तणसची निर्मितिप्रक्रिया
(संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यांच्या आग्रहाखातर 2020 च्या "संस्कृती" दिवाळी अंकासाठी लिहिला आहे। तो त्या अंकात प्रकाशित झाला आहे।)
एम. ए. पूर्ण झाल्यावर वर्षभरातच पीएच, डी.चा संशोधकविद्यार्थी म्हणून मी १९९६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात रूजू झालो होतो. मराठी नवकादंबरीवर संशोधन करत होतो. त्यावेळी विभागात संशोधक अधिछात्र म्हणून एक वर्ष आणि पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून दोन वर्षे भाषाविज्ञान शिकवण्याची संधी मिळाली. त्यामुळे भाषाविज्ञान हेही माझ्या आवडीचे आणि अभ्यासाचे क्षेत्र बनून गेले. हे सांगण्याचे कारण असे की, माझ्या लेखनाचा प्रवास बर्यापैकी उलटा झालेला आहे. पहिल्यांदा मी सत्याग्रही, नवभारत, प्रतिष्ठान, पंचधारा, अनुबंध अशा काही नियतकालिकांत समीक्षा लिहिली. नंतर भाषाविज्ञान, शैलीविज्ञान आदींवर लेखन केले. पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले ‘मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान’ हे माझे पहिले पुस्तक २००३ मध्ये प्रकाशित झाले आहे. नंतर २००७ मध्ये ‘कवितेची शैली’ हे कवितेची शैलीशास्त्रीय चिकित्सा करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर २००९ मध्ये माझी पहिली ‘धूळपावलं’ कादंबरी प्रकाशित झाली. इथून मी कादंबरीच्या लेखनाकडे वळलो आहे.
धूळपावलं आणि आगळ या दोन कादंबर्यांनंतर जून,२०१९ मध्ये प्रकाशित झालेली ‘तणस’ ही तिसरी कादंबरी लोकवाड्.मय गृहने प्रकाशित केली आहे. लोकवाड्.मयच्या वतीनेच जानेवारी २०१२ ला आगळ प्रकाशित झाली होती. तिला प्रतिसाद बरा मिळत असल्याने एक प्रकारचे कौतुक, दडपण, जबाबदारी येऊन पडत होती. ललित (लक्षवेधी), लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ या नियतकालिकांनी आणि दैनिकांनी तिची त्वरीत दखल घेतली होती. आगळने माझ्यातील ललितलेखनावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान समीक्षाही लिहीत होतो. परंतु वाटले की, जरा आपण समीक्षा लेखन थांबवावे, आत फुटणारे झरे आणि त्यांचे पाझर समीक्षालेखनाच्या नादात फुटून-आटून जात असावेत. कारण एखादा लेख लिहिण्यासाठी दोन-तीन महिने तरी सहज जातात. परीक्षण लिहायचे म्हटले तरी आठ-पंधरा दिवस जातात. त्यात आपली ही लेखनाची उर्जा जळून जात असावी. ललित लेखनाकडे लक्ष देण्यापूर्वी आपण जरा हे उद्योग कमी करावेत, असे ठरवून केले. तरीही अधूनमधून काही आग्रहासाठी, भूमिका म्हणून लिहावे लागत होते. परंतु ते प्रमाण बरेच कमी होते. तर मला नेहमी एप्रिल-मे दोन महिने लेखनाला उपयोगी ठरत आले आहेत. अशाच २०१२ च्या मे महिन्यात सहज म्हणून काही तरी एका अस्वस्थ आणि विमनस्क अवस्थेत लिहायला सुरुवात केली होती. ती सुरुवात म्हणजे केवळ मनोगत होते. तर ही प्रक्रिया कशी होती, हे पुढील तपशिलावरून लक्षात यायला मदत होईल.
पहिला खर्डा :
हा खर्डा लिहिताना तसे डोक्यात कादंबरी लिहिण्याचे काहीही नव्हते. परंतु मीच अस्वस्थ होतो. नोकरीचे सगळे ठीकठाक असतानाही उगाच उदासीचे ढग दाटून येत होते. कशात मन लागत नव्हते. दररोज कॉलेजला जात होतो. कामे सुरू होती. कॉलेज मूल्यमापनाचे नॅक नावाचे जे प्रकरण होते, ते पुढे सरकत नव्हते. अनेक अडथळे होते. त्यातच सुट्या लागून गेल्या. सुरू झालेले काम पुन्हा थांबून गेले होते. दुष्काळाने समान्य मान्सांचे कंबरडे मोडले होते. पारा ४४ च्या पुढे जाऊन सूर्य सगळ्यांना भाजून काढत होता. आणि मग चर्चा होत्या की, यावर्षी इतका उन्हाळा आहे म्हटल्यावर पावसाळा चांगला होणार. पण तसे काही घडत नव्हते. गावाकडेही मन लागत नव्हते. कदाचित या सगळ्या कारणांनी एक प्रकारची वैतागाची भावना प्रबळ झाली असावी. त्यातून मी लिहायला सुरूवात केली. तो लेखनाचा पहिला टप्पा असा आहे. तो सगळा मी जपून ठेवला आहे. मला प्रशासकीय डायरी लिहायची सवय असल्याने त्याबरोबर माझ्या लेखनाच्या सगळ्या नोंदी डायरीत सापडतात. त्याचे काही नमुने मी येथे देणार आहे.
१३मे, २०१२ :०६ पाने लिहिली. लिहायला सुरुवात केली. म्हणजे ‘तो अनेकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय होऊन बसलाय. कुणात मिसळून राहण्यात त्याला फार रस वाटत नाही. तो पुरता एकटा पडलाय’, या वाक्याने ही लेखनाला सुरूवात केली होती.
२४ मे, २०१२ : ०८ पाने लिहून झाली. फार काही होत नव्हते. लेखन करत होतो. काय होईल कळत नव्हते.
२५ मे, २०१२ : तब्बल २५ पाने लिहून झाली. यातही पहिला भाग हा पुन्हा राघवच्या मानसिक संघर्षाचा आणि त्याला वेटाळून असणार्या आणि सतत आकर्षण वाटत आलेल्या उजाड माळरानाचा संदर्भ आहे. या लेखनात मला मात्र कथा सापडली. त्या कथेचे सूत्र असे होते :
राघव देसाई > सुशिक्षित बेरोजगार > त्याने जीप घेणे > वडापचा व्यवसाय > वाहनतळ >
अवैध वाहतूक > त्यातले चढउतार > गाडीचा अपघात > गाडी विकणे > खुंट्यावर येणे
२६ मे, २०१२ : या दिवशी तब्बल ३६ पाने लिहून झाली. कथेला पाय फुटले. लेखनाची झिंग तयार झाली.
२७ मे, २०१२ : कथेला वेगळीच पायवाट फुटली. चक्क माझ्याकडून ३२ पाने लिहून झाली. कादंबरी भेटली.
२८मे, २०१२ : २६ पाने लिहून झाली. या दरम्यान जगजीतने गायलेल्या अनेक गझला मी येथे उतरून काढल्या.
२९मे,२०१२: ३० पाने लिहून झाली. प्लॉटिंग आणि धर्मकारण, राजकारण, दिगंबररावांचा प्रवेश, अमरचे लग्न, उत्तमराव-पंतांची भेट, असे तपशील भरावे लागले. मागील पाच दिवसांत तब्बल १४९ पाने लिहून झाली होती.
३० मे, २०१२ : ०५ पाने लेखन. किरकोळ नोंदी. लेखन पुढे सरकत नव्हते. हात प्रचंड दुखत होता.
३१मे,२०१२ : १२ पाने लेखन. या दरम्यान सगळा झरा आटून गेल्यासारखा झाला असावा. लेखनाची गती थांबली होती. जे मेंदूत उगवत होते, ते वेगाने संपले होते.
०१जून, २०१२ : दीड पान फक्त. पंतांचे मंदिर जीर्णोद्धार प्रकरण येथे आले.
०२जून, २०१२ : २३ पाने. शिवाजीराव यांची उभारणी अचानक करावी लागली आहे. त्यांचा मुलाशी संघर्ष.
०४ जून, २०१२ : ०९ पाने. मनोजच्या भावाचे अॅट्रॉसिटी प्रकरण. त्याची पहिली नोकरी जाणे.
०५ जून, २०१२ : अर्धा पान. मजकूर पुढे सरकत नाही.
०६ जून, २०१२ : २५ पाने. पतसंस्था संघर्ष आणि आश्रमशाळेची उभारणी. राघव–उर्मिला संघर्ष
०७ जून, २०१२ : ३५ पाने. लिहून पाठीचे भडके उठत होते. राघवचे मानसिक संतुलन बिघडणे. नोकरी जाणे.
०८ जून ,२०१२ : २५ पाने. राघवचा अमरशी संघर्ष. पतसंस्थेची पडझड. आश्रमशाळेची उभारणी.
०९ जून, २०१२ : १० पाने. कोर्टाचा निकाल. उर्मिलाचे घर सोडून जाणे.
असा हा पहिला खर्डा खर्या अर्थाने २४ मे ते ९ जून, २०१२ या अवघ्या सतरा दिवसात आणि १३ मेचा एक दिवस पकडला तर १८ दिवसात पूर्ण केला आहे. त्यातही पुन्हा मध्येच काही दिवस काहीच लिहिलेले नाही. याचा अर्थ हा ३०९ पानांचा पहिला खर्डा केवळ पंधरा दिवसांत पूर्ण झाला आहे. त्याच्या सगळ्या नोंदी माझ्याकडे उपलब्ध आहेत. अत्यंत नशा चढल्या अवस्थेतून मी जात होतो. काहीतरी भारी, वजनदार कागदावर उतरत असल्याचा आनंदी फील, झरे आटत चालल्याची हुरहूर, पाठीच्या दुखण्याने मांडलेला हैदोस, जेवणाचे नसलेले भान आणी त्यातून कॉफीचे अतिरिक्त सेवन यामुळे पचनाचे होऊन बसलेले वांदे, पाय मोडून टाकावेत इतक्या होत असलेल्या वेदना आणि तरीही मेंदूचा हाताला होत असलेला आदेश अशा अत्यंत विचित्र स्थितीत ही लेखन झाले होते. त्रास कमी करण्यासाठी बसण्याच्या पद्धती आणि खुर्च्या बदलून पाहिल्या या काळात. पण काही करक पडत नव्हता.
वेदना- आनंद- मुक्ती- अर्थपूर्ण असे काही सापडलेले हातून निसटत असलेल्या कळा- तो जुना काळ पुन्हा जगण्याचा घेतलेला मनस्वीपणा- स्वत:शीच बोलण्याचा एक आध्यात्मिक आनंद- प्रचंड उर्जा निर्माण होण्याने डोक्यात उठू लागलेले फोड आणि त्याच्या वेदना- त्यामुळे डोक्याचे वाढलेले तापमान- लिहून मोकळे झाल्यावर थंड होऊन ठणकू लागलेले डोके- झोपेत पात्रांनी घेतलेला ताबा- घरात काहीच लक्ष नसल्याचा बायकोचा वैताग- नव्या निर्मितीचा आत्यंतिक उच्च प्रतीचा आनंद आणि शेवटी आलेले एक प्रकारचे संन्यस्तवृत्तीचे रितेपण अशा अनुभवातून हा पहिला खर्डा तयार झाला आहे.
प्रत्यक्ष लेखनगर्भावकाश :
कादंबरीच लिहावी असे काही डोक्यात नव्हते. तशी काही पूर्वसूचनाही अथवा कसला मनाचा कौलही मिळालेला नव्हता. परीक्षा संपून गेलेल्या. सुट्या लागलेल्या. उन्हं वाढत होती. सलग तीन वर्षे दुष्काळाने शहरी माणूसही कावून गेलेला. व्यापार पेठा ठप्प होत्या. मी रोज कॉलेजला जात होतो. एकदा सहज म्हणून १३ मे रोजी डायरी काढली आणि उगीच काही तरी लिहावे म्हणून सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी साधारण सहा पाने लिहून झाली. ही पाने म्हणजे एकटेपणाचे मनोगत होते. ते लिहिताना माझ्या डोक्यात कदाचित मी आणि सभोवतालची वर्तुळेच असतील, परंतु त्याला मी तृतीयपुरुषी निवेदनातून व्यक्त केले आहे. हे काही कादंबरी वगैरे असले डोक्यात नव्हते. केवळ मनोगत म्हणून सुरू केलेला चाळा होता. कदाचित माझी डायरी कायम कॉलेजच्या टेबलावर असते. त्यामुळे ती कोणीही पाहू शकते, म्हणून मी त्रयस्थाच्या निवेदनाची काळजी घेतली असावी. या सहा पानांवर दहा दिवस तसेच निघून गेले. काहीही लिहिले नाही.
माझे एक सहकारी प्रा. दिगंबर वाघमारे पीएच.डी.च्या परीक्षेची तयारी करीत होते. ते दुपारी लायब्ररीत येऊन बसत होते. कार्यालय बंद झाल्यावर अधून मधून आम्ही सायंकाळी केबीनमध्ये चहा मागवत होतो. त्या निमित्ताने काही चर्चा होत होत्या. तर ते म्हणाले होते. सर आता काही तरी नवीन लिहायला घ्या. माझे काही कर्मचारीही मी काहीच अभ्यास कसा करत नाही आहात, असे विचारीत होते. त्यांना यातले काही कळत नाही, तरी ते अधून मधून हटकत होते. रात्रपाळीला असणारा कर्मचारी मी बसतो आहे उशीरपर्यंत म्हटल्यावर काय नवीन लिहिताय का? लिहा. मी मस्त तुम्हाला कॉफी बनवून आणतो असे म्हणायचा. ह्या गोष्टी मला दिलासादायक वाटायच्या. कारण मी आगळच्या वेळी जेव्हा रात्री कॉलेजवर लिहीत बसायचो, तेव्हा तो असाच न सांगता कॉफी घेऊन यायचा आणि माझ्यासमोर एका कोपर्यात बसून मला न्याहळत बसायचा. मी थकल्यासारखा वाटलो की, पाणी आणि कॉफी आहेच न सांगता. त्याची ही भाबडी भावना मला आजही खूप ग्रेट वाटते. तर तोही मला अधूनमधून टोकत होता. मी फार गंभीर नव्हतो. परंतु काही तरी आतले दाब सतत जाणवत होते. ते कशाचे होते, हे मात्र मला नीट सांगता येणार नाही.
२४ मे,२०१२ : सायंकाळची वेळ. वाघमारे सर बाहेर लॉनवर अभ्यास करत बसलेले. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी ती डायरी काढली. आणि नायक जन्माला घातला. त्याचे नाव राघवेंद्र उर्फ राघव देसाई. लिहिताना त्याच डायरीतील The unspoken words never does harm, या सुभाषिताभोवती मी खूप वेळ घोटाळलो होतो. ते मला माझ्या व्यक्तिगत स्वभावाशी मिळते-जुळते वाटले होते. म्हणून लिहिण्याला काल्पनिक रूप देताना मी स्वतंत्र नायक उभा केला. या नायक उभारण्यामागचे आणखी एक व्यवहारी कारण असे की, माझ्या टेबलाच्या ड्रॉवरला लॉक नसते. डायर्या कायम उघड्यावर पडलेल्या असतात. रात्री उशिरापर्यंत मी तिथे लिहित बसलो आहे. ही डायरी यदाकदाचित कोणाच्या हाती लागली आणि त्याने ती वाचायला घेतली तरी ते आपले व्यक्तिगत आहे, असे वाटू नये हा यामागचा व्यवहारी भाग होता. तर या राघवला शारीरिकदृष्ट्या उभा करताना मी ज्या शारीरिक तक्रारींनी त्रस्त होतो, त्या सगळ्या तक्रारी त्याला देऊन टाकल्या होत्या. मणक्याचा आजार असेल अथवा मे महिन्याच्या उन्हाचे लचके तोडण्याने होणारे त्वचेचे करपलेपण असो. पचनाच्या तक्रारी असोत अथवा बारीक चक्कर येणं असो, हे सगळं त्याला बहाल करून मी एक प्रकारे मुक्तीचा श्वास घेत होतो. उन्हाळ्यातले अंगावर येणारे दिवस. कॉलेजला तर जावे लागायचे परंतु विद्यार्थी नसल्याने जाणवणारे एकटेपण. ही घालमेल पहिल्यांदा डायरीच्या रूपाने लिहावी म्हणून लिहीत होतो. तसा मी अधून मधून डायरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तो सलग राहिला नाही. प्रशासकीय डायरी मात्र रोज लिहितो.
राघवला थेट जीप ड्रायव्हर करून त्याला वडापची वाहतूक करायला भाग पाडले. त्याच्या गाडीचा अपघातही झाला. त्याने गाडी विकूनही टाकली. तो पुन्हा घरात बसला. मग त्याचे घर उभे करावे लागले. त्याला पुढे कसा न्यायचा ? त्याचे पुढे काय करायचे ? असे प्रश्न उपस्थित करताना त्याला पतसंस्थेत नोकरीला टाकले.
वडाप ही गोष्ट तशी काही अचानक आलेली नाही. त्यामागे माझे नव्वदच्या आसपासचे महाविद्यालयीन जीवन कारणीभूत आहे. मी १९९३ ला बी. ए. झालो. पुढे टेलरिंग करत एम.ए. करत होतो. परंतु माझे दोन मित्र जीपच्या व्यवसायात उतरले. कुर्डूवाडीत त्यांचा व्यवसाय सुरू होता. ते अत्यंत क्लोज फ्रेंड असल्याने त्यांचे सगळे इनपुट-आऊटपुट सगळे मला माहित होते. सुटीच्या दिवसांत मी पण त्यांच्यासोबत वडापचा व्यवसाय केला आहे. त्यांचे अनुभव, व्यथा आम्ही सोबत शेअर केल्या आहेत. तर हे अर्धपोटी जगणारे जग मी पाहत होतो. भोगत होतो. मीही त्यातलाच होतो. फक्त मी वेगळा व्यवसाय करत होतो. या जगाचे प्रश्न फार गंभीर होते. परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. एक मोठा वर्ग या व्यवसायाशी बांधला गेला होता. तो व्यवसाय अवैध असूनही वैध होता. हप्ते पोच केले की, तो चालत होता. प्रवासी मिळत होते. नाही म्हटले तरी हातातोंडाची गाठ पडत होती. बर्याच जणांचे पोटपाणी या धंद्यावर चालले होते. पण मध्यमवर्गीय लोकांनी या धंद्यावर टाच आणली होती. त्यांना त्यांच्या पतसंस्थांकडून अत्यल्प व्याजदरात कर्ज मिळत असल्याने आणि पगार एकदम वाढल्याने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता.
२००६ ला सहावा वेतन आयोग आला आणि महाराष्ट्राचे चित्र बदलून गेले. अनेक नोकरदार वर्गाने चारचाकी गाड्या घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे वडापचा व्यवसाय मंदावत गेला. जो सुरु होता त्यात या नोकरदर वर्गाने उडी घेतली. कधी कायम तर कधी पगारी ड्रायव्हर ठेऊन आपल्या गाड्या त्यांनी भाड्याने लावल्या. काहींनी तर वडापलाही लावल्या. त्यांचा जोड धंदा झाला, परंतु हातावर पोट असणारे जुने व्यावसायिक अडचणीत आले. त्यांच्या गाड्या जुन्या. त्याचा मेंटेनन्स अधिक. कर्जाचे हप्ते धंद्यातूनच जाणार. त्यांच्या या जुन्या गाड्यांना पार्टीचे भाडे मिळेनासे झाले. त्यातच पुन्हा अॅपे नावाचे सहा आसनी वाहन मार्केटमध्ये दाखल झाले. त्याचाही परिणाम जीपच्या व्यवसायावर आला. तो धंदा सगळीकडून गोत्यात आला. अनेकांचे रोजगार गेले. तशातही आमच्या एका पाहुण्याने या व्यवसायात जम बसवला होत. तो धाडसी होता. वाहने घेऊन टक्कर देत होता. जगाबरोबर चालत होता. त्यामुळे मी नेहमी कुर्डूवाडीच्या वाहनतळावर रमलो आहे. माझा तो एक आवडता कोपरा होता. हे सगळे मी जवळून पहात होतो. अनुभवत होतो. त्यांच्या आतल्या सगळ्या गोष्टी मला कळत होत्या. काहीजण तरी नोकरी मिळेल का यासाठी धडपडत होते. त्यात एकाने आपली गाडी विकून नोकरीला भरले. पण त्याचे अॅप्रूव्हल काही आले नाही. संस्थापक पैसे परत देईना. ह्याचा हातचा रोजगार गेला. तो दिवसभर तळावर येऊन बसायचा. वाहनं भरायला मदत करायचा. मग कधी तरी तो पुन्हा ड्रायव्हर म्हणून तिथेच एकाच्या गाडीवर काम करू लागला.
हा सगळा भाग इतक्या वेगाने उद्ध्वस्त झाला की, मला कल्पनाही करता येईना. एखादी जखम आतल्या आत ठसठसत रहावी आणि तिला कसलेच तोंड फुटू नये तशी माझी अवस्था झालेली होती. ही जखम तशीच सोबत बाळगून होतो. या लेखनाच्या निमित्ताने त्याला अशी वाट फ़ुटली होती. ती भलभळून वाहत होती. तीच्या वाहण्याचा वेग इतका होता की, तो लेखनात पाझरला आहे. म्हणून तर एकेका दिवसात तीस-तीस पाने लिहू शकलो. त्यातही हे केवळ आर्थिक नव्हते तर भूसांस्कृतिक होते. लातूर-मिरज ही लाईटट्रेन बंद झाली. कुर्डूवाडीतील दोन मोठे रेल्वे पूल जमीनदोस्त झाले आणि कुर्डूवाडीचा चेहराच हरवून बसला. आजही मला त्यामुळे कुर्डूवाडी आवडत नाही. पूल आणि ती रेल्वे हे कुर्डूवाडीचे भूसांस्कृतिक वैभव होते. जागतिकीकरणाच्या रेट्यात हे सगळे मोडून पडले. त्यामुळे ते वाहनतळ आणि तेथील गजबज गेली आणि कुर्डूवाडीला लागून असलेल्या अनेक गावच्या तरूण पोरांचा रोजगार गेला. त्याची नोंद करणे मला अत्यांत महत्त्वाचे वाटले. या सगळ्या खूप खोलवर साठवल्या गेलेल्या या वेदना या निमित्ताने येथे आपोआप उतरल्या गेल्या आहेत. त्याचे कल्पितीकरण करताना टेंभुर्णीचा वाहनतळ त्या वाहनतळात मिसळून टाकला.
२५ मे,२०१२ : तब्बल २५ पाने लिहून झाली. यातही पहिला भाग हा पुन्हा राघवच्या मानसिक संघर्षाचा आणि त्याला वेटाळून असणार्या आणि सतत आकर्षण वाटत आलेल्या उजाड माळरानाचा संदर्भ आहे. या लेखनात मला मात्र कथा सापडली. त्या कथेचे सूत्र असे होते : राघव देसाई आडवेतिडवे शिक्षण घेऊन नोकरी शोधत राहतो. त्याला नोकरी मिळत नाही. वर आलेल्या वडापच्या व्यवसायातल्या माझ्या मित्राला राघवमध्ये परावर्तित केले. त्याने जीप विकली. परंतु येथे मी जाणीवपूर्वक त्याच्या गाडीचा अपघात दाखवला. पहिल्यांदा तो अपघातच का दाखवला याचे उत्तर देता आले नाही. परंतु दुसर्या खर्ड्यात मात्र ते नेमके उपयोगी पडले आहे. कारण त्यामुळे राघव आणि त्याच्या बापात एक विचित्र नाते निर्माण झाले अथवा ते तसे करता आले आहे. ते निर्माण करताना पुन्हा राघवचे घर नीट उभं करण्याची गरज भासली. कारण अचानक राघव आणि बापाचे संबंध बिघडणार नाहीत. त्यासाठी जे उभा करत होतो, ते फार वेगाने मेंदूत आकारत होते. तर त्या राघवला पुन्हा उभारी देने आवश्यक होते. त्यासाठी त्याला पतसंस्थेच्या नोकरीत टाकला. ती नोकरी मिळवण्यासाठी मूळच्या एम. ए. बी. एड. मित्राचे इकडे बी. कॉम. बी.एड. करायला लावले.
