खेळ खेळणाऱ्या उंबऱ्याचे तत्त्वज्ञान
खेळ खेळत राहतो उंबरा या शीर्षकाने आशुतोष पोतदारचा कवितासंग्रह कॉपरकॉइन प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. जे इतर कलाप्रकारात मावणारे नाही तेच कवितेत असावे, अशी कवितेची एक व्याख्या केली जाते. अशीच कविता अधिक कवित्वाच्या जवळ जाणारी असते. याचा प्रत्यय ही कविता देते. म्हणून ती अधिक महत्त्वाची आहे. आशुतोष हा नाटककार आणि संपादक परिचित आहे. पण तो कवीही आहे. इंग्रजीचा अभ्यासक आणि प्राध्यापक असल्याने जगभरातले उत्तम साहित्य त्याने वाचलेले आहे. त्याचा जसा जगभरच्या साहित्याच्या वाचनाचा आवाका मोठा आहे, तसाच मराठी वाचनाचा आवाकाही मोठा आहे. द्वैभाषिक लेखक म्हणून त्याचा त्याचा परिचय आहे.
'खेळ खेळत राहतो उंबरा' हा संग्रह प्रकाशित झाला आहे. या कवितेने खरी उत्तर आधुनिकता काय असते, याचा प्रत्यय दिला आहे. उत्तर आधुनिकता ही आधुनिकतेला विरोध करीत परंपरेकडे वळताना ती तिचे पुनर्वाचन करत तिला नकारही देत असते. या अर्थाने आशुतोष आजच्या काळाची, आजच्या भारताची आणि भारतातल्या ग्लोबल जगाची कविता लिहिताना दिसत आहे. ही कविता आशयाच्या अंगाने जशी परंपरेचा नवा अन्वय लावते तशीच ती अभिव्यक्तीच्या अंगानेही मराठी कवितेच्या सातशे वर्षाच्या परंपरेला कवेत घेत स्वत:चा वेगळा घाट शोधते.
लोकपरंपरा अणि तिच्या अभिव्यक्तीचे प्रकार, लोकनाट्यांच्या सादरीकरणाच्या पद्धती, ज्ञानोबा- तुकोबाची भजन- कीर्तन- अभंगाची रचनावली, अरुण कोलटकर यांच्या कवितेतील दृश्यात्मकता, दिलीप चित्र्यांच्या कवितेतील वैश्विकता, वसंत आबाजी डहाकेंच्या कवितेची विलंबित लय, महानगरीय संवेदनेसह येणारी लैंगिक हिंस्त्रता, वस्तूंचे होणारे आक्रमण यांसह आधुनिक जीवन कवेत घेताना ही कविता गाव - महानगर असा भेद मिटवून टाकते, तंत्रविकासाच्या भल्या-बुर्या शक्यतांच्या खेळांची चित्रलिपी निर्माण करून दृश्यात्मक द्वंद्वाची नवीच लिपी ही कविता तयार करते. भाषेच्या बाबतीतही ती ग्लोबल झालेली आहे. नवा आशय आणि आविष्कार या कवितेने मराठीला बहाल केला आहे. आधुनिक जीवनासह लोकपरंपरेतील रूपके, प्रतिमा यांचा वापर पाहण्यासारखा आहे.
"घरंगळत जातो तो रस्ता / रस्त्यावरचे रस्ते
रस्त्यावरचे रास्त रस्ते / लावलेले अगणित ब्रेक्स
घसरलेले आणि मुरगळलेले पाय / कितीतरी लैला मजनुंच्या बेधडक मिठ्या
भोपळ्यात बसलेली म्हातारी / किती मैल चालत आली असेल
पार करणार असेल सात बुटक्यांची गावे"
त्याचबरोबर कवितेला असणारी लोकलय, अनुप्रास आणि प्राचीन आणि आधुनिक जीवनातील मूल्यसंघर्षाचे चिरंतनत्व या गोष्टी अत्यंत वेगळ्या पातळीवरून सादर होतात. प्राचीनत्वातील चिरंतनत्व शोधणारी ही कविता अधुनिक जीवनातील निरर्थकता कशी व्यक्त होते, हे पाहण्यासारखे आहे.
