तणस : माधुरी मरकड
तणस : उद्ध्वस्त जगण्याचे वर्तमान
महेंद्र कदम यांची 'तणस' ही तिसरी कादंबरी. 'धूळपावलं', आणि 'आगळ' या कादंबर्यानंतर लोकवाड्.मय गृहने प्रकाशित केलेली ही कादंबरी आजच्या वर्तमानतील तथाकथित शहरीकरण आणि जागतिकीकरणाने सामान्य माणसाच्या जगण्यातलं सत्व काढून घेऊन, त्याला फोलपटासारखे (तणसासारखे) आयुष्य कसे बहाल केले आहे, याचा प्रत्यय देते. व्यवस्थेला धडका देत दोन वेळच्या भाकरीसाठी स्वतःला सिद्ध करू पाहणार्या तळागाळातल्या माणसांच्या संघर्षाची गाथा म्हणजे तणस. अतिशय तरल आणि अलवार शब्दांनी सुरू होणारी ही कादंबरी, पुढे वास्तवतेचे भयानक चित्र उभं करत, पानापानांतून उलगडत जाते आणि एका अनाकलनीय शेवटाला येऊन थांबते. जीवनाला विचारलेले आणि वाचकांच्या मनात असणारे अनेक अनुत्तरित प्रश्न तसेच ठेवून, मनाला चटका लावणारा शेवट आणि कोणाच्याच ओटीत मनपसंत सुख का पडत नाही ? याची हुरहूर लावून जाणारी ही कादंबरी आहे. जागतिकीकरणाने जी जीवघेणी स्पर्धा निर्माण केली त्यात दिनूसारखे अनेक तरुण आज होरपळत आहेत. स्वतःला सिद्ध करायचा जीवतोड प्रयत्न आणि तेवढ्याच वेगात समोरून येणारे अपयश या चक्रात या तरुणांच्या मनोबलाच्या चिंधड्या उडून त्यांचे असे स्वतःच्याच विश्वात हरवणे, स्वतःतच रमणे, वेगळं काहीतरी वागणे असे मनोकायिक संदर्भ 'तणस'मध्ये येतात.
कादंबरीचा नायक दिनकर देसाई, सुशिक्षित बेरोजगार, पाच बहिणींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा. बी.कॉम. बी.एड. असे थोडे तिरपे शिक्षण घेऊन नोकरीसाठी झटणारा. ती नाहीच मिळाली म्हणून 'वडाप'चा धंदा तो सुरु करतो. तिथेही यश मिळालं नाही म्हणून पतसंस्थेत रमतो. त्याला कुठलीच मोठी महत्त्वकांक्षा नाही. जगातील सगळी सुख मिळायला हवीत ही तर लांबची गोष्ट; पण चाकोरीबाहेरच्या कुठल्याही गोष्टीची कधी अपेक्षा न करणारा, बरेचदा मध्येच ट्रान्समध्ये जाणारा, नाकासमोर चालताना भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारा दिनकर आपल्या आतल्या अबोध विश्वात रमत असतो. परंतु त्याच्या रुटीन आणि कंटाळवाण्या आयुष्यात अचानक उर्मिलाच्या रूपानं एक सुखाची लहर येते. आईविना पोरकी असलेली उर्मिला वेगळ्याच आत्मविश्वासाने कादंबरीत वावरते. तिची प्रश्नाला सरळच भिडण्याची वृत्ती, जराशी बेदरकार असलेली मानसिकता, बंडखोर वृत्ती ह्या तिच्या जमेच्या बाजू. महादेवाच्या भक्तीमागून वनीकरणाची जमीन हडप करण्याची लालसा मनात असणाऱ्या पंताची उर्मिला ही मुलगी. सावत्र आईच्या जाचाला कंटाळून, शिक्षणासाठी बाहेर पडून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करताना एका क्षणी दिनकरची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करते आणि त्याच्यासाठी अहोरात्र धडपडते. दिनकरच्या ट्रान्समध्ये जाण्याच्या सवयीने अस्वस्थ होणारी उर्मिला, कुठल्याच स्वप्नाला मनाजोगता आकार मिळत नाही हे जाणूनही गप्प राहणारी, वडिलांच्या टोकाच्या व्यवहारिकतेपुढे अगतिक झालेली उर्मिला, स्वतःच्या छोट्या अस्तित्वासाठी जगणारी उर्मिला, कादंबरी वाचताना नायिकेच्या रूपातील उर्मिला मनात घर करून जाते. पण त्याची जगण्याची लढाई आणि त्या लढाईत हरताना त्याचे ट्रान्समध्ये जाणे तिला खूपच अनाकलनीय वाटते. त्यातून जो संघर्ष आकारतो तो डोळ्यासमोर उभा करण्यात कादंबरी यशस्वी होते. जगण्याच्या लढाईत हतबल होणारा दिनकर, फक्त सरळ रेषेतील आयुष्याची अपेक्षा करतो. छोटे-छोटे अन्याय सहन करतो.
