मराठी साहित्यातील शोषित समाज : महेंद्र कदम
मराठी साहित्यातील शोषित समाज
महेंद्र कदम
संस्कृती ही माणसाच्या स्वत्वाला पूर्णत्व देणारी गोष्ट असते,तर बहुसांस्कृतिकता हा त्या पूर्णत्वाचा मोरपंखी पिसारा असतो.
– प्रभाकर बागले
संस्कृती ही जगण्याची गतिशील रीत असते. ती सतत बदलणारी असते. मानवी जगण्याला पूर्णत्व देणारी संस्कृतीच असते. ती एकाच वेळी शोषणही करत असते आणि शोषणाला नकार देत समानतेची मागणी करीत मांगल्याची भाषाही करत असते. ती करुणेचा सागर बनते. अशा मांगल्याची स्वप्ने पाहणारे साहित्य हे सतत शोषणला नकार देत आले आहे. भारतीय संस्कृतीही अशीच सतत बदलत आणि संघर्षरत राहिली आहे. ती बहुविध स्वरूपाची आहे. शोषकांची एक आणि शोषितांची एक अशा दोन संस्कृती भारतात अस्तित्वात आहेत. त्यांनी आपापली स्वतंत्र जाणीव जिवंत ठेवत आपले जगणे समृद्ध केले आहे.
असे असले तरी आपल्या सत्तांचा विस्तार करुन, त्या अबाधित ठेवण्यासाठी प्राचीन वैदिक समाजाने सतत आपली संस्कृती प्राचीन काळापासून प्रगत असलेल्या कृषक भारतीय समाजावर लादण्याचा, थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्यांना गुलाम करण्यात वैदिकांना यश मिळाले आहे. त्यामुळे भारतीय शोषणाच्या मूळांशी शोषक वैदिक समाजाची संस्कृती आहे. या संस्कृतीसोबत शोषित समाजाने सतत लढा दिला आहे. कापिलिक, चार्वाक, सांख्य, जैन यांच्यापासून हा लढा सुरू आहे. तो लढा अधिक यशस्वी बौद्ध काळात झाला. यात गौतम बुद्धाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले. म्हणून तर इसवीसन पूर्व ५०० ते इसवीसन ५०० असा सलग एक हजार वर्षे भारत बौद्धमय झाला होता. परंतु पुढे त्यांचा पराभव झाला आणि नव्याने पुन्हा शोषण सुरू झाले.
शोषणाला नकार देणार्या साहित्याला भारतीय परंपरेत ऋग्वेदपूर्व हजारो वर्षांचा इतिहास आहे. या साहित्याने जसा भारतीयांच्या जाणिवेचा इतिहास जतन केला आहे. तसाच मानवी वर्तनाच्या आणि मिथकांच्या रूपाने लढा देत, तो आजही लोकमानसाच्या नेणिवेत जपून ठेवला आहे. हा साहित्याचा इतिहास शरद पाटील म्हणतात त्या निर्ऋतीच्या तांत्रिक श्रुतीपासून सुरु होतो. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने आणि जातकाने तो अधिक समृद्ध होतो. ह्या साहित्याने सतत शोषणाला नकार देण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याला पुसून टाकण्याचा प्रयत्न वेद, पुराणे, उपनिषदांनी केला आहे. अर्थात म्हणून वेदोपनिषदांचे महत्त्व कमी होत नाही. कारण याच साहित्यातून शोषणाचा इतिहास शोधता आलेला आहे. हे सर्व नोंदवण्याचे कारण असे की, आजच्या वर्तमान शोषणाला हे संदर्भ लागून येतात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या शोषणाच्या परंपरा नीट समजून घेतल्या की, आजच्या शोषणाचे स्वरूप आपल्याला सहजपणे समजू शकते.
वर्तमान साहित्य:
आजचे वर्तमान साहित्य असे म्हणताना साधारणपणे एकविसाव्या शतकातील साहित्य असे आपल्याला म्हणता येते. मात्र या साहित्याला जागतिकीकरणाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे खरे तर नव्वदनंतरच्या साहित्याला मांडणीच्या अवकाशात विचारात घ्यावे लागणार आहे. जागतिकीकरणानंतर जी खाजगीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली, त्याच्या बदलाचा मोठाच परिणाम समाजावर झाला. त्यातून कोणालाच सुटणे शक्य नव्हते. ते अपरिअहार्यपणे आपल्यावर लादले गेले. त्यातून मूळच्या धार्मिक शोषणासह भांडवलदारी शोषणाचा नवाच मार्ग तयार झाला. शोषणाची नवी वारुळे तयार झाली, त्या वारुळांचे चित्रण करणार्या कथनात्म साहित्याचा विचार येथे केंद्रस्थानी आहे. हा विचार करत असताना लेखक अथवा त्याचा वयोगट महत्त्वाचा नाही; तर त्याच्या साहित्यातील जाणिवा महत्त्वाच्या आहेत. वर्तमान जाणिवा आणि शोषणाला नकार देणारे साहित्य हे या मांडणीच्या केंद्रस्थानी आहे. त्यामध्ये निवडक कथनात्म साहित्याचा म्हणजेच कथा आणि कादंबर्याचा विचार केला आहे.
शोषित समाज:
शोषित समाज अथवा शोषित घटक असे म्हणताना इथल्या धर्मव्यवस्था आणि भांडवलदारांकडून ज्या- ज्या घटकांचे जातीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, शारीरिक शोषण होते अशा व्यक्तीला अथवा समाजाला शोषित घटक अथवा शोषित समाज असे म्हणता येईल. हे शोषित घटक सतत एका आरिष्टाच्या आणि भीतीच्या सावटाखाली जगत असतात. त्यांचे केवळ शोषण आर्थिक अथवा सामाजिक शोषण केले जात नाही तर त्यांना हीन वागणूक दिली जाते. त्यांचे माणूसपण नाकारले जाते. त्यांना भाषिक आणि सांस्कृतिक पातळीवर दुय्यमत्व दिले जाते. त्यांच्या जगण्याचे हक्क नाकारले जातात. आपल्या जगण्याचे मूलभूत हक्क नाकारला गेलेला एक मोठा समाज भारतात आहे. त्यातल्या अनेकांना अद्यापही आपली ओळख नाही. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यांना कसलेच लाभ मिळत नाहीत. पायाखाली जमीन नाही. त्यांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, असा मोठाच वेगवेगळ्या जाती- जमातींत विभागला गेलेला शोषित समाज आपल्या अवतीभोवती आहे. या समाजाला साहित्याच्या परिघात किती स्थान मिळाले आहे, हा या मांडणीचा हेतू आहे.
संविधानाने जरी समतेची, शोषणविरहित, धर्मनिरपेक्ष समाजाची काही मूल्ये अधोरेखित करून त्याला कायदेशीर मान्यता दिलेली असली तरी शोषणाची खरी जाणीव ही सत्तरीनंतरच्या साहित्यात दिसू लागली. त्यातून साहित्याचा केंद्र बदलून ते परिघावर आलेले दिसते. आणि परीघ हेच नंतरच्या काळात केंद्र झालेले दिसून येते. याची सुरुवात जरी साठोत्तरी साहित्यात दिसत असली तरी ती केवळ शोषणाची जाणीव होती. तिच्यात नकाराची शकयता असली तरी विद्रोहाची शक्यता कमी दिसते.
उदा. माडगूळकर यांच्या कथेतील विविध जाती- जमातीची जी पात्रं आहेत, ती आहे ते जीवन स्वीकारून जगतात. शंकर पाटील, हमीद दलवाई यांच्या कथा- कादंबर्या शोषण नोंदवतात, परंतु शोषणाच्या मुळाशी जात नाहीत. कोसलातील सांगवीकर खुंट्यावर येवून थांबतो. धगमधील कौतिक वेडी होते, भाऊ पाध्येंचा धोपेश्वरकर, वासुनाक्यावरची तरुणाई वास्तवाचे चित्रण करते. गोतावळातील नारबा पराभूत होतो. अशी काही उदाहरणे देता येतील. अगदी अनियतकालिकाच्या चळवळीने एक इतिहास घडवला असला तरी तो अस्तित्वाच्या आणि परात्मतेच्या झगड्याचा होता.
१९७० नंतर खर्या अर्थाने शोषित समाज साहित्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. त्याला जगभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या चळवळी कारणीभूत आहेत. या चळवळींनी शोषणाचे एक नवे भान लेखकांना दिले. त्याचे चित्र साहित्यात आलेले दिसू लागले. त्यामुळे या काळातील साहित्यात शोषणाची केवळ चिकित्सा नाही, तर तिच्यावरील उपाय आणि नव्या व्यवस्थेच्या मांडणीचे मॉडेलदेखील साहित्यातून डोकावू लागले. म्हणजे चळवळीचे हे साहित्य माझ्यासह माझ्या समाजाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शोषणाचे आहे, त्याला मी नकार देणार या धारणेतून हे लिहिले गेलेले साहित्य आहे. याचा अर्थ हे साहित्य स्व आणि स्वसमाज यांच्या शोषणाला नकार देताना नव्या व्यवस्थेची मांडणी करताना दिसते.
उदा. कोसलानंतरचे भालचंद्र नेमाडे, भास्कर चंदनशिव, बाबुराव बागूल, केशव मेश्राम, आनंद यादव, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, योगीराज वाघमारे, गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे अशा काही लेखकांचा समावेश होतो. या लेखकांनी ज्या पद्धतीने शोषणाची चिकित्सा केली आहे, ती संविधानिक चौकटीत राहून प्रस्थापित व्यवस्थेला नकार देत नव्या मानववादी व्यवस्थेची मांडणी या साहित्याने केली आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर लढ्यात बहुजन पिढीचे जे नुकसान आणि शोषण झाले आहे, त्याचे चित्रण नेमाडे करतात. शेतकर्यांच्या समग्र शोषणाची चिकित्सा करून म. फुल्यांच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न भास्कर चंदनशिव, रा. रं. बोराडे, भीमराव वाघचौरे यांनी केला आहे. विविध जातींच्या उपेक्षित वर्गाच्या राजकीय, धार्मिक, आर्थिक शोषणाची मीमांसा बाबुराव बागूल, नागनाथ कोत्तापल्ले, केशव मेश्राम, योगीराज वाघमारे यांनी केली आहे. तर पितृसत्ताक व्यवस्थेने केलेल्या शोषणाची चिकित्सा गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर यांनी केली आहे.
१९९० नंतरच्या लेखकांनी आपल्या आधीच्या लेखकांच्या संस्काराला आणि लिखित संचिताला पचवून नव्वदनंतर शोषणाला नकार देवून त्याची सार्वत्रिकता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सार्वत्रिकता या अर्थाने महत्त्वाची आहे की, या काळातील लेखक आपल्या जाती धर्माच्या बाहेर पडून व्यापक स्तरावरील शोषणाची चिकित्सा करताना दिसत आहेत. या अर्थाने ही सार्वत्रिकता आणि बहुसांस्कृतिक आस्था महत्त्वाची आहे. हा प्रयत्न यासाठी महत्त्वाचा आहे की, या लेखकांपुढचे प्रश्न वेगळे होते. जागतिकीकरणाने शोषणाचे स्वरूप फार गुंतागुंतीचे बनलेले होते. या शोषणाला केवळ जात अथवा धर्म जबाबदार नव्हता. तर एक जागतिक आर्थिक आरिष्ट, भांडवलदारी व्यवस्था त्याला जबाबदार बनू लागली होती, या व्यवस्थेने जात, धर्म या शोषणाच्या मूळ व्यवस्था काही काळ विस्मृतीत टाकण्याचा प्रयत्न करून एक नवी भांडवलदारी व्यवस्था निर्माण करण्यात आणि चंगळवाद पसरवण्यात यशस्वी झाली. या काळाने मानवाला वस्तूत रुपांतरित करण्यात आणि त्याचे सांस्कृतिक मूल्य हे केवळ आर्थिक निकषावर अधोरेखित करण्यास भाग पाडले. त्यामुळे या काळातील समाजाच्या शोषणाचे स्वरूप नेमकेपणाने चिमटीत पकडणे कठीण होवून बसले. त्यांना व्यापक स्तरावर होणार्या शोषणाने हैराण केले होते. म्हणजे जागतिकीकरणाच्या शोषणाच्या केंद्रस्थानी इथला शेतकरी होता, कामगार होता, स्त्री होती, तितकाच गावगाड्याबाहेरील माणूसही होता. त्यामुळे शोषणाचा एकारलेला विचार करून त्याचे स्वरूप लक्षात येत नव्हते, याचे भान या काळातील लिहिणार्या पिढीला आलेले दिसते. त्यामुळे या पिढीने एक पाऊल पुढे टाकत शोषणाची सर्वांगीण चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हेतर या पिढीने आपल्या समाजाच्या बाहेर पडून व्यापक पट कवेत घेवून शोषणाच्या सर्व शक्यता तपासण्याचा प्रयत्न केला आहे.
उदा. राजन गवस यांच्या चौंडकं, भंडारभोग, तणकट, रिवणावायली मुंगीतल्या कथा, रंगनाथ पठारे यांच्या प्रारंभीच्या काळातील कथा- कादंबर्यातून डोकावणारे शोषणाचे चित्र, बळवंत कांबळे यांचे साहित्य, जी. के. ऐनापुरे यांच्या रोबोट, जाईच्या घरी जाई या कादंबर्यातील आणि स्कॉलरज्यूस, निकटवर्तीय सूत्र यातील कथा, भारत सासणे यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी असलेला शोषित समाज, आनंद विंगकर यांच्या अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट मधील चित्रण, प्रज्ञा लोखंडे, मलिका अमर शेख, उर्मिला पवार यांच्या लेखनातून व्यक्त झालेल्या जाणिवा, मोहन पाटील, आनंद पाटील यांच्या कथनात्म साहित्यातील शोषित समाज, सदानंद देशमुख, सुरेंद्र पाटील यांच्या कथा- कादंबर्यातून चित्रित होणारा समाज इत्यादी. यातील चित्रण हे स्व आणि स्वसमाज यांच्या सीमारेषा पुसून टाकणारे आहे. एका अर्थाने या काळातील लेखकांच्या जाणिवा अधिक विस्तारलेल्या आणि व्यापक पातळीवर शोषणाला नकार देणार्या राहिल्या आहेत.
आजचे साहित्य म्हणजे एकविसाव्या शतकातील साहित्य असे सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येईल. अर्थात याला जागतिकीकरणाचा जसा संदर्भ आहे, तसाच तो तांत्रिक प्रगतीतून आकाराला येवू लागलेल्या शोषणाचाही संदर्भ आहे. हा काळ माणसाला त्याच्या वस्तुकरणासह त्याला संभ्रमित आणि भयचकित करून सोडणारा आहे. या काळाने मानवाला संभ्रमित, संशयी करून सोडले आहे. त्याचा वस्तूपणातून उपभोक्ता आणि रोबोकडे प्रवास सुरु झाला आहे. त्याला त्याचा असा स्वत:चा आवाज राहिला नाही. आधीच्या काळात तो वस्तू होता. आता त्याला रोबो बनवून त्याला सोयीने हाताळणारी एक नवी व्यवस्था आकाराला आलेली आहे. ही व्यवस्था अत्यंत विखारी आणि खुनशी आहे. त्याचे भान सामान्य माणसाला येवू लागले आहे, परंतु त्याच्या हातात आता काही राहिले नाही. त्यामुळे त्याला त्याच्या शोषणाच्या जागा नीटपणे सापडायला तयार नाहीत. शत्रू त्याला शोधणे अवघड बनले आहे. घरापासूनच त्याचे शोषण सुरू झाले आहे, ही जी नवी व्यवस्था आकारली आहे, तिचे कितपत चित्रण या आजच्या साहित्यात आले आहे, हे पाहणे आवश्यक ठरते.
उदा. जयंत पवार यांच्या कथेतून येणारे महानगरीय कामगाराच्या विस्थापनाचे आणि शोषणाचे चित्र, प्रवीण बांदेकर यांच्या चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन अॅनिमल फार्म मधून होणारे कोकणच्या र्हासाचे चित्र, दीनानाथ मनोहर यांच्या कबीरा खडा बजार में, फत्तेसिंह तोरणमाळ या कादंबर्यातून प्रकट होणारे जातीय ताणतणावाचे आणी आदिवासी शोषणाचे चित्र, डी. बी. रत्नाकर यांच्या विसकट मधून आलेले हॉटेल कामगारांचे आणि वेश्या जीवनाचे चित्र, समर खडस यांच्या बकर्याची बॉडी मधील महानगरीय जातवास्तवातील शोषणाचे चित्रण, आसाराम लोमटे यांच्या ईडा पिडा टळो आणि आलोक मधील शेती आणि तिच्याशी लगडून येणार्या शोषणाच्या तर्हा, कृष्णात खोत यांच्या कादंबर्यातील पर्यावरणासह होणारे राजकीय, धार्मिक आणि आर्थिक शोषण, किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीसह कथांमधून येणारे शेती आणि तिच्याशी संबंधित येणार्या नवमध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण, रफीक सूरज यांच्या बेबस आणि पायाड मधील बांधकाम क्षेत्रातील मुस्लीम आणि इतर जातींच्या जगण्याचे येणारे तपशीलात्मक चित्रण, नामदेव माळी यांच्या खरडछाटणी आणि छावणी मधील शेतकरी- प्राणीजीवन, राकेश वानखेडे यांच्या पुरोगामी आणि गिनिपिग या कादंबर्यांमधून डोकावणारे दलित- ओबीसी समाजाचे चित्रण, त्यांच्यातील संघर्ष आणि होणारे शोषण, सिद्धार्थ देवधेकर यांच्या मुंबईतील सफाई कामगारांच्या जीवनावरील कथा, सुनीता बोर्डे यांच्या फिंद्रीमधील भावविश्व, अशोक कोळी यांच्या पाडा, कुंधा मधील जग, बालाजी मदन इंगळे यांच्या झिम पोरी झिम मधील पौगंडावस्थेतील तरुणीचे चित्र, सरदार जाधव, ज्ञानेश्वर जाधवर, विजय जाधव (पाऊसकाळ), शिल्पा कांबळे (निळ्या डोळ्यांची मुलगी), अशोक पवार (इळानमाळ, पडझड), मनस्विनी लता रवींद्र यांच्या साहित्यातील अनुक्रमे ऊसतोड कामगारांचे प्रश्न, दुष्काळाचे आणि पावसाचे प्रश्न, जातीय आणि शारीरिक, लैंगिक शोषणाच्या तर्हा अशा विविध स्तरावरील चित्रणाचे तपशील आजच्या साहित्यात येत आहेत.
वर्तमान साहित्यात जे चित्रण आलेले आहे, ते अधिक व्यापक पटावरील शोषण कवेत घेते आहे. या साहित्याच्या केंद्रस्थानी जो वर्ग आहे, तो सर्वहारा समाजातील आणि जातीतील आहे. अनेक लेखक आपल्या जातीय आणि वर्गीय कक्षा ओलांडून शोषणाचे स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न करताहेत. धर्म, जात, विज्ञान- तंत्रज्ञान, भांडवलदार यांनी जे शोषण सुरू केले आहे, त्याचे दर्शन आणि चिकित्सा हे साहित्य करताना दिसते. हे चित्रण करणारे लेखक वेगवेगळ्या गटातून आलेले असले तरी त्यांनी केवळ आपापल्या गटाचे नेतृत्व करून साहित्यात मुशाफिरी केली आहे, असे नाही. आजच्या काळातील शोषणाला ते आपल्या आस्थेच्या व्यूहात घेताना अधिक जागृत राहून लिहीत आहेत. परंतु काळच इतका वेगाने बदलतो आहे की, त्यांना ज्या पद्धतीने रोबो बनवून टाकले जात आहे, ते पकडणे वरचेवर कठीण होत चालले आहे.
एकूणच मराठी साहित्यातील शोषणाच्या चित्रणाची चिकित्सा करताना समग्र शोषणाला नकार देताना एक माणूस म्हणून विचार करण्यात मराठी साहित्य कमी पडताना दिसते. ते गटातटात विभागले गेल्याने समग्र शोषनाची चिकित्सा करण्यात हे साहित्य कमी पडताना दिसते. तसेच या साहित्याला आपले तत्त्वज्ञान करून समग्र शोषणाची नीट मीमांसा करून एक नवे प्रारूप समाजापुढे ठेवता येत नाही. ब बळीचा मधील राजन गवस यांचा निवेदक, अगदी गौतम बुद्धापासून तुमच्या आस्थेच्या आणि तत्त्वज्ञानाच्या कक्षेत शेतकरी कधीच का आला नाही, असा जो प्रश्न विचारतो, तो महत्त्वाचा आहे. म्हणजे शेतकर्याचे शोषण होत आहे, हेच अनेकांना मान्य नाही. अर्थात शेतकरी कोणत्याही एका धर्माचा अथवा जातीचा नसूनही ही चर्चा मात्र मराठी साहित्यात झालेली नाही.
या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्कृतीचा विकास आणि विस्तार ज्या शेतीच्या शोधाने झाला आहे, त्या शेतीने जशी क्रांती केली तशी तिने गुलामी पण आणली. यामध्ये केवळ तेथे राबणार्या माणसाचे चित्रण अजूनही जगाचा पोशिंदा असेच भाबडेपणाने येताना दिसत आहे. तर दुसरीकडे दलित साहित्यात सरंजामदार शोषक म्हणून येताना दिसते. परंतु तो कसा शोषित आहे, याचे आकलन जे महात्मा फुल्यांना झाले होते, तेवढे आकलन मराठी साहित्याला झालेले दिसत नाही. आपल्या शोषणाच्या केंद्रस्थानी इथला धर्म आणि जात आहे, याचे नेमके आकलन मराठी साहित्यात आलेले दिसत नाही. पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची अशा स्वरुपाचे चित्र हे साहित्य रेखाटताना दिसते. त्यामुळे आजच्या साहित्यात शेती आणि त्याला लगडून येणार्या शोषणाची नेमकी चर्चा आणि चिकित्सा होत नाही. शोषणाचे स्वरूप निश्चित करताना, त्याची व्याख्या करताना कामगार, पीडित, दलित, स्त्री अशी केली गेली आहे. परंतु या व्यवस्थेच्या अथवा विचारधारेच्या केंद्रस्थानी शेती आणि शेतकरी कधी आला नाही. त्यासाठी त्यांना स्वतंत्र चळवळ उभी करावी लागली. तीही उभी करताना कांदा, ऊस आणि गव्हाच्या उत्पादनासंदर्भात उभी राहिली आहे. बाकी किरकोळ पिकांच्या संदर्भातही हे आंदोलन उभे राहिले नाही. तसेच कधीही शेतकरी शोषित आहे, तोही इथल्या धर्मव्यवस्थेचा बळी आहे, याचे भान मराठी साहित्याने व्यक्त केले नाही.
त्याचबरोबर भारत सासणे (सटवाईचा लेख) म्हणतात त्या पद्धतीने आजच्या कथात्म साहित्याच्या केंद्रस्थानी करुणा हे मूल्य येत नाही; जे मंटोच्या कथेत आलेले आहे. हे साहित्य बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारीत नाही. त्यामुळे ते भयमुक्ततेची घोषणा करीत नाही. सर्वसामान्य माणसाला कोणतेही आश्वासन देत नाही. हे साहित्य शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहते पण जातीवर प्रहार करीत नाही
एकीकडे हे कथात्म साहित्य बहुसांस्कृतिक होत असताना दुसरीकडे मात्र धार्मिक उन्माद वाढतो आहे, या दुहेरी पेचात आजचा लेखक सापडला आहे. तत्त्वज्ञानाचा अंत कधीच झाला आहे. त्यामुळे बहुसांस्कृतिक होताना लेखकाला अधिकात अधिक समाचार उन्मादी धर्मांधतेचा घ्यावा लागणार आहे. आजचा काळ हा आधीच सामाजिक माध्यमांनी गिळंकृत करीत आणला आहे. लेखनाचे क्षेत्र अधिकच आक्रसत चालले आहे अशा काळात बटबटीतपणाला नकार देत, मागच्या काळातील थेट विद्रोहाची भाषा न बोलता नव्या रूपांत साहित्याला अवतरावे लागेल. हे अवतरणे सर्वांगीण शोषणमुक्तीचे गाणे गाणारे असेल.
पूर्वप्रसिद्ध : मुराळी (संपादक: राजन गवस) डिसेंबर २०२२
-------------------------------
टिप्पण्या