आसाराम लोमटे यांच्या तसनसची मूल्यात्मकता
"तसनस"ची मूल्यात्मकता : महेंद्र कदम
भारतीय इतिहासात ज्या दोन संस्कृती गेली हजारो चालत आलेल्या आहेत त्या म्हणजे ब्रह्मण आणि श्रमण संस्कृती. श्रमण संस्कृती ही भारताचीच नव्हे तर जगातील सगळ्याच देशांची प्रमुख संस्कृती राहिली आहे. कारण शेतीच्या शोधातून श्रमण संस्कृती आकारली आहे. त्यामुळे तिला लगडून जी संस्कृती आकारली ती श्रमाशी आणि समतेशी जोडली गेली होती. परंतु अतिरिक्त धान्य उत्पादनाच्या गरजेतून ही संस्कृती पुरुषसत्ताक बनली व त्याच अतिरिक्त धान्यसंचयातून राजन्य सत्ता पुढे सरसावल्या. त्यांनी, आम्ही तुमचे धान्य जतन करू, असे सांगून उत्पादनकर्त्या शेतकरी वर्गाला उत्पन्नातून बाजूला काढून, हळूहळू गुलाम केले. ती गुलामी धर्माधिष्ठित करताना ब्रह्मण वर्ग केंद्रस्थानी आला. त्यातून सरंजामदार आणि पुरोहित हे दोन सत्ताधीश वर्ग तयार झाले. त्यांनी आपले ऐतखाऊपण झाकण्यासाठी श्रमांपेक्षा बुद्धी श्रेष्ठ असल्याचे जाहीर करून उत्पादक वर्गाला गुलाम केले आणि तिथून त्याच्या श्रमाचे अवमूल्यन सुरू झाले.
या अवमूल्यनाला हजारो वर्षांच्या भारतीय इतिहासाने कायम ठळक केले आहे. मध्ययुगीन कालखंडात तर दक्षिण भारतात मंदिरांना जमीनदान देण्याच्या प्रकरणातून याला अधिक खतपाणी घातले गेले आहे. हजारो एकर जमीन कष्ट न करणाऱ्या लोकांच्या ताब्यात गेल्याने धर्म आणि देव यांचा धाक दाखवत पुरोहित वर्ग केवळ वरकड उत्पन्न मिळवत गेला आणि शेतात राबणाऱ्या लोकांचे शोषण करत आला. त्यातही पुन्हा शेतकर्याकडून अधिकची वसुली करणारी जी मंडळी तयार झाली ती सरंजामदार बनली. त्यांनीही आपापल्या परीने शेतकर्याचे शोषण केले. हे केवळ येथेच थांबले नाही तर ब्रह्मण वर्गाने आध्यात्मिक ज्ञानाचे एक पोकळ क्षेत्र निर्माण करून, त्याच्या अदृश्य दबदब्याखाली श्रमाचे महत्त्व कमी करून, श्रमकरी वर्गाला गुलाम केले. त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जाही संपुष्टात आणला. वस्तुत: त्याच्या आधीच्या काळात वैश्य म्हणून ओळखल्या गेलेल्या व्यापार्यालाही कसला दर्जा नव्हता. परंतु त्यांनी जेव्हा बौद्ध आणि जैन धर्म स्वीकारायला सुरुवात केली, त्यांना प्रचंड आर्थिक मदत करून त्या धर्मांचा विस्तार करायला सुरुवात केली. त्यामुळे शूद्र वर्गही या नव्या धर्माकडे आकर्षित होऊ लागला. म्हणून भविष्यातील धोका ओळखून ब्रह्मण वर्गाने वैश्य व्यापार्यांना आपलेसे करून घेतले. भूमिहीन शूद्र वर्गाची तर अत्यन्त भीषण अवस्था करून ठेवली. अर्थात श्रमण परंपरेला लोकायत, बौद्ध आणि जैन यांच्या धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा आधार आहे. त्यांचे असे एक तत्त्वज्ञान आहे, नाही असे नाही. ते तांत्रिक आणि भौतिक तत्त्वज्ञान आहे. परंतु चैतन्यवाद्यांनी या तत्त्वज्ञानाची कायम जडवादी म्हणून हेटाळणी केली आहे. जडवादी तत्त्वज्ञान हे खरे श्रमकऱ्यांचे तत्त्वज्ञान आहे. ते त्याला कळले आहे, परंतु तो शोषित असल्याने या तत्त्वज्ञानाला मध्यवर्ती धारेत स्थान मिळत नाही, हे आजचे वास्तव आहे.
मध्ययुगीन काळातील जमीनदान प्रकरणातून कुमारी जमिनी वहितीखाली आल्या आणि नव्या जमीनदारांचा उदय झाला. या काळात ब्राह्मणांना जमिनी दान देण्याची प्रथा अधिक गतिमान बनलेली पहावयास मिळते. ब्राह्मणांना जमीन दान देण्याचे प्रकरण इतके प्रभावी बनले की, साधारणपणे देशभर अनेक राजे आपल्या पदरी असलेल्या ब्राह्मणांना आणि पुजार्यांना आपल्या स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी जमिनी दान देत सुटले. त्या घटना इतक्या वाढल्या की, आठव्या शतकाच्या आसपास लागवडीखालच्या जमिनीपैकी जवळपास ६०% जमिनी ब्राह्मण- पुरोहित आणि मंदिर समितीच्या ताब्यात गेल्या. यातून एक नवा जमीनदार वर्ग तयार झाला. आणि शेतकरी, वैश्य शूद्रात ढकलला गेला. त्यामुळे आठव्या शतकाच्या शेवटी आणि नवव्या शतकाच्या मध्यात ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने उरले. बाकीच्या दोन वर्णातील संख्या अत्यल्प झालेली पहावयास मिळते. कारण व्यापाराचेही प्रमाण घटत चाललेले आपणास पहावयास मिळते. या संदर्भात आर. एन. दांडेकर लिहितात, "The main features of the feudal system in India may be stated to have been the following : The King granted the revenue from the land to the Brahmanas or to his officers or selected holders. He also granted land in lieu of salaries. In most cases perticularly from the Gupta period onwards, the king also surrendered to the grantees police and administrative functions. Usually, grants were made only of arable land. The land was cultivated by peasents, generally Shudras, who were tied down to the land almost completely. They handed over a share to the new land holder. The appearance of a large number of such hereditary intermediaries tended to reduce many of the free peasentary to a semi servile status. According to some scholars, theoretically only the revenue from the land was granted to the feudatorty, and not the land itself. A part of the revenue collected by the feudatories was send to the king. However, the production happened to be usually at the subsistence level. Consequently there occurred a reversion to a kind of closed and self sufficient local economy, a retrogression of trade, and a preponderance of natural economy over money economy"(Recent Trends in Indology, 70-71).
जमीन दान प्रकरण आणि कर वसुलीचा परिणाम तत्कालीन समाजव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. यातून सामंतशाहीचा उदय झाला आहे. याबाबत विविध मत- मतांतरे असली तरी ही सरंजामशाही उदयास येण्याची जी विविध कारणे आहेत. त्यापैकी वर उल्लेख केलेले एक कारण महत्त्वाचे आहे. रोमिला थापर लिहितात, "The considerable evidence of royal grands of land reflects an alienation of rights to land revenue, with the more powerful political authorities investing these rights in those of lasser authority. Grands to Brahmans and to officers created holding of land or villages where the recipients had the right to collect revenue but where not required to pay tax. The Grand could either be of the revenue from the land or, more commonly overtime, of both the land and its revenue. In either case the grantee appropriated the surplus produced by the peasant through rent and labour taxes. The appropriation used the rights invested in the the grantee and did not preclude coercoin or the threat of force. The rights and obligations of the grantee in relation to those settled on the land were listed, together with the taxes and revenues which he could collect. In effect, the landed intermediary had immediate authority over the peasent. These changes are said to have concided with a decline in urbanism and trade during this period and up to the tenth century, reflected in the excavation of urban sites" (Early India, 443).
जमीन दान आणि कर पद्धतीच्या बदलत्या अधिकारामुळे सामाजिक आणि राजकीय रचनेत बदल झालेले पहावयास मिळतात. जमीनदार आणि ब्राह्मण यांना जे अतिरिक्त अधिकार प्राप्त झाले, त्यातून त्यांनी त्यांच्या स्वतंत्र व्यवस्था निर्माण केल्या. त्यातून मूळ राज्ये दुबळी बनत गेली. हे जमीनदार अथवा सामंत स्वतंत्र सैन्य बाळगू लागले. त्यांच्या निर्णयात राजाने हस्तक्षेप करू नये, अशा धारणा प्रबळ बनत गेल्या. शेतीवर अधिक कर लादला जाऊ लागला. मूळ राजाचा कर, मंदिराचा कर हे तर होतेच; परंतु त्याबरोबर स्थानिक सरंजामदार आणि ब्राह्मण त्यांच्या सोयीने नवे कर शेतीवर लादू लागले. यातून एक असंतोष जसा निर्माण झाला; तसा शेतीत राबणारा माणूस अधिकच बाहेर ढकलला गेला. त्याला शूद्राच्या स्थानी जावे लागले. तसा मूळचा शूद्र अधिक बाहेर हाकलला जाऊन तो अतिशूद्र अथवा अस्पृश्य बनला. तर त्यांच्याही पलीकडे चांडाळ गेला. चांडाळाला गावात जागा राहिली नाही.
