धूळपावलं : डॉ. अरुण शिंदे

 धूळपावलं : समकालीन ग्रामीण वास्तवाचा सर्जनशोध : डॉ. अरुण शिंदे 


     म. फुले यांनी आधुनिक भारतामध्ये पहिल्यांदा ग्रामीण कृषिजनसमूह साहित्य व समाजव्यवहाराच्या केंद्रस्थानी आणला. त्यांनी जीवनवास्तवाचा अन्वयार्थ लावण्याची एक सत्यशोधकीय दिशा दिली. फुल्यांची अन्वेषक दृष्टी व दृष्टिकोनांचे मर्म पकडून समकालीन ग्रामीण वास्तवाचा अर्थ कलात्मकपणे व्यक्त करणारे लेखक १९९० नंतर मराठीत दिसतात. त्यांनी ग्रामीण जीवनवास्तवाचे केवळ वर्णन केले नाही तर ते तसे  का आहे? त्याच्या घडणीमागे कोणते वास्तव कारणीभूत आहे? अशासारखे कार्यकारणभावात्मक प्रश्न उपस्थित करून ग्रामीण वास्तवाचा तळामुळासकट शोध घेण्याचा प्रयत्न केला. महेंद्र कदम यांची 'धूळपावलं' ही कादंबरी या परंपरेला पुढे नेणारी आहे. सामाजिकता, समानता केंद्रस्थानी असणारी ही परंपरा समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. समस्येचे व्यामिश्र, अनेकपदरी रूप वाचकांसमोर ठेवते. अस्वस्थतेचा प्रत्यय देते. त्यामुळे नकळत परिवर्तनाच्या आश्वासक शक्यता निर्माण होतात, 

      समकालीन ग्रामीण कृषिजन संस्कृतीचा अधः पात, विविध पातळ्यावर होत असलेला मूल्यऱ्हास, यामुळे अंधःकारमय झालेले अस्तित्व यांचा मूलगामी शोध घेण्याचा प्रयत्न कदम यांनी 'धूळपावलं 'मध्ये केला आहे. ग्रामीण कृषिजन जीवनाचा जन्मसिद्ध अनुभव, तेथील बदलांचा, प्रकृती- विकृतीचा तीव्र संवेदनेने घेतलेला प्रत्यय, अन्वयार्थ लावण्याचा चिंतनशील दृष्टिकोन, कादंबरीच्या आकृतिबंधाची जाण, भाषा आणि शैलीचे यथार्थ भान यासारख्या गुणविशेषामुळे 'धूळपावलं' ही कादंबरी वर्तमान ग्रामीण वास्तवाचे कलात्मक पातळीवरील दस्तऐवजाचे रूप धारण करते हे या कादंबरीचे मोठे यश आहे.

    वर्तमान ग्रामीण समाजजीवनाला ग्रासून टाकणाऱ्या विविध अंगोपांगांना कादंबरीमध्ये अनेकविध घटितांच्या माध्यमातून एकात्मपणे  कथासूत्राच्या निवेदनातून व्यक्त केले आहे. ग्रामीण सामाजिक अंतःस्तरामध्ये, लोकांच्या मनोवृत्तीमध्ये होत असलेले बदलांचे सूक्ष्म चित्रण केले आहे. समूहभाव, श्रमपरायणता, माणुसकी, विश्वास हा ग्रामीण मूल्यभाव आहे. ग्रामीण समाजाचा तो स्थायीभाव आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून ग्रामीण जनसमूहामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंवाद, स्वार्थ, भ्रष्टता, दांभिकता, कष्ट न करता वाममार्गाने पैसा मिळवण्याची वृत्ती, व्यसनाधिनता, भोगवाद वाढत चालला आहे. असे का आणि कसे झाले याचा शोध ही कादंबरी घेते. अंतर्गत सामाजिक पातळीवरील बदलांपासून जागतिकीकरणापर्यंतच्या घटकांच्या परिणामांचा वेध येथे घेतलेला आहे. राजकारणातील सत्तालोलुपता, विधिनिषेधशून्यता ही आमच्या ग्रामीण समाजाची ठळक वैशिष्ट्ये बनली आहेत. सरंजामी राजकारण, त्याला तरुण पिढीचे मिळणारे आव्हान, गटतट, कुटील डावपेच, निवडणुकांमधील काळे अर्थकारण, जातकारण, राखीत जागा यांमुळे पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. विविध क्लृप्त्या योजून रात्तासूत्रे ताब्यात ठेवण्याचे प्रस्थापितांचे डावपेच, निवडणुकीतील हारजीतीपोटी वर्णनुवर्षे धरला जाणारा वैरभाव, आडकाठी आणून माणसे जिरवण्याची सरसकट जीवनशैली, एकूणच विधायकतेचा, रचनात्मकतेचा होत असलेला सर्वकप ऱ्हास अशी अनेकविध आशयसूत्रे या कादंबरीतून  साकारतात. वर्तमान ग्रामीण राजकारणाच्या शूद्र, भ्रष्ट व बटबटीत रूपाचे जिवंत दर्शन येथे घडते.  

      सामाजिक कल्याणकारी योजना, त्यांमधील भ्रष्टाचार व राजकारण यांचे नेमके चिमण येथे केले आहे. गोरगरिबांच्या पोटापाण्यासाठी सुरु झालेल्या रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार, तक्रारी व सूडाचे राजकारण यांची परिणतीतून गरिबांना देशोधडीस कसे लावले जात आहे, यावर ही कादंबरी प्रक्कश टाकते. राजकारणी व नोकरशाहीमध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी होऊन कल्याणकारी योजना कशा पोखरून काढल्या जात आहेत, दुष्काळामध्ये कृषिजन समूहांची होरपळ कशी होत असते आणि शासन व प्रशासन व्यवस्था कशी आत्ममग्न, सुस्त असते यासारख्या अनेक प्रश्नांचे विविध पैलू कादंबरीमध्ये उलगडतात, भ्रष्टाचार, अडवणूक हा जणू जीवनाचा भागच झाल्याचे फलोत्पादन अनुदान योजना, पाणीपुरवठा योजना, नळजोडणी, सार्वजनिक वाचनालय यासाररख्या घटनातून प्रत्ययास येते. ही भ्रष्टता, सूडाचे राजकारण शेवटी ग्रामीण समाजाला कोठे घेऊन जाणार हा प्रश्न वाचकाला अंतर्मुख करतो.

     तरुण पिढींच्या जगण्याच्या प्रेरणा-प्रवृत्तीचा शोध येथे घेतलेला आहे तरुणांचे एकूण जगणेच ' बाई' आणि 'बाटली'भोवती केंद्रित होत आहे. बेकारी दिशाहीनता, ऐदीपणा, चैनविलासाची लालसा या भोवत्यात सापडलेली तरुण पिढी राजकारण्यांच्या हाताचे कोलीत होऊन विध्वंसकतेकडे कशी सरकत आहे, याचा वेध कादंबरीकाराने घेतला आहे. तरुणांच्या भकास भावविश्वापासून ढाबासंस्कृतीशरण जीवनशैलीचे अत्यंत वास्तव दर्शन भाषा, संवाद, शैलीच्या अस्सलतेमधून घडते. अशा दारुण संभ्रमित  वास्तवामध्ये संवेदनशील तरुणाची होणारी घुसमट (नायक-धनू शेळके), राजकारणातून समाजकारणाला आकार देऊ पाहणाऱ्या तरुणाची होणारी कोंडी (विकास), त्यांना होणारा विरोध, प्रवाहाबाहेर फेकले जाणे, यासारख्या गोष्टींच्या चित्रणातून ग्रामीण भागात काही एक मूलभूत, मनापासून करायची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांची गत काय होते याचे विदारक दर्शन घडते. 

     'समूहभाव' हा जगण्याचा स्थायीभाव असणाऱ्या ग्रामीण कृषिजन समाजामध्ये वाढत चाललेला विसंवाद, भोगवाद, अर्थप्राप्तीची वाढती हाव, हे खरे चिंतेचे प्रश्न आहेत. प्रसारमाध्यमांचे आक्रमण, जागतिकीकरण यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे ग्रामीण  जनजीवनातही शिरकाव केला आहे. यांची विचारप्रक्रियाच बंद करून त्यांना आपल्या शोषणव्यवस्थेचे बळी बनविले आहे. अशा बाह्य  हल्ल्यामुळे कृषिजन संस्कृतीला कसे हादरे बसत आहेत, याचे सूक्ष्म चित्रण कादंबरीकाराने केले आहे.    वाढते जातभान, त्यातून निर्माण होणारे संघर्ष, राखीव जागा या साऱ्यामधून दुभंगत चाललेले ग्रामीण मन, त्यातून निर्माण होणारे ताण गावाचे गावपण नाहीसे' होण्याची भीती हे आजचे जळते वास्तव लेखकाने वस्तुनिष्ठपणे पकडले आहे. 

       या अस्वस्थ करणाऱ्या, भयावह वास्तवावर उतारा आहे तो ग्रामीण भागातील संवेदनशील, विचारी तरुणांनी नेटाने, न खचता कार्यप्रवृत्त  राहण्याचा. कादंबरीचा नायक धनू शेळके, विकास, प्रा. डोंगरे यांची समस्या समजून घेण्याची त्यांच्या मुळापर्यंत जाण्याची आस्था, चिंतन, आपली माणसे व समाजाबद्दलची करुणा, त्यांना विधायक दिशा  देण्यासाठी कृतिशील रचनात्मक कार्य उभे करण्याची  मनापासूनची धडपड, यामधूनच धूळधाण होत चाललेल्या संस्कृतीला नव्या रुपात तरारून येण्याची 'धूळपावलं' उमटू शकतील. "ज्यांचं पोट भरलंय त्यांचं काय नडलंय आपल्यासाठी  प्पोट जाळून घ्या. ते आपले प्रश्न सोडवीत नसतात. त्यासाठी वाचन करून ज्ञान वाढवणं, समस्यांचा नीट अभ्यास करणं. आपण रस्त्यावर उतरणं, नंतर सगळीकडून रान उठवून राज्यकर्त्यांची झोप उडवणे." (पृ. १०९) हा आशासक सूर परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे

       आशयाप्रमाणेच शैलिबाबतही ही कादंबरी लक्षणीय आहे. तंत्राची पकड आहे. कादंबरीतील पात्रांची भाषा ही ग्रामीण सोलापुरी लोकसंस्कृती आणि लोकजीवनातील अस्सल बोलीचे दर्शन घडवते, मार्मिक म्हणी व घटनाप्रसंनाच्या निवेदनातून ग्रामीण इरसालपणा जिवंतपणे टिपला आहे. तरुणांचे भकास, भग्नमनस्क मन, भुकेच्या मनाला असणारी स्त्री देहाची आसक्ती यांचे नेमके दर्शन तरुणांच्या भाषेतून आणि संवादातून घडते. स्त्रीभावविश्वही त्यांच्याच भाषेतून उत्कटतेने व्यक्त झाले आहे. एकंदरीत ग्रामीण भागातील विविध व्यक्ती, वृत्ती प्रवृत्ती, समाजस्तर, प्रादेशिक- सांस्कृतिकतेचे नेमके दर्शन भाषेतून घडते.

    सारांश, कृषिजन संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या, संवेदनशील मनाने भोवतालच्या समकालीन वास्तवाचा घेतलेला कलात्मक शोध व त्याचा समाजनिष्ठ मनाने लावलेला चिंतनशील अन्वयार्थ धूळपावलंमध्ये येतो. ही कादंबरी समस्याग्रस्त झालेल्या ग्रामीण जीवनाचा अस्वस्थ करणारा अनुभव देते, त्याचबरोबर परिवर्तनाची 'धूळपावलं'ही उमटवते. वाचकाला अंतर्मुख, विचारप्रवृत्त करते हेच या कादंबरीचे यश आहे. स्थानिक राजकारणापासून जागतिकीकरणापर्यंत बदलत्या परिप्रेक्षात ग्रामीण माणूस व ग्रामीण समाजामध्ये अंतर्बाह्य पातळीवर होत चाललेला बदल व त्यांच्या परिणामांचा यशस्वी वेध ही कादंबरी घेते. अनेकविध आशयसूत्रे घटनाप्रसंगामधून प्रकट होत असताना कलात्मक वास्तवाला सत्याचे रूप लाभू लागते, आपल्या स्वतःचा, भोवतालचा गावच नककच त्याच्या संस्कृती- विकृतीसह मनासमोर उभा राहतो. माणसांच्या जगण्याच्या प्रेरणा प्रवृत्तीच बदलल्या तर आपल्या मानवी अस्तित्वाचे, सामाजिक जाणिवांचे भवितव्य काय? यासारखे अनेक प्रश्न ही कादंबरी निर्माण करते. वाचकांच्या डोक्यात प्रश्नांचे मोहोळ उठविणे हे या कादंबरीचे सामर्थ्य आहे आणि डोक्यातला गुंता सोडवत सोडवत स्वत:ला आणि समाजालाही सावरणं, आकारणं यात कादंबरीचे यश आहे.

—---------------

प्रा. डॉ. अरुण कृष्णा शिंदे  

मोबा. ९४२१०२००५५,


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट