस्तार म्हणजे हा कवितासंग्रह आहे. हा विस्तार यासाठी महत्त्वाचा आहे की, या कवितेला मराठी पर्यावरणाने तिचा अवकाश निर्माण करून दिला आहे. पर्यावरण ही संज्ञा मी जाणीवपूर्वक वापरीत आहे. कारण या संज्ञेत संदीपच्या कवितेचा समग्रपणा दडला आहे. ही कविता केवळ एका वाटेने जात नाही. तिने समग्रतेला आव्हान केले आहे. ही समग्रता जशी आशयाच्या अंगाने महत्त्वाची आहे; तशीच ती वाड्.मयीन घटना आणि घटितांच्या अंगानेही महत्त्वाची आहे.
            ही कविता केवळ गावाची किंवा शेती-मातीची नाही; ती आहे मराठी माणसाच्या समग्र पर्यावरणाची आणि त्याच्या विस्थापनाची. हे विस्थापन केवळ आजचे नाही. मराठी मणसाच्या हजारो वर्षांच्या विस्थापनाला ती उजागर करते. म्हणूनच ती म्हणते,
                                    कोणी विचारू नये माझा पत्ता / खरं तर
                                    सांगू शकत नाही मी / कोणतं माझं गाव?
                                    कुठून आलोय मी? /  किती वाटा गेल्यात पायाखालून?
   ही कविता केवळ हरवल्या वाटांची नाही; तर त्या वाटेवरून चालताना हरवून गेलेल्या गावाची आणि त्याने दिलेल्या समग्र मूल्यसंचिताच्या विस्थापनाची आहे. एखादे रोपटे जरी जमिनीतून उखडून टाकले तरी त्याच्या कोवळ्या मूळांना काही माती चिटकून येते. इथे तर अख्खंच्या अख्खं गावच उखडून टाकले गेले आहे. ज्या नदीच्या किनार्‍या-किनार्‍याने माणसाची संस्कृती फुलली, त्या किनार्‍यावर तो विसावला, विकासला आणि विस्तारला देखील. विस्तारताना त्याने नदीच्या प्रवाहीपणाबरोबर स्वत:लाही प्रवाही ठेऊन नदीच्या धर्माशी जागून आपली नदीची संस्कृती आकारली. तिच्याप्रमाणेच इथल्या माणसानेही सगळ्या भल्या-बुर्‍या गोष्टी पोटात घेऊन उत्तम पिकाची आणि सहानुभावाची शेकडो पिके घेतली आणि समृद्धीच्या कक्षा निर्माण केल्या. त्याच नदीने अचानक एके दिवशी सगळ्याचा घात करावा आणि स्वत:च्या किनार्‍यावरून केवळ हाकलून न देता सगळेच गिळंकृत करावे अशावेळी माणसाचे काय होत असेल? त्याच्या हजारो वर्षांच्या संचिताला अशी अचानक एका रात्रीत जेव्हा पाण्याची आग लावली जाते, तेव्हा काय होते, याचा शोध घेणारी ही कविता आहे.
            ज्या नदीच्या किनारी वाढला; त्याच नदीच्या धरणावर मजूर म्हणून काम केले. तिला बांध घातला. आणि तिनेच एके दिवशी त्याला गाशा गुंडाळायला लावला. तेही दु:ख विस्थापिताने पचवले. परंतु त्याच्या विस्थापनानंतर त्या गावला कुणीच जवळ केलं नाही, ही खरी सांस्कृतिक मेख आहे. धरणाचं पाणी पिऊन ज्यांची घरं फुलली; त्या माणसांनीही या पाण्याखाली आहुती दिलेल्या गावाला कुणी आसरा दिला नाही. त्यामुळे या गावाला आपलं मरण रोजच पाहण्याशिवाय आणि त्याचाच उत्सव साजरा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा गावतून आलेला हा कवी तरीही म्हणतो आहे की, घर कधीच मरत नसतं.