"वर / खाली / समोर / वास येणाऱ्या काखेतून
कॅफे कॉफी डे नावाच्या / ऐरावताकडे
ऐरावताने चढवलेत / एम टीव्हीची रंगीबेरंगी
सुळसुळीत आरपार प्रावणं / गदगदणारी डान्सिंग ब्रेसियर्स
लॅपटॉपवरल्या स्क्रीनसेवरवरचे नक्षीदार थुईथुईणारे मासे
मोबाईलवरले चविष्ट एस्एम्एस् आणखी काय-काय
कॉफीसाठी / चटावलेली लिंगं / चुळबुळतात
ऐरावताची शेपूट हलली की / शेपटीला बांधलेला तिचा परफ्युम्ड बो
अलगद घरंगळतोय अमर्त्य सेनच्या चष्यावर
आणि मग फेसाळलेल्या कॅपिच्युनोच्या मगबरोबर
टेबल आणि लुसलुशीत केनचे दिवाण / उठतात-ताठरतात "
आजच्या वर्तमान जगण्याला व्यापून राहिलेली सर्वव्यापी उदासीनता, व्यस्तता, विखंडितता, एकाकीपण, परात्मता यातून कुणाचीच सुटका व्हायला तयार नाही. त्यात सगळेच भरडून निघत आहेत. ही कविता सर्वव्यापी म्हणण्याचे कारन असे की, एकीकडे जगण्याला लगडून आलेले अभावग्रस्त दारिद्र्य आणि त्या खाईत जगणारा वर्ग जसा विखंडित आहे, तसाच सुखवस्तू समाजही विखंडित होत चालला आहे. त्याच्या अॅब्सर्ड जीवनाला कवेत घेताना ही कविता अधिकच टोकदार बनत जाते. नात्यांमधली कोरडीठाक भावना व्यक्त करताना कवी लिहितो,
"चौकोनी बेडरूम / लांबसडक बेड / न मावणारे पाय चौकटीबाहेर
पाठ एकमेकांच्या पाठीकडे / नजर छताकडे
मोबाईलमध्ये खुपसलेले डोके / एकमेकाचे दुखणे-खुपणे ऐकू येणे कधीचे बंद"
अशी अॅब्सर्ड जीवनशैली जगणारा माणूस सगळ्या प्रकारच्या क्सरती करतो. समुद्र घरात आणतो. हवा आडवतो. ढग खेचून आणतो. सेक्सचे सगळे प्रकार आणि सुखाचे शेकडो नमुने घेऊन तो तो आपले जगणे अर्थपूर्ण करू पाहतो. परंतु तरीही त्याच्या हातून सतत काही तरी निसटत राहते. हे जे काही निसटते आहे, ते ज्या पद्धतीने व्यक्त होते ते अंगावर येत राहते. त्यासाठी ज्या प्रतिमा प्रतीकांचे दृश्यमय उपयोजन कवी करतो ते कवितेला एक वेग्ळे परिमाण देत राहते.
आईबापपणाचे विदुषकी हसू, कंपोस्ट खताच्या डब्यासारखे राग, प्रेम, उन्माद, फ्रस्ट्रेशन यांचे थर, झगमगीत मादक झब्बा, माळरानावरून सरकलेले रंगीबेरंगी ब्रेसिअर्स, कोथळा फाडून जेवायला बसलेली आतडी, अफवांची फौज, आतड्याची स्प्रिंग, इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला लोंबकाळणार्या पारंब्या, थुईथुईणारे स्तन, नदीचे रक्ताळ वळण, गरोदर म्हशीसारखे फुगलेले गज, ढेकणांचा रोमान्स, स्लिपरच्या नजरा, चपलांचे टवकारलेले कान, विकेंडची झूल पांघरलेले घर, शनिवारच्या हँगआऊटचे लोंबकळणारे पडदे, हेल्मेटने आच्छादलेले शहर अशा कितीतरी प्रतिमा येथे एकदम नव्या रुपात येतात. अशावेळी विशेषणापेक्षा विशेष्यच अधिक उजळून निघण्याने कविता परिणामकारक बनते. अशा खूप प्रभावी जागा या कवितेत आहेत. त्यामुळे ही कविता अधिक वेगळेपणाने समोर येते.