आपल्या धुंदीतच आयुष्य आकाराला आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा दिनू जसजसा दुनियेशी झगडतो, लढतो आणि सातत्याने पराभूत होत जातो तसतशी त्याची जीवनाबद्दलची मतं बदलायला लागतात. कुठल्याच क्षेत्रात आपण यश मिळवू शकत नाही ही टोचणी, सततचा होणारा अन्याय ,आर्थिक कोंडी आणि व्यवस्थेकडून त्याचे होणारे शोषण याने पिचून तो सतत ट्रान्समध्ये जायला लागतो. दिनूच्या मनस्थितीचे नेमके वर्णन येथे आहे. "खोलीतच अंधारात बसून राहू, न जानो उठलो आणि आपली जागा कोणी घेतली तर काय करा. त्यापेक्षा लढाईच नको ,स्थितप्रज्ञ राहू, "ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान". किंवा "खोलीत इतकी धूळ साठलेली असते की विचारायची सोय नाही. उठलं की पावलांचं ठसा उमटवत रुमभर फिरत असतो. वावरतांना मात्र तो पूर्वीच्याच पावलावर पाऊल टाकत असतो.तेव्हा त्याच्या डोक्यात येतं की कितीही ठरवलं तरी पावलं एका विशिष्ट लयीत, एका विशिष्ट ठेक्यात, आणि विशिष्ट अंतरानेच पडतात"(११८-११९). या वाक्यामध्ये दिनूच्या मनातील भावनांचा गोंधळ कळतो. कितीही प्रयत्न केले तरी आपली धाव कुंपणापर्यंतच हे त्याने मनोमन ठरवलेलं, त्यातूनच त्याची चक्रात अडकल्यासारखी स्थिती होते. ऐन उमेदीच्या काळात सगळे जग जिंकण्याची धमक रक्तात असणारा तरुणवर्ग जागतिकीकरणाने बेकारीच्या खाईत लोटला जातोय, आणि भावनिक फरफट होऊन मनाचे आजार मागे लावून घेतो, ही आजकालची शोकांतिका दिनूच्या ट्रान्समध्ये जाण्यामागे स्पष्ट जाणवते आणि ती जाणवण्याएवढी परिणामकारक भाषा आणि नैराश्यवादी भावनांचे प्रगटीकरण करण्यात कादंबरी यशस्वी ठरते.
दिनूला उर्मिलेची भक्कम साथ असतेच पण दिनकरचा वैचारिक गोंधळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाला मारक ठरतो. शेवटी पतसंस्थेविरुद्धची केस तो जिंकतो. त्याच्यावरच्या अन्यायाला थोडीतरी वाचा फोडली जाते. पण त्याच वेळी दिनकरची साथ सोडली तरच नोकरीत परत घेतले जाईल या अमरच्या अर्थातच संस्थाचालकाच्या मनमानीपणापुढे हतबल झालेली उर्मिला त्याचवेळी दिनूला सोडून जाण्यासाठी घराच्या पायऱ्या उतरते. कदाचीत आपण याला सोडून गेलो तर, हा सुधारेल अशी भाबडी आशा तिच्या मनात असते. उर्मिलेचं घराच्या पायऱ्या उतरून बाहेर पडणं आणि दिनूचं करारी मुद्रेनं पायऱ्या चढून घरात येणं, अशा एका निर्णायक टप्प्यावर कादंबरी संपते.
दिनकरचा मित्र मनोज जावळे हाही या कथेचा नायक आहे. बीई झालेला मनोज सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली सुपरविजन करत असताना त्याला अडचणीत आणले जाते. तिथुन सुटून ड्रायव्हरच्या नोकरीसाठी तो अगतिक होतो हे पाहून काळापुढे कोणाचे काही चालत नाही हे पटते. तर त्याचा भाऊ केवळ खालच्या जातीतील आहे, म्हणून शिक्षणापासून वंचित राहतो. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मनोजच्या कुटुंबाला गावात कोणी काम देत नाही. तीच अवस्था चिंतामण या जीपचालक-मालक संघटनेच्या अध्यक्षाची होते. तो शेवटी दैववादी बनतो. तीच अवस्था अनेकांची झालेली आहे. या सगळ्या जगण्याच्या कोलाहलाचा उत्तम नमुना म्हणजे वाहनतळ आहे. शेवंताची आई ही एक ताकदीची स्त्री व्यक्तिरेखा या कादंबरीत आहे. अक्षरशः'खडकावर नंदनवन फुलवणं' हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणारी ही स्त्री. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर कुटुंबाला भरभराटीचा काळ तर आणतेच पण आपल्या व्यवहारचातुर्याने सगळं घर एकत्र बांधून ठेवते. धरणाच्या पाण्यात गेलेले आपले वैभव रक्ताचं पाणी करुन परत मिळवण्यात आयुष्य वेचते. आईच्या पावलावर पाऊल ठेवणारी शेवंताही नवरा उत्तमराव आणि मुलगा अमर यांच्यात कायम समन्वयकाची भूमिका निभावते.
गजाननपंत, उत्तमराव, शेवंता, दिनकरचे आई-वडील, शिवाजीराव काळे हे आधीच्या पिढीचे नेतृत्व करतात. त्या पिढीमध्ये असणारे जगण्यासाठीचे आदर्श उत्तमराव, शिवाजीराव यांच्यामध्ये सातत्याने दिसून येतात. उत्तमराव खूप मोठ्या ताकदीने कादंबरीत वावरतात. कुणावर अन्याय होणार नाही, संपत्ती मिळवायची तीही नैतिक मार्गाने, लोकांना धरून राहायचे ,त्यांच्या अडीअडचणीला उभे राहायचे, आणि तरीही राजकारणासारख्या बदनाम क्षेत्रापासून लांब राहायचे, ही उत्तमरांवांची धारणा आहे. उत्तमरावांचा हा ग्रेटनेस पदोपदी जाणवतो. पतसंस्थेवर जबरी पकड असणारे उत्तमराव पतसंस्थेत निवडणुका लागल्यावर न डगमगता उभे राहतात. पण स्वतःच्या मुलाच्या उधळेपणामुळे जेव्हा पतसंस्था डबघाईस येऊ लागते तेव्हा हतबल होण्याशिवाय काही करू शकत नाहीत. मागच्या पिढीमध्ये जगण्याचे जे आदर्श त्या पिढीने अंगिकारले आणि त्यामध्ये त्यांचे पूर्ण जीवन उजळून निघाले अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे उत्तमराव यांचे व्यक्तिचित्र खूपच प्रभावीपणे महेंद्र कदम यांनी रेखाटले आहे. तसेच मुलगा नालायक निघाला म्हणून जमीन, वाडा सुनेच्या नावावर करून तिला आर्थिक दृष्ट्या सबळ करणारे शिवाजीराव पुरोगामित्वाचे प्रतिनिधित्व करतात. कारण ते गावात जगायला आलेल्या भटक्या लोकांना आपली स्वत:ची जागा कायमची रहायला देतात. तर दिनकर, उर्मिला, अमर, मनोज, चिंतामण हे नव्या पिढीचे लोक स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत वावरताना दिसतात. त्यांच्यावर फोकस करणारी ही कादंबरी आजच्या वर्तमानाचे चक्रावून टाकणारे वास्तव अधोरेखित करते.