वारकरी, महानुभाव यांच्याही काळात हा चैतन्यवादी आणि जडवादी हा संघर्ष राहिला आहे. तुकोबांचा सगळा संघर्ष दुष्काळ आणि या चैतन्यवाद्यांशी लढण्यात गेला. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना ही श्रमणाच्या प्रतिष्ठापनेची होती. म्हणून त्यांच्या राज्यातला सैनिक हा अर्धवेळ सैनिक आणि अर्धवेळ शेतकरी होता. यामुळेच म. फुल्यांनी उभा केलेले शिवराय हे कुळवाडी भूषण आहेत. इंग्रजांच्या काळात महात्मा फुले इथल्या शेटजी, भटजी, लाटजी व्यवस्थेची चिरफाड करून शेतकऱ्याच्या शोषणाची नेमकी चिकित्सा करतात. यथावकाश देश स्वतंत्र झाला. म. गांधींच्या खुनानंतर बहुतांश ब्रह्मण वर्गाने गावे सोडली. आपल्या शेतीवाडी विकून टाकल्या. तर गावात राहिलेले बाकी सगळे वतनदार स्वातंत्र्योत्तर भारतात सहकाराच्या माध्यमातून राजकारणात स्थिर झाले. म्हणजे मध्ययुगीन काळापासून ज्यांनी जमिनी ताब्यात घेतल्या त्यांनी आपला हक्क सोडला नाही. त्या जमिनीच्या बळावर नव्या व्यवस्थेत सत्ता बळकावल्या. कोणत्याही गावाचा भौगोलिक नकाशा पाहिला तर गावाच्या कडेच्या सगळ्या सुपीक जमिनी म्हणजे बागायत मळे हे कुलकर्णी, जहागीरदार, पाटील यांचे राहिले आहेत. महसुली दप्तरच त्यांच्या ताब्यात असल्याने त्यांनी ह्या मोक्याच्या जमिनी बळकावून गरीब शेतकऱ्यांना जिरायत जमिनीच्या रूपाने मूळ गावकेंद्रापासून लांब ठेवले. त्यांना कशातच फार वाटा मिळू दिला नाही. दलितांना तर नापीक हाडकी हाडवळे बहाल केले. हे जर महत्त्वाचे नव्हते तर "भूदान चळवळ" आकारली नसती.कुळकायद्यांनी जन्म घेतला नसता. काँग्रेसच्या रूपाने सत्तेत आलेला वर्ग कायम या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार आणि लाभार्थी झाला. शेतकरी, कष्टकरी, दलित केवळ उपेक्षेचा धनी झाला.
नेहरूंच्या पाच कलमी विकास कार्यक्रमातंर्गत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात सहकाराचे जाळे निर्माण झाले. धरणे उभारली. बँका उभारल्या. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, मार्केट कमिट्या निर्माण केल्या. इरिगेशन आले. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले. जगण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न झाला. काही प्रमाणात चित्र बदललेही, नाही असे नाही. पण ही सगळी क्षेत्रे झपाट्याने भ्रष्ट बनत गेली. भूमिपुत्रच शेतकऱ्यांचे शोषण करू लागले. दरम्यान लोकसंख्या वाढत गेली. आधीच कमी असलेल्या जमिनीचे विभाजनाने अधिक तुकडे झाले. अल्पभूधारक शेतकरी ही नवीच जमत जन्माला आली. दुष्काळ, नापिकी यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कसल्याही मालाच्या भावाची हमी राह्यली नाही. एकतर पिकत नव्हते आणि पिकले तर विकत नव्हते. मालाला भाव मिळत नव्हता. अर्थात आजही तो मिळत नाही. दरवेळी स्वामिनाथन आयोगावर मते मागणारी मंडळी राजकारणात निवडून आली की, तो आयोग गुंडाळून ठेवतात. याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत. आडतीतील व्यापारी, खत आणि बियाण्यांचे व्यापारी त्यांना लुटत राहतात.
या संपूर्ण शोषणाला नकार देण्यासाठी मराठवाड्यात शेतकरी चळवळ उभी राहिली. या चळवळीने इतक्या वेगाने शेतकऱ्यांना आपल्या कवेत घेतले की, ही चळवळ महाराष्ट्रभर पसरली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरणारी, जेलच्या वाऱ्या करणारी चळवळीतली मंडळी शेतकऱ्यांना आपला आधार वाटायला लागली. तर दुसरीकडे मार्क्सच्या विचारधारेतून आकाराला आलेली कामगार चळवळ सामान्य कामगारांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरून समतेची नवी मांडणी करत होती. तिसरीकडे वारकऱ्यांची समन्वयवादी चळवळ आपल्या परीने शेतकरी, कष्टकऱ्यांना आपल्या आस्थेच्या व्यूहात घेऊन काहीएक परिवर्तन करू पाहात होती. एका पातळीवर बदलते राजकारण आणि दुसऱ्या बाजूला या परिवर्तनवादी चळवळी यांच्यातील संघर्ष हा "तसनस" या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील एक मोठा व्यापक पट "तसनस" अधोरेखित करताना दिसते
आसाराम लोमटे यांची शब्द पब्लिकेशनकडून प्रकाशित झालेली ही कादंबरी श्रमण परंपरेला उजागर करीत श्रमाची नवी परिभाषा मांडते. शेतकरी, कष्टकरी चळवळीचा एक मोठा पट उलगडून दाखवते. जागतिकीकरणाच्या टप्प्यावर आकाराला आलेल्या शेतकरी आणि कामगार चळवळीच्या उभ्या- आडव्या छेदासह त्यांच्या यशापयशाची चिकित्साही ही कादंबरी करते. एका शेतकरी आंदोलनावेळी पोलीस गोळीबार करतात आणि त्यात एका तरुणाचा मृत्यू होतो, या घटनेने ही कादंबरी सुरू होते. भास्करराव लुंगारे, नामा, राम यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक होते. बरीच वर्षे खटला चालतो, समिती तो खटला चालवत राहते. पण चळवळ थांबत नाही. ज्या भाऊसाहेब महाजन यांनी ही चळवळ उभारली होती, ते स्वतःला विठ्ठल समजून वारकरीरुपी कार्यकर्त्याच्या कानात जो प्राण ते फुंकतात, त्यामुळे अनेक कार्यकर्ते तयार होतात. त्यांचे अधिवेशनातले विचार महत्त्वाचे आहेत, ते म्हणतात, "एखाद्या वारीला जावं इतक्या भक्तिभावाने तुम्ही इथं आलात. भाकरी गाठीशी बांधून उन्हातान्हाचं अनवाणी आणि कसल्या तरी ओढीने माणसं फक्त दिंडीत येतात. काल जेव्हा मी माझ्या छातीवर शेतकरी संघर्ष समितीचा बिल्ला लावला तेव्हा उरात एक अभिमानाची कळ दाटून आली. आताही तुमच्या अनेकांच्या छातीवर मला हा बिल्ला दिसतोय. तो तुम्ही केवळ छातीवर नाही तर काळजावर कोरलाय. आणि आपल्यातलं हे जे बिल्ल्याचं नातं आहे ते रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे कारण दैवात, नशिबात नाही तर ते सरकारच्या धोरणात आहे हे आपण सांगायला सुरुवात केली आणि सगळ्या तज्ज्ञांच्याही डोक्यातला अंधार दूर झाला. आपल्या शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते भल्या भल्या तज्ज्ञांनाही हरवतील इतक्या आत्मविश्वासाने बोलायला लागले. ज्या ओढीनं तुम्ही इथं आलात, मला तर वाटतं ही समोरची सारी गर्दी जणू चंद्रभागेच्या वाळवंटात जमा झाली आहे. आणि जरा भूषणाचं वाटेल, आत्मस्तुतीचं वाटेल, पण मला काही क्षण का होईना...मी विठ्ठल आहे. असं वाटलं. मी अक्षरशः भरून पावलो आहे"(३०).