राघवच्या या नव्या नोकरीसाठी आलेली ती पतसंस्था कोणाची? का, कोणी आणि कशी उभी केली? हे तपशील भरण्यात तब्बल २५ पाने लिहून झाली. ही कथा होईल पूर्ण होईल असे वाटले. परंतु ती अपूर्ण वाटायला लागली. उलट तिला अधिक नव्या शक्यता भिनत गेल्या. मेंदूत नवे काही उगवत गेले. अचानक पाऊस पडावा आणि जमिनीतून बेडकांची पिलं वर यावीत अथवा अचानकच्या पावसाने वातावरणात पंखाचे असंख्य मुंगळे दिसावेत,; तसे काहीसे माझे होईन बसले होते. हे बेडूक आणि मुंगळे तसे काहीच कामाचे नसतात. पण जन्माला तर आलेले असतात. तसे माझ्या मेंदूच्या पोतडीत असे अचानक काही जन्म घेत होते. त्याचे काय करायचे मला काही कळत नव्हते. कारण ते ज्या काळात मी लिहीत होतो, त्या काळाच्या पर्यावरणात ते मिसफीट होत होते. परंतु त्यांचा जन्म दर पावसात होणार आणी काही काळात त्यांचे अस्तित्व संपून जाणार, हे नैसर्गिक सत्य होते. त्यात काहीच फायदा नसला तरी ते चालूच राहणार होते. तसे माझ्या मेंदूतल्या पोतडीतले विश्व होते. ते रुड हर्थाने उपयोगी नव्हते. परंतु ते उगवणारच होते. त्यामुळे त्याचा निचरा करण्याशिवाय कसलाही पर्याय नव्हता. पाऊस येत होता. ही पाखरं उगवत होती. त्यांना मी कागदावर जागा देत होतो. बघू पुढे काय होईल ते होईल, असा विचार करून त्यांना कागदावर मुक्काम करण्यास जागा देत होतो.
परंतु पुढचा खर्डा करताना ही अनावश्यक वाटणारी भाऊगर्दीच महत्त्वाची ठरली. कारण जर त्यांना जन्मण्याचा हक्क आहे तर मग जगण्याचा पण हक्क आहे. परंतु ती काही काळ लाईटभोवती फिरत राहतात, थोड्या काळाने पंख गळून ती मरूनही पडतात. अनेक बेडून चिरडून जातात. या सगळ्यांचा तसा काहीच दोष नसतो. तरी ती मरतात. मारली जातात. तसे या नव्या विश्वात जन्म घेणार्या माझ्या पात्रांच्या बाबत आणि त्यांच्या भावविश्वाबाबत झाले आहे. त्यांचा जन्म या व्यवस्थेने नाकारला नाही; परंतु त्याचे जगणे मात्र नाकारले आहे. त्यांना कोणी गृहीत धरले नाही. बेडूक-मुंगळ्यासारखे त्यांचे आयुष्य कुचकामी ठरवले गेले आहे. त्यांच्याविषयी कुणालाच काही वाटेनासे झाले आहे. ती अशीच रस्त्याच्या कडेला मरून पडली. ही सगळी फाटकी, अदखलपात्र माणसे कागदावर उतरल्यानंतर मात्र माझ्या अधिकच जवळ वावरायला लागली. आम्हाला व्यकत कर. आम्ही तुला तसे आता कच्चे सोडणार नाही. व्यवस्थेने आम्हाला मारू दे. तुला मात्र मारण्याचा अधिकार नाही. तुझ्या मानगुटीवरून आम्ही आता उतरत नसतो. असा जणू दावाच त्यांनी माडला होता. कितीही खिडक्या बंद केल्या तरी लाईट लागला की घरात किड्यांनी गर्दी करावी तशी ही गर्दी होत होती. नकोशी होती, पण ती हटत नव्हती. खिडक्या-दारे बंद करूनही ती घुसत होती. मग त्यांना मी कागदावर जागा देत गेलो. कागद भरत गेले. पोतडी रिती होत होती. पुन्हा भरत होती. तो वेग मलाच चकित करणारा होता.
२६ मे,२०१२ : या दिवशी तब्बल ३६ पाने लिहून झाली. ह्या कथेला पाय फुटले. लेखनाची एक झिंग तयार झाली. पात्र, प्रसंग, वातावरण स्थल या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येत गेल्या. त्या मी नोंदवत गेलो. ही कथा पुढे सरकवण्याआधी मी मग राघव- उर्मिला, मनोज जावळे, चिंतामण गावडे, उत्तमराव शेंडेपाटील त्याचा मुलगा अमरसिंह अशी डायरीच्या मागे पात्रांची नावे, त्यांचे व्यवसाय व त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध लिहून ठेवले. हे का लिहिले तर वाहन व्यवसायाच्या निमिताने मला वाहनतळ उभा करायचा होता. तर पतसंस्थेच्या निमित्ताने मला इतर काही गोष्टी निर्माण करायच्या होत्या. असे साधारण धूसर चित्र माझ्या मन:पटलावर नोंदले जात होते. कादंबरी नाही परंतु दीर्घकथा होईल असे वाटत होते. मग वाहनतळ आकाराला आला. माळ आणि टेकडी आली. उर्मिलाच्या निमित्ताने गजाननपंत आले. त्यांचा व्यवसाय आणि मग कुटुंब आले. येथेच मला कादंबरीचे बीज सापडले. ते आधीच पेरले गेले असावे. परंतु ते जमिनीच्या वर उगवून न आल्यामुळे मला दिसत नव्हते. परंतु पंताच्या रूपाने माझी ही कथा पूर्ण बदलून गेली. ती अधिक वेगळ्या बाजूने आकार घेऊ लागली. एका बीजाला दाणे लागताना असंख्य दाण्यांनी कणीस बहरून जावे, तसे या कथाबीजाचे झाले. कथेच्या शक्यता पुसल्या गेल्या. आणि मोठाच्या मोठा पट माझ्या मेंदूत उलगडत गेला. कादंबरीचा अवकाश स्वच्छपणे आकाराला आला. तो पट साधारण असा होता :
पंत > त्यांनी वनातल्या मंदिराचे पुजारीपण मिळवणे > त्यांचा धर्म आणि त्याचा केला जाणारा वापर > सरकारी भूखंड > तो घशात घालणे > त्यासाठी उत्तमरावांसारखा माणूस सोबत घेणे > हद्दवाढ > पतसंस्थाचे पेव फुटणे > विनाअनुदानित शिक्षणव्यवस्था > जातवाद > मंदिराचा जीर्णोद्धार > भोंगळ अध्यात्म > पर्यावरण > शेती > राजकारण आणि त्यासाठी सामान्यांचा केला जाणारा वापर > जागतिकीकरण आणि अर्थकारण. या मोठ्या पटावर ही कथा आपोआप गेली.
सामाजिक वास्तव वगैरे :
कादंबरी हा व्यापक अवकाश कवेत घेणारा पट असल्याने त्यामध्ये सामाजिक वास्तव येणारच. तसे अनेक वास्तवाचे तपशील सभोवती आकारत होते. त्यातला पतसंस्था हा एक महत्त्वाचा वासवाचा भाग होता. जागतिकीकरण नेमके नव्वदला आले असले तरी ते गाव पातळीवर पोचायला एकविसावे शतक उगवावे लागले आहे. असे असले तरी गाव- शहरांची आर्थिक आणि सामाजिक घडी मात्र बदलत होती. दूधव्यवसायाच्या आणि बागायती क्षेत्रात वाढ होण्याच्या कारणाने थोडाफार पैसा मार्केटमध्ये खेळत होता. त्यातही रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी मिळत गेल्या आणि अर्थकारण बदलत गेले. हे सगळे घडत असताना अचानक १९९५ नंतर पश्चिम महाराष्ट्रात पतसंस्थांचे पेव फुटले. ते इतके वेगाने फोफावले की, खासगी सावकारांनी पतसंस्था उघडल्या. त्या कमी की काय म्हणून नोकरदार वर्गाने आपापल्या गटांच्या पतसंस्था काढल्या. म्हणजे सेवकांच्या पतसंस्था. त्यांचाही मोठाच बाजार निर्माण झाला. त्याला जोडून पुन्हा बचतगटांचे पेव फुटले. हे सगळे वेगाने घडत होते. माझ्या परिसरात बारलोणी म्हणून गाव आहे. त्या पाच हजार लोकवस्तीच्या गावात किमान पंधरा पतसंस्था उघडल्या गेल्या. त्यातल्या एकेका पतसंस्थेच्या दोन पासून दहापर्यंत शाखा जन्माला आल्या. त्या शाखा जन्मत होत्या. विकसत होत्या. प्रत्येक शाखेच्या इमारती उभारत होत्या. कर्मचारी भरती होत होती. हे कर्मचारी पिग्मीच्या रूपाने पतसंस्थेत सामान्य माणसांचा पैसा आणून टाकत होती. चेअरमन मंडळी दहा- दहा लाखांच्या गाडीत फिरत होती. जमीन, जागा, सोने तारण ठेऊन कर्ज वाटप होत होते. लग्नासारख्या विधीत संचालक आणि चेअरमन लाखो रूपये उधळत होते. लोकं पहात होती. डोळे दिपवून घेत होती. गप्प बसत होती. गरज पडली की, पतसंस्थांकडून कर्ज उचलत होती. पण इतका पैसा कुठून आला? चेअरमन इतकी संपत्ती कुठून गोळा करू लागले? जमिनी कशा खरेदी करू लागले? असे प्रश्न कुणाला पडत नव्हते. काळ्या पैशाला पांढरा करून देण्याचा हा धंदा इतका तेजीत होता की, राष्ट्रीयीकृत बँका त्यांच्यापुढे झक मारत होत्या.
अर्थकारणाने चंगळवादी चेहरा धारण केला होता. वीज कनेक्शन नसलेल्या झोपडीतही डेक, टेप, टी. व्ही. झळकत होते. दारात दोनचाकी उभ्या होत्या. लोकं कर्ज काढायला आणि पतसंस्था करज द्यायला बिलकूल मागेपुढे पहात नव्हत्या. सगळा खासगी सावकारीचा प्रकार. पैसा मार्केटमध्ये फिरत होता. लग्नात सत्कारांच्या आणि जेवणांच्या पंगतीच्या पंगती उठत होत्या. हे सगळे मी जवळून बघत होतो. अनेकांच्या लग्नाला जात होतो. उद्याचा इनव्हेस्टर आणि प्राध्यापक म्हणून मीही सत्कार घेत होतो. लग्नातला बडेजाव आणि पुढार्यांचा वावर पाहून चकित होत होतो. गर्भगळीत होत होतो. मला कशाचाच अर्थ लागत नव्हता. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत गावी गेल्यावर दुपारच्या वेळी माढ्याला आणि कुर्डूवाडीला गेलो की, दिवस दिवस पर्तसंस्थेत बसून काढत होतो. माझे टेलरिंगमधले मित्र पिग्मी गोळा करत होते. भावकीतले एक-दोघे शाखा मॅनेजर होते. त्यांच्यासोबत मी सुटी घालवत होतो. त्यांचे व्यवहार, वसुली, मालकांचे वर्तन, अनिर्बंध सत्ता आणि त्याचा स्वार्थासाठी चाललेला वापर जवळून पाहत होतो. कदाचित यातून नवे काही आकारेल, अर्थकारण सुधारेल असा आशावाद मी बाळगून होतो.
परंतु अचानक केंद्र सरकारने २००६ च्या आगेमागे शेतकर्यांना बाहत्तर हजार कोटींची कर्जमाफी केली आणि टाचणी लागून फुगा फुटावा तसा पतसंस्थांचा फुगा फुटला. बघता-बघता तीनेक वर्षात सगळ्या पतसंस्था भुईसपाट हऊन गेल्या. मालक देशोधडीला लागले. मालमत्ता जप्त झाल्या. बारलोणीत तर या प्रकरणातून खून झाला. संचालकांवर केसेस दाखल झाल्या. अनेक गरीब लोकानी पोटाला चिमटा घेऊन दोन पैसे जादा व्याज मिळते म्हणून ठेवलेल्या किडूकमिडूक रकमा बुडाल्या. अनेकांनी कर्ज बुडवले. शासनाने पतसंस्थाचेही कर्ज भरावे असा दुराग्रह धरला गेला. त्यामुळे वसुल्या थांबल्या. लोकं कोर्टाच्या पायर्या चढू लागले. नोकर्या गेल्या. त्यात माझ्या भावकीतल्या दोघांच्याही निकर्या तर गेल्याच. परंतु त्यांच्या भरोशावर ठेवलेल्या रकमा बुडाल्या. त्यात माझ्या चुलत्याचेही पैसे बुडाले. या पोरांना गावात जाणे मुश्कील झाले. मग काही वेळा पदर भरपाई द्यावी लागली. पण त्यांच्याकडे तरी काय होते? एक मोठा फुगा फुगून फुगून फुटून गेला होता. सगळे चारचाकीतले मालक कुठे गेले कुणालाच माहीत झाले नाही. भूकंपाखाली सगळे गडप व्हावे, तसे हे पतसंस्था प्रकरण गडप होऊन गेले. पण त्यात अनेकांचे संसार धुळीला मिळाले.
केवळ पतसंस्था म्हणून नव्हे तर एकूण जागतिकीकरणानंतरच्या शहर आणि शहरालगतच्या गावांचा जो जो आर्थिक चेहरा बदलून गेला होता, तो अधोरेखित करावा असे मला खूप दिवस वाटत होते. तसा थोडा काही भाग आगळ आला आहे, परंतु त्याला कौटुंबिक संदर्भ अधिक आहे. त्याचे सार्वत्रिक स्वरूप काय आहे, हे नोंद करावे , असे वाटत आलेहोते, त्याला या लेखनाच्या रूपाने वाट मिळाली होती.
२७ मे,२०१२ : कथेला वेगळीच पायवाट फुटली. चक्क माझ्याकडून ३२ पाने लिहून झाली. उत्तमराव शेंडे पाटलांच्या बायकोच्या म्हणजे शेवंताबाईच्या निमित्ताने तिची आई उभी करावी वाटली. आणि इथे मला कादंबरीच्या दुसर्या विस्ताराचे बीज सापडले. मग ही आई उभी करताना उत्तमराव आणि त्याचा मुलगा, पतसंस्था, पंत आणि त्याची देवदेवस्की, त्यांचा मुलगा असे सगळे उभा राहिले. यातली ही काही मधयमवर्गीय पात्रेही आपापल्या ताकदीने मानगुटीवर बसून राहू लागली. त्यांचा एकमेकांशी मग आपोआप संघर्ष होत गेला. कारण राघवसारख्या सामान्य माणसाला जगणे महत्त्वाचे होते. तर पंत- उत्तमरावांसारख्याना पैसा गोळा करून श्रीमंत होणे महत्त्वाचे होते. त्यासाठी ती वाट्टेल त्या थराला जायला तयार होती. त्यांच्या धारणा बदलण्याचा मला अधिकार राहिला नव्हता. कथा वेगाने पुढे सरकत होती. पेन थांबत नव्हता. मेंदू अत्यंत वेगवान बनला होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मी लिहीत बसत होतो. अधूनमधून कॉफी येतच होती. तरतरी येत होती. वेदनेला गोळी मारून मी लिहीत होतो.
तोल सांभाळणारे प्रकरण :
शेवंताच्या आईच्या निमित्ताने कादंबरीच्या आशयाचा तोल सांभाळला जाणार होता. खरं तर शेवतांच्या आईचे पात्र डोक्यात नव्हते. पण आमच्या कॉलेजचा एनेसेसचा कॅम्प सुर्ली या गावी गेला होता. तिथे कदम नावाचे एक एकत्र राहणारे कुटुंब आहे. चार भावांचे हे कुटुंब त्यांच्या आईने एकत्र बांधून ठेवले होते. त्यांचा एक मुलगा माझ्या कॉलेजला शिकत होता. त्यासाठीचा तिचा संघर्ष मोठा आहे. धरणग्रस्त असलेल्या कुटुंबाची धुरा सांभाळताना एक स्त्री किती ताकदीने घर उभे करते, याचा उत्तम नमुना म्हणून त्या माऊलीकडे पहायला हवे. तिने केवळ घर उभे केले नाही तर त्या घराला सोनेरी दिवस दाखवले. ती माऊली माझ्या मनात घर करून होती. स्त्री भक्कमपणे उभी राहू शकते, तिच्यात नवनिर्माणाच्या खूप शक्यता आहेत, असे मला सतत वाटत आले आहे. त्या शक्यतांचा शोध घ्यावा ही जाणीव या लेखनात उपयोगी पडली आहे. स्त्रीच्या चिवटतेने आणि जैविक स्तरावरील टिकून राहण्याच्या प्रवृत्तीने कुटुंब उभारणीत मोठा वाटा उचलला आहे. स्त्रीला मोकळा स्वतंत्र स्पेस मिळाला तर ती आर्थिक नियोजन तसेच पूर्ण व्यवस्थापन उत्तम रीतीने करू शकते, हे त्या कुटुंबाने सिद्ध करून दाखवले होते. चहा घेण्याच्या निमित्ताने त्या कुटुंबाला भेट दिली आहे. त्याचबरोबर करमाळ्याला नोकरीच्या निमित्ताने उजनी धरणात गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. त्या लोकांच्या पुनर्वसित गावांना अनेक्दा जान्याचा योग आला आला आहे. ते पुन्हा अधिक वेगळे आहे. त्यांच्या व्यथा- वेदना ऐकताना आजही मन सुन्न होऊन जाते. तेही आणखी बरेच काही मनात तसेच साठून आहे. त्यातला खूप थोडा भाग येथे आला आहे. कादंबरीच्या बांधणीचा तोल सांभाळण्यापुरते हे प्रकरण कल्पित रुपांत येथे अवतरले आहे.
शेवंताची आई जशी अचानक जन्मली आणि आशयाची बाजू भक्कम झाली; तशीच बाजू शिवाजीराव यांनी तोलून धरली आहे. शिवाजीराव काळे हेही अचानक कादंबरीत अवतरले आहेत. त्यांच्या उभारणीची तर बिलकूल शक्यता नव्हती. परंतु राघवची बदली करण्यासाठी ज्या गावात त्याला टाकले, त्या गावाने शिवाजीराव यांना जन्म दिला आहे. त्यांनी कादंबरीच्या अर्थकारणाच्या आणि संस्कृतिकारणच्या चित्रणाचा बराच तोल सांभाळला आहे. त्यामुळे पतसंस्था प्रकरण सविस्तरपणे चित्रित झाले आहे.
याच दरम्यान माझ्या घराचे बांधकाम सुरू झाले होते. मी गावाकडे, करमाळ्याला आणि टेंभुर्णीत अशी तीन घरे बांधली होती. तेवढे कमी की काय म्हणून मला आमच्या कॉलेजचे बांधकामही बघावे लागत होते. त्यातच माझे गावाकडचे घर माझ्या चुलतभावाने तर करमाळा, टेंभुर्णीतील घर बांधायला मला माझा मित्र रफीक सूरजने खूप सहकार्य केले आहे. त्याचे बरेच अनुभव माझ्या गाठीशी असल्याने आणि ते स्वस्थ बसू देत नसल्याने मनोज जावळेच्या रूपाने ते व्यक्त झाले आहेत. हा तरूण बांधकाम व्यवसायात उभा राहू पाहतोय, असे चित्र मी निर्माण केले. त्याचे पुढे काय होईल हे मला माहीत नव्हते. परंतु त्या निमित्ताने हे सगळे नोंदवावे असे वाटले होते.
२८मे,२०१२ : २६ पाने लिहून झाली. या दरम्यान मी गझला ऐकत लिहीत होतो. तर जगजीतने गायलेल्या अनेक गझला मी येथे उतरून काढल्या. त्या राघवच्या मानसिकतेला नेमका न्याय देत असल्याने उपयोगी पडल्या आहेत. मनोज, चिंतामण, वाहनतळ आणि अमर यांचे तपशील यादरम्यान उतरून झाले आहेत. या दरम्यान अर्थकारणाच्या अनुषंगाने बरेच बदल देशपातळीवर घडत होते. जेडीपी टिकवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मनमोहनसिंग सरकार त्यात यशस्वी झाले होते. तरी अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी थेट केळकर यांची लोकसत्तातली मुलाखतच सारांशरूपाने मी येथे लिहून ठेवली. तिचे पुढे काय करायचे काही माहीत नव्हते. पण ती पतसंस्थेला जोडून घेण्यात यश आले. त्या संदर्भातली काही टिपणे मी बाजूला काढून ठेवली होती.
२९मे,२०१२: ३० पाने लिहून झाली. प्लॉटिंग आणि त्यातले धर्मकारण, राजकारण, दिगंबररावांचा प्रवेश, अमरचे लग्न, उत्तमराव, पंतांची भेट, असे काही तपशील मला येथे भरावे लागले. मागील पाच दिवसांत तब्बल १४९ पाने लिहून झाली होती. शिवाजीराव यांची वाढ आणी राघव-शिवाजीराव तेढ. त्यातून जन्मलेला विसंवाद.
३० मे,२०१२ : ०५ पाने लेखन. थांबलेपण जाणवत आहे. पुढची वाट दिसत नाही.
३१मे,२०१२: १२ पाने लेखन. या दरम्यान सगळा झरा आटून गेल्यासारखा झाला असावा. कारण लेखनाची गती थांबली होती. जे मेंदूत उगवत होते, ते वेगाने संपले होते. कादंबरीचा गाभा उअतरून झाला होता. प्रचंड शारीरिक थकवा जाणवत होता. परंतु मनाचा उत्साह मात्र टिकला होत. तरीही झर्यातले पाणी आटल्यामुळे तहान भागवण्यासाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की, लेखनाचा वेग मंदावला होता. परंतु तो थांबला नव्हता.
०१ जून, २०१२ : दीड पान लेखन झाले आहे फक्त.
०२ जून, २०१२ : २३ पाने लिहून झाली. उत्तमरावांच्या पतसंस्थेचे निवडणूक प्रकरण
०४ जून, २०१२ : ०९ पाने. कथानक पुढे सरकवण्याची प्रक्रिया होताना दिसते. किरकोळ तपशील भरले आहेत.
०५ जून, २०१२ : अर्धा पान. काहीच नाही.
०६जून,२०१२: २५ पाने. आश्रमशाळा इमारत उभारणी प्रकरण, मंदिर विस्तार, सभामंडप, वनजमीन ट्रस्टच्या नावाने करण्याचे प्रकरण. तसेच राघवचा मानसिक प्रवास. चिंतामणचे प्लॉट प्रकरण आणि त्याचे बाळूमामाच्या नादी लागणे, व्यवसायातील चढउतार आणि त्यातून त्याचे संसारातून लक्ष उडणे.
०७जून,२०१२: ३५ पाने लिहून झाली. उर्मिलाचे नोकरी प्रकरण. तिच्या नोकरीसाठी पैसे भरण्याचा निर्माण झालेला प्रश्न. आश्रमशाळेची संस्थेच्या सदस्य बदलांचे आवर्तन. त्यातून निर्माण झालेला पेच. उत्तमराव आणि पंत यांच्यात झालेले मतभेद. त्याचा त्यांच्या संबंधावर झालेला परिणाम. त्यामुळे उर्मिलाच्या अडचणीत झालेली वाढ. हे सगळे सलग लिहून झाले.
०८जून,२०१२: २५ पाने लिहून झाली आहेत. कादंबरीच्या समारोपाच्या शक्यतांच्या दिशेने लेखन निघाले आहे. उर्मिलाचा प्रश्न मार्गी लागतो आहे. राघवच्या केसचा निकाल त्याच्या बाजूने लागल्याने त्याने एक मोठी लढाई जिंकल्याने त्याला एक नवे बळ मिळाले. त्या बळावर तो पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करनार आहे. तर इकडे अमरने उर्मिलाला सोडण्याची अट घातली आहे.
०९ जून, २०१२ : १० पाने. राघवने बळ बांधले आहे, तर उर्मिला घर सोडून निघते. कादंबरी येथे संपते.
पहिला खर्डा हा खर्या अर्थाने २४ मे ते ९ जून, २०१२ या अवघ्या सतरा दिवसात आणि १३ मे चा एक दिवस पकडला तर १८ दिवसात पूर्ण केला आहे. त्यातही पुन्हा मध्येच काही दिवस काहीच लिहिलेले नाही. याचा अर्थ हा पहिला खर्डा केवळ पंधरा दिवसांत पूर्ण झाला आहे. त्याच्या सगळ्या नोंदी उपलब्ध आहेत. हा खर्डा पूर्ण झाला आणि ती डायरी थेट घरात आणून ठेवली. काही महिने तरी तिला कसलाही हात लावायचा नाही. ते पूर्ण विसरून जायचे असे मनाशी पक्के ठरवून टाकले होते. तसे केलेही. दरम्यान नवीन वर्ष सुरू झाले. महाविद्यालय भरून गेले. त्या कामात अधिक व्यस्त होत गेलो. उर्वरित २०१२ आणि २०१३ या वर्षात या बाडाला कसलाही हात लागला नाही. लावला नाही. तिन्ही कादंबर्याच्या बाबतीत हे पथ्य मी पाळले आहे. पहिला खर्डा झाल्यावर किमान वर्षभर तरी तो बाजूला ठेऊन, तो पूर्णपणे विसरून जातो. या स्क्रीप्टच्या बाबतीतही जाणीवपूर्वक तसे केले आहे.
दुसरा खर्डा आणि डायरीतील नोंदी :
मुख्य खर्डा लिहून झाल्यानंतर पुन्हा ह्या बाडाला कधी हात लागला असावा, याचा मी जेव्हा शोध घ्यायला लागलो. तेव्हा मला माझ्या डायरीत काही नोंदी सापडल्या आहेत. या खर्ड्याच्या अनुषंगाने मला पहिली नवी नोंद डायरीत सापडली ती २५ एप्रिल, २०१४ ला. ती अशी आहे : कादंबरी लेखनाला (पुनर्लेखन) सुरुवात केलीय. एवढ्या एकाच ओळीची ही नोंद आहे.
म्हणजे तब्बल दोन वर्षे मी त्या बाडाला कसलाही हात लावला नाही. ते सगळे मी विसरून गेलो होतो. परंतु या नोंदीशिवाय २०१४ च्या डायरीत पुन्हा त्या संदर्भात कसलीही नोंद नाही. एप्रिल १४ ते फेब्रुवारी १५ च्या दरम्यान दहा महिन्यात कादंबरीवर काही काम झाले असेल असे वाटत नाही. कारण थेट नंतर जी नोंद सापडते ती ३ फेब्रुवारी २०१५ ची. ती अशी आहे : टाकळीला (तेथे आमच्या संस्थेचे एक हायस्कूल आहे.) जाऊन आलो. दुपारी कॉलेजला जाऊन कादंबरी लिहायला बसलो. २० मार्च, २०१५ : कादंबरी लेखन सुरूय.
२२ एप्रिल, २०१५ : दुपारी कादंबरीचे लेखन सुरू केले. पण फारच गरम होत होतं. दमच निघेना. मी घरी गेलो. २४ एप्रिल, २०१५ : लेखन सुरूय. पण वेग पकडत नाही.
०२ डिसेंबर,२०१५ : कादंबरी लेखन सुरू. परंतु ते लेखन सलग होताना दिसत नाही. बहुतेक पुनर्लेखन करताना सलगता राहिली नाही. हा दुसरा खर्डा मे, २०१६ च्या आसपास पूर्ण झाल्यावर रफीक सूरज, गिरीश मोरे, राजेंद्र दास आणी दत्ता घोलप यांना वाचायला दिला. हा पक्का हस्तलिखित खर्डा १९४ (A4 size) पानांचा झाला. माझे हस्ताक्षर लहान असल्याने तो डीटीपी करताना २५० पानांच्या पुढे जाणार असा अंदाज होता.
तिसरा खर्डा अर्थात डीटीपी :
०८ मार्च, २०१७ : कादंबरीचे डीटीपी सुरू केले. १३ मार्च, २०१७ : डीटीपी सुरु आहे.
२९ मार्च, २०१७ : कादंबरीचे टायपिंग सुरू आहे. १६ एप्रिल, २०१७ : पहिले डीटीपी पूर्ण (उपाधीचे बीज)
०१ नोव्हेंबर, २०१७ : दुरुस्त्या सुरू आहेत. ०८ नोव्हेंबर, २०१७ : दुरुस्त्या पूर्ण केल्या. फायनल प्रत तयार केली. २३ ऑक्टोबर,२०१७ : कादंबरीच्या दुरुस्त्या सुरू आहेत.
१७ नोव्हेंबर,२०१७ : लोकवाड्.मयशी चर्चा. तसेच विजय चोरमारे यांच्याशी चर्चा. लोकवाड्.मयला देण्याबाबत एकमत. त्या अनुषंगाने सतीश काळसेकर सरांशी बोललो. तर ते आता फार लक्ष देत नसल्याबाबत बोलले. नंतर जयप्रकाश सावंत सरांशी बोललो. पाठवून दे स्क्रीप्ट म्हणून होकार आला.
२१ नोव्हेंबर, २०१७ : जिभाळी, तणस, तणसडीचे दिवस, आटोळा, कोलदांडा, भानवस, मोगरसूल, चिमणचारा, पिगमी या नावांची साधारण चर्चा करत होतो. मोगरसूल, उपाधीचे बीज आणि तणस यावर अधिक लक्ष होते. परंतु शेवटी ‘तणस’ हे शीर्षक फायनल केले. पुन्हा त्या शीर्षकाच्या अनुषंगाने काही बदल मूळ स्क्रीप्ट मध्ये करून घेतले, आणि प्रत पाठवून दिली.
लोकवाड्.मयकडे हे स्क्रीप्ट जवळपास १६ महिने पडून होते. कुणीच दखल घेत नव्हते. शेवटी फायनल काही तरी कळवा असे म्हटल्यानंतर सावंत सरांनी लक्ष घातले. मग दोनेक महिन्यात कादंबरीचे मार्गी लागले. स्क्रीप्ट ज्यांना वाचायला दिले होते. त्यांचा अपघात झाल्यामुळे ते अडकून पडले होते. नंतर कामाने वेग घेतला.
२० एप्रिल,२०१९ : तणसची प्रूफं प्राप्त झालीयेत.
०६ मे, २०१९ : तणसची प्रूफं तपासून पाठवली. त्यातही अंतिम टप्प्यात मुखपृष्ठ फायनल होत नव्हते. शेवटी संदेश भंडारे यांनी त्यात लक्ष घालून ते काम मार्गी लावले.
२४ जून, २०१९ : तणस प्रकाशित झाली.
माझ्या डायरीत या काही नोंदी कादंबरीबाबत सापडल्या आहेत. अर्थात त्या काही जाणीवपूर्वक केल्या आहेत सगळ्या नोंदी असे नाही. कारण प्रशासकीय डायरी लिहिताना माझ्या व्यक्तिगत नोंदी, ज्या मला महत्त्वाच्या वाटतात, त्याही करून ठेवत असतो. तत अशा नोंदींमधून या काही नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी यासाठी महत्वाच्या आहेत की, कादंबरी लिहिताना किती काळ जातो अथवा घालावावा लागतो? तिच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? शारीरिक आणि मानसिक त्रास किती होतो? याची उत्तरे जशी यातून मिळतील तशीच नेमकी कादंबरी तयार कशी होते? याचीही काही उत्तरे सापडत जातील. ती सगळी उत्तरे जशीच्या तशी सापडतील आणि तणसची प्रक्रिया पूर्ण पणे समजेल अस नाही. परंतु तरीही काही एक अंदाज बांधता यईल.
डायरीबाहेरीच्या वाटा :
तर साधारणपणे १३ मे, २०१२ ते २४ जून २०१९ असा हा सात वर्षांचा तणसच्या निर्मितीचा प्रवास आहे. या प्रवासात तिच्यात बरेच बदल झाले आहेत. डायरीबाहेरील तिचा प्रवासही अत्यंत गुंतागुंतीचा आहे. पहिला खर्डा ते फायनल स्क्रीप्ट हा प्रावासही तसा साडेपाच वर्षांचा आहे. या प्रवासात निर्मिक म्हणून माझ्याही धारणांमध्ये काही बदल झाले आहेत. राजकीय संदर्भ बदलत होते. मोदी सरकार सत्तेवर आले होते. सभोवतालची परिस्थिती वेगाने बदलत होती. त्या बदलत्या वेगाचा आणि कादंबरीतील मूळ खर्ड्याचा पुन्हा संबंध लावावा लागत होता. त्यासाठी बरेच अभ्यासपूर्वक प्रयत्न करावे लागले. सात वर्षात बरेच बदल झाले होते.
चर्चेचा तपशील :
राजेंद्र दास सर, रफीक, गिरीश आणि दत्ता यांच्याकडे हे स्क्रीप्ट दिल्यावर त्यांनी सवडीने वाचून त्यावर काही प्रतिक्रिया दिल्या. त्या संदर्भात समक्ष कुर्डूवाडीत, कोल्हापुरात आणि हुपरीत स्वतंत्र चर्चेच्या फेर्याही झाल्या. फोनवर चर्चा झाल्या. सविस्तर बोलणे होत होते. त्या अनुषंगाने या काही सूचना आल्या त्या मुद्दाम येथे देतो.हा चर्चेचा कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ असा आहे. त्यातील काही सूचनावजा तपशील उपलब्ध असल्याने तो देणे शक्य आहे :
* कादंबरीचा सुरुवातीचा भाग अप्रतिम मात्र मध्यंतर ढासळतो.
* नातेसंबंधातील तणाव फार उत्तम जमलेत.
* संस्थांतर्गत राजकारण, बदलते गाव नेमके उतरले आहे.
* वाचनीयता टिकवून ठेवली आहे. तरीही त्यावर काम करावे लागेल.
* राघवचे बालपण, त्याचा एकही मित्र येत नाही, हे असे का? राघव नाव कसे वाटते बघ.
* मनोजचे आणि अध्यक्षाचे पुढ काय झाले कळत नाही. उर्मिला नीट उभी रहात नाही.
* अमरची आई विकसित होत नाही. कौटुंबिक संघर्ष अचानक आल्यासारखा वाटतो का?
* शेवट नकारात्मक का? वर्तमानात काहीच चांगले, सृजनशील घडत नाही का?
* राघव- उर्मिला प्रकरण अधिक रोमँटिक झाल्यासारखे वाटते आहे, त्यावर काम करायला हवे.
* मध्यंतरात तू विनाकरण अधिक हळवा झाल्यासारखा वाटतोस, ते जरा नीट बघ.
* कालावकाशाची आणखी नीट मांडणी करून रूपबंधावर काम करायला हवे.
* फिक्शनच्या निमित्ताने येणारा जो भाग आहे, तो आणखी बदलता येण्यासारखा आहे.
* कंटाळवाणे तपशील जे आले आहेत, ते आवश्यक आहेत का?
* तुला काय म्हणायचे आहे, ते नेमके तुला कळए आहे काय?
अशा काही लेखी सूचना दिल्या होत्या. समक्ष अनेक गोष्टींवर बोललो होतो. हुपरीत एका चांदण्या रात्री टेरेसवर पहाटे साडेतीन पर्यंत मी आणि रफीक चर्चा करीत होतो. या सगळ्या चर्चा गृहीत धरून बरेच बदल करावे लागणार होते. ते आवश्यकही होते.
दरम्यानचा अवकाश :
कादंबरीच्या सोबत दैनंदिन जगण्याचा आणि बाकी कामकाजाचा गाडा समांतरपणे चालतच होता. तरीही या दरम्यानच्या अवकाशात मागची काही कामे पुढे येत होती. ती मी हातावेगळी करीत होतो. त्यात मध्येच मी ‘कवितेचे वर्तमान’चे स्क्रीप्ट तयार करून दर्या प्रकाशनाकडे पाठवले. याच दरम्यान २०१४ मध्ये काही काळ लोकसत्ताला आणि दिव्य मराठीला लेख लिहिले आहेत. त्यापूर्वी मी कृषिवल, महान्यूज, संचारसाठी काहीबाही लिहीत होतो. त्याचेही ‘कोलाहलातील फूलपाखरू’ नावाचे ललित-वैचारिक स्क्रीप्ट तयार करून प्रकाशकाला पाठवून दिले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची भाषाशास्त्रावरील पुस्तिका पूर्ण करून दिली. तसेच ‘तू जाऊन तीन तपं झाली’ हा दीर्घ कवितासंग्रहाचे काम पूर्ण केले. तर ‘कवितेची शैली’ची सुधारित आवृत्ती करण्यासाठी काही लेख बाळासाहेब घोंगडेला पाठवून दिले. त्याचीही आवृत्ती प्रकशित झाली. कवितेचे वर्तमान आणि दीर्घकविताही या दरम्यान प्रकाशित होऊन गेली.
याच दरम्यान २०१८ च्या ‘पर्ण’ या दिवाळी अंकात महावीर जोंधळे यांच्या आग्रहाने ‘उपाधीचे बीज’ या नावाने काही भाग आणि प्रवीण बांदेकर यांच्या ‘नवाक्षर दर्शन’ मध्येही काही भाग प्रकाशित झाला. त्याबद्दल काही प्रतिक्रिया येत होत्या. परंतु अलीकडे चर्चेचा आणि प्रतिक्रियांचा हा अवकाश अधिक कमी होत चालला आहे. तरीही मी तो खर्डा विसरून जाण्याचा आणि पुन्हा त्यावर नव्याने विचार करण्याचा प्रयत्न करत होतो. जेणे करून आपणच आपले लेखन तटस्थपणे तपासू शकू. त्यामुळे तिचा अंतिम आराखडा तयार होत नव्हता. त्यात बदल होत होते. ते करण्यासाठी पुन्हा हाताने लिहिणे कठीण वाटू लागले. त्याची टंकलिखित प्रत तयार करावी असे ठरल्यानंतर मुलगा आविष्कार घरात होता. त्याची दहावीची परीक्षा संपली असल्याने त्याने घरीच तणसची टंकलिखित प्रत तयार करून दिली. त्यामुळे त्यावर पुन्हा काम करणे, बदल करणे अधिक सोपे गेले. हे काम करताना मला स्वत:ला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेता आले. त्यातल्या काही गोष्टी शिकून घेता आल्या. विशेष म्हणजे मी टायपिंग शिकलो. त्यामुळे कादंबरीची अंतिम संहिता करताना या तंत्रज्ञानाचा खूप फायदा झाला आहे. विशेषत: भाषेच्या अंगाने काम करताना याचा अधिक फायदा झाला. अत्यंत नेमकेपणाने बोलायचे झाल्यास शब्दा- शब्दांवर काम करता आले आहे. कॉपी-पेस्ट करणे मजकूर मागे करणे, बदलणे सहज सोपे होऊन गेले. आणी दुरूस्त्या करण्यात एक प्रकारची मजाही घेता आली.
रूपबंधाच्या बांधणीच्या शक्यता : चौथा खर्डा :
दुसरा खर्डा आणि प्रत्यक्ष त्याची तिसरी टंकलिखित प्रत तयार करताना झालेल्या चर्चा हा अंतिम आराखडा तयार करताना उप्योगि पडल्या आहेत. त्याचबरोबर कादंबरीच्या रूपबंधाचा मला असलेला अंदाज अथवा माझ्या डोक्यात घोळत असलेली संकल्पनात्मक बांधणी या अनुषंगाने मी हा चौथा अंतिम आरखडा तयर करण्याचे ठरवले. हे काम सुरू करताना मी स्वतंत्र काही नोंदी करून ठेवल्या होत्या. त्या नोंदी जशा आशयाच्या बाबतीत आहेत, तशाच त्या रुपाच्या बाबतीतही आहेत. या नोंदीसाठी आगळचा अनुभव पाठीशी होता. त्यामुळे मी रूपाच्याबाबत अधिक सजग राहून काम करायचे ठरवत होतो. त्यासाठीच्या काही गोष्टी ठरवत होतो :
आगळ मध्ये संवाद खूप आलेत. ती जमेची बाजू असली तरी आपण या कादंबरीत टाळायला हवेत.
आगळ टाळू म्हटले तरी कौटुंबिक झाली होती. तशी ही कादंबरी होता कामा नये.
आगळ नायक मुद्दाम प्राध्यपक आणि प्रथमपुरूषी निवेदक होता. तो आता ठेवता कामा नये.
आगळच्या किमान एक पाऊल तरी पुढे जाता येत असेल तर लिहू अथवा ते बाड तसेच ठेऊन देऊ.
एक नायकी कादंबरी करायला नको. ती अनेक नायकी आणि अनेक आवाजी करु.
आगळमध्ये भाषिक प्रादेशिकता होती. आता आपण भाषेचा पोत बदलायला हवा.
निवेदनावर अधिक भिस्त ठेऊन कादंबरीची उभारणी करायला हवी.
या कादंबरीचा मुख्य केंद्र हा आर्थिक असायला हवा. ती वेगवेगळ्या स्तरांवर पोचायला हवी.
आपण जरी लेखक म्हणून काही भूमिका घेत असलो तरी ती प्रचारकी होता कामा नये.
भूमिकेचा आवाज खालचा (BelowTone) असायला हवा. तो नाही जाणवला तरी चालेल.
जात, धर्म, राजकीय भूमिका, शोषक-शोषित, स्त्री-पुरुष सहसंबंध यांचा नीट विचार करावा लागेल.
वास्तव आणि कल्पिताची उभारणी करताना वास्तवाचे कल्पितीकरण (fiction) जमायला हवे.
एका वेगळ्या स्तरावर जाणारा नायक उभा करता येईल का?
मानवाची भूसांस्कृतिक निष्ठा आदिबंधाच्या पातळीवर जाऊन तपासता येईल का?
निव्वळ चंगळवाद म्हणजे जागतिकीकरण नव्हे, त्याचे तपशील नीट नोंदवायला हवेत.
भाषिक द्रव्यावर अधिक काम करताना आपल्याच मर्यादा आपल्याला ओलांडता येतील का ?
स्त्रीच्या भावविश्वाकडे जरा तटस्थपणे आणि वेगळ्या अंगाने पाहता येईल का?
दारिद्र्यरेषेला लागून असलेला जो एक मोठाच्या मोठा समूह आपल्या सभोवताली चेहराहीन होऊन वावरतो आहे, त्याचे प्रतिनिधित्व आपल्याला करता येईल का? त्यांच्या जगण्याच्या धडपडीत जात, धर्माचे काय होते? जात आणि धर्माचे आजच्या शोषणाचे रूप काय आहे?
भारतीय स्तरावर आधुनिकता नीट अवतरली आहे का? ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाचे जे शोषण होत आले आहे, त्याला वाचा फोडता येईल का?
आपल्या वर्तनाचा अंदाज न लागणारी पात्र आपणांस उभारता येतील का?
मानवी तळाचा शोध घेताना, अबोध पातळीवर जाऊन काही एक मूल्ययुक्त विश्व उभारेल का?
असे काही प्रश्न कादंबरी लिहिताना डोक्यात होतेच पूर्वी. परंतु पुन्हा फायनल आराखडा करताना वरील चर्चा आणि माझ्या मनात रूपबंधाच्या अनुषंगाने असेलेली एक संकल्पनात्मक प्रतिमा यांच्या संयोगाने मी ही फायनल प्रत तयार करणार होतो. तर ती करण्यासाठी पुन्हा दुसरा खर्डा आणि डीटीपीची प्रत घेऊन कामाला लागलो होतो.
अंतिम फिक्शनची रचना :
ही मांडामांड म्हणजे चौथा आणि अंतिम आराखडा असणार होता. त्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करणे गरजेचे होते. जरी कादंबरीची रूपरेषा ठळक झाली असली तरी तिच्यावर अधिक काम करणे गरजेचे होते. पहिला खर्डा ३०९ पानांचा होता. तो दुसर्यात १९४ पाने झाला. डीटीपी करताना पुन्हा तो १७० पानांचा झाला. कारण तिसर्या खर्ड्यावेळी राघव आणि उर्मिलाच्या अनुषंगाने जो रोमँटिक तपशील आला होता, तो बर्याच अंशी काढून टाकला. म्हणजे ती प्रेमाची कथाच पूर्ण बदलून टाकली. दुसर्या खर्ड्यातली पंचवीसेक पाने काढून टाकली. राघवचे नाव जरा अधिकच मध्यमवर्गीय वाटल्याने त्याच्या सभोवतालाशी ते मॅच होईना (तशी सूचना दत्ता घोलपनेही केली होती.) म्हणून त्याला दिनकर देसाई करून टाकला. तर दिनकर आणि उर्मिलाच्या प्रेमाचे वय निघून गेले होते. म्हणजे तिचे प्रेमात पडण्याचे वय निघून गेले आहे तर ती दिनकरला कशी भेटेल? का भेटेल? ती कथा आशयाशी एकरूप वाटायला हवी, हे दाखवताना मला तिची मूळच्या खर्ड्यातली कथाच बदलून टाकावी लागली.
त्यासाठी तिला सावत्र आई दाखवली (ही सूचना रफीकने केली होती.). या एका नोंदीने तिच्या सार्या कथेचा बाजच बदलून गेला. तिच्या शिक्षणाची आणि त्या निमित्ताने तिची मानसिक कुचंबना कशी झाली, हे सगळे नव्याने लिहावे लागले. त्यासाठी तिला होस्टेलाला ठेवावे लागले, जे की मूळच्या खर्ड्यात नव्हते. ते अर्थात लिहिलेही. त्यामुळे मूळच्या कथेतील बराचसा तपशील येथे बदलला गेला. पुन्हा उर्मिला ही ब्राह्मण कुटुंबातील दाखवली. मूळच्या पंतांच्या राजकारणाची आणि धर्मकारणाची सगळी शक्यता अधोरेखित करताना त्याला समांतर जाणारी परंतु धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करणारी एक व्यक्तिरेखा मला उभी करायची होती, ती उर्मिलेच्या रूपाने केली आहे. त्यातही तिचे नाव पुन्हा रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नीचे म्हणून दिले आहे. त्याचा फायदा दिनकरच्या नेणीवेतील वर्तनाशी तिचे वर्तन जोडताना मला आपोआप झाला आहे. रामायणातील उर्मिला सगळे सहन करते, ही मात्र आपला आतला आवाज जागा ठेवते. ती आजच्या काळाची आहे. म्हणून ती थेट दिनूला लग्नाबद्दल विचारूशकते, यामागे मला शूर्पनखेचा संदर्भ जोडायचा होता. म्हणजे शूर्पनखेने लक्ष्मणाला लग्नाबद्दल अथवा शरीरसंबंधाबद्दल विचारले म्हणून तो शूर्पनखेला कान-नाक कापून विद्रुप करतो. तर दिनकर उर्मिलेचे स्वतंत्र्य जपत तिचा स्वीकार करतो. ही उलटी मांडणी मला करायची होती. म्हणूनच तो तिला टेकडीवर घेऊन गेल्यावर पार्वती, सीता, द्रौपदी, उर्मिला अशा सगळ्यांशी बोलण्याची आणि त्यांच्यात मिसळून जाण्याची विनंती करतो आहे.
उर्मिला ब्राह्मण कुटुंबातील दाखवण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यात असलेले निर्णय स्वातंत्र्य, स्वातंत्र्याबद्दल असलेली त्यांची लवचिकता मला अधोरेखित करायची होती. त्याचबरोबर त्यांची काळाबरोबर चालण्याची वृत्ती, प्रसंगी काळाला मागे टाकून पुढे जाण्याची आणि सोयीचे निर्णय घेण्याची वृत्ती अधोरेखित करायची होती. त्याचवेळी उर्मिला या कथेत एकजीवही व्हायला हवी होती. तशी ती झाली असल्याचे तणस प्रकाशित झाल्यनंतरच्या वाचकांच्या प्रतिक्रियेवरून वाटते आहे.
दिनकर देसाई हा जरा अधांतरी आहे असे मलाही वाटत होते. रफीकनेही ते नोंदवले होते. त्यामुळे मी कादंबरीची सुरुवातच बदलून टाकली. केवळ सुरुवात नव्हे तर मूळचा राघव आणि शेवटाचा दिनकर यात खूप अंतर आहे. त्याचे गाव, बालपण, शिक्षण हा सगळा पट उभा करताना मूळ लेखनातले अनेक संदर्भ बदलून गेले. पहिल्या खर्ड्यात त्याचे कसलेही शैक्षणिक तपशील नव्हते. ते यात घेतले. त्याला असलेले टेकडीचे आकर्षण का वाटते आहे? याचे लॉजिकली उत्तर देताना त्याची स्वत:ची जमीन टेकडीच्या पलीकडे असल्याचे नव्याने नोंदवावे लागले. या नवीन नोंदीमुळे मानसाचे भूमीशी असलेले जैविक नाते, त्याच्या नेणीवेत असलेल्या आणि मागच्या पिढीकडून आलेल्या जैविक बाबी या सगळ्यांचा परिणाम दिनकरवर झाला आहे. शेतीच्या घटनेचा पुढे जाऊन फायदा असा झाला की, अमरच्या आणि दिनूच्या मतभेदाशी जोडता आला. कारण अमरला ती जमीन प्लॉटिंग करण्यासाठी, तीही अत्यल्प दरात हवी होती. यातून जो संघर्ष आकारतो, तो दिनूला कोर्टापर्यंत घेऊन जातो.
त्याचबरोबर त्याची मूळ लेखनात असलेली बेफिकीरी अधिक ठळक करताना, त्याच्या महाविद्यालयीन जीवनातील घडामोडी नोंदवण्यासाठी लडतर क्र.१ ते ५ अशी नव्या लडतरींची रचना अंतिम आराखड्यात उभी केली. ज्यातून त्याचे बेफिकिरीपण व्यक्त झाले. त्याचे वनाकडे जाणे त्याच्या शेतीशी जोडून घेता आले. लहानपणापासून त्याला महादेवाचे भीतियुक्त आकर्षण असणे, त्से भास त्याला लहानपणीच होणे, तरीही तिकडे खेचले जाणे, हे माणसाचे अतर्क्य जगणे मला नोंदवायचे होते. त्यासाठी मूळच्या लेखनांत वनातला मारुती होता. तो बदलून महादेव केला. कारन मारूतीच्या मंदिरातला तो छोटा मारूती मला माझ्या लहानपणी असाच एकदा भर दुपारी हसल्याचा भास झाला होता. त्यामुले आजही त्या ठिकाणी गेले की, काही तरी विचित्र आश्चर्य, भीती, आजचा माझ्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्या संमिश्र भावना जाग्या होतात. ती जागा, त्यामागची ती विहीर आजही मला गूढ वाटते. आता तो सगळा माहोल बागायती जमिनीच्या नावाखाली बदलून गेला आहे. तर ते काही तरी माणसाच्या मेंदूत आहे, असे मला सतत वाटत आले आहे. त्याचा शोध घेताना मग मी ती मूर्ती बदलली. तिथे महादेवाची पिंड घेतली. त्या पिंडीवर दिनूला नाग दिसलेला दाखवला, जो मूळच्या महादेवाच्या गळ्यात आहे. तो जरा वास्तावाच्या जवळ आणता आला. आणखी एका कारनाने मारुती बदलला, तो म्हणजे महादेव हा शेतकर्याचा देव आहे. त्याचे बहुतेक वास्तव्य वनातच असते. तसेच मारुतीपेक्षा अधिक कथा महादेवाच्या आहेत. म्हणून मारुतीचा महादेव केला.
तसेच पुढे जाऊन टेकडीच्या बाजूच्या तळ्याचा, पार्वतीचा आणि दिनूच्या अबोध नेणीवेचा मला संबंध जोडायचा होता. हा वनातला मरूती माझ्या मूळ प्रत्यक्ष होता. ते वन, टेकाड आणि तळे गावाकडचे आहे. परंतु तेवढ्याने त्याला न्याय देता येत नव्हता; म्हणून मी कुर्डूवाडीच्या पूर्वेला पाचेक किमी अंतरावर एक टेकडी आहे. तिला चिंचगाव टेकडी असे म्हणतात. तिचाही समावेश कादंबरीतल्या टेकडीत केला आहे. त्याचबरोबर माझ्या गावी वनातल्या मारूतीचा अत्यंत सुंदर परिसर होता. तो एका मोठ्या सुंदर पाझर तलावाने आणि झाडीने व्यापलेला होता. तिकडे दिवसा एकट्याला जायची भीती वाटायची, इतकी किर्र झाडी हिती. तसेच बार्शीला जाताना खांडवीच्या दक्षिणेला एक जोतिबाचे मंदिर आहे. जोतीबा कुलदैवत असल्याने तिकडे कधी तरी गेलो आहे. त्याच्या मोकळेपणचेही मला आकर्षण वाटते. तोही परिसर यात मिसळून गेला आहे. तर या सगळ्यांचे मिळून कादंबरीतील टेकडी, माळ आणि तळे आकारले आहे.
वास्तवातला सगळा भूपरिसर बदलून तो कादंबरीगत वास्तवात बदलून टाकला. त्याचबरोबर मूळ आराखड्यात दिनूचे नसलेले बालपण देताना वनातला महादेव, त्याची शेती, त्याच्या वडलांची नोकरी, त्यानिमित्त त्यांनी गाव सोडणे, नंतर त्यांनी आपल्या भावकीशी आणि गावाशी संबंध न ठेवणे या सगळ्याचा परिणाम दिनूच्या वर्तनावर होतो. त्याचबरोबर त्याचे देसाई हे आडनाव त्याला सतत संशयाचा फायदा कसा देत राहील, हे मी नकळतपणे केले आहे. ते कधी मराठा वाटते, तर कधी ब्राह्मण वाटते, त्यांच्या कुटुंबाची चौकटपण मी संशयास्पद ठेवली. ती तशी का ठेवावी वाटली, हे मला नाही सांगता येणार. परंतु ते कादंबरीच्या अवकाशात चपखल बसून गेले, हे मात्र खरे. माझ्या डोक्यात त्याला कोणत्याही जातीय आणि धार्मिक चौकटीत बसवायचे नव्हते, तेवढे मात्र जमून गेले. त्यासाठीही खूप खाडाखोड आणि मांडामांड करावी लागली आहे. अनेक तपशील पुन्हा पुन्हा तपासून घ्यावे लागले आहेत. काही तपशील डिलीट करावे लागले आहेत. काही नव्याने लिहावे लागले आहेत. (टीप : प्रसाद कुमठेकरला तणस वाचल्यावर हे कुटुंब विधूराचे वाटले आहे. म्हणजे ब्राह्मण वदील आणि आई बहुजन असे ते वाटले आहे. हे या मांडणीचे कौशल्य ठरले आहे.)
दिनकरचे एकुलता एक असण्याने त्याचे लाडात वाढलेले असणे, त्यामुळे शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष असे तपशील नव्याने भरावे लागले. तसेच त्याचा वाचनाचा नाद आणि महादेवाच्या मंदिरातील महाराजाशी झालेली त्याची दोस्ती त्यातून त्याला आपल्याच आत वळून बघण्याची लागलेली सवय हे आपोआप येत गेले.कारण माझ्या मूळच्या वनातल्या मारूतीच्या देवलात कधीतरी एक बुवा येऊन राहू लागला होता. त्याने संसार सोडून दिला होता. त्याला आम्ही गोदडीमहाराज म्हणत असू. तो काही चमत्कार वगैरे करत नव्हता. त्याला कोणीही खायला द्यायचे. ते वन खूप दूर असले तरी अनेक गुराखी त्याला भाकरी घेऊन जायचे. सुटीच्या आम्ही तिकडे गेल्यावर दुपारी त्यांच्याबरोबर गप्पा करत बसायचो. त्यावेळी तो गूढ काही बोलायचा नाही, परंतु असंबद्ध काही बोलतोय, असे मला वाटायचे. आणि का कुणास ठाऊक ते मला आत्मीयतेने बोलायचे. अगदी नंतर मला नोकरी लागल्यावरही एकदा मला ते भेटून गेल्याचे आठवते आहे. त्यांनी नंतर कधी तरी गाव सोडले होते. का सोडले ते कधी कुणाला कळाले नाही.
दिनकरच्या वाढीतला हा विचित्रपणा त्याच्या पुढे जाऊनच्या वर्तनाचा परिणाम ठरला. तो जसा बेफिकीरपणे उर्मिलेला स्वीकारतो. त्याच बेफिकीरीने तो तिच्याकडे दुर्लक्षही करतो. हीच बेफिकीरी त्याच्या लैंगिक वर्तनात आहे. माणसाच्या लैंगिक वर्तनात त्याच्या भूतकालीन घडणीचे काय-काय संदर्भ दडलेले असतात? त्याचबरोबर त्याच्या सेक्सच्या भूकेशी दैनंदिन जग्ण्याचा आणि मानसिकतेचा काही संबंध असतो का? लैंगिक वर्तन ही फारच खाजगी गोष्ट असल्याने त्याचा मानवी मनावर आणि नात्यांवर कसा परिणाम होऊ शकतो, याचाही मला दिनकर-उर्मिलेच्या लैंगिक जीवनासंबंधाने शिध घ्यायचा होता. त्यासाठी दिनकरच्या उभारणीचे सगळे संदर्भ मी नव्याने उभे केले आहेत. त्यासाठी दिनकरच्या नजरेने त्याच्या आईला पान्हा फुटणे आणि त्याची ही नजरच उर्मिला स्पार्क वाटणे. त्यात तिचे गुंतत जाणे आणि फसत जाणे मग ओघानेच आले आहे. दिनकरची बेफिकीरी कायम त्याला तळ्याकाठी घेऊन जाते. ह्याच बेफिकीरीतून तो उर्मिलेला माळावरील त्या दगडावर बसायला लावतो. मातीत बसवून नग्न व्हायला लावतो. ही बेफिकीरी पुढे जाऊन त्याला वेडसर वाटावे असे वर्तन करायला भाग पाडते. तो तसा वेड्यासारखा वागतोही अनेकदा. त्यामुळे त्याच्यावरचा उर्मिलेचा विश्वास आपोआप कमी होत जातो. त्यासाठी मला पुन्हा स्वतंत्रपणे फार काही रचत बसावे लागले नाही.
मग त्याची आणि उर्मिलाची भेट जी मूळात अधिक रोमँटिक झाली होती, ती काढून टाकताना उर्मिलेने आपल्या वडलांच्या व्यवसायाची माहिती विचारणे, त्याचे सतत टेकडीवर जाऊन बसणे पुनरुक्त होऊ नये म्हणून पंतांचा प्लॉटिंगचा व्यवसाय, त्यांचे सरकारी भूखंड देवाच्या नावाखाली घशात घालणे, त्यांच्या शाळेचे प्रकरण. त्यातून पंतांच्या घरात निर्माण झालेला वाद हे विश्व समांतरपणे कादंबरीत विस्तारत गेले आहे. त्यासाठी अनेक तपशील मागे- पुढे झाले आहेत. उर्मिलेला खरे तर तिच्या लग्नासाठी तिला आई नसणे दाखवावे लागले. पण ती एकदा घरात सावत्र ठरली ती ठरलीच. तिच्यावरच्या या सावत्रपणाच्या शिक्क्याचा तिला पुढे नोकरी टिकवताना जो त्रास झाला तो आपोआप आलेला आहे. ती कादंबरीच्या रूपाची मागणी होऊन बसली होती. तिच्याही घडणीत असा वेगळेपणा आला की, त्यामुळे ती कादंबरीच्या शेवटी माझी लेखक म्हणून इच्छा नसतानाही घर सोडून बाहेर पडते. जर मी तिला अमरची अट नाकारून घरात थांबवले असते, तर ते तिच्या मनाविरूद्ध सगळे घडले असते; आणि अख्खा कादंबरीचा डोलारा ढासळला असता. त्या डोलार्यापेक्षा मी लेखक- निवेदक म्हणून तिच्यावर अन्याय केला असता, असे मला आजही वाटते आहे. रफीक म्हणाला होता, कादंबरीचा शेवट नकारात्मक वाटतो आहे, त्यावर काम कर. मी त्यावर काम करताना खूप विचार केला. परंतु मला मार्ग दिसत नव्हता. ज्या बिंदूवर उर्मिला जन्माला आली होती, तिथून तिला मागे नेता येत नव्हते. ते माझ्या हातात राहिले नव्हते. त्यामुळे मूळ खर्ड्यातला शेवट तसाच राहिला आहे. परंतु त्याची नकारात्मकता कमी करण्याचा मार्ग मला सापडला होता, तो दिनकरच्या बाजूने कोर्टाचा लागलेला निकाल. किमान तो सकारात्मक धागा पकडून त्याला फेजच्या बाहेर काढू शकलो होतो. तो एक समांतर सकारात्मक पैलू निर्माण करून नकाराची काळी गडद छाया कमी मी करू शकलो आहे.
मूळ आराखड्यात शिवाजीरावाचा फार विस्तार नव्हता. परंतु या आराखड्यात तो अधिक झाला आहे. पतसंस्थेच्या निमित्ताने मग शिवाजीरावांनी भटक्या लोकांना आपल्या शेतात रहायला जागा देणे आले. त्यांच्यासठी गावाचा विरोध पत्करणे आले. भटक्या लोकांचे काहि इतपशील दास सरांनी बदयायला लावले. ते मला योग्य वाटले. मग मूळच्या आराखड्यात काही बदल करून घेतले. शिवाजीरावांचा मुलगा बाजीराव त्यांना कसा अडचणीत आणतो? तो कसा व्यसनाधिन बनतो? गाववाले त्याला बापाच्या विरूद्ध कसे भडकवतात? बाजीरावची बायको ठामपणे टक्कर देत कशी उभी राहते? हे सगळे घ्यावे लागले. अर्थात हे घेताना कादंबरीच्या आशयाच्या शक्यता अधिक विकसित होत जाताना रूपबंध अधिक मजबूत होत गेला आहे. वर जे मी म्हणालो होतो की, मला स्त्रीचा वेगळा विचार करावयाचा होता. तो करताना अनेक स्त्रिया मी वेगवेगळ्या पर्यावरणात आणि परिस्थितीत टाकून त्या कशा वागतील, हे निरीक्षण करत गेलो. त्यातून जी स्त्री उभारली गेली, ती परिणामकारक झाली आहे. अशीच शेवंताची आईही जन्माला आली आहे. दिगंबरराव पुन्हा अचानक जन्माला आलेले पात्र. ते येण्याचे कारण अमरचे लग्न. कारण अमर हा शिकलेला मुलगा आहे. त्याला राजकारणाचा नाद आहे. त्याला पूरक वाटणारे त्याच्या सासर्याचे पात्र दिगंबररावाच्या रूपाने आलेले आहे. हेच दिगंबरराव अधिक विकसित होत जाताना जावयाला फूस लावून राजकारणात आणतात, आणी अमरच्या विनाशाला जबाबदार होऊन बसतात. राजकारणाचा नाद बहुजनांच्या रकात किती मिस्ळून गेला आहे. त्याने विकृत वळण घेतले तरी त्याला ते कळत कसे नाही, यावर त्यानिमित्ताने काही प्रकाश टाकता आला आहे.
शेवटाचे आख्यान :
असे असले तरी लेखक म्हणून मी कुणाच्या बाजूने उभा आहे, हे महत्त्वाचे होते. त्यासाठी मला काम करायचे होते. तर मला दिनूबरोबर मनोज आणि चिंतामण महत्त्वाचे वाटत होते. खरं तर मी वाहनतळाच्या बाजूने उभा आहे. वाहनतळ हाच माझा आवाज आहे. म्हणून तर मी वाहनतळाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच तळावरील हे तिघे प्रातिनिधिक रूपाने माझ्या समोर होते, त्यांच्या बाजूने मला उभे रहायचे होते. हेच माझे विधान असणार होते. त्यासाठी त्यांच्या शोषणाच्या सगळ्या शक्यता नोंदवून ठेवायच्या होत्या, त्या मी नोंदवल्या आहेत. त्यांच्या बाजूने उभा राहून माझा आवाज मी त्यांच्यात मिसळला आहे. त्यासाठी मनोजचा जन्म खालच्या जातीत झाला असल्यामुळे व्यवस्थेने त्याला जे नाकारलेपण दिले आहे, त्याचा त्याच्या जीवनावर आणि एकूण कुटुंबावर झालेला परिणाम मी दाखवला आहे. तर चिंतामणच्या रूपाने जगण्याचे सगळे पर्याय संपल्यानंतर सामान्य माणूस कसा दैववादी बनवून स्वत:ला फसवत राहतो, यावर फोकस केला आहे.
कादंबरीगत व्यक्तिरेखा, त्यांचे-त्यांचे वर्तन, त्यांचे वातावरण, अवकाश हे सगळे देऊन टाकताना त्यांच्या जगण्याचा आणि वर्तनाचा अंदाज बिलकूल लागू शकणार नाही, असा पवित्रा घेऊन मी हे सगळे उभा केले आहे.कारण आजच्या वर्तमानात कसलाही अंदाज देता येत नाही. एक प्रकारची विचित्र कोंडी झालेली आहे. क्धी काय येऊन आपल्या अंगावर ढासळेत आणि आपले वर्तन काय असेल याचा कसालाही अंदाज न येनारा हा काळ पकडण्यासाठी मी ही अस्थिरता पात्रांच्या वाट्याला देऊन टाकली आहे. त्यानंतर कादंबरीत काळाचे काय करायचे हा प्रश्न होता? तो पहिल्याच खर्ड्यात काही अंशी सुटला होता. जागतिकीकरण, अर्थकारण, त्यात भरडला चाललेला सामान्य माणूस आणि त्याचा कालावकाश मला अधोरेखित करायचा होता. तो करताना केवळ धर्म आणि राजकारण कसे त्यांचे शोषण करतात, यावर केवळ मला बटबटीत रूपांत विधान करायचे नव्हते. त्या सगळ्याला सोबत घेऊन इथली भांडवली व्यवस्था कशी संपूर्ण व्यवस्थाच गिळंकृत करीत निघाली आहे, यावर लक्ष द्यायचे होते. ती लक्ष्यावरची नजर मला हलू द्यायची नव्हती अथवा अधूही होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे मी डीटीपीच्या खर्ड्यावर तीनेक महिने सतत काम करत होतो. घरी आलो की लॅपटॉप घेऊन बसत होतो. वाक्या-वाक्यावर काम करत होतो. या काळात मी डीटीपी झालेला किमान पस्तीसेक पाने मजकूर डिलीट केला आहे. काही नवीन मजकूर टाकला आहे.
कादंबरी अधिक गोळीबंद कशी होईल आणि आपले म्हणणे अधिक नेमके कसे होईल यासाठी धडपडत करत होतो. त्यासाठी निवेदकाच्या दर्शनबिंदूवर लेखक म्हणून मला जागता पहारा ठेवावा लागत होता. तो प्रचारकी होईल की काय? राजकीय व्यक्तीसारखे अथवा चळवळीतल्या माणसासारखे विधान करील अथवा तशी भूमिका घेईल की काय, असे मला सतत वाटत होते. कारण तशा खूप जागा कादंबरीत होत्या. निवेदकाने त्याच्या पद्धतीने त्या जागा घेतल्या असत्या तरी ते रूपबंधाला बाधा आणणारे ठरले नसते. मनोजचा भाऊ जेव्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या डोक्यात अॅट्रॉसिटीचे जे घोळत होते. ते अत्यंत बरोबर होते. त्याचे काहीही चूकत नव्हते. कारण त्याच्या जातीमुळे त्याचे अख्खे आयुष्य वाया गेले होते. त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली होती. परंतु तरीही मी निवेदकावर लक्ष ठेऊन होतो. कारण त्या गुन्ह्यात गावातले जाधव कुटुंब सहजपणे अडकत होते. ते अडकले असते की, कादंबरी वेगळ्या वळणावर गेली असती. तिला चळवळीची उन्मादी आणि प्रचारकी भाषा बोलावी लागली असती. हे कादंबरीतल्या तपशिलावरून सहजपणे लक्षात येत होते. तरी मी निवेदकाला तसे करू दिले नाही.
कारण कादंबरी ज्या खालच्या आवाजात (below tone) बोलत होती, तो आवाज मला बिघडू द्यायचा नव्हता. त्याला प्रचारकीपणा येऊ द्यायचा नव्हता. तीच गोष्ट दिनकरच्या कोर्टाच्या निकालाची होती. त्याला अधिक उन्मत्त बनू द्यायचा नव्हता. म्हणून तो प्रसंग मी उर्मिलेच्या घर सोडण्याच्या प्रसंगाला जोडून घेतला आहे. त्याचबरोबर अमरने केलेली खेळी यशस्वी होईल आणि उर्मिला नोकरी सोडेल असाही एक स्वर कादंबरीतून दिसत असला तरी ती घर सोडते, परंतु नोकरी सोडत नाही. तीच गोष्ट दिनकर आणि उर्मिला यांच्या लग्नाची आहे. तो विवाह थेटपणे आंतरजातीय दाखवून त्यातून वेगळा संघर्ष दाखवता आला असता. जातीय आणि धार्मिक उन्माद किती भयानक रूप धारण करू लागला आहे, हे आज आपण जरी पाहत असलो तरी त्याला संयमाने घेऊन मार्ग काढता येतो, असे काहीसे समीकरण मी निवेदकाला देऊन टाकले असल्यामुळे तो तिथेही आपला आवाज खूप खालचा ठेवतो आहे. अशा अनेक प्रचारकी जागा कादंबरीत आहेत. परंतु त्या तशा झाल्या नाहीत. कारण कादंबरी ज्या सांस्कृतिक हस्तक्षेपाची भूमिका बजावते आणि एका मोठ्या आर्थिक भांडवलदारी व्यवस्थेला कवेत घेण्याचा प्रयतन करते आहे, तो प्रयत्न अशा प्रचारकी आवाजाने फसला असता. म्हणून काही काळजी घेतली गेली आहे.
आर्थिक अंगाने जे काही खाजगीकरण आणि उदारीकरण सुरु आहे, त्यातून जो एक उन्माद सुरू झाला आहे, त्यात सगळ्याच जाती- धर्माचा, पंथाचा माणूस भरडला जात आहे, हे आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. त्याला तोंड देत सामान्याचा आवाज मोठा करायचा असेल तर सरसकट सामान्य माणूस एका झेंड्याखाली यायला हवा, असा या कादंबरीचा हेतू असल्याने नकाराच्या रांगेत उभे असलेले सगळे आवाज अत्यंत मृदू आहेत. पण म्हणून ती काही बोलत नाही, असे होत नाही. ती काय बोलू पाहते, हे वाचकांनी ठरवायचे आहे. तिचा जो अनेक वाद्यांचा आवाज आहे, तो जर कोरसाच्या आवाजामध्ये कोणाला सापडणार नसेल तर ते कादंबरीचे अपयश असेल. हे यश आहे की आणखी काय, हे ठरवण्याचा अथवा सांगण्याचा अधिकार लेखकाला राहत नाही. लिहून झाले की, त्याचा त्या लेखनावरचा हक्क संपून जातो. तसा तो माझा हक्क २४ जून, २०१९ ला संपला आहे. फक्त मला काय सांगायचे होते, ते मी या आख्यानाच्या रूपाने आपणांसमोर ठेवले आहे. कादंबरीचे मूळचे २२७ पानांचे प्रकाशित आख्यानही आपल्यासमोर आहे. ते सामान्य माणसाच्या खालच्या आवाजात बोलत असेल, कदाचित बोलत नसेल, बोलणार नसेल. मौन पाळून राहणार असेल. त्या आख्यानाचे काय होईल ते मला माहीत नाही. मी तर ते आपल्यापुढे ठेवले आहे. त्याच्या निर्मानाचे आख्यानही मी येथे मांडले आहे. मला जे म्हणायचे होते, ते सगळे सांगून झाले आहे. आता मौन धारण करणे मी पसंत करतो आणि थांबतो
-----------------------
टिप्पण्या