कांडा: आदिमानवाच्या पहिल्या प्राणिमित्राची कथा


 सुनीताराजे पवार यांनी लिहिलेली "कांडा" नुकतीच वाचून संपवली. ही केवळ बालकादंबरी नाही. केवळ प्राणिकथा अथवा प्राणिविश्व  रेखाटणारी कादंबरी नाही. ही केवळ कांडा नावाच्या एका हत्तीची कथा नाही तर तिला अधिक मानवी मूल्याचे व्यापक संदर्भ आहेत. आदिमानवाने आपल्या  विकासाच्या टप्प्यावर पहिल्यांदा हत्तीला माणसाळावले आहे. आणि ही माणसाळावण्याची प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेत घडली आहे. माणूस आणि हत्तीच्या मैत्रीच्या इतिहासाची अत्यंत रोचक उलगडणी द. ग. गोडसे, युवाल नोव्हा हरारी यांनी केली आहे. मानवाच्या विकासात हत्तीचा सहभाग फार महत्त्वाचा राहिला आहे. हेच हत्ती नंतर जगभर पसरले आहेत. हत्तीच्या या विकासपूरक भूमिकेचे पुरावे आजही भारतात आढळतात. मंदिरे, वाडे यांच्या दर्शनी भागावर आजही हत्तीच्या प्रतिमा दिमाखाने कोरल्या जातात. त्या केवळ कोरल्या जात नाहीत तर शुभ सूचक मानल्या जातात. अशा या हत्तीच्या मानवीपणाची कथा म्हणजे "कांडा" ही कादंबरी आहे.

ही कादंबरी अक्षरबंध प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. कांडा या हत्तीच्या बछड्याला दक्षिण आफ्रिकेतून पकडून भारतातल्या त्रावणकोर येथील सुवर्णमंदिरात आणले जाते. या मंदिराच्या वार्षिक उत्सवात हत्तींच्या  रथाची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीसाठी त्याला सगळे धडे देऊन हत्तीच्या सेनापतीपदाचा मान दिला जातो. तो आपले काम पूर्ण क्षमतेने पार पाडत असतो.  

             आफ्रिकेच्या जंगलातून पकडला गेलेला कांडा आईच्या विरहाने व्याकुळ असतो. पण शेवटी तो अनाथ कृष्णाच्या आग्रहाने अन्नाला शिवतो आणि तिथून त्याची शिदम्मा नावाच्या माहुताबरोबर सेनापती पदापर्यंतचा सगळा प्रवास यशस्वीपणे पार पाडतो. सगळे धडे घेतो. त्याच्या या मैत्रीची आणि कांडाच्या माणूसपणाची कथा म्हणजे ही कादंबरी होय. मंदिराच्या पूजेच्या हत्तीच्या सेनापती पदाचा मिळालेला मान आयुष्यभर जपताना; एकवेळ मुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजा असताना त्यांच्यावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा अंदाज कांडाला येतो. त्यामुळे सावध पवित्रा घेऊन, फोटोग्राफरच्या रुपात आलेल्या दहशतवाद्याला मारताना स्वतःचा जीव संपवतो. आणि मुख्यमंत्र्यांना वाचवतो आणि कादंबरी संपते.

      या बालकादंबरीची ही कथा अनेक अर्थाने महत्वाची आहे. हत्तींचे माणूसपण आणि माणसांचे विकृतपण यांच्यातील द्वंद्वावर ही कथा भाष्य करते. त्याचबरोबर मानवानेही आपल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विवंजार करायला हवा, यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी लाखो वर्षांच्या मानवी आणि हत्तींच्या विकासाची कथा नव्याने आपल्यासमोर ठेवते.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट