चित्रपट आणि बदलते वास्तव

                 

साहित्य, संगीत, चित्र, शिल्प, नृत्य या कलांप्रमाणे चित्रपट ही सुद्धा एक कला आहे. इतकेच नव्हेतर बाकी सर्व कलांचा समावेश चित्रपट या कलेमध्ये होतो. कोणत्याही कलेचे प्रयोजन प्रबोधन आणि रंजन हेच असते. या सोबतच आनंद देणे हेही कलेचे अंतिम उद्दिष्ट असते. चित्रपटाचीही ही उद्दिष्टे आहेतच. मूकपटापासून बोलपटापर्यंत आणि ब्लॅक व्हाईटपासून इस्टमनकलर ते अ‍ॅनिमेशनपर्यंत मोठा प्रवास चित्रपटाने केला आहे. अर्थात रंजन हेच चित्रपटाचे प्रधान मूल्य राहिल्याने त्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. एकतर तीन तास ही चित्रपटाची कालमर्यादा आहे. त्या मर्यादेत आणि प्रेक्षकांच्या खिशात थेट हात घालून रंजन केले जात असल्यामुळे, काही घटक चित्रपटाला कायमचे चिटकून राहिले आहेत. या संदर्भातील एका घटनेची नोंद आवश्यक वाटते. ती अशी : अमोल पालेकरांनी व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीकादंबरीवर त्याच शीर्षकाचा चित्रपट बनवल्यानंतर, माडगूळकर प्रिमियर शोसाठी गेल्यानंतर पालेकरांना म्हणाले, अरे अमोल, माझ्या कादंबरीत मास्तर कारभारार्‍याच्या पोरीला एकदाच भेटतो. तू मात्र इथं ती सारखीच मस्तरच्या घरी पाणी भरायला येताना दाखवलीस, हे काही बरोबर नाही. त्यावर पालेकर म्हणाले, तात्या तुमची कादंबरी आहे, माझा चित्रपट आहे. तुम्ही म्हणताय ते खरं असलं तरी, इथं चित्रपट पहायला माणूस पैसे टाकून येतो. त्याला तीन तास चित्रपटगृहात बसवून ठेवायचं असलं, तर त्याची उत्सुकता वाढवायला हवी. मास्तर तिला भेटेल आणि प्रेम सुरू होईल असं प्रेक्षकांना वाटत राहतं. तो सिनेमा पहात राहतो. पण म्हणून मी तुमच्या आशयाला धक्का लावला नाही. मूळ कादंबरीत जसं काही घडत नाही, तसंच इथंही काही प्रेम पुढं सरकत नाही. माझे पैसे  तरी निघायला हवेत, तात्या. तर चित्रपटामागे मोठे अर्थकारण असते, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. असे असले तरी त्याचा वास्तवाशी संबंध राहिला आहे. पण रंजनाला प्राधान्य असल्याने प्रेम आणि पराक्रम या दोन घटकांना अतोनात महत्त्व आले आहे. हे दोन घटक वगळल्यानंतर सिनेमा, सिनेमा राहात नाही; इतका या घटकांचा सिनेमावर प्रभाव आहे.
            प्रेम आणि पराक्रम म्हटलं की, मग देखणा हिरो, हिरॉईन, व्हिलन आणि सिनेमाचा गोड सुखद समारोप आला. तीन तासात सागळंच दाखवायचं असल्यानं या गोष्टी आल्याच. पण त्यामुळं हिंदी चित्रपटाचं नेमकं काय झालं, ते शोधणं रंजक आहे. हा शोध घेताना  साधारण १९७० नंतरचा कालखंड लक्षात घेतला आहे. हा कालखंड लक्षात घेण्याचं कारण म्हणजे हिंदी चित्रपट या टप्प्यावर बदलला आहे. आणि दुसरं असं की, आमच्या पिढीने या काळापासूनचाच सिनेमा जास्त प्रमाणात पाहिला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे याच काळात सर्व स्तरावर बदल बरेच बदल होवू लागले होते.
            साधारणपणे मे १९७३ मध्ये सलीम-जावेद लिखित आणि प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीरहा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिंदी सिनेमाचे चित्रच बदलून गेलेले पहावयास मिळते. सत्तरपूर्वीचा  रोमँटिक सिनेमा बदलून तो अ‍ॅक्शन सिनेमात रूपांतरित झाला. या सिनेमाच्या रुपाने अमिताभ बच्चनला स्वत:ची जशी वाट सापडली तशी हिंदी सिनेमालाही सापडली. कारण या सिनेमात अमिताभने एका इन्स्पेक्टरची भूमिका करताना सामान्य माणसांच्या बाजूने तो उभा राहिलेला आहे. आणि तोच हिंदी सिनेमाचा टर्निंग पॉईंट ठरला आहे. याच दरम्यान म्हणजे १९७५ मध्ये दीवारहा सिनेमा प्रदर्शित झाला. याही सिनेमाची कथा सलीम-जावेद यांनीच लिहिली आहे. यश चोप्रा दिग्दर्शित हा सिनेमा हाजी मस्तान या स्मगलरच्या जीवनावर आधारित होता. आणि ते एक मोठे धाडस होते. म्हणूनच डॅनी बॉयल या समीक्षकाने या सिनेमाची प्रशंसा करताना म्हटले आहे की, ‘दीवार भारतीय सिनेमा की असली पहचान है.म्हणजे हिंदी सिनेमा कात टाकीत होता. मणि कौल, कुमार साहनी, केतन मेहता, विजय मेहता, गोविंद निहलानी या सारखे दिग्दर्शक हा सिनेमा बदलून त्याला सामान्य माणसाशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न करीत होते.
            कारण याच काळात काही महत्त्वाची स्थित्यंतरे भारतात घडत होती. स्वतंत्र भारताचे जे एक स्वप्न भारतीय नागरिकाने पाहिले होते, त्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. राजकारण्यांवरचा भरोसा उडून गेला होता. संपूर्ण भारत भ्रष्टाचाराने ग्रासला होता. आर्थिक विकासदर ढासळला होता. आर्थिक मंदी जाणवू लागली होती. त्यामुळे सामान्य माणूस फ्रस्ट्रेड झाला होता. त्याला सभोवती सगळा अंधार जाणवू लागला होता. अशा या माणसाला आपल्या आस्थेच्या व्यूहात घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम या सिनेमाने केलेले दिसून येते. सत्तरऐंशीच्या काळातील नुसती सिनेमांची नावं पाहिली तरी आपल्या हे लक्षात येते. रोटी कपडा और मकान. शोले, दीवार, आनंद, ऑंधी, मुकद्दर का सिकंदर, दोस्ताना, अमर अकबर अँथनी, लावारिस, कुली, कभी कभी, मर्द, शराबी यासारख्या अमिताभने अभिनय केलेल्या सिनेमांच्या नावावरून सिनेमाचे वास्तवाशी असलेले नाते लक्षात येते. सलग तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या अमिताभच्या  भूमिकांचा विचार  केला तरी तो कायम सामान्यांच्या भूमिका करताना दिसतो. जवळपास प्रत्येक सिनेमात त्याचे नाव जय अथवा विजय आहे. याचा अर्थ तो सामान्यांची भूमिका वठवताना सामान्यांच्या दु:खाला वाट करून देताना, त्यांच्या विद्रोहाला साद घालीत होता. हाच रोल विनोद खन्ना, मिथून चक्रवर्ती यांनी बजावलेला दिसतो. याच काळात एक दुजे के लिएहा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्याचे कारण त्याच्यात साकारलेली अत्यंत इनोसंट अशाप्रकारची प्रेमकथा. गरीब –श्रीमंतीच्या संघर्षात प्रेमी जीवांना आपला जीव गमवावा लागतो. एका अर्थाने ते ऑनर किलिंगच होते. त्यामुळे हा चित्रपट अनेक प्रेमी युगुलांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवलेली दिसते.