अशा या विठ्ठलाने उभारलेली ही चळवळ अनेक कार्यकर्त्यांनी परिपूर्ण झाली. त्यांना आपल्या प्रश्नांचे भान येऊ लागले. 'शेतकर्याच्या पोराने नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धत्तुरा?' 'स्वराज्य मिळवायचंय औंदा म्हणून कारभारणी सोडलाय धंदा', आमचे भाऊ चंद्राची कोर, बाकी सगळे हरामखोर' अशा घोषणांनी जन्म घेतला. अण्णा भाऊ साठे यांच्यानंतर हे सरकार आपल्या राबणार्यांच्या कष्टावर पोसलेलं आहे, याचे भान या चळावळीने दिले. आपल्या स्वातंत्र्याचा नवा सूर्य उगवतोय अशी धारणा बळ धरू लागली. त्यामुळे हजारो कार्यकर्ते आयुष्यभर रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करीत राहतात. हमीभाव असो, कर्जवाटप असो, बँक वसुली असो, कृषी विद्यापीठाची केवळ निष्क्रीय दिखावूगिरी असो. मार्केट कमिटीकडून होणारी कपात असो, कापूसखरेदी असो, दारुबंदी असो अथवा नसबंदी जिथे शेतकरी प्रश्न तिथे हे सगळे कार्यकर्ते हजर राहून प्रश्न सोडवण्यासाठी झटत राहतात. अधिवेशने घेतात. शेतकरी, कामगार दलित वर्गाचे व्यक्तिगत प्रश्न सोडवण्यासाठी झटतात. तर रुस्तुम सत्त्वधर हा कामगार, हमाल, दलित प्रश्नांवर थेट आंदोनले करीत, काम करत राहतो. त्रिवेणीबाई कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून तर कधी थेट रस्त्यावर उतरून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडते. घामाला दाम मागू लागते. दारुबंदीसाठी कायम आग्रही राहते. ती सतत स्त्रियांना बरोबर घेऊन लढत राहते.
हे सगळे एका विशिष्ट दिशेने निघालेले असते. काही प्रश्नांची तड लावली जाते. मुख्यमंत्री असो की आणखी कुणी; कुणाशीही ही चळवळ दोन हात करू लागली. त्यांनी केवळ हमीभाव मागितला नाही तर घेतलेले कर्ज भरू सुद्धा नका असा अलिखित फतवाच काढला. तेव्हा काही नोकरदार त्यांना विचारायचे, तुम्ही ही बुडवण्याची सवय शेतकर्याला का लावता? त्यावर राम आणि नामा यांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे. नामा म्हणतात, "कपातीच्या नावाखाली सरकारनं इतकं लुटलंय आम्हाला, की आमचेच पैसे त्यांच्याकडं निघतात. शेतमालाच्या बाजारभावात तर सरकारनं आम्हाला अक्षरशः नागवं केलंय. इतके पाडून भाव ठेवलेत...त्यात आजवर आमचं किती नुकसान झालंय याचा विचार केलाय का कधी. आमच्याकडून वीजबिल वसूल करता...आठ-आठ तास शेतात लाईटच नसते. विहिरीत पाणीय अन् पिकाचा हातातोंडाशी आलेला घास असतानाही हे पाणी देता येत नाही. उभ्या पिकाची राखरांगोळी होते याला जबाबदार कोण? आमच्या विहिरीवरच्या मोटरा जळतात. नाहक भुर्दंड होतो. तो कोणी भरून द्यायचा? आम्हाला आमचं सरकार आणायचं, ज्यात आम्ही मालक असू...आज आम्ही गुलाम आहोत. तुम्हाला वाटतं ना शेतकरी कोणताही कर भरत नाहीत. आम्हालाही वाटतं सन्मानानं कर भरावा, करदात्यांच्या यादीत आपलंही नाव असावं पण आधी उत्पन्न तर दिसावं ना. उत्पन्न दिसू लागलं की आम्ही कर भरू. त्यामुळे सरकारनं आता आम्हाला काही मागू नये. आमचं भलं करण्याच्या गोष्टी करू नयेत, फक्त आमच्या उरावरून उठावं. सगळी देणी दफ्तरावरून खोडून टाकावीत अन् फिटलं म्हणावं..."(५३). अशी बिनतोड उत्तरे देऊन ही मंडळी अनेकांना गप्प करत असतात.
या सगळ्या लढ्याचे नेतृत्व भाऊसाहेब महाजन आणि लक्ष्मण निरस करत असतात. तर भास्कर, नामा, राम, रुस्तुम, त्रिवेणीबाई हे कार्यकर्ते आपल्या घरादाराची पर्वा न करता श्रमणाऱ्या समाजासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत असतात. त्या कामात नामा आपले लग्नच विसरून गेला आहे. रामला शेवटी तोट्यात चालणारी गोदावरी प्रिंटिंग प्रेस बंद करावी लागली. हमालांच्या प्रश्नावरून रुस्तुम जीवघेण्या हल्ल्यातून वाचतो. त्रिवेणीबाईला आपले गाव सोडावे लागते. ही सगळी मंडळी आपल्या कार्यातून सर्वहारा लोकांचे जगणे उजागर करताना, शास्त्या समाजाचे पितळ सतत उघडे पाडत राहते. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते धडपडत राहतात.
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परन्तु तिच्या प्रश्नांची सोडवणूक कोणी करत नाही. बदामरावसारखे आमदार सगळ्या संस्था आपल्या ताब्यात ठेऊन शेतकऱ्यांचे शोषण करतात. त्यांच्या मामाचा मुलगा असूनही राम आयुष्यभर बदामरावांच्या विरोधात उभा राहून शेतकऱ्यांसाठी लढत राहतो. कर्जवसुलीला आलेले बॅंकअधिकारी पाहून कणगीत लपून बसणाऱ्या बापाच्या डोळ्यात पाहून आयुष्यभर लग्न न करता चळवळीला वाहून घेतलेला नामा या कादंबरीत भेटतो. तर एका नारायण धुळे नावाच्या एका दलिताने गावात जमीन विकत घेतली म्हणून त्याचे डोळे काढले जातात. त्याला जमिनीचा कब्जा मिळू दिला जात नाही. आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबाला कसली मदत मिळत नाही. आडतीतील हमाल आपल्या हक्काचे काम मागतात म्हणून त्यांना रुस्तुम नावाच्या त्यांच्या नेत्यांसह कोंडून मारहाण केली जाते. नारायणराव धुळेच्या घटनेसंदर्भात रुस्तुमने नामाला लिहिलेले पत्र महत्त्वाचे आहे. तो त्या पत्रात म्हणतो, "दादा, तुझ्या तोंडून मी नेहमीच ऐकतो की शेती परवडत नाही म्हणून. शेतीधंदा प्रचंड कटकटीचा आणि आतबट्ट्याचा आहे हे मलाही मान्य आहे. मग एखाद्या दुबळ्या माणसानं शेती घेतली तर ते सहन का होऊ नये? तो आपल्या बरोबरीचा होतोय असं वाटतं का यात? जमीन ही कसून जगण्याचं साधन आहे की प्रतिष्ठेची गोष्ट ? नारायणराव धुळे यांना जर तू कधी भेटलास तर तुला हजार इंगळ्या डसल्याची वेदना होईल जी मी सध्या अनुभवतोय. जणू छप्पर उडून गेलेल्या आणि आजुबाजून निवडुंगाचं बन असलेल्या ठिकाणीच आपण राहातो आहोत अशी या कुटुंबाची भावना आहे. भीतीचा गारठा भरून राहिलाय त्या खोपटात. या कुटुंबाला पुन्हा त्याच गावात सन्मानानं जगता येईल? सहजासहजी ही माणसं शेती कसू देतील त्यांना? नारायणरावांचे डोळे काढणारे अजूनही मोकाट कसे? कोणाची पाठराखण असणार त्यांना? पोलीस त्यांना कधी करतील जेरबंद ? पुढे खटला नीट उभा राहील? आरोपींना शिक्षा होईल?"(९०). यातील शेती ही कसून जगण्याची की प्रतिष्ठेची गोष्त आहे, हा जो प्रश्न कॉम्रेड रुस्तुम विचारति आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. शेती ही केवळ जगण्याचे साधन नाही तर ती प्रतिष्ठेची बनवली गेली, त्याला हजारेक वर्ष झाली. जमिनी फुकट दान मिळण्यातून जमीन हेच प्रतिष्ठा आणि संपत्ती मोजण्याचे साधन बनले आहे. ते आजही बदलायला तयार नाही. म्हणून दलिताने गावात घेतलेली शेती अनेकांना चालत नाही. ज्यांनी नारायणराव धुळेला गावाबाहेर काढले, ते आरोपी सहा वर्षांची शिक्षा भोगून परत आल्यावर उजल माथ्याने गावभर फिरून त्याला आम्ही कशी गावबंदी केली हे सांगत राहतात. यातून ही तयार झालेली मध्ययुगीन मानसिकता आहे, जी आजही बदलायला तयार नाही. प्रतिष्ठा आणि शेती असे एक समीकरण बनवले गेल्याने अनेक शेतकरी कर्जापेक्षा प्रतिष्ठेने हाय खाऊनच आत्महत्या करतात. त्यामुळे आजच्या शेतकरी आत्महत्येमागे जसे श्रमाचे अवमूल्यन आहे, तसेच ते सरंजामी मानसिकतेचेही एक कारण आहे. त्यांच्या श्रमाचे मोलही केले जात नाही. त्यांच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सतत टिंगल केली जाते. हे चित्र आजही बदललेले नाही. अनेक सिनेमा, कला, खाजगीतल्या गप्पा यांतून हे दिसून येते. चैतन्यवाद्यांनी तयार करून ठेवलेली ही मानसिकता बदलत नाही. ती केवळ उच्चवर्गीयांची बदलली नाही असे नाही; तर शेतकर्यांचीही ती बदलली नाही. यात तो भरडून निघत आहे. ज्यांनी जीवापाड कष्ट घेऊन ही चळवळ मोठी केली त्या लक्ष्मण, भास्कर, राम, नामा यांना शेवटी अवहेलना वाट्याला येते. तरुण शेतकर्यांची पोरं प्रतीकात्मक आंदोलन करणार्या खत दुकानदार सखारामभाऊ धानोरकर, भागचंद पोखरदास, शशांक धानोरकर अशा पोशाखी मध्यममवर्गीय चैतन्यवाद्यांच्या नादी लागतात. ही मंडळी आपला कोणताही धंदा घाट्यात करीत नाहीत. केवळ दिखावूगिरी करत खते, बी-बियाणे दुप्पट भावाने विकून वर्षाच्या शेवटी उधारी केल्याचे नाटक करीत शेतकर्याला लोबाडत राहतात. हीच मंडळी तरूण कार्यकर्त्यांना हाताशी धरून प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण निरस यांच्यावर भर सभेत हल्ला घडवून आणतात. आणि चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वीही होतात. नंतरच्या काळात सखाराम कापूस परिषद भरवून ज्या वल्लभदासने रुस्तुमवर जीवघेणा हल्ला घडवून आणलेला असतो. त्या वल्लभदासच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन केले जाते. हेच भागचंद नंतर भाऊसाहेबांसाठी कसला तरी यज्ञ घाडवून आणतात.
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राम बदामराव विरुद्ध आमदारकीला उभा राहतो, तर त्याला फक्त १८०० मते मिळतात. तर शिवसेनेचा फाटका सावंत नावाचा कार्यकर्ता बदामराव विरुद्ध निवडून येतो. अर्थात १९९५ च्या दरम्यान शिवसेनेने मराठवाड्यात जो मोठी मुसंडी मारत प्रवेश केला त्याला तिथल्या गोरगरीब शेतकरी, कष्टकरी लोकांचा मिळालेला आधार होता. ही आपलीच पोरं आपला तारणहार बनतील असे एक चित्र त्या काळात निर्माण झाल्याने काँग्रेसची पीछेहाट झाली. पण ते स्वप्नच राह्यलं. शेतकरी संघर्ष समितीने आम्ही राजकारणात उतरणार नाही असे आधीच जाहीर केल्याने रामला मते मिळण्याचा प्रश्न नव्हता. तरीही १८०० लोकांनी आपल्याला मतदान केले आहे. आपल्यावर इतक्या लोकांचा विश्वास आहे, तेव्हा आपण काम करायला हवे, असे मनाशी ठरवून नामा आणि राम चळवळीत सक्रीय राहतात.
पण त्यांच्याच गावात एका बैठकीत जेव्हा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण निरस यांच्यावर हल्ला होतो, तेव्हा मात्र ते उद्विग्न होतात. ज्या पोरांनी त्यांच्यावर हात उचलला आणि भागचंदसारख्या माणसांनी ज्यांना पाठीशी घालून सपोर्ट केला त्यांच्यावर कारवाई करावी, या हेतूने हे दोघेही आधी संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षांना भेटतात. पण तेही निराश झालेले असतात. राम, नामाची समजूत काढताना ते म्हणतात, "वाईट वाटून घेऊ नका. हे काय फक्त तुमच्याकडेच घडतंय असं नाही अन् आपल्या संघर्ष समितीतच घडतंय असंही नाही. अशा माणसांचा थयथयाट आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांना त्यांच्याकडून होणारा त्रास यात नवल काहीच नाही. याची सगळी रचना आधी ठरलेली असते. अशा माणसांना बळ पुरविणारी माणसंही आपलीच असतात, त्याशिवाय का अशी खुळी माणसं नंगा नाच घालतात. आता त्यांना खुळं तरी कसं म्हणावं. आपण मात्र आपलं काम करत राहावं"(२५४). या उत्तरातून काय समजायचे ते समजून घेऊन ते दोघे यथावकाश ते भाऊसाहेब महाजन याना भेटायला जातात. दरम्यान ते शासकीय समित्यांचा फायदा घेऊन बसलेले असतात. केस, दाढी वाढवून गोदेची परिक्रमा करून आलेले असतात. स्वतः भाऊसाहेब जी निरवानिरवीची भाषा करतात, ते पाहून हे दोघेही कोलमडून जातात. भाऊसाहेब म्हणतात, "आता मी स्वतःच समितीतून अंग काढून घेतोय. फक्त जाहीरपणाने ही निवृत्ती घोषित करता येत नाही इतकंच. तसं तर कधीकधी शेतकरी संघर्ष समितीच विसर्जित करावी, बरखास्त करावी असं वाटतं, पण अनेकांना ते रुचणार नाही. माझी गरज आता संपलेली आहे. ज्यांना काम करायचं, त्यांनी करावं आणि या कामात जर काही अडसर येत असतील तर ते आपणच दूर करावेत. ही काही कंपनी नाही किंवा मी कुणाला प्रत्येक जिल्ह्यासाठी फ्रेंचायजी अथवा डिलरशीप दिलेली नाही. समितीचा बिल्ला छातीवर असलेला प्रत्येक जण इथं नेता आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाचं जे निदान मला झालं ते मी तुम्हा सगळ्यांसमोर मांडलं. जणू माझं अवतारकार्यच संपलं आहे, असं मला वाटू लागलंय." या विधानाचे विश्लेषण करणारे जे पत्र क्षीरसागर वकिलांनी नामाला लिहून दिलेले होते, ते फार महत्त्वाचे आहे. त्यात ते म्हणतात, प्रदेशाध्यक्षांवर झालेल्या हल्ल्यावर भाऊसाहेब काहीच का बोलत नाहीत? त्यांच्यातल्या विठ्ठलाला बड्व्यांनी कोंडाळे घातले आहे की, विठ्ठलाचीच तशी काही इच्छा होती, याचा नीट विचार करा. ह्या अंगाने जेव्हा नामा विचार करायला लागतो, तेव्हा त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडू लागतात. त्यासाठीचा पुढील उतारा महत्त्वाचा आहे. "नामांना पुन्हा पुन्हा प्रश्न पडू लागतो. एखादा माणूस इतका कसा बदलतो? शेतकऱ्यांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांना सोडून थेट अध्यात्मात कसा काय शिरू शकतो? पायी देवळं हुडकत हिंडू शकतो? हे काय आहे नेमकं. आधी या सगळ्याच गोष्टी या माणसासाठी फिजूल होत्या. हे सारं तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी आहे, तुमच्या प्रश्नांपासून तुम्हाला दूर नेणारं आहे. दारिद्र्याचा प्रश्न सुटला म्हणजे तुम्हाला माणसासारखं जगता येईल. देवधर्माचे कोंडवाडे हे माणसाला बधिर करण्यासाठी आहेत. असं या माणसानं सांगितलं म्हणूनच तर भाऊसाहेब सर्वापेक्षा वेगळे वाटले. कधी काळी करकरीत अर्थशास्त्र समजावून सांगणाऱ्या या माणसाचं आजचं रूप कितीतरी वेगळं आहे. शोषणाची मांडणी करणारे, शेतीतल्या लुटीच्या चोरवाटा उघड करणारे भाऊसाहेब आणि आजचे भाऊसाहेब यात जमीन अस्मानचा फरक आहे. आपलं नातं होतं ते आधीच्या भाऊसाहेबांशी...असं नामा पुन्हा पुन्हा जोरकसपणे रामला समजून सांगत होते. राम म्हणाला, “आता मी हे सगळं ऐकून घेतलंय. मला पटलंयसुद्धा. मला फक्त इतकंच समजावून सांग, बडव्यांचं कोंडाळं विठ्ठलाभोवती आहे. त्यातल्या काहींच्या कुरापती नेहमीसाठी सुरू असतात आणि त्या फक्त आपल्याच भागात किंवा परिसरात आहेत असंही नाही. सगळीकडेच हे बडवे दिसून येतात. वारकऱ्यांना या बडव्यांनी गेल्या काही वर्षांत प्रचंड त्रास दिलाय. त्यांचा उच्छाद वाढत असताना विठ्ठलाने फक्त कमरेवर हात ठेऊन मौन का धारण करावं. यामागचं कारण काय?...विठ्ठलाची चक्क बडव्यांना फूस. म्हणजे बडव्यांच्या कटाला विठ्ठलाचा आशीर्वाद हे ऐकून साऱ्या अंगाचाच दगड झाल्यागत नामा निश्चल बसले. डोक्यात मुंग्यांची रांग चालली आहे. त्या कुठूनही बळाबळा बाहेर पडत आहेत. असा भास नामांना झाला. बडव्यांना विठ्ठलाची फूस असेल हे सहजासहजी मान्य करायला मन तयार होत नव्हतं. जे घडून गेलंय ते स्वीकारायचीही मनाची तयारी होत नव्हती. "असं कसं म्हणतोस, आपण जन्माला घातलेली गोष्ट अशी लयाला जात असताना, तिचे सतरा तुकडे होत असताना कुठल्या माणसाला बरं वाटेल?" नामांनी रामला विचारलं. तो म्हणाला, "म्हणजे ह्या सगळ्या शेतकरी संघर्ष समितीच्या पडझडीच्या काळात भाऊ एवढे निर्विकार कसे याचा तू विचारच केलेला दिसत नाहीस.” “दिसतं तर तसं पण मी याबाबत कधी खोलवर जाऊन विचार नाही केला." नामा म्हणाले. "हे बघ. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट जीव लावून तयार करतो. ती सहजासहजी दुसऱ्याच्या हाती द्यावी वाटत नाही. समजा जे मला कोणाकडून वारसा हक्काने मिळालं नाही ते मी दुसऱ्याला का द्यावं? त्यापेक्षा आपल्या नजरेसमोरच त्याची समाप्ती होत असेल आणि कोणाकडंच त्याची मालकी जाणार नसेल तर बरंचय की. तुला अजून जरा सोपं करून सांगतो. लहान पोरं समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा किल्ला तयार करतात. दिवसभर खपून, घामाघूम होऊन त्यांनी तो केलेला असतो. दिवस मावळतो. घरी जायची घाई झालेली असते. अशा वेळी त्या किल्ल्याला लाथ मारून, मोडून घर गाठणारेही काही असतात. शेतकरी संघर्ष समिती म्हणजे तो वाळूचा किल्ला आणि भाऊसाहेब महाजन म्हणजे तो लहरी पोरगा. असं होऊन बसलंय. यात आपण कितीही झुरणी लागलो तरी उपयोग काय त्याचा? पोराला वाटलं दिवसभर खपून चांगला किल्ला तयार करू, त्यानं केला.मोडून टाकू वाटला मोडला."(२७५-७६).
जेव्हा एखादी चळवळ तत्त्वज्ञान नसलेल्या भुसभुशीत पायावर उभी राहते तेव्हा ती कशी संपुष्टात येते याचे जे विवेचन ही कादंबरी करते, ते फार महत्त्वाचे आहे. जी गोष्ट नाकारून ही चळवळ उभी केली जाते, त्याच गोष्टींच्या आहारी जाऊन चळवळ मोडीत काढण्याची मानसिकता ही काय दर्शवते, याचा विचार करू लागतो, तेव्हा पुन्हा हा चैतन्यावाद्यांचा सुरु असलेला झगडा आपल्या लक्षात येतो. काहीही झाले तरी सूत्रे आपल्या हाती ठेवायची हे जे सरंजामी आणि ब्रह्मण सूत्र आहे, ते याही चळवळीत कसे काम करीत होते, हे भाऊसाहेब, सखाराम, भागचंद यांच्या वर्तनातून दिसून येते. चळवळ उभी करताना देवधर्म नाकारणार्या भाऊसाहेबांनी जर नीटपणे आपले तत्त्वज्ञान आकाराला आणले असते आणि त्याला श्रमण परंपरेची जोड दिली असती तर ही घुसखोरी टळली असती का? असा प्रश्न उपस्थित करायला जागा आहे, पण जर विठ्ठलालाच जर काही नको असेल तर काय करणार? असाही प्रश्न ही कादंबरी उभा करताना दिसते.
त्याचबरोबर ही कादंबरी मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचीही चिकित्सा करताना दिसते. आसारामची ही कादंबरी केवळ इथे थांबत नाही, तर ती आजच्या जागतिकीकरणाने सगळ्याच चळवळी कशा मोडीत काढल्या आहेत. यावर भाष्य करताना माणूस जरी आधुनिकतेच्या गप्पा करीत असला तरी तो आजही मध्ययुगातच कसा वावरत आहे, याचाही विचार करताना दिसते. कोणतेही शोषण हे वाईटच आहे. परंतु त्याचे शास्त्या समाजाला काहीच वाटत नाही. उलट त्यांचे शोषण केल्याशिवाय आपली तुंबडी बह्रत नाही ही सरंजामी मानसिकता जशी ब्रह्मण वर्गात आहे, तशीच ती राजन्य वर्गातही टिकून राहिली आहे. त्यांना शेतकरी, कष्टकरी प्रश्न जाणीवपूर्वक सोडवायचे नाहीत. केवळ काही काळ विकासाचा, आंदोलनांचा देखावा करायचा आणि एका विशिष्ट टप्प्यावर ते सगळे मोडून टाकायचे. भ्रम निर्माण करायचा. त्यातून मग दिशाहीनता जन्माला घालायची. आणि आपले सगळे फायदे मिळवत राह्यचे, ह्या सूत्राला ही कादंबरी अधोरेखित करताना दिसते.
एक मोठा कालपट कवेत घेऊन आसारामने शेतकरी, कष्टकरी समाजाचे प्रश्न तर ऐरणीवर आणले आहेतच. परंतु कृषिविद्यापीठाचे अपयश, मध्यमवर्गीय निष्क्रीयता, मध्ययुगीन मानसिकता, प्रतिष्ठेच्या खोट्या संकल्पना, गावागावातील जातीयता, गुंडगिरी, दहशत, दलितांवरील अत्याचार, सहकारातील राजकारण आणि भ्रष्टाचार, दिशाहीनता, व्यसनाधीनता, वर्गीय तणाव, शेतकरी आत्महत्या, स्त्रियांच्या समस्या असे अनेक प्रश्न घेऊन ही कादंबरी उभी आहे. त्याचबरोबर ह्या कादंबरीने जी शेतकरी चळवळीची जी चिकित्सा केली ती फारच भेदक आहे. मोठा वर्तमान काळ कवेत घेऊन त्या काळाचा मागच्या मोठ्या काळाशी आणि पुढच्या भविष्याशी सांधा कसा जोडायचा, हे समजून घेण्यासाठी "तसनस" महत्त्वपूर्ण कलाकृती ठरते. या अर्थाने तिची मूल्यात्मकता अधिक अर्थगर्भ आहे.
(पूर्वप्रसिद्धी : परिवर्तनाचा वाटसरू,15 मे,21)
टिप्पण्या