            कवी काय काम करतो, याचे उत्तर देणारी कविता आहे. संपूर्ण संसार पाण्याखाली गेला. जितकं शक्य आहे तितकं पाठीवर आण्णी गाडीत टाकून उंदरासारखं बाहेर पडलेली ही माणसं काय घेतलं आणि काय नाही, याचा हिशोब ठेवताना अख्खंच्या अख्खं घर राहिल्याचं आठवून खिन्न होतात. उदासतात. तिथल्या हजारो गोष्टी त्यांना आठवत राहतात. अगदी सुगरणीच्या हाताने सारवलेल्या जमिनीपासून पोतेरा दिलेल्या चुलीपर्यंत आणि दावणीच्या दाव्यापासून ते उकिरड्यात उगवलेल्या आंब्यापर्यंत त्याला सगळे आठवत राहील. तरीही तो मरणार नाही की, त्याच्या घराला मरू देणार नाही. ज्या नदीने जगवले त्या नदीमायला तो बोटे मोडणार नाही. संदीप लिहितो,
                                    त्यांना कधीच आठवणार नाही / रात्रीतून घरात घुसलेलं पाणी
                                    एक दिवस ते पाण्यासमोर उभं राहतील
                                    पण त्यांना पाणी दिसणार नाही / दिसेल फक्त घर
                                    ते पाण्याला पुन्हा पुन्हा विसरतील / अन् घराला जिवंत ठेवतील
संदीपची ही पर्यावरणीय भूमिका सबंध कवितेत उठून दिसणारी आहे. तो व्यवस्थेला शिव्या घालतो. त्यांचे साप आपण घरात पाळले म्हणून तो अगतिक होतो. पण तरी तो नदीला जराही विसरत नाही. ही जी इथली मराठी माणसाची हजारो वर्षे चालत आलेली जी पर्यावरणीय सांस्कृतिकता आहे, तिला ही कविता उजागर करते. त्यामुळे ही कविता केवळ ग्रामीण किंवा कृषीची कविता नाही, ती सबंध व्यवस्थेला आपल्या आस्थेच्या केंद्रस्थानी घेऊ पाहते. म्हणूनच या कवितेने जी नदीची पायखुटी स्वत:च्या पायात ठोकून घेतली आहे, ती फार महत्त्वाची आहे. कविताच म्हणते आहे की, एखाद्या नदीने भाविकाने टाकलेले आठाणे जसे गिळावेत; तसे गोदावरीने माझ्यासह माझ्या गावाला गिळून टाकले आहे. तरीही तिला मनातून हाकलून टाकता येत नाही. ही अस्वस्थता घेऊन वावरणारी ही कविता म्हणूनच धरणाला धरण मानायला तयार नाही. नदीच्या अंगावरची जखम म्हणजे धरण अशी धारणा ही कविता व्यक्त करते. कारण तुझ्याच कृपेने आमच्या घरात धान्याच्या राशी लागल्या होत्या. तुझ्याच अंगा-खांद्यावर आम्ही खेळलो, हे मला कसे विसरता यईल. ही खरी भूमिका या कवितेची आहे. कारण संदीप आपल्यासह झालेल्या विस्थापनाकडे केवळ विकास किंवा विस्थापन म्हणून पाहत नाही. त्याच्याही पलीकडे एक माणूस आहे, आणि त्याचे सर्वस्व हिरावले आहे. अशा सर्वस्व हरवलेल्या माणसाच्या दु:खाची व्यथा तो अधोरेखित करतो आहे.
            संदीपची ही पर्यावरणीय चाड दुहेरी स्वरूपाची आहे. त्याला आपल्या विस्थापनाला कोणी व विचारल्या माणसांना कशी कशाचीच चाड नाही, असा करडा सवाल तो करतो; पण त्याचवेळी नदीने विकासाच्या नावाखाली मला जरी विस्थापित केले असले तरी मी मात्र तिला कृतघ्न म्हणणार नाही. तिच्याबद्दलची एक सहानुभावाची चाड मला आहे, अशी त्याची स्पष्ट भूमिका आहे. ही भूमिकाच त्याच्या कवितेला उंचीवर घेऊन जाते. तो व्यवस्थेला कसलीच चाड नाही, हे नोंदवताना लिहितो,
                                    माझ्या मायमावल्यांनो / काळजाचा  दगड करा / रस्त्यावरून उठा
                                    अन् चालायला लागा बिनबोभाट
                                    बारा पिंपळावरचा मुंज्या झाल्यावर / मागू नये बूड टेकवायला टीचभर जागा
                                    तुम्हाला इथं सरण रचण्यापुरताही / मिळणार नाही कुठल्याच नदीचा काठ
                                    मीही आहे तुमच्यातलाच एक / मी करू शकत नाही तुमची फसवणूक
                                    मला सांगावं लागतंय खरंखुरं
                                    तुम्ही ऐकल्या नाहीत का सगळ्या जनसुनावण्या ?
                                    वाचले नाहीत का / न्यायलयाचे सतराशे साठ पानांचे निवाडे ?
                                    इथं कोणीच नाहीय तुम्हाला वाली
                                    परक्या वाटांवर / पायं खोरून मरण्याशिवाय
                                    तुमच्या समोर ठेवला नाहीय / दुसरा कोणताच पर्याय
या व्यवस्थेला कसली चाड नाही किमानपक्षी आपण तरी चाड ठेऊ आणि उठून जाऊ, अशी भूमिका घेणारी कविता विद्रोहाकडे झुकतानाच जगण्यावरची निष्ठा कमी करीत नाही. सगळे वाअहून जाऊनही धरणाच्या तळाचा उंबरठा शोधू पाहणार्‍या म्हातार्‍या म्हणूनच त्याच्या आस्थेचा विषय बनतात. कुणी तरी तोंडावर पैसे फेकले म्हणून तिथून आपली मूळं निसटत नाहीत, हे आजच्या जागतिकीकरणाच्या व्यवस्थेला लक्षात यायला तयार नाही, यावरही ही कविता भाष्य करताना दिसते. कारण जिथे मूळे रोवली ती सहजासहजी सुटणार नाहीत. त्या मुळांबरोबर चिकटून माती आणि तिच्याबरूबर तिथलं संचित येणार आहे. ते सगळे हिरावून घेतल्याने गावाने आपले गावपण हरवले आहे.
            अचानक जेव्हा सगळं जगणंच पाणीमोल होऊन बसतं, तेव्हा सहानुभाव आणि समूहभावाचे दोरच कापून टाकले जातात. कुठेच जगण्याचा आधार मिळत नाही. आधाराची भूमी काढून घेतल्यावर त्या माणसाचे काय होते, हे नोंदवताना कवी म्हणतो, मी एक गाव मरताना पाह्यलंय. आणि त्या गावाचं मढं रोज मी खांद्यावर घेऊन फिरतोय. पण त्याला स्मशानभूमी पण मिळायला तयार नाही. ते गाव मरता-मरता वाचेल अशी कवीला आशा होती. पण एका रात्रीत गोदावरीने त्याला गिळंकृत केलं आणि कायमची त्याच्या डोळ्याला पाण्याची धार लावून ठेवली. तो लिहितो,
                                    जायकवाडी, सरदार सरोवर, रिहंद,भाक्रा, कोलार / तुम्ही तर पाहिलंय सगळं
                                    मग मला सांगा ना / माणसं गावाला कायमचं / पारखं होऊन चालू लागतात
                                    तेव्हा कसे दिसतात? / मी कसा दिसलो तुम्हाला
                                    माझ्या बालमुठीत मावेल ते तोलून / पाठमोरा चालताना ?
हे गावाला पाठमोरं व्हावं लागणं ही गोष्ट सोपी नसते. अधांतरी होणं काय असतं, हे सहजासहजी कुणाला कळणार नाही. म्हणून कवी म्हणतो की, हे असं कुठवर भ्रमिष्टासारखं बडबडत राहू ? घरगिळ्या व्यवस्थेला तो शब्द बद्दलून मागतो आहे. कारन किती दिवस दु:ख उगाळत बसावं, असं कवीला वाटतं आहे.