अर्थकारणाचे अतिशय भेदक वास्तव आणि तितकेच विदारक शब्दचित्र कादंबरीत आहे. उर फुटेस्तोवर होणारी जगण्यासाठीची शर्यत आणि त्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केला जाणारा जीवघेणा आकांत अख्ख्या कादंबरीभर भरून राहिला आहे. खूप पैसे मिळाले पाहिजेत, खूप श्रीमंत झालो पाहिजे, या एका उद्देशासाठी काहीजण धडपडतात, तर दोन वेळच्या जेवणाची तजवीज व्हावी आणि जिवंत राहता यावे यासाठी काहीजण धडपडतात. श्रीमंताला आणखी श्रीमंत आणि गरिबाला आणखी गरीब करणारी भांडवली अर्थव्यवस्था त्या धडपडीला आणखी खतपाणी घालते. श्रीमंत होण्याच्या शर्यतीत केवळ पंतच नाहीत, उत्तमराव आहेत, पतसंस्था आहे, अमर आहे, दिनू आहे, मनोज आहे, अध्यक्ष चिंतामण आहे, जीप आहे, टमटम आहे.
मोठे घर बांधण्यासाठी कर्ज, टीव्ही घ्यायला कर्ज, गाडी घ्यायला कर्ज, मोबाईल घ्यायला कर्ज या सगळ्यात प्रत्येक वस्तूची दामदुप्पट किंमत वसूल करण्यात व्यवस्था यशस्वी होते आणि सर्वसामान्यांना या चंगळवादात आपले किती पैसे जास्त जातात याचे भान राहत नाही, ही जी जगण्याला झिंग देण्यात भांडवली व्यवस्था यशस्वी झाली आहे त्यामागे विषम सामाजिक परिस्थितीत जगणारी सर्वसामान्य माणसं हाच केंद्रबिंदू आहे. एकीकडे स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा आणि दुसरीकडे आपण कमी पडतोय याची खंत आणि त्यातून सुरू असणारा स्पर्धेचा खेळ जो जगण्याचा आनंद सहजच हिरावून घेतो. पैशाचा हव्यास असणारी माणसं उदा. अमर,पंत आणि त्यांच्या तालावर परिस्थितीमुळे नाचायला लागणारे सर्वसामान्य लोक दिनू, मनोज, उर्मिला. यांच्या छोट्या-छोट्या स्वप्नांचे उद्ध्वस्त होणारे मनोरे मनाला चटका लावतात. सगळं कर्ज भरूनही दिनूला अमर बोजा कमी झाल्याचं पत्र देत नाही. ज्या पतसंस्थेसाठी आपण एवढं राबलो त्या पतसंस्थेने आपल्याला एवढही सहकार्य करू नये, या विचाराने अस्वस्थ दिनू नोकरीचा राजीनामा देतो, तरी अमरला त्याचे काही वाटत नाही,कारण अमरला त्याची शेती बळकावयाची असते. इथं भांडवलदार आणि सर्वसामान्यांचा जीवघेणा संघर्ष दिसून येतो. अशा पराभूत मनोवृत्तीतून जर कशातच यश मिळालं नाही तर माणूस दैववादाकडे वळतो. हे जे आपल्याला यश मिळत नाही त्यामध्ये आपल्या दैवाचा वाटा आहे आपण प्रयत्नात तर कमी पडत नाहीत असं मनाला बरी वाटणारी अवस्था दैववादाकडे वळल्यामुळे होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बचत गटाचा अध्यक्ष बाळुमामाच्या नादी लागतो.
कादंबरीत काळ हा सगळ्यात परिणामकारकरीत्या काम करतो. काळाच्या परिघात फिरणारे माणसांचे भोवरे भांडवलशाही आणि वास्तवतेच्या दोऱ्याने बांधलेले आहेत, आणि त्यामध्ये त्यांच्या स्वप्नांची तर चिरफाड होतेच पण जगावं कसं? हा प्रश्न समोर ठेवण्यात कादंबरी यशस्वी होते. काळासोबत वावरतांना कादंबरीतील माणसांचे भावभावनांचे कंगोरे तेवढ्याच तडफडीने समोर येतात. दिनूचे टेकडीवर जाणं ,त्याला ऐकू येणारी पैंजणधून ,उर्मिलेची आणि त्याची भेट, कोर्टात केलेल लग्न, नंतर त्याला ती धून ऐकू न येणे. हे प्रसंग ओघवत्या आणि तेवढ्याच पकड घेणाऱ्या भाषेत आहेत. दिनू-उर्मिलेचा, मनोजचा व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष आणि त्यात काळ बजावत असलेली महत्त्वाची भूमिका, हेही नियतीच्या रुपाने अनेक ठिकाणी समोर येते.
महेंद्र कदम यांनी शैलीचे आणि भाषेचे बरेच प्रयोग या कादंबरीत केले आहेत. ग्रामीण बोली भाषा, त्याला लगटून येणारे अनेक ग्रामीण शब्द यांचा लीलया वापर केलेला आहे. ओघवत्या आणि संयत भाषेमुळे कादंबरीत कुठेही अतिरंजितपणा जाणवत नाही. काही शब्द तर खूपच नवे वाटतात उदा..वडाप,लडतर इ. ग्रामीण भाषेचा गोडवा कुठेही कमी होऊ न देता किंवा सर्वसामान्य वाचकांना समजणारच नाही, अशा दोन्ही टोकांना न जाता भाषेचा सुरेख मेळ साधलेला आहे. विशेषतः दिनू जेव्हा ट्रान्समध्ये जातो तेव्हा त्याच्या तोंडची वाक्य खूपच गूढ आणि एका वेगळ्या वैचारिक पातळीची ओळख करून देतात. अनेक अनाकलनीय गोष्टी दिनूच्या तोंडून सहज उलगडून दाखवण्यात कादंबरीकार यशस्वी झालेले आहेत..
उदा. अग्नीचा शोध ही आदी मानवासाठी उत्क्रांतीची पुढची पायरी होती.अग्नीचे महत्त्व आदिमानवाने जाणले आणि मग अशा महत्त्वाच्या अग्नीसाठी, त्याला जपून ठेवण्यासाठी खोल गुहा निवडल्या गेल्या. तिथेच मंदिराचा गाभारा खोल आणि बिनखिडकीचा ठेवण्यामागे अग्नीची जपवणूक ,त्याला विझू न देणे हा हेतू असणार. त्यातूनच अग्नीला देवत्व प्राप्त झाले. या आणि अशा अनेक ठिकाणी बोलता-बोलता पारंपरिकतेचे आधुनिक मूल्य लेखक सहज उलगडत जातो. कातळावरचा उर्मिला आणि दिनू चा शेवटचा प्रसंग खूप बोलका आहे. तिथं दिनू एका वेगळ्या उंचीवर जातो आणि ऊर्मिला भूमीच्या रूपात जाते. अतिशय तरल आणि सुरेख शब्द. उर्मिलेच्या पायाला दिनूने केलेला स्पर्श. अर्थातच दिनूचे मातृशक्तीपुढे नतमस्तक होणे हे अतिशय सुरेखपणे आले आहे. कदमांच्या शैलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अन्याय सहन करताना कोणत्याही पात्राच्या तोंडची भाषा कुठेही घसरलेली नाही. अतिशय संयत शब्द, विद्रोह पण संयत शब्दात व्यक्त करण्यात ते यशस्वी होतात.
तळागाळातल्या माणसांच्या रोजच्या जगण्यावर आधारलेली आणि स्वतःचे वेगळेपण जोपासणारी महत्त्वाची कादंबरी आहे. सामाजिकतेच्या उतरंडीत सगळ्यात गाळात रुतलेला सर्वसामान्य माणूस, आणि त्याची जगण्याची धडपड खूप वेगळ्या अँगलने मांडलेली आहे. या माणसांमध्ये विद्रोहाचा जीवघेणा आकांत नाही की जगणच संपवून टाकावं अशी पराभूत मानसिकताही नाही. फक्त येईल त्या प्रसंगाला सामोरं जाणं आहे, जगणं स्वीकारून दिवस ढकलत जाणं एवढीच त्यांची अपेक्षा आहे. शोषित व्यवस्थेविरुद्ध रोजचे दोन हात करणार्या या माणसांना, व्यवस्था आपल्याला वापरून घेते याची जाणीव आहे ,पण त्याला त्यांना विरोध करता येत नाही. नियती आणि व्यवस्थेच्या हातचं खेळणं बनन एवढच यातील पात्रांचं प्राक्तन. ग्रामीण जीवनातील पराकोटीचा संघर्ष वस्तुनिष्ठ व सूक्ष्म निरीक्षणाने चित्रित केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणस मधील स्त्रिया खूप खंबीर आणि स्ट्रॉंग दाखवलेल्या आहेत. जगण्यातील दुःखाचा वाटा खंबीरपणे उचलणाऱ्या स्त्रिया, कुटुंबाचं जगणं समृद्ध करू पाहणाऱ्या स्त्रिया, प्रसंगी कुटुंबासाठी वाड्याबाहेर पडून शेती करणारी बाजीरावाची बायको, शेवंताची आई ,उर्मिला, दिनूची आई ही सगळी स्त्रीपात्रे प्रभावी बनून कादंबरीचा पोत अधिक परिणामकारक करतात.
आणखी एक गोष्ट कादंबरी वाचताना जाणवते की, यामध्ये जगण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना कितीही कष्ट पडले तरी प्रामाणिकपणाची साथ न सोडणारी सामान्य माणसे आहेत. जीवनाचे तत्वज्ञान अगदी सहजपणे कधी पात्रांच्या तोंडून तर कधी निवेदकाच्या तोंडून खूप सुरेख रित्या व्यक्त झालेले आहे. मध्ये मध्ये होणारी गाण्याची गजलांची प्रस्तुती वेगळी वाटते. असे असूनही संपूर्ण कादंबरीत भावनांचा कोरडेपणा प्रकर्षाने जाणवतो.
एकूणच मराठीत 'तणस'चे स्थान खूपच वरचे आहे. ही कादंबरी एका मोठ्या सामाजिक समूहाचे प्रतिनिधित्व करते. जागतिकीकरणाने माणसाचे वस्तूकरण झाले आहे हे ठळकपणे विशद करणारी, सडेतोड पण तितकीच संयत कादंबरी. कादंबरीच्या प्रारंभी असणारा तुकारामांचा अभंग़ 'घातकचि आहे लोकांचा संग ।म्हणून नि:संग तुका राही ॥ या वचनाप्रमाणे कादंबरीतील पात्रे आपापला अस्वस्थपणा सांभाळत एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. आजचा 'काळ सोकावला आहे' याचा प्रत्यय कादंबरीत येत असला तरीही त्यातील प्रत्येक जण काळाबरोबर लढतच आयुष्य जगतो आहे. भूतकाळाच्या कडू आठवणी गोड मानून वर्तमानाला सोबत घेऊन, आनंदी भविष्याचे स्वप्न पाहणारी आणि त्यासाठी संघर्ष करणारी ही सगळी माणसं नाउमेद दाखवली नाहीत. संघर्ष अटळ आहे हे जणू ती परिस्थिती ला ठणकावून सांगतात आणि लढतात.
-माधुरी मरकड
(पूर्वप्रसिद्धी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जाने- मार्च 2021)
-------------------------------------------------------------
टिप्पण्या