खेळ खेळत राहतो उंबरा ही प्रतिमा केवळ प्रतीक म्हणून येत नाही तर ते रूपक बनून जाते. उंबरठा हा या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. हा उंबऱ्याचा केंद्र दोन अर्थाने रूपक बनून येतो. तो म्हणजे आधुनिकपूर्व जीवन आणि उत्तर आधुनिक जीवन यांच्यात सीमा आखणारा उंबरा आणि घर आणि समाज यांना जोडणारा उंबरा. असे असूनही आता हा केवळ लाकडी भाग बनून राहिला आहे. तरीही तो खेळ खेळत आहे. हा खेळ फारच निरर्थक बनत चालला असल्याचे सूचन ही कविता करत राहते. या कवितेत महानगरीय जीवन अधोरेखित होताना त्याला गावाकडच्या नात्यांच्या संदर्भाने बांधून ठेवल्याने हे किती मृतवत झाले आहे याचा सतत प्रत्यय ही कविता देत जाते. याचा उत्तम नमुना म्हणून फ्रोजन नाईट, A nap in a toilet, अ कविता ऑन कुजके दिवस या कवितांचा उल्लेख करता येईल. दृश्यात्मक आणि नाट्यात्मक कविता म्हणूनही या महत्त्वाच्या आहेत. अशा या महानगरीय पार्श्वभूमीवर संग्रहाच्या प्रारंभी येणाऱ्या कविता जरी व्यस्ततावादी वाटत असल्या तरी त्या देशीपणाचे भान व्यक्त करणाऱ्या आहेत. या देशी कवितांची सावली पुढच्या सबंध संग्रहावर आहे. एकूणच मृतवत बनत चाललेल्या जीवनाला गावाकडचा समृद्ध निसर्ग, तिथला माणूस, त्याने बांधून ठेवलेले नात्यांच्या सहानुभावाचे धोरण यांचा विचार करणारी ही कविता केवळ भाबडा आशावाद व्यक्त करून नॉस्टॅल्जिक बनत नाही, तर याही जगण्याने माणूस मोडत होता पण तुटून एकाकी बनत नव्हता याचे भान ही कविता व्यक्त करते. बहुस्तरीय विश्वाला कवेत घेत, शोषणाला नकार देऊ पाहणारी ही कविता एक नवे तत्त्वज्ञान घेऊन येते. हे तत्त्वज्ञान बहुसांस्कृतिकता आणि विश्वात्मक समतेची भूमिका अधोरेखित करत जाते. त्यामुळे ही कविता कोणत्याही एका वाटेने जात एकारलेली बनत नाही, हे आशुतोषच्या कवितेचे वेगळेपण आहे.
कवितेतील दृश्यात्मकता आणि प्रतीक- रूपकात्मता कवितेला उंची वाढवून देतात. ही कविता भाषेच्या अंगानेही महत्त्वाची आहे. या कवितेची भाषा ही केवळ आधुनिक नाही तर ती मराठीच्या समर्थ गद्याचाही वापर करीत उत्तर आधुनिक बनत जाते. बोली, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, महानगरीय स्लांग, तिचा उघडेपणा, मुक्तता अशा विविध रूपांनी व्यक्त होताना दिसते. त्याचबरोबर ही कविता या सगळ्यासह ही कविता तिची स्वतःची भाषा घडवते, ही भाषा सर्वार्थाने आजच्या काळाला कवेत घेऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते.
टिप्पण्या