            पुढच्या दशकातही हीच परंपरा चालू असलेली दिसते. कयामत से कयामत तक, तेरी मेहेरबानियाँ, डिस्को डान्सर, क्रांती, कुर्बानी, शक्ती, राम तेरी गंगा मैली, मि.इंडिया, तेजाब, बेताब, घायल, नगीना, प्यार झुकता नही या सारख्या चित्रपटातूनही गरीब-श्रीमंत संघर्ष, देशप्रेम, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदी विषय हाताळताना ह्या सिनेमांनी कायम अभावग्रस्तांची आणि उपेक्षित वंचितांची बाजू घेतली आहे. सामान्य माणसाचा प्रामाणिकपणा, त्याची नैतिकता, त्याची लढण्याची चिवट वृत्ती शेवटी उपयोगी पडते आणि तिचाच विजय होतो, हेच सूत्र साधारणपणे केंद्रस्थानी असलेले दिसून येते. जरी या सिनेमात प्रेम आणि पराक्रम याच गोष्टी गाभ्याचा भाग असला तरी मात्र त्यांची थिंक लाईन मात्र क्लेअर आहे. त्यातही पुन्हा नायक मात्र सामान्यांचा प्रतिनिधी आहे. तो नोकरीसाठी धडपडतो आहे. गरिबीवर मात करीत अन्यायाविरोधात लढतो आहे. त्यात तो अनेकदा हरतो आहे. मार खातो आहे. पन पुन्हा उठून उभा राहण्याचा प्रयथ करतो आहे. आपली मूल्ये जीवापाड जपताना जवळची, नात्यातली माणसं आडवी आली तरी तो त्यांना भेदून पुढे जाताना दिसतो. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यात यश नाही आलं तर त्यांना सोडून देऊन आपली लढाई चालू ठेवताना दिसतो. याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवलेला शेखर कपूर दिग्दर्शित बाँडिट क्वीनहा फुलनदेवी या सरंजामी व्यवस्थेला बळी पडलेल्या आणि पुन्हा नव्याने उभा राहून अन्यायाचा बदला घेणार्‍या एका स्त्रीच्या जीवनावर आधारित आहे. एका अर्थाने या सिनेमाने सामान्य माणूस पेटून उठल्यावर काय करू शकतो आणि अन्यायाचा बदला घेऊनही सन्मानाचे जगणे कसे जगू शकतो, याचे एक अत्यंत प्रभावी उदाहरण या सिनेमाने लोकांसमोर ठेवले आहे.
            या सिनेमात प्रेम आहे, पराक्रम आहे पण तरीही कथानकावर मात्र या काळातल्या सिनेमाचा भर असलेला दिसतो. अ‍ॅक्शनपट म्हणून या काळातला सिनेमा पुढे आला असला तरी तो किमान विद्रोही भूमिका बजावताना दिसतो. गाण्यांमधूनही तो सेंस जपलेला दिसतो.  या काळातली गाणी म्हणजे त्या फसलेल्या कविता आहेत. म्हणजे केवळ संगीताला महत्त्व देऊन गाणी वाजवली जात नव्हती तर गाण्यांनुसार संगीत आकाराला आलेले दिसते. आशयानुसार किंवा कथाबीजाच्या मागणीनुसार गाणी निवडली गेलेली दिसून येतात. त्यामुळे या काळातल्या गाण्यांमध्ये संगीत पार्श्व्भूमी म्हणून येतात. गाण्यातल्या शब्दांना आणि त्याच्या अर्थाला महत्त्व असलेले दिसून येते. बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबर आशय मात्र ठळक करण्यावर भर असलेला दिसून येतो.
            या काळातला प्रेक्षकही सामान्य वर्गातला असल्याने तिकीटदरही त्यांना परवडणारे होते. त्यामुळे तो थिएटरात गर्दीही करताना दिसून येत होता.  साधारणपणे १९९०-९५ पर्यंत थिएटरात सायकलींची गर्दी जास्त असायची. यावरून बर्‍याच गोष्टी स्पष्ट होताना दिसतात. अभावग्रस्तांपासून ते मध्यमवर्गीय माणसापर्यंत सामान्य लोकांना सिनेमाचे आकर्षण होते. सिनेमातल्या अनेक गोष्टींचे अनुकरण तरूण पिढी करताना दिसत होती. अगदी कपड्याच्या फॅशनपासून ते दैनंदिन जीवनातल्या गोष्टींपर्यंत अनुकरण होत होते. मुद्दाम दोन उदाहरणे देतो :
प्यार झुकता नहीहा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही ज्या कुर्डूवाडी परिसरात रहात होतो त्या सगळ्या परिसरातील झाडांवर बदामाचे चित्र कोरून त्यात आपापल्या स्वप्नातील प्रेयशींची नावे कोरली होती. एकही झाड त्या काळात रिकामं दिसात नव्हतं. मग काही मुलं झाडांवर चढून फांद्यावर हा उद्योग करीत होती. तर दुसरी घटना म्हणजे, ‘साजनचित्रपट जेव्हा थिएटरला लागला तेव्हा त्या वर्षीच्या दिवाळीला अनेक तरूण साजन शर्ट शिवून घेत होते. इतकेच नव्हेतर हेअरस्टाईलही आपापल्या आवडत्या अभिनेत्यांसारखी केली जायची. दुसरी कोणती मनोरंजनाची साधनं उपलब्ध नसल्यानं तरून पिढी कायम चित्रपटाकडं आकर्षिली जायची. ते आकर्षण इतकं होतं की, अनेकांना आवडत्या अभिनेत्यांचे डायलॉग पाठ असत. माझंच सांगतो, मलामरते दम तकचित्रपट पाहता आला नव्हता; परंतु त्याची संपूर्ण ऑडिओ स्टोरी तोंडपाठ होती. म्हणजे एका अर्थानं सिनेमा हे रंजनाचं जसं साधन होतं; तसंच ते आपल्या अतृप्त इच्छा मानसिक पातळीवर पूर्ण करून घेण्याचंही महत्त्वाचं माध्यम होतं. सामान्य माणसांच्या विरेचनाला येथे एक प्रकारची वाट मिळत होती. आणि त्यातून किमान काही सामाजिक-सांस्कृतिक घटनांचं ताणतणावात्मक गांभीर्य कमी होत होतं. विशेषत: बेरोजगार गरीब तरूण वर्ग या माध्यमातून आपल्या कोंडमार्‍याला वाट करून देत होता. त्यामुळं बर्‍याच अंशी समाजात शांतता नांदत होती. गुन्हेगारीला एक प्रकारे आळा बसत होता. कारण सामान्य माणसाला प्रेम आणि पराक्रम या गोष्टी त्याच्यापासून शेकडो मैल दूर असतात. अर्थात पराक्रम करून त्याला रिअल हिरो व्हायचं नसतं. तर त्याच्यावर अन्याय करणार्‍या व्यवस्थेला तो जाब विचारू शकत नसतो. दमनशाही व्यवस्थेपुढं त्याला कायम झुकावं लागतं. अशा व्यवस्थेला फाट्यावर मारण्याची त्याची खूप इच्छा असते, पण त्याला ते शक्य नसते. त्याचा हा जो कोंडमारा सतत होत असतो, त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला सिनेमाशिवाय दुसरं कोणतंच माध्यम उपलब्ध होत नसल्यामुळे तो त्याकडे आकर्षिला जातो. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता तो सिनेमाद्वारे करून घेतो. या काळात अशाप्रकारचा अभावग्रस्त वर्ग अधिक प्रमाणात होता. आणि त्या वर्गाची दिवास्वप्ने या काळातला सिनेमा पूर्ण करीत होता. एका अर्थाने हा सिनेमा सामान्य माणसांशी संवाद करत होता.  
            साधारणपणे १९९५ नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने अधिक वेग घेतलेला दिसतो. यामुळे श्रीमंत वर्ग अधिकच श्रीमंत होवू लागला. हातात बर्‍यापैकी पैसा आला. मध्यमवर्गाची संख्या वाढू लागली. बाजारपेठ ग्राहकांच्या ताब्यात आली. सगळे जग खुले झाले. आणि जगण्याच्या सगळ्या धारणाच बदलू लागल्या. या मध्यमवर्गाला बाकीच्या सामान्य माणसाचे देणं-घेणं राहिलं नाही. पैशाबरोबर त्याचा अभिरूची स्तर बदलत गेला. जगण्याच्या धारणा वेगाने बदलल्या. एकप्रकारचा चंगळवाद आकाराला आला. एकदा का चंगळवाद बोकाळला की, जीवनमूल्यांना फारसा अर्थ राहत नाही. बाजारपेठ माणसाच्या ताब्यात आली म्हणता-म्हणता तो स्वत:च कधी बाजारपेठेतली वस्तू बनून जातो, हे त्यालाही कळत नाही. चंगळवाद हा माणसाच्या खिशात कसा हात घालतो आणि कसे पैसे काढून घेतो, हे त्यालाही कळत नाही. याचा परिणाम सगळ्या बाजारपेठेवर जसा झाला तसाच त्याचा परिणाम सिनेमावरही होवू लागल्याचे दिसून येते. कारण १९९० नंतर हिंदी सिनेमाची वार्षिक आर्थिक उलाढाल जवळपास १५ टक्क्यांनी वाढलेली दिसून येते. हा जो टक्का वाढला आहे तो नवश्रीमंत आणि मध्यमवर्गाचा आहे. आणि मग हळूहळू बिगबजेट सिनेमांच्या जाहिराती सुरू झालेल्या दिसून येतात. म्हणजे कथानक, आशयापेक्षा सादरीकरण आणि दिखाऊपणाला अधिक महत्त्व येऊ लागले. थिएटरची जागा मल्टिप्लेक्सने घ्यायला सुरुवात केली. तिकीटाचे दर वाढत गेले. आणि सिनेमाचा दर्जाही घसरायला सुरुवात झाली. मानवीमूल्यांवरच्या निष्ठा बदलू लागल्यामुळे चांगल्या कथानकाचे सिनेमेही बॉक्सऑफिसवर आपटू लागले. जुना दिलीपकुमारचा देवदासखूप चालला होता; म्हणून शाहरूख खान अभिनित नवा देवदासआला. बिगबजेट म्हणून त्याची खूप चर्चाही झाली. माधुरी दीक्षित अणि ऐश्वर्या रॉय यांच्या महागड्या ड्रेसचीही चर्चा झाली. पण हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसा चालला नाही. कारण प्रेक्षकांची मानसिकता बदलली आहे. त्याला आता अशा एखाद्या ट्रॅजिक विषयात आनि त्यातही प्रेमासारख्या भावनेत अडकून पडून आयुष्य वाया घालवण्याची मानसिकता नाही. मल्टीप्लेक्सला आल्यावर त्याला आता कुणाचे दु:ख, उपेक्षा, अवहेलना पाहण्याची गरज वाटत नाही. मस्त टाईमपास हवा आहे. त्यासाठी आपल्या अभिरुचीची आपण वाट लावून टाकत आहोत, याकडेही त्याचे लक्ष नाही. या काळात गाजलेले सिनेमे सहज आठवले तरी हे लक्षात येते. दिल तो पागल है, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, हम दिल दे चुके सनम, कहो ना प्यार है या सगळ्या सिनेमात काय आहे? आहे फक्त मनोरंजन आणि टाईमपास. केवळ हसवणे, हलके-फुलके विषय हाताळणे आणि काहीही कथाबीज नसताना बॉक्सऑफिसवर भरपूर गल्ला करणे एवढेच या सिनेमाचे उद्दिष्ट राहिले आहे.
            याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे संजयदत्तच्या खलयायकया सिनेमाने जो अभिरुचीला जोरदार दणका दिला आणि चुकीची गोष्टच कशी खरी असते, आणि त्याला मान्यता मिळू शकते, अशी उलटी अभिरूची आकाराला येऊ लागल्याचे ते प्रतीक होते.नायक नही खलनायक हूँ मैं, जुलमी बडा दुखदायक हूँ मैं!असं मोठ्या आवाजात म्हणून, खोट्याचं आणि चुकांचं समर्थन करण्यालाच प्रेक्षकही पाठिंबा देऊ लागले होते. याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण सिनेमाची अभिरुचीच बदलून गेली. ज्या संजयदत्तने याचे समर्थन केले त्यानेच पुढे मुन्नाभाई एमबीबीएस
हा सिनेमात अभिनय करून पुन्हा चुकीच्या तत्त्वज्ञासाठी म. गांधीचा वापर केला. हा सिनेमा आला आणि संजयदत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झाली तरी त्याचा सिनेमा चालला. पुढे जाऊन त्याने पुन्हा पोलीसवाला गुंडाकेला आणि चुकीच्या तत्त्वज्ञानाचा कळस केला.
            हीच गोष्ट धूमच्या निमित्ताने अधिक ठळक झाली. या सिनेमात तर अभिषेक बच्चनने केलेल्या पोलीस अधिकार्‍याला सहानुभूती मिळण्याऐवजी चोरी करणार्‍या टोळीचेच कौतुक झाले आणि त्यांनाच प्रेक्षकांची सहानुभूती मिळाली. त्यामुळे धूम२मध्ये मग चोराची भूमिका हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉयला करावी वाटली. आणि त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यांच्या चोरीच्या कल्पनांचीच अधिक चर्चा झाली. हे कमी काय म्हणून रेस’, रेस२यासारखे चित्रपट केवळ पैशांसाठी कायपण या विषयाभोवती आकाराला आलेले दिसतात. नाना पाटेकर सारखा अभिनेताही असल्या कथानकांना बळी पडतो. बोलबच्चनसारखा सिनेमा याच दिशेने साकारत जाताना दिसतो. हे सगळे चित्रपट केवळ टाईमपास म्हणूनही बघावेशे वाटत नाहीत. यातील गाणी, नट्यांच्या अंगावरील कपडे, वातावरण, अंगावर येणारे भव्य राजप्रासाद,अंगप्रदर्शन,सेक्स,विदेशी चित्रीकरण या गोष्टी आणि त्यातील कोटी-कोटीची उड्डाने सामान्य माणसांपर्यंत कशीच पोहचत नाहीत. त्यामुळे या सिनेमाकडे सामान्य माणसाने कधीच पाठ फिरवली आहे. अर्थात या बद्दल दिग्दर्शक-निर्माता आणि अभिनेता या कुणालाच  काही वाटत नाही. 
            असे असले तरी लगान, चक दे इंडिया, भाग मिल्खा भाग, ओ माय गॉड, 3 इडियट्स, तारे जमीं पर, रंग दे बसंती यासारखे काही चित्रपट अपवाद आहेत. पन अपवादानेच नियम सिद्ध व्हावा अशी ही संख्या आहे. हे चित्र फारच निराशा करणारे आहे. एकूणच जागतिकीकरणाने जसजसा वेग घेतला तसतशा सगळ्या धारणाच बदलून गेल्या आहेत. सगळं जग एका अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभं असताना खरं तर कोणत्याही कलेने अधिक जागृत राहून समाजाला दिशा देण्याचे काम करावे लागत असते. चित्रपट ही अधिकच प्रभावी कला असल्याने त्याची अधिक जबाबदारी असूनही, फार काही हाती येताना दिसत नाही. समाजप्रबोधनाच्या शक्यता आजतरी दिसून येत नाहीत. अर्थात याला समाजही जबाबदार आहे. जोपर्यंत समाज चित्रपटाकडे केवळ इंटरटेन्मेंट म्हणून पहायचे नाकारत नाही, तोपर्यंत चित्रपटाचे स्वरूप बदलणार नाही.               

टिप्पण्या

आर्टिकल बहुत ही अच्छा लगा इसमें फिल्मी हीरो हीरोइन के संदर्भ में लोगों की रुचि अभिरुचि के बारे में जो भी आपने टिप्पणी की है बहुत ही सटीक टिप्पणी है बहुत ही आयत हार्थ चित्रण आपने किया है बहुत ही अच्छा लगा कि इस लेख के द्वारा सामाजिक वातावरण के प्रकार का लोगों की प्रवृत्ति किस प्रकार से बदल रही है लोग क्या चाहते हैं लोगों में बदलाव इस प्रकार का हो रहा है इसका बहुत ही अत्यंत सुंदर वर्णन आपने किया हैं/
Mahendra Kadam Bhoomi म्हणाले…
खरी गोष्ट आहे। आभार।
Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर. वेगवेगळ्या कालखंडात /दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत आणि त्यांचे बदलते रुप, प्रेक्षकांची अभिरुची याबाबतचे विस्तृत आणि अभ्यासपूर्ण विवेचन. एकदम छान आहे.

लोकप्रिय पोस्ट