            सर्वस्व हरवलेल्या विस्थापित माणसांच्या जगण्याच्या व्यथा काय असतात; आणि त्यांच्या स्वप्नांचं काय होतं, याचे चित्र अधोरेखित करताना ही कविता अधिकच अंगावर येते. अनुभवाच्या थेट सादरीकरणाने आशय इतका उठावदार बनतो की, त्याला वेगळ्या विश्लेषणाची गरज पडत नाही. गाव मरणं म्हणजे एक अख्खी संस्कृती बेचिराख होण्यासारखं असतं, याचं अत्यंत जबरदस्त भान देणारी ही कविता मराठी कवितेला खूप पुढे घेऊन जाणारी आहे. या कवितेच्या रूपाने संदीप जगदाळेने जे स्वत:ला सोलून घेतलेले ते फारच प्रभावी आहे. बालमुठीतल्या स्वप्नापासून नदीचा समूद्र झाल्यावर सैरभैर झालेल्या म्हातार्‍या माणसांच्या पाणी होऊन गेलेल्या स्वप्नांपर्यंतचा हा प्रवास अत्यंत पोटतिडकीने आणि सरळपणाने होत असल्याने तो अधिकच भिडतो. ही भिडण्याची प्रक्रिया केवळ उद्ध्वस्त करणार्‍या भावनांना शब्दबद्ध करीत नाही, तर त्याच्या पुढे जाऊन उभे राहू पाहणार्‍या माणसांच्या जगण्याला अधोरेखित करते. म्हणून कवी लिहितो,
                                    स्वत:च्या गावापासून इतक्या दूरवर आल्यावर
                                    हे उद्ध्वस्त गाव एकाएकी का भासू लागलंय मला
                                    माझ्याच गावासारखं / की या गावापर्यंत येणं 
                                    हे माझं माझ्यापर्यंत येणं आहे?
हा माझ्यापासून माझ्यापर्यंत झालेला हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. कारण या प्रवासात जगून पाहण्यासारखं काहीच नाही. वास्तवाची भूमी गेली आणि स्वप्नांचा गावही हरवतो तेव्हा माणूस काही आधार शोधू पाहतो, तो आधारही काढून घेतल्यावर मानसाचे काय होते, याचा प्रभावी प्रत्यय देणारी ही कविता आहे. गमावण्यासासखे काहीच जवळ राहिलेले नसतानाही या कवितेतेला मास्तर पुन्हा काही स्वप्न घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे.
            हा प्रयत्न म्हणजे त्याची प्रार्थनेची ओळ आहे. तो आपला मास्तरकीचा व्यवसाय तरी नीटपणे करावा म्हणतोय. तिथे आपली स्वप्ने पेरावी म्हणतोय. त्या बालमुठींना एक आशादायक जग दाखवावे म्हणतोय, तर त्या बालमुठीही परागंदा झाल्या आहेत. तो जिवाच्या आकांतानं ओरडून म्हणतोय,
                                    मला माझी मुलं हवीत / मी एकटाच कसा बसून राहू
                                    मुलांशिवाय रिकाम्या बाकड्यांसमोर / फुलपाखरांसारखी उडणारी
                                    जादूची गोष्ट दाखवावी तशी / जांभळं, बोरं, चिंचा, पेरू
                                    दप्तरातून काढून माझ्यासमोर ठेवणारी ही पोरं
                                    ही अशी अचानक गायब का होतात दरवर्षी?
जगण्याचे स्त्रोत आटून बसल्यावर दरवर्षी पोटासाठी परागंदा होणार्‍या आईबापांसोबत शाळा सोडून बैलगाडीच्या चाकाखाली स्वप्नांना सोडून देणार्‍या आणि आशाळभूतपणे शाळेकडे बघत निघालेल्या तांड्यातल्या पोरांना पाहून ह्या मास्तरचा जीव कावराबावरा होतो. पोटापासून भाकरीपर्यंतचा हा जीवघेणा प्रवास त्या चिमुकल्यांना विटा थापायला भाग पाडतो. अशावेळी घरासमोर उभा राहून हाका मारण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच उरले नाही, याचाही त्याला सल आहे. तरीही तो पसायदानाची ओवी म्हणतोय. पोरांनो परतून या. मला तुमच्या हातात उमललेलं कापसाचं फूल पहायचंय आणि तुमच्या आयुष्यावर पसरलेली काजळी पुसून काढायची आहे मला. ही तुकोबाची जातकुळी अधोरेखित करताना या कवीतला मास्तर खूपच हळवा होत जातो. कारण त्याच्यासमोर बसणारी सगळी पोरं गोरगरिबांची आहेत. त्यांना आपण नाही शिकवले तर ती नकाशावरही दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्या आत सतत साने गुरूजीला जिवंत  ठेऊन,  त्याच्यावर जागता पहारा देणारा हा कवी त्यांचीच "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे" या प्रार्थनेच्या ओळीवर जीव लावतो. त्याच्याकडे शब्दांच्या रूपाने ज्ञान देण्याच्या पलीकडचे काहीच नाही. जे आहे तेही उद्याच्या बाजारात टिकून राहणार नाहीत, याचे भान त्याला आहे. म्हणून तो म्हणतो,
                                    चारी बाजूंनी आत शिरणार्‍या धुरानं / दिवसेंदिवस अंधुक होत जातील
                                    फळ्यावर स्पष्ट लिहिलेली अक्षरं / काजळी वाढत जाईल 
                                    ती पुसण्यासाठी / माझे हात आखूड पडतील / मी हतबल होईल
                                    तरी तडफडत राहीन / ही अवदसा थोपवण्यासाठी
                                    माझ्या लेकरांनो कितीही ठेचकाळलात, गुरफटलात
                                    तरी मी सोबत दिलेली  / प्रार्थनेची ओळ / जीवतोड धरून ठेवा
                                    एवढीच एक गोष्ट आहे माझ्याजवळ / तुम्हाला देण्यासाठी
ही तुकोबाशी नाते सांगणारी जाणीव, कवितेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. स्वत: विस्थापित आयुष्य जगलेला हा शिक्षक प्रचंड आशावादी आहे. परंतु तरीही त्याला मुलं जे प्रश्न विचारतात, त्यामुळे तो हतबल होतो. मुलांच्या अवतीभोवती असणारे जग त्यांना पुस्तकात कुठेच भेटत नाही. त्याला नाही सांगता येत शेतकर्‍याच्या मरणाचा भाव एक लाख का केला आहे म्हणून. त्याला माहीत नाही शेतीचा अभ्यास पुस्तकात का नाही म्हणून. आणि जरी माहीत असलं तरी त्याला या व्यवस्थेने मुसक्या बांधलेल्या आहेत. शाळेत घातलेल्या मुलाला पाहून त्याला वाटलं होतं की, आपण त्याला गारवा देणारं झाड होऊ; पण त्याच्या तळहाताएवढीही सावली त्याला देता येत नाही. त्यामुळे केवळ प्रार्थना करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नाही. पण ही प्रार्थना हीच त्याची ताकद आहे. तुकोबाचा अभंग हीच तुकोबाची ताकद होती. आणि ती काय होती, हे उभ्या जगाने पाहिले आहे. त्याच जातकुळीची साने गुरूजीची प्रार्थना करणार्‍या कवीजवळ शब्दांची ताकद आहे. त्याला ते कळले असले तरी या जागतिक व्यवस्थेत त्याच्या शब्दाला तुकोबाचे बळ मिळणार नाही, याचे भान आहे. आणि हे भान हीच त्याच्या कवितेची ताकद आहे.
            त्याच्या कवितेला जहाल पान लागलं असलं तरी त्याच्याकडे त्या पानाचं जहाल विष उतरवण्याची कलाही त्याला अवगत आहे. ती कला म्हणजे त्याची "पोएटिक जस्टिस" (कवितिक न्याय) ची भूमिका. हा कवितिक न्याय देण्यासाठीच तो कविता लिहितो आहे. मुलगा म्हणून, मास्तर म्हणून, विस्थापित म्हणून, नातू म्हणून आणि या व्यवस्थेला जाब विचारणारा एक जबाबदार घटक म्हणून तो आपल्यापुढे सगळ्या अन्यायाची गाथा गातो आहे. आणि सामान्यांच्या भूमिकेला बळ देताना तो व्यवस्थेकडे न्याय मागतो आहे. हा न्यायाचा आवाज दुबळा नाही, जरी व्यवस्थेला तो दुबळा वाटला तरी तो तसा नसतो. आपल्याकडे हात पसरून भीक मागणार्‍या माणसाचे आपण कधी निरीक्षण केले आहे का? जर बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, तो समोर आला की, त्याला पटकन आपण काही तरी देऊन नजरेसमोरून घालवून देतो. भिकारी आपल्याला नजरेसमोर नको असतो. त्याच्या चेहर्‍यावरचा दीनपणा आपण फार काळ पाहू शकत नसतो. आणि त्याला न्यायही देऊ शकत नसतो, त्यामुळे त्याला नजरेसमोरून घालवणे हेच एक कार्य आपल्यापुढे उरते. याच न्यायाने जेव्हा एखादा कवी खूप आतून काही उच्चारतो आणि व्यवस्थेला न्याय मागतो, तेव्हा त्या व्यवस्थेला त्याला न्याय देण्याशिवाय पर्याय नसतो. अशी ही शब्दांच्या आधारे न्याय मागणार्‍या भावविश्वाची उभारणी कवी करीत आहे. जरी त्याने थाळा वाजवून साप घरात घेतले असले तरी त्याच्याजवळ असे काही तरी आहे की, ते अनेकांजवळ नाही. ते म्हणजे शब्दधन. या धनाच्या बळावर तो नवे चित्र काढू पाहतो आहे. त्यासाठी ज्या अनेक महापुरुषांनी जी वाट निर्माण करून ठेवली आहे. तिची तो वहिवाट करू पाहतोय. या वहिवाटेवर काही कमी अडचणी नाहीत. एक गाव पाण्याखाली गेला असला तरी दुसरा गाव आता गाव राहिला नाही. गावाचा सांधा निखळून पडला आहे. कोणत्याच नात्यात आता गोडवा उरला नाही. माणूस माणसात राहिला नाही. आणि ही व्यवस्था त्याला माणसात येवू द्यायला तयार नाही. तो आपला मार्ग सोडायला तयार नाही.
                                    रंगीबेरंगी कुत्तरओढीच्या वावटळीतून / दरवेळेस वाचवलं स्वत:ला
                                    घट्ट धरून ठेवला हातातला कासरा / नखात अलगद घर करून बसलेली
                                    कष्टाळू माती / पंढरीच्या बुक्क्यासारखी / वागवत आलो कपाळभर
                                    मानेवरचं जू झुगारून / नि:संग झालो नाही / गायीच्या खुरातलं पाणी पिवून
                                    हजार पिढ्यांनी दिलेला शब्द / पाळत आलो आजवर
कवीच्या भूमिकेच्या अंगाने विचार करताना,  प्रारंभी मी जी पर्यावरणाची भूमिका मांडली आहे, ती ही भूमिका आहे. पर्यावरण हे केवळ निसर्गाच्या अंगाने नाही,  तर सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने महत्त्वाचे आहे. आजच्या सगळ्या संभ्रमित काळाच्या अजागळातून जी एक वाट मराठी माणूस चालत आला आहे, तीच वाट हा कवी चालत आला आहे. ही वाट खूप कठीण असली तरी मराठी माणसाने ती नीटपणे तयार केली आहे. अशा या वाटेवरून वाटचाल करणे कठीण असते. कारण  हजार वर्षांच्या वाटचालीत परंपरेने जो शब्द तयार करून पाळला आहे, त्याचे दडपण सोबत असते. आणिन त्या दडपणासह त्याला त्या वाटेची वहिवाट करायची असते. ही वहिवाट करण्यासाठी जे जे काही असावे लागते, ते सगळे संदीपकडे आहे. त्यामुळे त्याच्या कवितेने जो वहिवाटीचा प्रवास सुरू केला आहे, तो निश्चित आशादायक आहे.
            हा प्रवास आशादायक असण्याचे कारण म्हणजे त्याची कवितेवर असलेली निष्ठा. त्याचे प्रचंड वाचन असूनही आणि तो उत्तम अनुवादक असूनही त्याच्या कवितेत ही विद्वत्ता कुठेही लुडबूड करीत नाही. ही कविता निखळ आहे. त्याच्या कवितेत शब्दांना जे वजन प्राप्त होते, ते त्याच्या बोलीतल्या शब्दांच्या नेमक्या वापरामुळे. ही कविता कसलाही रचनेचा सूस बाळगत नाही. ती सरळपणे आशयाला भिडते. प्रतिमा, मोडतोड, अलंकरण असल्या कसल्याही भानगडी न करता आकाराला आलेली ही कविता थेटपणे जे काही सांगू पाहते, ते नेमकेपणाने पोअहचते. त्यामुळे तिला काय म्हणायचे आहे, हे शोधण्यासाठी कसल्याही कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत. साधेपणा दिमाखाने मिरवणारी ही कविता इतकी आतून येते की, त्या साधेणात दडलेल्या आशयात आणी त्यातून व्यक्त होणार्‍या राजकीय- सांस्कृतिक जाणिवेत वाचक सहजपणे प्रवेश करू शकतो, हे या कवितेचे यश आहे.
            आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा कवी ज्या व्यवस्थेत काम करतो आहे, ती व्यवस्था जरी आज मोडकळीस येऊ लागली असली तरी तीच व्यवस्था विचाराला आकार देऊ शकते. याचे या कवीला नेमके भान आहे. पगार घेऊन शिकवायला मिळते आहे, यापेक्षा आणखी कसले भाग्य हवे माणसाला, या नैतिक पायावर तो उभा आहे. आणि हा पाया तो भक्कम करू पाहताना दिसतो आहे. त्याच्या कवितेत जरी शिक्षक असण्याचा जो "गिल्ट" आहे; तो गिल्ट हीच त्याची ताकद आहे. त्यामुळे या कवितेला आशादायी भविष्य आहे.
            तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची भूमिका जशी समग्रतेला कवेत घेऊ पाहते, तशीच त्याची कविता ही थेटपणे जे काही म्हणू पाहते आहे, त्या म्हणण्यात कसलाही संभ्रम, गोंधळ नाही. जागतिक खुल्या व्यवस्थेला तोंड देताना आपण कोणते शस्त्र हाती घ्यावे, याचे नेमके भान या कवितेला आहे. त्यामुळे तिच्या वाढीच्या आणि विकासाच्या अनेक शक्यता या पहिल्याच संग्रहात तिने अधोरेखित करून ठेवल्या आहेत.  
            ही कविता खर्‍या अर्थाने प्रामाणिक आणि कुठल्या एका संप्रदायात अडकून पडत नसल्याने, तिची परिणामकारकता वाढत जाते. ती सांप्रदायिक होत नसली, तरी तिला तिची गांधीवादी वाट माहीत असल्याने, तिच्या विकासाच्या शक्यता अधिक आहेत. त्या शक्यता संदीपने नीट तपासून पाहाव्यात. चांगल्या कवितेची आत्महत्या पाहण्याची वेळ त्याने वाचकांवर येऊ देऊ नये. कारण ती तशी आली तर, त्याच्यातला कवीच त्याला माफ करणार नाही. तशी वेळ त्याच्यावर येणार नाही, इतके सत्व त्याच्या कवितेत आहे. तूर्तास इतकेच.

                                    -----------------------------------------------------------------   

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट